मुशाफिरी कलाविश्वातली
गेंडा
१५१४
मध्ये गोव्याचा गव्हर्नर होता अल्बुकर्क. गुजरातमधल्या
एका मुझफ्फर शहा (दुसरा) या
सुल्तानाकडं त्यानं आपला दूत पाठवला
होता. त्याला दीवमध्ये किल्ला बांधायचा होता. दूताला सुल्तानानं परवानगी तर दिली नाही.
पण, सुलतान आणि दूत यांनी
एकमेकांना काही भेटवस्तू दिल्या.
सुल्तानानं दूताला दिलेल्या भेटींमध्ये एका गेंड्याचाही समावेश
होता. त्याकाळी राजे मंडळी शौक
म्हणून दूरच्या प्रदेशातील प्राणी पक्षी एकमेकांना भेट/नजराणा द्यायचे हे आपण पूर्वीच
पाहिलं (डोडो
https://dushyantwrites.blogspot.com/2020/02/blog-post_21.html).
अल्बुकर्कनं
हा गेंडा युरोपमध्ये मायदेशी (पोर्तुगाल) पाठवायचं ठरवलं. पोर्तुगालच्या राजा मॅन्युअल याला
हा गेंडा भेट म्हणून पाठवण्याचा
त्याचा मानस होता. या गेंड्याचा सांभाळ
करणाऱ्या माणसालाही तो तिकडं पाठवणार
होता. एका जहाजातुन गेंड्याला
(आणि त्याला सांभाळणाऱ्या माणसाला) पाठवण्यात आलं. अर्थातच व्यापाराचा
भाग म्हणून जहाजात खूप सारे मसालेही
भरले होते. हिंदी महासागरातून प्रवास करत, दक्षिण आफ्रिकेला
वळसा घालून तब्बल चार महिन्यांच्या प्रवासानंतर
हे जहाज पोर्तुगालला पोहोचलं.
पोर्तुगालमधल्या
लोकांना या प्राण्याविषयी प्रचंड
कुतूहल होतं. पोर्तुगालमध्येच काय, पुऱ्या युरोपमध्ये
गेंडा हा प्राणी गेली
हजार वर्षे आला नव्हता. हजार
वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या काळात
गेंड्याचे उल्लेख येत होते. त्यामुळं
प्राचीन ग्रंथांमध्ये येणाऱ्या या प्राण्याभोवती एक
प्रकारचं वलय होतं. या
अद्भुत प्राण्याबद्दल साऱ्या युरोपमध्ये पत्रं पाठवण्यात आली. विद्वान मंडळी
आणि या प्राण्याविषयी कुतूहल
असणारी मंडळी गेंड्याला भेट देण्यासाठी येऊ
लागले.
हजार
वर्षांपूर्वी रोमन लोकांनी लिहून
ठेवल्याप्रमाणे हत्ती आणि गेंडा हे
एकमेकांचे शत्रू होते. पोर्तुगालच्या राजाला ही गोष्ट पडताळून
पाहायची होती. त्यानं एके दिवशी (रविवार,
३ जून १५१५) एक
छोटा हत्ती आणि गेंडा यांच्यात
लढत ठरवली. लिस्बनच्या लोकांना या लढतीचं प्रचंड
आकर्षण होतं. पण प्रत्यक्ष लढतीत
मात्र छोटा हत्ती गेंड्याला
पाहून (किंवा लोकांच्या आवाजमुळं) घाबरून पळून गेला !!
राजा
मॅन्युअलनं हा गेंडा त्या
काळच्या पोपला हा गेंडा भेट
म्हणून द्यायचं ठरवलं. त्यामुळं हा गेंडा आता
पोर्तुगालहून इटलीला भूमध्यसागरातून प्रवास करणार होता. चांदीचं ताट, भारतीय मसाले
आणि सजवलेला गेंडा अशा भेटवस्तूंसह हे
जहाज इटलीकडं डिसेंबर १५१५ मध्ये रवाना
झालं. पण दुर्दैवानं अचानक
आलेल्या वादळामुळं हे जहाज उद्ध्वस्त
झालं. गेंड्याला साखळ्यांनी बांधलं असल्यानं गेंड्याला पोहता आलं नाही. त्यामुळं
गेंड्याचा शेवट झाला.
या काळात जर्मनीमध्ये ड्युरर नावाचा एक कलाकार राहायचा.
लाकडी ठोकळ्यांवर कोरीव काम करून तो
चित्रांचे ठसे बनवायचा. शाई
लावून हा ठसा कागदावर
ठेवला की ते चित्र
कागदावर उमटायचे. लिओनार्दो दा विंचीसह युरोपमधल्या
बऱ्याचशा महान कलाकारांसोबत त्याचा
संपर्क होता. पोर्तुगालमधल्या गेंड्याविषयी जेंव्हा त्याला ऐकायला मिळालं, तेंव्हा गेंड्याचं चित्र छापण्यासाठी लाकडी ठोकळा बनवण्याचे विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. लोकांच्या
मनात गेंड्याविषयी प्रचंड कुतूहल होते. त्यामुळं गेंड्यांच्या चित्रांना चांगली मागणी असणं अपेक्षित होतं.
खरंतर ड्युररनं गेंडा प्रत्यक्षात पाहिलंच नव्हता. पण वाचलेल्या वर्णनावरून
आणि पाहायला मिळालेल्या एका रेखाटनावरून त्यानं
स्वत:च्या कल्पनेनं गेंड्याचं
चित्र छापण्यासाठी एक लाकडी ठोकळा
बनवला.

सोबतच्या
चित्रात आपल्याला ड्युररनं साकारलेला गेंडा दिसतोय. या गेंड्याच्या अनेक
त्रुटी आहेत. उदा. गळ्याचा लोंबणारा
भाग खऱ्याखुऱ्या गेंड्याच्या नसतो. पण त्यानं गेंड्यामध्ये
खूप सारे बारकावे दाखवले
आहेत. ड्युररचा गेंडा खूपच लोकप्रिय झाला.
जवळपास अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंत युरोपमधले लोक ड्युररचं गेंड्यांचं
चित्रण अचूक मानायचे !! गेंड्याचं
चित्र प्रकाशित करताना त्यानं सोबत गेंड्याची लक्षवेधक
अशी माहिती लिहिली. चित्रात गेंड्याच्या चित्रात दिसणाऱ्या मजकुरात असा उल्लेख येतो
:
'... हे
(गेंड्याचे) अचूक चित्रण आहे..
.. त्याचा
आकार जवळपास हत्तीइतका असतो आणि त्याला
कुणी इजा पोहोचवू शकत
नाही.. त्याला नाकावर टोकदार असे शिंग असते
आणि तो ते दगडावर
घासून अजून टोकदार बनवत
असतो.. .. हत्ती
गेंड्याला घाबरतो.. '
ड्युररचं हे
चित्रण इतकं प्रभावी होतं की त्यानं जवळपास पुढची
चार शतकं युरोपमधल्या वेगवेगळ्या
कलाकारांना गेंड्याची कलाकृती बनवण्यासाठी प्रेरणा दिली !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
https://www.artsy.net/show/underdogs-gallery-elephant-vs-rhinoceros
https://www.metmuseum.org/art/collection/search/356497
https://www.carredartistes.com/en/blog/the-history-of-the-durer-rhinoceros-n109
https://www.rct.uk/collection/800198/a-rhinoceros
https://www.artble.com/artists/albrecht_durer/engravings/rhinoceros
https://en.wikipedia.org/wiki/D%C3%BCrer%27s_Rhinoceros
Image Credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:The_Rhinoceros_(NGA_1964.8.697)_enhanced.png
Albrecht Dürer /
Public domain