Friday, March 27, 2020

ग्यारह मूर्ती


मुशाफिरी कलाविश्वातली

ग्यारह मूर्ती

काही शिल्पं इतिहासातली एखादी घटना अक्षरश: जिवंत करतात. आपण पूर्वी फ्रेंच शिल्पकार रोदँचं एक शिल्प (https://dushyantwrites.blogspot.com/2018/07/blog-post_12.html) पाहिलं. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या युद्धातली चौदाव्या शतकातली एक घटना रोदँनं यात दाखवलीये. या शिल्पात आपल्याला लोकांची एक प्रकारची हालचाल, गतिमानता जाणवते. आणि त्यांची गतिमानता, देहबोली, हावभाव या साऱ्यांमुळंच हे शिल्प जिवंत बनून विश्वविख्यात झालं.

भारतीय शिल्पकार पद्मभूषण देवीप्रसाद रॉय चौधरी यांच्यावर रोदँचा प्रभाव होता. (देवीप्रसाद रॉय चौधरी 'ललित कला अकादेमी' चे founder chairman होते) त्यांचं एक शिल्प असंच इतिहासातला एक प्रसंग जिवंत करणारं आहे. या शिल्पातल्या लोकांच्या भासणाऱ्या हालचालींमुळं, त्यांच्या हावभावामुळं सारा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. या शिल्पाचं चित्र आपल्याला पूर्वी पाचशेच्या नोटवर पाहिल्याचं स्मरत असेल. हे शिल्प हे दिल्लीच्या मध्यवर्ती भागात, राष्ट्रपती संपदेच्या पश्चिम भागाला लागून आहे. मदर टेरेसा क्रिसेंट आणि सरदार पटेल मार्गच्या टी-जंक्शनला असलेले हे शिल्प या वाहत्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचे लक्ष वेधून घेत असते.  दांडी यात्रेच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी भारत सरकारनं ह्या ठिकाणी एक शिल्प उभं करण्याचं ठरवलं होतं. यासाठी सरकार एका प्रतिभावंत शिल्पकाराच्या शोधात होतं. आणि त्यावेळी अशा प्रकारच्या शिल्पाला न्याय देणारं देवीप्रसाद रॉय चौधरी यांच्याइतकं दुसरं कुणीही नव्हतं. पाटणामधलं हुतात्मा स्मारक आणि चेन्नईमधल्या बीचवरचं 'श्रमशक्तीचा विजय' या शिल्पांमध्ये चौधरी यांच्या प्रतिभेची झलक सर्वांना दिसली होती.

नव्वद वर्षांपूर्वी ह्याच दिवसांमध्ये (१ मार्च १९३० ते एप्रिल १९३०) दांडी यात्रा चालू होती. मिठावर इंग्रजांनी लादलेला कर म्हणजे सरळ सरळ अन्यायच होता. लोकांच्या मनात याविषयी चीड होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या अन्यायाला वाचा फोडणारे हे आंदोलन सुरु झाले. या यात्रेत सहभागी झालेल्या लोकांमध्ये एक प्रकारचा निश्चय होता, निर्भीडता होती. या आंदोलनात सर्व धर्माचे, सर्व जातींचे, समाजाच्या सर्व स्तरांमधले लोक होते. साऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची झपाटलेपणाची भावना होती. गांधीजींनी निवडक ८० लोकांसोबत या यात्रेला सुरुवात केली. त्यांना वाटेत अनेक अनुयायी मिळाले. ही मंडळी दरारोज १० मैल चालत प्रवास करायची. एकूण २४ दिवसांचा म्हणजे २४० मैलांचा हा प्रवास होता.

समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांच्या, वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांनी निश्चयानं एकत्र येऊन बलाढ्य इंग्रज सरकारविरुद्ध लढा पुकारणं हा दांडी यात्रेचा आत्मा होता. देवीप्रसाद चौधरी यांनी दांडी यात्रेचा हाच आत्मा व्यक्त करण्याचा प्रयत्न या शिल्पामधून केला. या शिल्पात आपल्याला गांधीजींच्या मागे दहा लोक दिसतात. हे शिल्प 'ग्यारह मूर्ती' या नावानंच ओळखलं जातं.



शिल्पात सर्वात पुढं गांधीजी चालताना दिसतात. खाली नजर ठेवत चालणाऱ्या गांधीजींमध्ये निश्चय दिसतो. गांधीजींच्या मागं काही अंतरावर डोक्यावर पदर घेऊन चालणारी स्त्री दिसते. तिच्यामागं आपल्याला गांधीटोपी घातलेली एक व्यक्ती, कृश असणारा एक मुसलमान माणूस, डोक्याला पगडी असणारा एक शीख माणूस (याचा चेहरा आपल्याला सोबतच्या फोटोमध्ये दिसत नाही), आणि डोक्याला फेटा बांधलेला एक हिंदू पंडित दिसतो. त्यांच्या मागं ख्रिश्चन धर्मगुरूदेखील दिसतो. सर्वात मागं एक मुलगा वृद्धाला यात्रेत पुढं चालण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतोय. शिल्पातल्या दोन स्त्रीया सरोजिनी नायडू आणि मातंगीनी हाजरा मानल्या जातात. या साऱ्या लोकांमध्ये एकी जाणवते. विविधता असणारी ही सारी मंडळी एका ध्येयानं प्रेरित होऊन पुढं जाताना दिसतात.

चित्र असो वा शिल्प, आपल्या कलेत प्राण ओतणं ही चौधरींची खासियत होती. असं म्हणतात की सामान्य लोकांचं जीवन चौधरींना नेहमीच भावायचं. आपल्या कलाकृतीसाठी सारे मॉडेल्स ते नेहमी सामान्य जनतेतूनच निवडायचे. 'ग्यारह मूर्ती'मधले लोक कोण आहेत याविषयी अंदाज बांधण्याचे (विशेषतः इतिहासातल्या लोकांशी या व्यक्तिरेखा जोडण्याचे) कित्येक लोकांनी प्रयत्न केले आहेत. पण खरंतर शिल्पामधल्या साऱ्या व्यक्तिरेखा तुमच्या आमच्यामधले सामान्य लोक आहेत.

या शिल्पाचं काम पूर्ण होण्याआधीच देवीप्रसाद चौधरी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शिल्पाचं उरलेलं काम त्यांची पत्नी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी पूर्ण केलं.

इतक्या असामान्य शिल्पाचा भाग लोकांनी चोरून न्यावा यापेक्षा विकृत आणि दुर्दैवी गोष्ट काय असावी? १९९९ मध्ये या शिल्पामधला गांधीजींचा चष्मा चोरीला गेला !! बागकाम करणाऱ्या एका व्यक्तीनं त्यावेळी पोलीस चौकीत तक्रारही नोंदवली. यानंतर - वेळा धातूचा चष्मा बसवण्याचा प्रयत्नही केला गेला. पण प्रत्येक वेळी - दिवसांमध्येच चष्मा चोरीला गेला.

चष्म्याशिवाय गांधीजींचा चेहरा थोडा चुकल्या चुकल्यासारखा वाटत असला तरी या शिल्पाचे असामान्यत्व कमी होत नाही. दिल्लीला गेल्यावर प्रत्येकानं हे शिल्प आवर्जून पाहायलाच हवं असं हे शिल्प आहे!!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :
http://www.probashionline.com/deviprasad-roychowdhury/
Image Credit


Saturday, March 14, 2020

झियाओझियांगची आठ दृश्ये


मुशाफिरी कलाविश्वातली

झियाओझियांगची आठ दृश्ये

हिरवेगार डोंगर, वनराई, पाण्याचे तलाव, धुके अशा गोष्टी असणाऱ्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला एक विशिष्ट अनुभव येतो. आपल्याला एक प्रकारची  विलक्षण शांती इथं जाणवते. कसलाही कोलाहल इथं नसतो. फारतर पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट आपल्याला ऐकू येतो. चित्रकार मंडळी निसर्गाचा हा खास अनुभव आपल्या कलाकृतींमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारच्या निसर्गचित्रांची चीन देशात हजारपेक्षा जास्त वर्षांची दीर्घ परंपरा आहे.

जुन्या काळात या निसर्गचित्रांमध्ये चिनी कलाकार बऱ्याचदा आपल्या कल्पनेप्रमाणं निसर्गातल्या गोष्टी दाखवायचे. किंवा काही वेळा निसर्गातल्या एखाद्या दृश्यावर आधारित असं चित्र ते काढायचे. बहुतेक वेळा त्यांना चित्रात पर्वतांचं सौंदर्य दाखवायला आवडायचं. बऱ्याच चित्रात ते पाणीही दाखवायचे.

चीनमधल्या निसर्गचित्रांना तिथल्या ताओ विचारधारेची पार्श्वभूमी आहे. या विचारधारेमध्ये निसर्गाचं महत्व अनन्यसाधारण आहे. उदा. ह्या विचारधारेप्रमाणं 'या पृथ्वीवर पाण्याइतकं मृदू आणि जीवनदायी काहीच नाही. तरीही कठीण आणि मजबूत (खडकांवर) आघात करण्यासाठी पाण्याइतकं (प्रभावी) काहीच नाही. दुबळे ताकतवानांना हरवू शकतात. मृदू गोष्ट कठीण गोष्टीला भारी पडते.' निसर्गाच्या अभ्यासानं आपल्या जीवनात आवश्यक असणारं अशा प्रकारचं ज्ञान मिळू शकतं. म्हणूनच या विचारधारेप्रमाणं आपण अरण्यात फिरायला हवं. तळ्याकाठी बसायला हवं. पक्ष्यांचं निरीक्षण करायला हवं. एकांतात निसर्गाचं निरीक्षण करत अंतर्मुख व्हायला हवं.

निसर्गचित्रणामध्ये 'झियाओझियांगची आठ दृश्ये' हा चीनमधल्या चित्रकारांचा गेल्या एक हजार वर्षांमधला एक आवडता विषय. सर्वसाधारण एक हजार वर्षांपूर्वी तिथं सॉंग घराण्याचं राज्य चालू असताना या विषयावर कलाकार मंडळींनी चित्रं काढायला सुरुवात केली. या चित्रमालिकेत चित्रकार लोकांना जे डोळ्यांना दिसतंय फक्त तेवढंच दाखवायचं नव्हतं तर मंद प्रकाश, धुकं यासारख्या गोष्टींचा अनुभव दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचासॉंग डी (. . १०१५ - १०८०) या कलाकारानं सर्वात पहिल्यांदा 'झियाओझियांगची आठ दृश्ये' या विषयावर चित्रं काढली असं मानण्यात येतं.  झियाओझियांग हा चीनमधला निसर्गसौंदर्यानं नटलेला प्रदेश आहे. या ठिकाणी झियाओ आणि  झियांग या दोन नद्यांचा संगम होतो.  

या आठ दृश्याचे विषय फार सुंदर आहेत:

) झियाओझियांगमधल्या रात्रीच्या पावसाचं दृश्य
) घरी परत येणाऱ्या जंगली हंसांचं दृश्य
) क्वीन्गलियांगमधल्या मंदिरातला संध्याकाळचा गॉन्ग (पितळेची चकती असणारं काठी बडवून वाजवायचं वाद्य)
) पर्वतावरच्या मंदिराचं दृश्य
) संध्याकाळचा हिमवर्षाव
) मासेमारी करणाऱ्या लोकांच्या खेडेगावाचं संध्याकाळचं दृश्य
) तळ्याकाठी दिसणारा हेमंत ऋतूमधला चंद्र
) घरी परत येणारी पाण्यातली नाव

इतक्या सुंदर विषयानं नंतरच्या काळात चित्रकार मंडळींना साद घातली नाही तरच नवल. 'झियाओझियांगची आठ दृश्ये' या विषयावर अनेक चित्रकारांनी चित्रं काढली. खरंतर या चित्रमालिकेनं प्रेरित होऊन बाकीच्या ठिकाणच्या कलाकारांनी 'आठ दृश्ये' ही मालिका वेगवेगळ्या ठिकाणांचं निसर्गसौंदर्य दाखवत काढली. चीनच्या पूर्व दिशेच्या भागातल्या, जपानमधल्या आणि कोरियामधल्या कलाकारांनी त्या त्या ठिकाणाचं निसर्गसौंदर्य दाखवणारी 'आठ दृश्ये' ची मालिका बनवली.

सोबत दिलेली दोन चित्रं 'झियाओझियांगची आठ दृश्ये' ह्याच मालिकेतली.पण ही चित्रं खूप अलिकडल्या काळातली - जवळपास शंभर वर्षांपूर्वीची. ही चित्रं जपानी चित्रकार योकोयामा टायकान यानं काढलेली आहेत. यातल्या एका चित्रात आपल्याला पर्वतावरच्या खेड्यातलं रात्रीचं पाऊस पडल्यानंतरचं दृश्य दिसतंय. पावसासोबत असणाऱ्या वाऱ्यामुळं उंच झाडं वाकताना दिसत आहेत. दुसऱ्या चित्रात धुक्यात अस्पष्ट दिसणारं पर्वतावरचं मंदिर दिसतंय.



गेल्या हजार वर्षांत या विषयावर काढली गेलेली बहुतेक सारी सारी चित्रं फक्त शाईनं काळ्या पांढऱ्या रंगात काढली गेली असली तरी ही चित्रं आपल्याला एक अनुभव देतात हे मात्र खरं !! 

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :
🌸 Image Credit:
🍁Yokoyama Taikan (1868-1958) / Public domain
🍁Yokoyama Taikan (1868-1958) / Public domain

Friday, March 6, 2020

ज्युडिथ


मुशाफिरी कलाविश्वातली

ज्युडिथ

बायबलच्या जुन्या करारात एक विलक्षण कथा येते. ही कथा आहे बॅबिलोनिया आणि इस्रायल ह्या प्रदेशातली. बॅबिलोनियाच्या प्रदेशात (आजच्या काळातला इराक) नेब्युकड्नेझर नावाचा एक राजा होऊन गेला. बायबलमधल्या उल्लेखाप्रमाणं हा चांगला राजा नव्हता. आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी या राजानं बऱ्याचशा राज्यांना शरण यायला सांगितलं. जी राज्यं शरण यायला तयार नव्हती त्यांना आपल्या साम्राज्याला जोडण्यासाठी त्यानं आपला सेनापती होलोफर्नेस याला प्रचंड सेनेसहित पाठवलं. होलोफर्नेस शरण न येणाऱ्या राज्यातल्या लोकांना अक्षरश: जाळत, त्यांचा विनाश करत निघाला. शरण येणाऱ्या लोकांना तो मारायचा नाही पण त्यांची मंदिरं, मूर्त्या तो नष्ट करायचा. कारण त्याच्या मते सर्वांनी नेब्युकड्नेझर राजाची पूजा करायला हवी होती !!

होलोफर्नेसची इस्रायलच्या दिशेने वाटचाल चालूच होती. त्याची नजर इस्रायली लोकांच्या जेरुसलेम शहरावर होती. पण जेरुसलेमला जाण्याआधी त्याला वाटेत बेथूलिया नावाचे नगर लागलं. हे नगर टेकडीवर होतं. पुढच्या प्रवासासाठी त्याला बेथूलिया पार करूनच जावं लागणार होतं. या बेथूलियाला भक्कम तटबंदी होती. प्रचंड सैन्य सोबत असलं तरी त्याला ही तटबंदी भेदून जाणं शक्य नव्हतं.

होलोफर्नेसच्या सैन्यानं बेेेथुलिया नगराला वेढा घातला. बेथुलियाच्या नगरवासियांनी शरण यावं अशी होलोफर्नेसची मागणी होती.  नगरवासियांना मुख्य समस्या होती ती पाण्याची. काही दिवसात नगरातला पाण्याचा साठा संपू लागला. लोक भोवळ येऊन रस्त्यावर पडू लागले. लोकांचा धीर सुटू लागला. सर्वांनी नगरप्रमुखाला दोषी ठरवायला सुरुवात केली. शरण गेल्यानं नागरवासियांना त्यांच्या देवाऐवजी होलोफर्नेसच्या राजाची पूजा करावी लागणार होती, गुलामीचं जीवन जगावं लागणार होतं. पण जगायला मिळणार होतं !! पाण्याशिवाय ते जगणारच नव्हते. नगरप्रमुखानं तिथल्या रहिवाश्यांना पाच दिवसात परमेश्वरानं काही मदत केली नाही तर शत्रूला शरण जाण्याचं वचन दिलं.

याच नगरात आर्थिक परिस्थिती चांगली असणारी एक ज्युडिथ नावाची विधवा राहायची. दिसायला देखणी असणाऱ्या या विधवेचं चरित्र अतिशय शुद्ध होतं. आर्थिक सुस्थिती असूनही ती विरागी जीवन जगणं पसंत करायची. तिच्या नवऱ्याचा मृत्यू तीन वर्षांपूर्वी उष्माघातानं झाला होता.

नगरप्रमुखाचा शरण जाण्याचा निर्णय तिला मुळातच पटलेला नव्हता. तिनं नगरप्रमुखासहीत इतर ज्येष्ठ मंडळींना स्वत:च्या घरी बोलावलं. तिनं आपले विचार सांगितल्यावर नगरप्रमुखानं  तिच्या मताकडं दुर्लक्ष केलं. ती एक स्त्री असल्यानं तिनं फक्त प्रार्थना करावी आणि निर्णय घेण्याचं काम पुरुषांकडं सोपवावं असं नगरप्रमुखानं सुचवलं. आता त्याच्या मताकडं तिनं दुर्लक्ष केलं.

तिनं स्वत:च काहीतरी करायचा निर्णय घेतला. तिनं मनात काहीतरी बेत आखला. परमेश्वराची प्रार्थना करत तिनं स्वत:ला व्यवस्थित खोटं बोलता यावं अशी इच्छा व्यक्त केली. तिनं परमेश्वराची प्रार्थना केली. प्रार्थना संपल्यावर तिनं आपल्या विश्वासू मोलकरणीला बोलावलं. मोलकरणीसोबत तिनं आपल्या बेतावर चर्चा केली. आणि लगेच बेताप्रमाणं काम करायला सुरुवातही केली.

तिनं स्नान केलं. (नगरातला पाण्याचा प्रचंड तुटवडा लक्षात घेता स्नान करणं ही मोठी गोष्ट होती.) सुगंधी अत्तराचा वापर करत सुंदर वस्त्रं परिधान करत, काही दागिन्यांसहित ती सजली आणि आपल्या मोलकरणीसहित ती घराबाहेर पडली. नगराच्या प्रमुख दरवाजाजवळ नगरप्रमुख आणि काही ज्येष्ठ मंडळी उभी होती. दरवाजा उघडण्यात आला. ज्युडिथ आणि तिची मोलकरीण बाहेर पडल्या आणि खाली शत्रूसैन्याच्या तळाकडे चालत गेल्या.

खाली शत्रूसैन्याच्या तळाकडं आल्यानंतर त्यांना गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांनी अडवलं. त्यांची ओळख विचारली. ज्युडिथनं सांगितलं की त्या बेथुलियामधुन पळून आल्या आहेत, त्यांच्या मागं बेथूलियाचे लोक लागलेले आहेत. एक सैनिकही न गमावता बेथूलिया नगर कसं जिंकायचं ते गुपित तिला होलोफर्नेसला सांगायचं होतं असं तिनं सुरक्षारक्षकांना सांगितलं. तिच्या सौंदर्यानं प्रभावित झालेल्या सुरक्षारक्षकांनी त्या दोघींना होलोफर्नेसच्या तंबूकडं नेलं.

तंबूमध्ये आराम करत असणारा होलोफर्नेस त्यांच्या स्वागतासाठी बाहेर आला. त्यानं सुरुवातीलाच सांगितलं की त्याचा मालक म्हणजे राजा नेब्युकड्नेझर याच्याशी निष्ठा ठेवणाऱ्या कुणालाही त्यानं आजपर्यंत कसलीही इजा केलेली नव्हती. खरंतर, तो  हे खोटं बोलला होता. ज्युडिथनं सांगितलं की नेब्युकड्नेझर आणि होलोफर्नेस यांच्या प्रतिभेविषयी आणि त्यांच्या विचारपूर्वक योजना करून केलेल्या लष्करी कारवायांविषयी तिनं बरंच ऐकलेलं होतं आणि तिला या दोघांचं खूप कौतुक वाटायचं. अर्थातच तीही धडधडीत खोटं बोलली होती. तिच्याइतकी सुंदर असणारी आणि विचारपूर्वक बोलणारी स्त्री होलोफर्नेसनं पूर्वी कधीच पाहिलेली नव्हती असं होलोफर्नेसनं बोलून दाखवलं.

ज्युडिथ आणि तिची मोलकरीण यांची एका वेगळ्या तंबूत राहण्याची सोय झाली. त्या दोघीजणी ३ दिवस त्या तंबूत राहिल्या. स्वत:चं अन्न त्या स्वत:च बनवून खायच्या.
चवथ्या दिवशी होलोफर्नेसनं त्या दोघींना जेवणासाठी बोलावलं. खरंतर होलोफर्नेस ज्युडिथच्या सौंदर्यानं वेडावून गेला होता आणि त्याला काहीही करून ज्युडिथ मिळवायची होती !!

याच दिवशी नंतर त्याच्या तंबूमध्ये ज्युडिथनं होलोफर्नेसला इतकं मोहित केलं की तो भान हरपून गेला. त्यानं तिला प्यायला मद्य देऊ केलं. पण तिनं ते नाकारत तिच्या मोलकरणीनं दिलेलं मद्य (wine) पिलं. होलोफर्नेस इतकं मद्य पीत गेला की त्याला नशेत काहीच भान उरलं नाही. एकेक करत होलोफर्नेसचे सारे सेवक बाहेर गेले. तंबूत फक्त होलोफर्नेस आणि ज्युडिथ उरले.

हाच तो क्षण होता !! ज्युडीथनं परमेश्वराकडं शक्ती मागितली. तिनं होलोफर्नेसची तलवार घेतली आणि साऱ्या शक्तीनिशी होलोफर्नेसचं शीर धडापासून अलग केलं !! त्याचं कापलेलं मस्तक तिनं एका कापडात गुंडाळलं आणि आपल्या मोलकरणीला दिलं. मोलकरणीनं ते जेवणाच्या टोपलीत ठेवलं !! यानंतर ज्युडिथ आणि तिची मोलकरीण गुपचूपपणे शत्रूसैन्याच्या तळातून आपल्या नगराकडं परत आल्या.

नगराच्या दरवाजाजवळ आल्यावर त्यांनी तिथल्या रक्षकांना हाक मारून दरवाजा उघडायला सांगितला. नगरात प्रवेश केल्यावर तिनं लोकांना कापून आणलेलं होलोफर्नेसचं डोकं दाखवलं. त्याचं मस्तक पाहून सारे लोक अर्थातच अचंबित झाले.

ज्युडिथ एवढ्यावरच थांबली नाही. तिनं पुढच्या दिवशी काय करायचं याच्या सूचना लोकांना दिल्या. होलोफर्नेसचं डोकं सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं लटकावयाला सांगितलं. आणि पहाटे सर्वांना शस्त्रं घेऊन मोठमोठ्यानं आरोळ्या ठोकायला सांगितल्या. या आरोळ्या ऐकून शत्रूसैन्यातले लोक होलोफर्नेसला सांगायला जातील असा तिचा अंदाज होता. आणि त्याच्या तंबूत गेल्यावर त्याचं मस्तकरहित शरीर पाहून त्यांना चांगलाच धक्का बसणार होता! त्यामुळं ते भयभीत होऊन पळून जाणार होते.

दुसऱ्या दिवशी नेमकं असंच घडलं. बेथुलियाच्या लोकांच्या आरोळ्या ऐकल्यावर शत्रुचे सैनिक होलोफर्नेसला सांगायला गेले. होलोफर्नेस जिवंत नाही हे लक्षात आल्यावर शत्रूसैन्य भयभीत होऊन पळून जाऊ लागलं. गनिमी काव्यात तरबेज असणाऱ्या इस्रायली लोकांनी मग नेता नसणाऱ्या शत्रूसैन्याचा सहजच पराभव केला !!

ज्युडीथची ही कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. ह्या कथेनं कुठल्याही संवेदनशील कलाकाराच्या मनाला साद न घातली तरच नवल !! ह्या कथेवर पाश्चात्त्य कलाकारांनी अक्षरश: हजारो चित्रं काढली. ज्युडीथचं चित्र काढण्याचा मोह भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनाही आवरला नाही !

१५९९ मध्ये कॅरॅवॅज्जिओ या चित्रकारानं काढलेल्या चित्रात तिघांच्याही चेहऱ्यावरचे ( विशेषतः मोलकरीणीच्या चेहऱ्यावरचे) हावभाव पाहण्यासारखे आहेत. यात आपल्याला ज्युडिथ शिरच्छेद करताना दिसते.


१६२० च्या दरम्यान सायमन वाउटनं काढलेल्या चित्रात कापलेलं शीर हातात घेतलेली ज्युडिथ पाहायला मिळते.


१८४० मध्ये एका हातात तलवार आणि एका हातात होलोफर्नेसचं कापलेलं मस्तक असणारं चित्र रिडेलनं काढलंय. 

१४७० साली बोत्तिसेली या चित्रकारानं परतीच्या वाटेवरची ज्युडिथ दाखवलीये.


आतापर्यंत हजारो चित्रं काढण्यात आलेल्या या ज्युडीथवर भविष्यकाळातही उत्तमोत्तम कलाकृती होतील यात शंका नाही !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

🌹http://www.womeninthebible.net/women-bible-old-new-testaments/judith/
🌹http://www.womeninthebible.net/bible-paintings/judith-and-holofernes/
🌹https://www.biblicalarchaeology.org/daily/people-cultures-in-the-bible/people-in-the-bible/judith-a-remarkable-heroine/
🌸 Image Credit:
🌹Attributed to Simon Vouet / Public domain
🌹Sandro Botticelli / Public domain  
🌹August Riedel / Public domain