Monday, September 23, 2019

ट्रायल बाय ज्युरी


मुशाफिरी कलाविश्वातली

ट्रायल बाय ज्युरी

एडविन लँडसीअर हा एकोणिसाव्या शतकातला एक मोठा इंग्रज चित्रकार. प्राण्यांची चित्रं काढणं ही त्याची खासियत होती. प्राणी असणारी त्यानं काढलेली अनेक चित्रं जगविख्यात झाली. नैतिक, सामाजिक बाजू असणारे विषय चित्रकलेच्या माध्यमातून मांडणं हे त्याचं वेगळेपण होतं.

एडविनचे वडील कलाकार होते. एडविनमधले कलागुण त्यांनी लहानपणीच टिपले होते. लहान एडविन प्राण्यांची चित्रं सुरेख काढायचा. नंतर चित्रकलेचं शिक्षण घेताना त्यानं प्राण्यांच्या शरीराच्या रचनेचा सखोल अभ्यास केला. चित्रकलेतल्या कौशल्यामुळं त्याला लगेचच लोकप्रियता मिळत गेली.

त्यावेळची इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीचा एक लाडका कुत्रा होता - त्याचं नाव होतं डॅश. लहानपणापासून राणीला आपल्या वयाचा कुणीच मित्र नसल्यानं डॅश हाच तिचा सगळ्यात जवळचा मित्र होता !! ह्या डॅशचं एडविननं  चित्र काढलं. व्हिक्टोरिया राणीनं हे चित्र पाहिल्यावर तिला ते इतकं आवडलं की एडविन राणीचा एक आवडता चित्रकार बनला !

एडविनची बरीचशी कारकीर्द एकोणिसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली. एडविन लँडसीअरचं आपण आज जे चित्र पाहणार आहोत त्याला या काळाची आणि या काळातल्या कायदाव्यवस्थेची पार्श्वभूमी आहे. या काळातलं इंग्लंड बरंचंसं वेगळं होतं. या काळातल्या न्याय व्यवस्थेत बऱ्याच अडचणी होत्या. एक तर या काळात तिथं झपाट्यानं शहरीकरण होत चाललं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या काळात तिथलं पोलीसदलही बऱ्याच प्रमाणात वाढवण्यात आलं होतं. याचा परिणाम म्हणजे कोर्टात चालणाऱ्या केसेसची संख्या खूपच वाढली होती. या साऱ्यामुळं कोर्टातलं काम पूर्ण होण्याचा वेग खूपच मंदावला होता. याचा परिणाम सामान्य माणसांना भोगावा लागत होता. कोर्टातल्या केसेस दीर्घकाळपर्यंत चालत. कोर्टात केस चालवायची म्हणजे लोकांना खूप खर्च करावा लागे. दुसरी बाजूला वकीलमंडळी मात्र श्रीमंत होत चालली होती !! चार्ल्स डिकन्सच्या ब्लीक हाऊस नावाच्या कादंबरीत त्या काळातली अशा प्रकारच्या कोर्टाच्या अनुभवाचं वर्णन वाचायला मिळतं.

इंग्लंडमध्ये असा काळ चालू असताना एके दिवशी चित्रकाराच्या घरी जेवणासाठी त्यानं आपल्या एका न्यायाधीश असणाऱ्या मित्राला बोलावलं होतं. जेवण चालू असताना चित्रकाराचं (एडवीनचं) एक कुत्रं कोचवर मोठ्या ऐटीत बसलं होतं. या कुत्र्याच्या डोक्यावर न्यायमूर्तींच्या डोक्यावर असणाऱ्या विगसारखेच केस होते. ते कुत्रा पाहून तो न्यायाधीश गंमतीनं म्हणाला की ते कुत्रं कॅपिटल लॉर्ड चॅन्सेलर (कायद्यातील अधिकारी) होऊ शकलं असतं !! न्यायाधीश मित्रानं केलेल्या एका विनोदानं चित्रकाराच्या कलाकार मनाला साद घातली. बाहेर न्यायव्यवस्थेची अवस्था तर त्याला स्पष्टच दिसत होती. या साऱ्या परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करण्याची कल्पना त्याला खुणावत होती.

ह्या विषयावर पुढं काम करत चित्रकारानं सोबत दिलेलं चित्र काढलं. चित्रात दाखवलेलं मुख्य कुत्रं एका विशिष्ट जातीचं आहे. न्यायमूर्तींच्या डोक्यावर असणाऱ्या विगसारखे या कुत्राच्या डोक्यावर केस असतात. चेहऱ्यावर अतिशय गंभीर असे हावभाव आहेत. समोरच्या टेबलावरच्या पुस्तकाच्या एका पानावर त्याचा एक पाय आहे तर पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर त्याचा चष्मा आहे. लाल रंगाची खुर्ची आणि त्यावर असणारी मऊ गादी न्यायाधीशांच्या खुर्चीची आठवण करून देते. टेबलावर शाईची डबी, लेखणी, दस्तावेज या सारख्या कोर्टातल्या वस्तू दिसतात. कोर्टातला कारकून कुत्रा मागच्या बाजूला दिसतो. कोर्टातले वकील, इतर अधिकारी सारीच मंडळी आपल्याला या चित्रात वेगवेगळ्या कुत्र्याच्या जातींमध्ये पाहायला मिळतात !! या विविध जातींच्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दाखवण्यात चित्रकाराचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. कुणाच्या चेहऱ्यावर कंटाळलेले भाव तर कुणाला झोप आल्यासारखी वाटते. कुणी लक्ष देऊन ऐकत असल्यासारखं वाटतं तर कुणाचं लक्षच नाहीये असं वाटतं. कुत्र्याच्या चेहेऱ्यांवरच्या हावभावांमुळंच ह्या चित्र कोर्टातलं वातावरण जिवंत होतं !! न्याययंत्रणेतली सारी माणसं कुत्र्यांच्या रूपात दाखवणं ही कल्पना उपहास करण्यासाठी अफलातून होती !!



ह्या चित्राला नाव देण्यात आलं 'ट्रायल बाय ज्युरी'. हे चित्र १८४० मध्ये पूर्ण झालं. ते त्याच वर्षी लंडनमधल्या रॉयल अकॅडेमीमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. ते त्याच वर्षी विकलं गेलंन्यायव्यवस्थेवर उपहासात्मक भाष्य करताना मोठी कल्पकता वापरल्यानं हे चित्र खूप गाजलं. आजही हे चित्र लोकप्रिय आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🍁https://www.chatsworth.org/art-archives/devonshire-collection/paintings/laying-down-the-law/ 
🍁https://en.wikipedia.org/wiki/Laying_Down_the_Law 
🍁http://victorian-era.org/edwin-henry-landseer-biography.html
🍁https://victoria.fandom.com/wiki/Dash
🍁https://www.parliament.uk/about/living-heritage/transformingsociety/laworder/court/overview/judicialreform/ 
🍁Sir Edwin Henry Landseer, 1802-1873- by Ormond, Richard; Rishel, Joseph J; Hamlyn, Robin; Philadelphia Museum of Art; Tate Gallery


🍁Image details:
Edwin Henry Landseer [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Edwin_Landseer_Trial_By_Jury.jpg

Tuesday, September 17, 2019

उत्तर-पश्चिम मार्ग



मुशाफिरी कलाविश्वातली

उत्तर-पश्चिम मार्ग

एकोणिसाव्या शतकातल्या उत्तरार्धातली गोष्ट. या काळात जगातल्या बऱ्याच ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज लोक दर्यावर्दी होते, धाडसी होते, हुशारही होते. पण एका मोहिमेत मात्र त्यांना यश मिळालं नव्हतं.

युरोपमधून अमेरिकेत जाण्यासाठीचा अटलांटिक महासागरातून असणारा मार्ग सर्वांना माहीत होताच, पण युरोपच्या उत्तर भागातून आर्क्टिक समुद्रातून कॅनडाकडं जाण्याचा (किंवा खरं तर थेट प्रशांत महासागरात जाण्याचा) समुद्री मार्ग लोक शोधत होते. आर्क्टिक भागातली जीवघेणी थंडी आणि बऱ्याच महिन्यांची रात्र लक्षात घेता हे एक महाकठीण काम होतं. हा मार्ग शोधण्याचे बरेच प्रयत्नही झाले होते, पण ते वाईट प्रकारे फसले होते. या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मृत्यूला मिठी मारणं असं सारे लोक मानायला लागले होते.

१८४५ मध्ये अनुभवी इंग्रज कप्तान 'जॉन फ्रँकलीन' याच्या नेतृत्वाखाली एक मोहीम झाली होती. ती इतक्या वाईट प्रकारे फसली होती की या मोहिमेवरच्या लोकांचं पुढं काय झालं हेही कुणाला कळतच नव्हतं. या मोहिमेतली जहाजं बर्फामध्ये अडकली होती आणि माणसं पुढच्या काळात त्या बर्फाळ प्रदेशात वेगवेगळ्या कारणानं मृत्युमुखी पडली होती. यावर आधारित एक कलाकृती 'मॅन प्रपोजेस् गॉड डिस्पोजेस्' पूर्वी आपण पाहिलीच आहे.

फ्रँकलिनच्या मोहिमेचं पुढं काय झालं ह्याची धाकधूक साऱ्याच इंग्रजांना होती. १८५० मध्ये कप्तान मॅकल्युअर यांच्या नेतृत्वाखाली एक शोध मोहीम निघाली. ह्या मोहिमेत ध्रुवीय प्रदेशात हरवलेल्या जहाजाचा आणि माणसांचा बराच शोध घेण्याचा प्रयत्न झाला. शोध मोहिमेतल्या जहाजाचं नाव होत 'एच एम एस इन्व्हेस्टिगेटर'. या लोकांनी समुद्रात आणि बर्फाळ प्रदेशात आपल्या माणसांचा काही ठावठिकाणा लागतो का हे पाहण्याचा बराच प्रयत्न केला. 'एच एम एस इन्व्हेस्टिगेटर' हेदेखील अखेरीस जहाजाची ध्रुवीय प्रदेशात बर्फात अडकलं. मोहिमेतल्या लोकांची सुटका 'एच एम एस रेझोल्यूट' नावाच्या जहाजानं केली आणि नंतर 'एच एम एस रेझोल्यूट' हे जहाजही शेवटी बर्फात अडकलं !! पण शोध मोहिमेतल्या लोकांनी जवळपास चार-पाच वर्षे ध्रुवीय प्रदेशात शोध घेण्याचं कठीण, आव्हानात्मक काम केलं होतं.

पुढं इंग्रजांनी १८७४ - ७५ च्या दरम्यान पुन्हा एकदा हा मार्ग शोधण्यासाठी एका मोहिमेची आखणी केली. ही मोहीम 'ब्रिटिश आर्क्टिक एक्स्पेडिशन' नावानं ओळखली जाते. या मोहिमेची आखणी चालू असताना या मोहिमेकडं साऱ्या जनतेचं लक्ष वळू लागलं. महान इंग्रज चित्रकारांपैकी एक असणाऱ्या जॉन मिलैस याच्या संवेदनशील कलाकार मनाला ही घटना साद घालत होती. एका वृद्ध खलाशाशी गप्पा मारताना चित्रकाराला खलाशाचं एक वाक्य खोल परिणाम करून गेलं होतं. वृद्ध खलाशी म्हणाला होता, "हे होऊ शकतं (हा मार्ग शोधला जाऊ शकतो) आणि तो इंग्लंडने शोधायला हवा."  या विषयावर चित्र काढण्याची कल्पना मिलैसच्या डोक्यात घोळू लागली.

आता मिलैस चित्र काढण्यासाठी मॉडेल्सच्या शोधात होता. एका अर्कचित्रं काढणाऱ्या (caricaturist) मित्राच्या अंत्ययात्रेत त्याला ट्रेलोनी नावाचा वृद्ध खलाशी भेटला. मिलैसला आपल्या चित्रासाठी तो मॉडेल म्हणून पसंत पडला. पण 'ट्रेलोनी'ला मॉडेल म्हणून काम करण्यात बिलकुल रस नव्हता. काहीतरी करून त्याचं मन वळवावं लागणार होतं. 'ट्रेलोनी' या काळात तुर्किश बाथ या प्रकाराचा खूप प्रचार करत होता. शेवटी मिलैसच्या पत्नीनं त्याला ६ वेळा तुर्किश बाथमध्ये जाण्याचं आश्वासन दिल्यावर तो मॉडेलिंगसाठी तिच्या पतीकडं ६ वेळा येण्यासाठी तयार झाला !!! व्यावसायिक मॉडेल असणाऱ्या 'सौ एलिस' यांची त्या चित्रातल्या स्त्रीच्या पात्रासाठी मॉडेल म्हणून निवड करण्यात आली.



या मॉडेल्सना घेऊन मिलैसनं १८७४ मध्ये सोबत दाखवलेलं चित्र काढलं. चित्राला नाव दिलं 'दि नॉर्थ वेस्ट पॅसेज'. चित्रात आपल्याला एक वृद्ध खलाशी आणि त्याची कन्या दिसतीये. वृद्ध खलाशी कॅनवासमधून थेट बाहेर बघतोय असं वाटतं. या खलाशांच्या नजरेत एक प्रकारची चमक आहे. मुलीच्या हातात एक जाडी वही आहे. यात त्या वृद्ध खलाशाच्या आठवणी लिहिलेल्या असाव्यात असं वाटतं. (अर्थात ती त्याची समुद्रातल्या प्रवासाची दैनंदिनी असावी.) मागच्या टेबलवर एक नकाशा पडलेला दिसतो. हा नकाशाच  ह्या चित्राचा संबंध आर्क्टिक मोहिमेशी जोडतो. हा नकाशा कॅनडाच्या उत्तर किनाऱ्याचा आहे. या प्रदेशाचा नकाशा बनवण्याचं काम वर नमूद केलेल्या मॅकल्युअरच्या शोध मोहिमेत झालं होतं. त्यामुळं चित्रातला खलाशी त्या शोध मोहिमेतील असावा असं सुचवण्यात आलंय. चार-पाच वर्षाच्या खडतर आठवणी या वहीत असाव्यात अशी कल्पना चित्र पाहणाऱ्याला लगेच येते. साहसाची, खडतर अनुभवांना सामोरं जाण्याची इंग्रजांची परंपरा आहे असं मिलैसनं एक प्रकारे या चित्रात सूचित केलंय. टेबलच्या मागच्या बाजूला भिंतीवर अडकलेलं एक चित्र अर्धवट दिसतंय. हे चित्र बर्फात अडलेल्या एका जहाजाचं आहे. आणि ते 'एच एम एस इन्व्हेस्टिगेटर' जहाजासारखं दिसतं असं मानलं जातं !!

मिलैसनं सुरुवातीला या चित्रात खलाशाची नातवंडंही दाखवली होती. (या नातवंडांसाठी मॉडेल्स म्हणून त्यानं स्वत:ची मुलंच घेतली होती). पण चित्रात जे नेमकं दाखवायचं होतं ते त्या चित्रात दिसत नव्हतं असं त्याला वाटलं. त्यामुळं त्यानं नंतर मुलांना वगळून पुन्हा एकदा चित्र काढलं.

हे चित्र नंतर प्रदर्शनात ठेवण्यात आलं. चित्रासाठी मॉडेल म्हणून काम करणारा ट्रेलोनी चित्र पाहून संतापालाच ! कारण या चित्रात त्याच्या बाजूला मद्याचा ग्लास दाखवण्यात आलेला होता !

हे चित्र इंग्लंडमध्ये प्रचंड गाजलं ! या चित्राच्या कित्येक प्रती ब्रिटिशांच्या घरी दिसू लागल्या ! मिलैसच्या मुलानं नंतरच्या काळात लिहिलंय की दक्षिण आफ्रिकेतल्या एका झोपडीत देखील त्यानं या चित्राची एक प्रत पाहिली ! खरं तर हे चित्र इंग्रजांची साहसी आणि वीर दर्यावर्दी म्हणून प्रतिमा दाखवणारं असल्यानेच इतकं लोकप्रिय झालं होतं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🍁Sir John Everett Millais - by Baldry, A. L. (Alfred Lys), published in 1908

Tuesday, September 10, 2019

चंडेश अनुग्रह

मुशाफिरी कलाविश्वातली

चंडेश अनुग्रह


तामिळनाडूमध्ये अरियालूर जिल्ह्यात एक शहर आहे - गंगाकोंडचोलापूरम. चोला घराण्यातल्या राजा राजेंद्र चोला (पहिला) याच्या कारकिर्दीत (म्हणजे जवळपास एक हजार वर्षांपूर्वी) हे शहर त्याच्या राज्याची राजधानी बनलं. त्यानंतर जवळपास २५० वर्षे हे शहर साम्राज्याची राजधानी होतं. या शहरातलं एक ऐतिहासिक, कलात्मक मंदिर म्हणजे बृहदीश्वर मंदिर.

हे मंदिर १०३५ मध्ये राजा राजेंद्र चोला (पहिला) यानं बांधलं. त्याचे वडील राजराजा चोला यांनीही तंजावर इथं असंच एक 'बृहदीश्वर मंदिर' बांधलं होतं. राजेंद्र राजानं आपलं साम्राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि बंगाल इथपर्यंत वाढवल्यानंतर आपल्या विजयाचं एक प्रकारचं स्मारक म्हणून हे मंदिर बांधलं. पराभूत झालेल्या राजांना त्यानं गंगेचं पाणी भांड्यांमधून पाठवायला सांगितलं. या पराभूत राजांनी पाठवलेलं गंगाजल त्यानं मंदिराच्या विहिरीत ओतलं. ही विहीर त्या काळात चोलगंगम या नावानं ओळखली जायची. नंतरच्या उत्खननात या मंदिरापासून राजाचा राजवाडा जवळच असल्याचं स्पष्ट झालं.

राज्याच्या सीमा दूरदूरपर्यंत वाढवणाऱ्या या राजेंद्र राजाला वाटत होतं की त्याच्यावर शंकराची कृपा होती. या शिवाच्या कृपेमुळंच त्याला इतके विजय मिळाले होते असं त्याला वाटायचं. बृहदीश्वर मंदिराभोवती प्रदक्षिणा काढली तर शिवभक्तांना शंकराचं वरदान/आशीर्वाद मिळाल्याचं दृश्य दाखवणारी बरीच कोरीव कामं दिसतात. उदा. यात शंकराचा भक्त असणाऱ्या रावणाच्या मूर्तींचाही समावेश आहे. मूर्तीमध्ये आपल्याला रावण शंकराकडून वरदान/आशीर्वाद घेताना दिसतो. यात एक चंडेश नावाचा शिवभक्त शंकराकडून आशीर्वाद घेतानाचं शिल्पांकन आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यात दाखवलेला चंडेश हा राजा राजेन्द्रासारखा दिसत असावा असं जाणकारांचं मत आहे.

Image credit: R.K.Lakshmi [CC BY-SA 4.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:N-TN-C94_Chandesha_anugraha_Gangaikondacholapuram.jpg

कोण होता हा चंडेश ? चंडेश हा एक महत्वाचा नायनार म्हणजे शिवाचा भक्त असणारा संत मानला जातो. शैव पंथातले सहाव्या आणि आठव्या शतक दरम्यान तामिळनाडूमध्ये होऊन गेलेले ६३ संत या नायनारांमध्ये येतात.

दक्षिण भारतातल्या सुप्रसिद्ध पेरिय पुराणात सांगितलेल्या कथेप्रमाणे चंडेशचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. पण जन्मापासूनच त्याच्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. तो गाईंना घेऊन बाहेर जायचा. एका वाळूच्या शिवलिंगावर तो गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा. त्याच्या वडिलांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्याच्या वडिलांना हा सारा मूर्खपणा वाटला, त्यांना हा सारा प्रकार कळताच ते सरळ मुलाकडे आले.  त्यांना त्या शिवलिंगाचा वैताग आला होता. त्यांनी रागाच्या भरात शिवलिंगाला लाथ मारली. यामुळं चंडेशचं ध्यान भंग झालं. त्यानं वडिलांच्या लाथ मारणाऱ्या पायावर काठी फेकून मारली. त्या काठीची कुऱ्हाड झाली. ह्या ठिकाणी शंकर प्रकट झाले. चंडेशची निस्सीम भक्ती पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी चंडेशच्या वडिलांचा पाय पूर्ववत केला. त्यांनी तेंव्हापासून चंडेशला स्वत: त्याचे वडील असल्याचं सांगितलं. यानंतर शंकरांनी स्वत:च्या गळ्यातील फुलांची माळ काढून चंडेशच्या डोक्यात फेट्यासारखी बांधली. नेमका हाच प्रसंग ह्या शिल्पात दाखवलाय.

कुठल्याही शैव पंथाच्या मंदिरात चंडेशचं स्थान खूप महत्वाचं मानलं जातं. मंदिरात त्याच्या मूर्तीसमोर गेल्यानंतर भक्त लोक टाळ्या वाजवतात.

या शिल्पामध्ये आपल्याला शंकराच्या डोक्यावर मुकुटासारखी केशरचना दिसत आहे. शंकरानं अलंकारही वापरले आहेत. पार्वतीच्या डोक्यावर रत्नांचा मुकुट दिसतोय. सर्वात मोठ्या आकाराची मूर्ती शंकराची, त्यापेक्षा  लहान पार्वतीची आणि सर्वात लहान मूर्ती चंडेशची दाखवलेली आहे. शंकराच्या वरच्या दोन हातात परशु आणि काळवीट दिसतंय. तसंच चंडेशच्या कथेमधली काही दृश्ये मागं कोरलेली दिसतात. शिल्पांकनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातल्या तिघांच्या नजर तीन वेगवेगळ्या दिशांना आहेत.

शिल्पामधल्या अप्रतिम कलाकौशल्यासाठी हे शिल्पांकन सुप्रसिद्ध आहे.

दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:


https://www.thehindu.com/features/magazine/marvels-in-stone/article2308298.ece

https://tamilnadu-favtourism.blogspot.com/2015/11/gangaikonda-cholapuram-sculptures.html
https://www.academia.edu/11003817/Shaiva_Iconography_in_Chola_Temples
https://en.wikipedia.org/wiki/Chandeshvara_Nayanar
प्राचीन मंदिरेमूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे - उदयन इंदूरकर

Monday, September 2, 2019

लेखनिक गणपती

मुशाफिरी कलाविश्वातली


लेखनिक गणपती 

आजच्या काळातल्या मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधल्या बुंदेलखंड भागात दहाव्या शतकात चंदेल घराण्याचं राज्य होतं. इ स ९२५ ते इ स ९५० च्या दरम्यान चंदेल घराण्यात एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं यशोवर्मन. सुरुवाळतीच्या काळात त्यानं गुर्जर-प्रतिहार राजाचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं. पण ते झुगारून नंतर तो स्वतंत्र राजा झाला. आपल्या कारकिर्दीत त्यानं एक महत्वाचं मंदिर बांधायला सुरुवात केलीहे मंदिर होतं खजुराहोमधलं लक्ष्मण मंदिर.

या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बऱ्याच प्रकारची कोरलेली शिल्पं आहेत. यात देवदेवता तर पाहायला मिळतातच, पण त्या शिवाय शिकारीचे प्रसंग, नृत्याचे कोरलेले चित्रण, कुस्तीच्या स्पर्धा आणि सैनिकही दाखवलेले आहेत. एका ठिकाणी सभोवताली विद्यार्थी असणारे शिक्षकही दाखवण्यात आले आहेत. या सर्वांमध्ये महाभारताशी संबंधित असणारा एक प्रसंग दाखवणारी गणेशाची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती दाखवण्यात आलेली आहे. हा प्रसंग महाभारत घडून गेल्यानंतरचा आहे. 

आपले वंशज असणारे कौरव आणि पांडव यांची आयुष्ये संपल्यानंतरही वेदव्यास यांचं जीवन व्यवस्थित चालू होतं. याचं कारण म्हणजे महर्षी वेदव्यास हे मोठे तपस्वी होतेएके दिवशी व्यासमुनींचं असंच ध्यान चालू होतं, आणि त्यांच्या समोर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवानं त्यांना महाभारताची कथा लिहायला सांगितली. सारं महाभारत व्यासांच्या डोळ्यासमोरच घडलं होतं, त्यामुळं त्यांना महाभारतातली सारी पात्रं, सारे प्रसंग पूर्णपणे माहीत होते. महाभारत लिहिण्यासाठी व्यासमुनींपेक्षा अधिक चांगला व्यक्ती मिळणंच शक्य नव्हतं.

Image credit: Rajenver [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Khajuraho_India,_Lakshman_Temple,_Sculpture_02.JPG

पण ब्रह्मदेवानं सांगितलेलं काम ऐकून व्यासमुनी विचारात पडले. कारण एकतर महाभारताची कथा अतिशय क्लिष्ट होती. आणि अशी क्लिष्ट आणि अतिदीर्घ असणारी कथा काव्यरुपात रचता रचता लिहिणं म्हणजे खरंच कठीण काम होतं. कुणीतरी आपल्याला ही महाभारताची कथा लिहायला मदत करावी असं व्यासमुनींना वाटत होतं. यावेळी ब्रह्मदेवानं व्यासमुनींना गणपतीची मदत घ्यायला सांगितलं.

व्यासमुनींनी गणपतीसाठी तपस्या सुरु केली. गणपती प्रसन्न झाला. गणपतीला पाहताच व्यासमुनींनी गणपतीला प्रणाम केला आणि आपल्या तपस्येचं कारण सांगितलं.

व्यासमुनी अतिशय शीघ्र रचना करत वेगानं महाभारत रचू शकतात ह्याची गणपतीला कल्पना होती. पण व्यासमुनींची परीक्षा पाहण्यासाठी गणपतीनं एक अट घातली. या अटीप्रमाणं व्यासमुनींनी रचलेले श्लोक  सांगायला सुरुवात केल्यानंतर गणपती लिहायला सुरुवात करणार होता. पण एखाद्या क्षणी गणपतीचं लिहून झाल्यावर व्यासमुनींनी पुढची रचना करेपर्यंत थांबावं लागलं तर मात्र लिहिण्याचं काम थांबवून गणपती सरळ निघून जाणार होता !!

महाभारत वेगानं रचण्याचा व्यासमुनींना आत्मविश्वास होता. पण गणपतीच्या लिहिण्याच्या प्रचंड वेगाचीही त्यांना कल्पना होती. गणपतीच्या लिहिण्याच्या वेगापेक्षा आपला रचण्याचा वेग जास्त असेल का हे त्यांना कळत नव्हतं. इतक्यात व्यासमुनींच्या डोक्यात काहीतरी विचार आला. त्यांनी गणपतीची अट लगेच मान्य केली. आणि त्यांनीही एक अट घातली. व्यासमुनींनी सांगितलेली कुठलीही गोष्ट गणपतीनं समजल्याशिवाय लिहू नये अशी ही अट होती.

अशा प्रकारे व्यासांनी महाभारत रचायला आणि गणपतीनं ते लिहायला सुरुवात केली. जेंव्हा जेंव्हा व्यासमुनींना थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटे किंवा थोडासा वेळ हवा असे तेंव्हा तेंव्हा ते क्लिष्ट अर्थाचं काव्य रचत. (याला कूट श्लोक असंही म्हणतात) त्याचा अर्थ समजायला गणपतीला वेळ लागे. यामुळं व्यासमुनींना विश्रांती मिळे. मग पुढची रचना ते आरामात करू शकत.

व्यासमुनींनी वेगानं महाभारत रचलं तर गणपतीनं ते सारं तितक्याच वेगानं लिहिलं. पण वेगानं लिहता लिहता एकदा गणपतीची लेखणी तुटली. पण गणपतीला थांबायचं नव्हतं. त्यानं आपला एक दात (हस्तिदंत) तोडून त्याचा लेखणी म्हणून वापर केला. त्यामुळंच गणपतीचा एक दात तुटलेला दाखवला जातो. (त्याचं एकदंत हे नावही यामुळंच पडलं).

महाभारतातलं हेच दृश्य खजुराहोमधल्या लक्ष्मण मंदिरात बघायला मिळतं. या गणपतीला आठ हात आहेत.  हा गणपती नृत्यमुद्रेत असून तो उजव्या मांडीवरच्या वस्त्रावर व्यासांनी रचलेलं महाभारत लिहतोय. व्यासांनी सांगितलेल्या शब्दांचा, रचनेचा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक आणणारी एकाग्रता त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

लक्ष्मण मंदिरातलं हे गणपतीचं शिल्प खूप प्रसिद्ध आहे !!

दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
“A Guide To Khajuraho” – B L Dhama
The Early Rulers of Khajuraho – Dr Sisir Kumar Mitra, Dr B C Sen
प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे - उदयन इंदूरकर