Saturday, May 30, 2020

पाटणा कलम


मुशाफिरी कलाविश्वातली

पाटणा कलम

मुघल सम्राटांपैकी हुमायून, अकबर आणि जहांगीर यांच्या काळात चित्रकलेला खूप चांगले दिवस आले. हे लोक कलाप्रेमी असल्यानं त्यांच्या कारकिर्दीत कलेला आणि आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळालं. या काळात आपल्याला मुघल चित्रशैलीतले उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. पण यानंतर गादीवर आलेला औरंगजेब हा मात्र थोडासा वेगळा होता. त्याला कलेमध्ये कसलाही रस नव्हता. त्याच्या कारकिर्दीत चित्रकार मंडळींना आपल्या उपजीविकेसाठी दिल्ली सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले. यात काही लोक उत्तरेला पहाडांवर गेले आणि त्यातून पहाडी शैली निर्माण झाली. काही लोक राजस्थानात आले आणि त्यातून राजस्थानी शैली विकसित झाली. याच काळात काही लोक पूर्वेला बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं गेले

मुर्शिदाबाद इथला नवाब मीर जाफर हा कलाप्रेमी होता. याच कारणामुळं मुघल दरबारातले कलाकार मुर्शिदाबाद्ला आले. मीर जाफरच्या प्रोत्साहनामुळं त्यांना चांगले दिवस आले. दरबारामध्ये चित्रकलेचं काम करता करता या चित्रकार मंडळींचा इंग्रज व्यापाऱ्यांशी संबंध येऊ लागला. इंग्रजांशी संवाद साधता साधता इंग्रजांच्या चित्रकलेचाही त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. या काळात मुर्शिदाबाद हे कलेचं एक प्रमुख केंद्र बनलं.
मीर जाफरनंतर त्याचा मुलगा मिराण गादीवर आला. त्याला कलेत काहीएक रस नव्हता. चित्रकार मंडळींवर पुन्हा एकदा वाईट दिवस आले. या काळात पाटणा हे एक प्रमुख शहर होते. तिथं कपडे, साखर, मसाले,अफू वगैरेचा चांगला व्यापार चालायचा. व्यापारी केंद्र असल्यानं तिथं इंग्रज, डच आणि पोर्तुगीज व्यापारी मोठ्या कालावधीसाठी राहताना दिसत. सर्वसाधारण १७६० च्या दरम्यान मुर्शिदाबाद मधली चित्रकार मंडळी पाटण्याला आली. पाटणमधल्या काही ठराविक भागात हे लोक राहायचे. तिथले राजेलोक, नवाब, जमीनदार, इंग्रज व्यापारी, इंग्रज सैनिक यांच्या मागणीप्रमाणं चित्रं काढू लागले. बरेच चित्रकार पटण्यामधून बिहारमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दरबारी कलाकार म्हणून काम करू लागले.

या चित्रकार मंडळींनी एक नवीनच चित्रशैली निर्माण केली. या शैलीवर मुघल चित्रशैली आणि पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव होता. चित्रातल्या रेषा, रंग मुघल शैलीतून आल्या होत्या तर छटा (shades) वापरण्याची पद्धत पाश्चात्य चित्रशैलीमधून घेतली गेली होती. ही चित्रशैली 'पाटणा कलम' या नावानं विश्वविख्यात झाली. मुघल चित्रशैलीत आपल्याला बहुतेक वेळा चित्रांच्या विषयांत राजेशाही थाट, शाही जीवन पाहायला मिळतं. पण पाटणा कलममध्ये मात्र चित्रांचे विषय अगदीच साधे असायचे. सामान्य माणसांचं दैनंदिन जीवन हे या चित्रांचा प्रमुख विषय असायचा. त्यामुळं या चित्रांमध्ये आपल्याला कासार, गारुडी, चांभार, लोहार, कोळी अशा प्रकारचे लोक पाहायला मिळतात. तसंच या चित्रांमध्ये त्या काळचे सण, उत्सव, जत्रा आणि बाजारही दिसतात. एकूणच या चित्रांमध्ये आपल्याला तत्कालीन सामाजिक जीवन पाहायला मिळते. मुघल शैलीत चित्राच्या चारी बाजूंना सुंदर नक्षीकाम दिसायचं. पण पाटणा कलममध्ये मात्र असं काही नक्षीकाम नसायचं. इतकंच काय, या शैलीतल्या चित्रांमध्ये पार्श्वभूमीलाही काहीच नसायचं. पाश्चात्य व्यापारी अशी चित्रं आपल्या भारतातल्या आठवणी म्हणून घेऊन जायचे.

ही चित्रं प्रामुख्यानं कागदांवर, हस्तिदंतावर किंवा कपड्यांवर काढली जायची. हा कागद त्या काळात नेपाळहून यायचा. हस्तिदंतावर केलेली चित्रकला प्रामुख्यानं इंग्रजांसाठी असायची. हस्तिदंताच्या छोट्याश्या पट्टीवर अंडाकृती आकाराचं चित्र काढलं जायचं आणि बऱ्याचदा इंग्रज लोक ते आपल्या कोटवर लावायचे. चित्रं काढण्यासाठी वापरले जाणारे कुंचलेही हे चित्रकार स्वत: तयार करायचे. खारीच्या शेपटीचे (किंवा घोड्याच्या मानेवरचे केस) मऊ होण्यासाठी गरम पाण्यात उकळले जायचे. मग पक्ष्यांच्या पिसांमध्ये असणाऱ्या पोकळ नळीसारख्या भागात ते बसवून कुंचले तयार केले जायचे. चित्रासाठीचे रंगही हे लोक स्वत: तयार करायचे. हे रंग पूर्णपणे नैसर्गिक असायचे. फळं, फुलं, खनिजं आणि झाडांच्या सालींपासून हे रंग बनवले जायचे. (हळदीपासून पिवळा, काजळीपासून काळ वगैरे)  हे रंग पावसाळ्यात बनवले जायचे. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात कमी असणारं धुळीचं प्रमाण.

दुर्गा पूजा

टांगा
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र या शैलीला उतरती कला लागली. याचं एक कारण म्हणजे त्यात तेच तेच विषय येऊ लागले. याच सोबत आता लिथोप्रेस आणि कॅमेरा यांचंही आगमन झालं होतं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालेली ही चित्रशैली विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अस्तंगत झाली.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :

https://www.jagranjosh.com/general-knowledge/patna-kalam-painting-origin-and-characteristics-1548754612-1
https://selfstudyhistory.com/2016/04/25/bpsc-general-studies-patna-kalam-paintings/
https://www.deccanherald.com/content/56522/return-patna-kalam.html
https://www.patnabeats.com/patna-kalam-the-heritage-that-we-lost/

Image Credit

https://commons.wikimedia.org/wiki/File:Durga_Puja,_1809_watercolour_painting_in_Patna_Style.jpg
Sevak Ram (c.1770-c.1830) / Public domain

https://commons.wikimedia.org/wiki/File:Shiv_Lal.jpg
Shiv Lal / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)

Saturday, May 23, 2020

व्हर्चुओसो


मुशाफिरी कलाविश्वातली

व्हर्चुओसो

१८३२ मधली गोष्ट. पॅरिसमधल्या ऑपेरा हाऊस मध्ये एक मैफल चालू होती. इटलीमधुन आलेला व्हायोलिनवादक पॅगॅनिनी याचं वादन या कार्यक्रमात चालू होतं. त्या काळात पॅरिसमध्ये कॉलराची साथ चालू होती. कॉलराग्रस्तांसाठी निधी उभारण्यासाठी ही मैफल आयोजित करण्यात आली होती. या मैफलीत एक तरुण पियानोवादक श्रोता होता. त्याचं नाव होतं फ्रान्झ लीझस्ट. पॅगॅनिनीचं व्हायोलिनवर असणारं प्रभुत्व पाहून लीझस्ट थक्क झाला होता. पॅगॅनिनी आणि त्याचं व्हायोलिन एकरूप झालेलं त्यानं अनुभवलं. पॅगॅनिनी त्या काळाच्या इतर व्हायोलिनवादकांपेक्षा तर चांगलं वाजवायचाच पण महत्वाचं म्हणजे तो व्हायोलिन जितक्या चांगल्या प्रकारे वाजवता येऊ शकतं तितकं तो वाजवायचा. पॅगॅनिनीसारखंच आपल्या वाद्यावर प्रचंड प्रभुत्व असणारं, असामान्य कौशल्य असणारं म्हणजेच 'व्हर्चुओसो' बनण्याचे विचार त्याच्या डोक्यात घोळायला लागले. त्यानं एक प्रकारची तपस्या सुरु केली.

यानंतर liszt नं जे काही केलं त्यानं इतिहास बनला. असं म्हणतात की मानवी मर्यादा आणि पियानोच्या मर्यादा जिथं संपतात तिथंपर्यंत liszt पोहोचला. त्यानं रचलेलं संगीत याची साक्ष देते. आपण त्याची एक रचना ऐकूया - https://www.youtube.com/watch?v=M0U73NRSIkw. गंमत म्हणजे Liszt ची ही रचना पॅगॅनिनीच्या एका रचनेवर आधारित आहे. व्हर्च्युऑसिटीचा संगीतामधला अर्थ आपलं वाद्य वाजवण्यातलं अत्युच्च कौशल्य असा करता येईल. (अर्थातच कौशल्य म्हणजे कला नव्हे, पण संगीताच्या कलेत  उत्कृष्ट कलाकृती बनवण्यासाठी कौशल्य नेहमीच उपयोगी ठरते.)

संगीतासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या मंडळींमध्ये व्हर्च्युऑसिटी मिळवण्याचं एक प्रकारे वेड दिसायचं. त्यासाठी कितीही तपस्या करायला हे लोक तयार असायचे. अर्थातच आजही व्हर्च्युऑसिटीचा ध्यास असणारी, संगीतसाधना करणारे लोक दिसतात.

१९८० च्या दशकात अमेरिकेमधल्या ह्यूस्टन इथं एका व्यापारी कार्यालयांच्या संकुलासमोर (लिरिक सेंटर) काहीतरी शिल्प बसवायचं होतं. ह्या संकुलाच्या शेजारीच थिएटर डिस्ट्रिक्ट नावाचा भाग होता (म्हणजे अजूनही आहे). हा भाग संगीत, नृत्य आणि नाट्य कलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं इथं या कलांशी संबंधित काहीतरी शिल्प बसवायचं ठरलं. डेव्हिड ऍडिक नावाच्या एका कलाकारावर हे शिल्प बनवण्याची कामगिरी सोपवण्यात आली.


या कलाकारानं 'व्हर्च्युओसो' नावाचं शिल्प बनवलं. या शिल्पात आपल्याला एक चेलो नावाचं वाद्य वाजवणारा कलाकार दिसतो. चेलो म्हणजे व्हायोलिनच्या परिवारातलंच एक आकारानं थोडंसं मोठं असणारं वाद्य. या व्हर्च्यूओसो वादकाला देहच नाही आहे. जणू काही हा वादक देहभान हरपून आपल्या वादनात मग्न झालाय. आपल्याला यात फक्त वाद्य, वाद्य वाजवणाऱ्या हाताचा मनगटापुढचा हात आणि संगीतात हरवलेल्या या वादकाचा चेहरा दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांऐवजी दोन गोल दिसतात. नाकाच्या ठिकाणी सरळ रेषा दिसते. या भव्य आकाराच्या शिल्पाची उंची ३६ फूट आहे.  मागं दिसणारी इमारत २६ माजली आहे !! यावरून या शिल्पाच्या भव्यतेची कल्पना येते.  हे शिल्प बनवताना २१ टन काँक्रीट वापरलं गेलं. खरंतर या वादकाच्या मागच्या बाजूला अजून तीन वादकांची शिल्पं आहेत पण भव्य शिल्पाच्या मागं असल्यानं ती आपल्याला दिसत नाहीत. या काँक्रीटच्या शिल्पात एक संगीताची ध्वनियंत्रणा आहे. रस्त्यावरून चालताना आपण या शिल्पाजवळ गेलो तर आपल्याला पाश्चात्य अभिजात संगीत ऐकू येते !! रस्त्यावर जास्त वर्दळ असेल तर मात्र हे संगीत ऐकू येत नाही.

इतकं सुंदर शिल्प असलं तरी या शिपवर सुरुवातीच्या काळात कडाडून टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये तिथले नागरिक आणि कलासमीक्षक होते. नंतर मात्र हे शिल्प अतिशय लोकप्रिय ठरत गेलं. आता हे शिल्प ह्युस्टनमधलं पर्यटनाचं एक आकर्षण ठरलं आहे !!

ह्युस्टनला जाण्याची संधी मिळाली तर मात्र हे शिल्प आवर्जून पाहायलाच हवं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit
Carol M. Highsmith / Public domain

Sunday, May 10, 2020

सप्तमातृका


मुशाफिरी कलाविश्वातली


सप्तमातृका

पुराणांमध्ये येणारी आणि साऱ्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी शिल्पांमध्ये दिसणारी एक संकल्पना म्हणजे 'सप्तमातृका'. सप्त म्हणजे सात आणि मातृका म्हणजे मातांचा समूह. असं म्हणतात की अतिप्राचीन काळात माणसाला (प्रत्यक्षात दिसणाऱ्या) परमेश्वराची कल्पना करणं अवघड जायचं. या काळात माणसाला आपलं रक्षण करणारी, आपली काळजी करणारी आणि आपल्यावर प्रेम करणारी आईच देवाचं रूप वाटायची. यातूनच मातृदेवतेच्या पूजेला सुरुवात झाली.

खरंतर सप्तमातृका ही संकल्पना पुराणकाळापेक्षाही जुनी असावी असं मानण्यात येतं. या सप्त मातृकांशी साम्य दाखवणारी मुद्रा सिंधू खोऱ्यातल्या उत्खननात मिळते. मोहेंजोदडो इथं सापडलेल्या सिंधू संस्कृतीमधल्या एका मुद्रेवर झाडाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या सात आकृती दिसतात. (त्या नृत्य करत असल्याचा भास होतो.) ही सप्तमातृकांच्या संकल्पनेची सुरुवात असल्याचं मानण्यात येतं. सप्तमातृकांची संकल्पना इतकी जुनी असली तरी प्रत्यक्षात सप्तमातृका शिल्पांमध्ये स्पष्टपणे दिसायला सुरुवात कुशाणकाळात होते. या काळात दगडांपासून बनवलेल्या, टेराकोटापासून बनवलेल्या सप्तमातृका पाहायला मिळतात. गुप्तकाळात (आणि पुढं) आपल्याला दगडाच्या आयताकृती पृष्ठभागावर सप्तमातृका कोरलेल्या दिसू लागतात. यात सप्तमातृकांच्या डाव्या बाजूला वीरभद्र (म्हणजे शंकर) तर उजव्या बाजूला गणेशही दिसू लागतो. बहुतेकवेळा या मातृकांमध्ये माता दिसत असल्या तरी कधीकधी (विशेषतः नेपाळमध्ये) आठ माताही दिसतात. नंतरच्या काळात हा आकडा अजूनही वाढतो.

दक्षिण भारतातल्या चालुक्य आणि कदंब घराण्यातले राजे या मातृकांना प्रमुख देवता मानायचे. चालुक्य घराण्यातल्या सुरुवातीच्या राजांच्या काळात ताम्रपत्रांवर सप्त मातृकांचा उल्लेख आढळतो. कांचीपुरममधल्या कैलासनाथ मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अगदी सुरुवातीच्या काळात कोरल्या गेलेल्या सप्तमातृका पाहायला मिळतात. यात सप्तमातृकांसोबत वीरभद्र आणि गणेशाची दिसतात.

या सप्तमातृकांच्या उत्पत्तीच्या बऱ्याच कथा पुराणांमध्ये दिसतात. यात सर्वात जास्त प्रसिद्ध असणारी कथा अशी आहे: भगवान शंकर अंधकासुराशी युद्ध करत होते. यावेळी अंधकासुराला झालेल्या जखमांमधून रक्ताचे थेम्ब जमिनीवर पडत होते. यातल्या प्रत्येक थेंबापासून एक नवीन अंधकासूर तयार व्हायला लागला. इतक्या साऱ्या अंधकासुरांशी लढायला शंकराला अवघड जायला लागलं. मग शंकरानं आपल्या मुखाग्नीतून योगेश्वरी नावाची देवी तयार केली. ही देवी अंधकासुराचे रक्ताचे थेम्ब जमिनीवर पडू देणार नव्हती. बाकीच्या देवांनीही आपापल्या शक्ती देवींच्या रूपामध्ये पाठवल्या. (ब्रह्मानं ब्रह्माणी पाठवली तर विष्णूनं वैष्णवी, इंद्रानं इंद्राणी वगैरे), या साऱ्या देवींनी (म्हणजेच सप्तमातृकांनी) अंधकासुराचं रक्त खाली सांडू दिलं नाही आणि मग शंकरानं अंधकासुराचा वध केला !!

या कथेला एक दुसराही अर्थ आहे. शंकर हे ज्ञानाचं प्रतीक तर अंधकासूर हे अज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. ज्ञानानं अज्ञानावर केलेल्या हल्ल्यानं अज्ञान (स्वत:चं संरक्षण करण्यासाठी) अजूनच वाढत जातं. अंधकासुराच्या रक्ताच्या थेंबापासून नवीन अंधकासूर निर्माण होणं हीच गोष्ट दर्शवते. आठ दुर्गुण (काम, क्रोध, लोभ, मद, मोह, द्वेष, पैशुन्य (एखाद्याचं गुपित दुसऱ्याला सांगणं), असूया) जोपर्यंत ज्ञानाच्या नियंत्रणात येत नाहीत, तोपर्यंत अंधकासुराचा पराभव होत नाही. वराहपुराणानुसार या मातृका म्हणजे अंधःकाराविरुद्ध लढतानाच्या आत्मविद्या आहेत.

शिल्पांकानात या मातृकांना प्रत्येकी हात दाखवण्यात येतात. पुढच्या दोन हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत तर दावा हातात वरद मुद्रेत दिसतो. या मातृका बहुतेकवेळा या क्रमानं दिसतात:

) ब्रह्माणी: हिला चार मुखं असतात. मागच्या दोन हातांपैकी एका हातात कमंडलू असतो. ही मातृका कमळावर बसलेली असते. हिचं वाहन हंस असतं.
) वैष्णवी: हिच्या मागच्या दोन हातांमध्ये आणि चक्र असतात तर वाहन गरुड असतो.
) इंद्राणी: हिच्या मागच्या दोन हातांपैकी एका हातात वज्र असते तर वाहन हत्ती (ऐरावत) असतो.
) माहेश्वरी: मागच्या दोन हातांमध्ये शूल आणि माला असते. वाहन बैल असतो.
) कौमारी: मागच्या दोन हातांपैकी एका हातात कोंबडा दिसतो. वाहन मोर असते.
) वाराही: हिचं मुख वराहासारखं असतं. मागच्या एका हातात हल असते. वाहन म्हैस असते.
) चामुंडा: शिल्पांकन करताना या मातृकेला सर्वात भयानक दाखवतात. केस विस्कटलेले तर गळ्यात मुंडक्यांची माला असते. वाहन गिधाड, कावळा किंवा शव असते.    

सोबत दोन चित्रं दिली आहेत. यापैकी पहिल्या चित्रात कर्नाटकातल्या गोविंदनहल्लीमधल्या पंचलिंगेश्वर मंदिरातल्या सप्तमातृका दिसतात. (यात आकृती दिसतात - डावीकडं शिव तर उजवीकडं गणेश दिसतो.) दुसऱ्या चित्रात आंध्रप्रदेशातल्या पुष्पगिरी मंदिरातल्या सप्तमातृका दिसतात. यामध्ये ब्रह्माणीची चार मुखं, मातृकांची वाहनं स्पष्ट दिसतात. (पण या मातृकांचा क्रम थोडासा वेगळा असल्याचं जाणवतं.)

सप्तमातृका - १
सप्तमातृका - २
भारतभर मंदिरांमध्ये (विशेषतः शैव मंदिरांमध्ये) दिसणाऱ्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये बनल्या गेलेल्या सप्त मातृकांच्या शिल्पांमध्ये दाखवल्या गेलेल्या आयुधांमध्ये, मातृकांच्या वाहनामध्ये काहीच बदल दिसत नाही हे विशेष !!

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा

#कारागिरी



🌺 संदर्भ :
https://www.speakingtree.in/allslides/when-sapta-matrikas-seven-divine-mothers-came-to-the-rescue-of-lord-shiva

https://sreenivasaraos.com/tag/saptamatrika/
https://www.britannica.com/topic/Saptamatrika
https://www.templepurohit.com/sapta-matrika-7-incarnation-goddess-shakti/
https://www.youtube.com/watch?v=GL9_G4JFLbI
https://magazines.odisha.gov.in/Orissareview/2009/September/engpdf/59-61.pdf
http://www.heritageuniversityofkerala.com/JournalPDF/Volume4/24.pdf
https://pankajsamel.wordpress.com/2018/12/06/saptamatruka/
https://www.exoticindiaart.com/article/mother/


🌺 Image Credit
Dineshkannambadi at English Wikipedia / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)


https://commons.wikimedia.org/wiki/Category:Pushpagiri_Temple_Complex#/media/File:Sapta_Matrikas.JPG
Harish Aluru / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)