Tuesday, May 28, 2019

मोनालिसेचं अपहरण

मुशाफिरी कलाविश्वातली

मोनालिसेचं अपहरण

१९११ चं साल होतं. या काळात पॅरिसमध्ये एक भुरटा चोर राहायचा. त्याचं नाव होतं पेरुज्जीओ. हा पेरुज्जिओ त्यावेळी जेमतेम ३० वर्षांचा होता. पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध 'लुव्र म्युझियम'मध्ये तो काम करायचा. चित्रांसमोर संरक्षक काच बसवण्याचं त्याचं काम होतं.

एके दिवशी त्यानं या म्युझियममधलं एक चित्र चोरण्याचा बेत आखला. खरंतर तो भुरटा चोर होता पण एखादं चांगलं चित्र चोरून नेलं तर आपलं आयुष्य मालामाल बनून जाईल असं त्याला वाटत होतं. एखादं चित्र पळवून न्यायचं आणि काही दिवसांनी गुपचूपपणे ते एखाद्या रसिक कलासंग्राहकाला मोठ्या किंमतीला विकायचं असं त्याच्या डोक्यात होतं.

चोरी करण्यासाठी त्यानं चित्र निवडलं ते 'लिओनार्दो दा विंची'चं 'मोनालिसा' !! हे चित्र त्याकाळात बहुतेक सर्वांना माहित होतं पण ते आजच्यासारखं तेंव्हा जगप्रसिद्ध नव्हतं. पेरुज्जिओ भुरटा चोर होता आणि एखादं जगप्रसिद्ध चित्र चोरण्याचा विचार करण्याची त्याची झेप नव्हती.

एके रात्री पेरुज्जिओ लुव्र म्युझियममध्येच झोपला. त्यानं मोनालिसाचं चित्र भिंतीवरून काढून घेतलं. आणि तो लपून बसला. सकाळी कर्मचाऱ्यांनी म्युझियम उघडल्यानंतर हे चित्र कोटसारख्या कपड्यामध्ये गुंडाळून तो पसार झाला. तो तिथं काम करणाऱ्या लोकांपैकीच एक वाटत असल्यानं तो काहीतरी घेऊन चाललाय हे कुणाच्या लक्षातच आलं नाही.


Image URL: https://commons.wikimedia.org/wiki/File:Mona_Lisa,_by_Leonardo_da_Vinci,_from_C2RMF_retouched.jpg

या काळात मोनालिसाला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली नव्हती. खरंतर चोरी झालेल्या दिवशी मोनालिसा गायब झाल्याचं कुणाच्या लक्षातच आलं नाही !!  दुसऱ्या दिवशी स्थिर चित्रं काढणारा एक सामान्य कलाकार कलासंग्रहालयात गेलेला असताना त्याला मोनालिसाचं चित्र गायब झालेलं दिसलं. त्याचं असं झालं की त्याला कलासंग्रहालयात थांबून चित्र काढायचं होतं आणि जोपर्यंत मोनालिसाचं चित्र पाहत नाही तोपर्यंत त्याचा चित्र काढण्याचा मूड बनत नव्हता !! त्यामुळं मोनालिसाचं चित्र जागेवर नसल्यानं तो अस्वस्थ झाला. पण मोनालिसाचं चित्रं चोरीला गेलं असावं असा संशय मात्र अजूनही कुणाला येत नव्हता. याचं कारण म्हणजे तिथं कलासंग्रहालयात एक काम चाललं होतं - साऱ्या कलाकृतींची छायाचित्रं काढण्याचं.. त्या काळात छायाचित्रणाचं तंत्रज्ञान इतकं प्रगत नसल्यानं छायाचित्रं काढण्यासाठी कलाकृती सूर्यप्रकाशात न्यावी लागे. त्यामुळं मोनालिसाच्या वाट पाहणाऱ्या कलाकाराला वाटलं की मोनालिसाचं चित्र छायाचित्रणासाठी वर छतावर सूर्यप्रकाशात नेलं असावं. त्यानं मोनालिसा किती वेळात परत येईल ह्याचा अंदाज घेण्यासाठी छायाचित्रणाच्या ठिकाणी (छतावर) जाणाऱ्या कर्मचाऱ्याला माहिती घेण्यासाठी सांगितलं. थोड्या वेळानं तो कर्मचारी परत आला. त्यानं सांगितलं की मोनालिसा छायाचित्रणाच्या ठिकाणी नव्हतीच !!

मोनालिसा जगप्रसिद्ध व्हायला इथंच सुरुवात झाली !!

कलासंग्रहालयवाल्यांनी मोनालिसा चोरीला गेल्याचं जाहीर केल्यावर अक्षरश: जगभरच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर मोनालिसा झळकली !! ‘चोरी झालेल्या मोनालिसाला शोधण्यासाठी ६० डिटेक्टिव्ह लोकांचा तपास सुरु’ अशा मथळ्याची न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बातमी आली !! एखादा राष्ट्रीय पातळीवर घोटाळा झाल्यासारखं ह्या बातमीला फ्रान्समध्ये महत्व मिळू लागलं.

अमेरिकेमधले गडगंज संपत्ती असणारे लोक फ्रान्सचा पारंपारिक असणारा ठेवा (चित्रं) अवैधरित्या विकत घेत होते अशा अर्थाच्या बातम्या पसरू लागल्या. अमेरिकन उद्योगपती 'जे पी मॉर्गन' यांच्यावरही संशय घेण्यात आला. महान कलाकार 'पाब्लो पिकासो' हा देखील फ्रेंच पोलिसांच्या संशयातून सुटला नाही.

कलासंग्रहालय जवळपास एक आठवडाभर बंदच होते. ते उघडल्यावर लोक मोनालिसाच्या चित्राची रिकामी झालेली जागा पाहण्यासाठी गर्दी करू लागले !! ही रिकामी जागा साऱ्या फ्रेंच लोकांना देशासाठी लज्जास्पद बाब वाटत होती !!

आपण चोरलेल्या चित्रामुळं इतकं महाभारत घडेल असं त्या पेरूज्जिओला अजिबातच वाटलं नव्हतं.. त्यानं काही काळ ते चित्र लपवूनच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानं पेटीच्या तळाशी ते चित्र लपवून ठेवलं !! पोलीस त्याला शोधत शोधत त्याच्या घरी आले. पण चोरी झालेल्या दिवशी आपण वेगळ्याच ठिकाणी होतो हे सिद्ध करणं त्याला अगदीच सोपं गेलं !! मोनालिसाच्या चित्रासाठी वर्तमानपत्रांनी मोठमोठी बक्षिसं जाहीर केली. पण आपण पकडले जाऊ या भीतीनं पेरूज्जिओ पुढं आलाच नाही !! याकाळात आपल्या वडिलांना लिहिलेल्या एका पत्रात त्यानं आपलं नशीब उजळणार असून आपण मालामाल होणार असल्याचं लिहिलं होतं..

जवळपास सव्वादोन वर्षांनी पेरूज्जिओ पेटीमध्ये मोनालिसाचं चित्र ठेवून इटलीला परत आला. तिथल्या 'फ्लोरेन्स' नावाच्या शहरात तो एका कलाकृतींच्या व्यापाऱ्याला तो भेटला. पेरूज्जिओनं त्याला मोनालिसाच्या मूळ कलाकृती दाखविली. व्यापाऱ्यानं शहानिशा करून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला बोलावलं. पेरूज्जिओला भरमसाठ रक्कम देण्याचं त्यानं मान्य केलं होतं. पेरूज्जिओ मोठ्या समाधानानं घरी गेला. थोड्याच वेळात पेरूज्जिओच्या घराची बेल वाजली. पण दार उघडताच त्याला समोर पोलीस दिसले !!!

लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पेरुज्जिओनं एक शक्कल लढवली. मोनालिसाचं चित्रं मुळचं इटालियन असून ते फ्रान्समध्ये नव्हे तर इटलीमध्ये असायला हवं, ह्या देशप्रेमाच्या उद्देशानं ते चित्रं त्यानं इटलीमध्ये आणल्याचं तो आता सांगू लागला ! त्याला वाटत होतं की तो अशा वक्तव्यामुळं इटलीमध्ये हिरो बनेल !
पण असं काही झालं नाही, पेरूज्जिओला ८ महिन्यांचा तुरुंगवास झाला !

नंतर मोनालिसाला फ्रान्समध्ये परत देण्यात आलं !! मोनालिसा पुन्हा एकदा लुव्र कलासंग्रहालायात आली..
काही दिवसातच पहिल्या महायुद्धाचे ढग जमू लागले आणि मोनालिसाच्या बातम्या वृत्तपत्रात येणं बंद झालं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍀 https://www.npr.org/2011/07/30/138800110/the-theft-that-made-the-mona-lisa-a-masterpiece
🍀 https://www.historytoday.com/archive/months-past/mona-lisa-stolen-louvre
🍀 https://edition.cnn.com/2013/11/18/world/europe/mona-lisa-the-theft/index.html
🍀 https://en.wikipedia.org/wiki/Vincenzo_Peruggia
🍀 https://allthatsinteresting.com/vincenzo-peruggia-mona-lisa-theft

Saturday, May 18, 2019

हिज मास्टर्स व्हॉइस (एच. एम. व्ही.)


मुशाफिरी कलाविश्वातली

हिज मास्टर्स व्हॉइस (एच. एम. व्ही.)

'फ्रान्सिस बॅरॉड' हा इंग्रज चित्रकार तसा असामान्य किंवा प्रतिभावंत म्हणून मुळीच ओळखला जात नाही. पण त्याचं एक चित्र मात्र अक्षरश: अजरामर झालं !! या चित्राचं नाव होतं 'हिज मास्टर्स व्हॉइस'.

फ्रान्सिस आपल्या वडिलांप्रमाणंच चित्रकार होतं. त्याचं लंडनमध्ये एका चांगल्या महाविद्यालयात कलेचं शिक्षणही झालं होतं. त्याचा मार्क हा भाऊदेखील चित्रकारच होता. नाट्यगृहात मंचावर सेट उभे करताना सेट जिवंत करण्यासाठी योग्य त्या प्रकारे तो चित्रं रंगवायचा. हा मार्क ब्रिस्टॉलला काम करायचा आणि तिथं त्याचं एक कुत्रंही होता. या कुत्र्याचं नाव होता 'निप्पर'.

दुर्दैवानं मार्क तरुण वयातच वारला. ब्रिस्टॉलला त्याच्यासोबत एक कुत्रंही होतं. त्याची आर्थिक स्थिती तशी वाईटच होती. या मार्कचं बरंचंसं सामान आणि तो कुत्रा मग फ्रान्सिसकडं आला. या सामानात एक फोनोग्राफ आणि मार्कच्या आवाजातले काही रेकॉर्डिंग्जदेखील होते.

     फ्रान्सिस कधी कधी त्या फोनोग्राफवर मार्कच्या आवाजातले रेकॉर्डिंग्ज लावायचा. आणि तो कुत्रा फोनोग्राफच्या हॉर्नकडं (त्यामधून येणाऱ्या आपल्या मालकाच्या आवाजामुळं) एकसारखं बघत राहायचा. हे दृश्य फ्रान्सिसच्या मनावर एक प्रकारचा ठसा उमटवायचं. १८८७ मध्ये मार्कचा मृत्यू झाला होता. आणि पुढं १८९५ मध्ये त्या कुत्र्यानंही प्राण सोडले.

आपला स्वर्गवासी भाऊ आणि फोनोग्राफमधून भावाचा आवाज येताना ते लक्ष देऊन पाहणारं त्याचं कुत्रं हे फ्रान्सिसच्या चित्रकार मनाला साद घालत होते. १८९८/९९ च्या दरम्यान फ्रान्सिसनं फोनोग्राफ ऐकतानाचं कुत्र्याचं एक चित्र काढलं. चित्राला शीर्षक दिलं - 'फोनोग्राफ ऐकत आणि पाहत असताना कुत्रा'. पण नंतर त्यानं चित्राचं नाव बदलून 'त्याच्या मालकाचा आवाज' (His Master’s Voice) असं नवीन नाव दिलं.

आता   फ्रान्सिसला एक चित्र कुठंतरी विकून पैसे मिळवायचे होते. त्यानं आपलं चित्र रॉयल अकॅडेमीमध्ये प्रदर्शित करण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याला काही यश मिळालं नाही. मग त्यानं आपलं चित्र नियतकालिकांमध्ये देण्याचाही प्रयत्न केला. पण तिथंही त्याचं चित्र घ्यायला कुणी हो म्हणेना. ते कुत्रं काय करतंय हे चित्र बघणाऱ्यांपैकी कुणालाच कळणं शक्य नाही असं सारे लोक त्याला सांगायचे ! पण तो      काही आशा सोडायला तयार नव्हता. फ्रान्सिस 'एडिसन बेल' नावाच्या एका फोनोग्राफ बनवणाऱ्या कंपनीकडं आपलं चित्र विकण्याचा प्रयत्न करू लागला. तिथं  "कुत्री फोनोग्राफ ऐकत नाहीत" असं उत्तर त्याला मिळालं.

  फ्रान्सिसनं आपल्या चित्रात फोनोग्राफच्या हॉर्नचा रंग काळा दाखवला होता. त्याला कुणीतरी सल्ला दिला की त्या चित्रात जर हॉर्नचा रंग सोनेरी (म्हणजे पितळेच्या हॉर्नचा रंग) दाखवला तर त्याचं चित्र अजून सुंदर दिसलं असतं. आणि त्यामुळं ते चित्र विकलं जाण्याची शक्यता वाढणार होती.

आता फ्रान्सिस फोनोग्राफचं पितळी हॉर्न असणारं मॉडेल शोधू लागला. नव्यानंच स्थापन झालेल्या एका 'ग्रामोफोन' नावाच्या कंपनीमध्ये तो आपलं चित्र घेऊन गेला. त्यानं तिथल्या मॅनेजरला आपलं चित्र दाखवलं आणि एक विनंती केली. त्याला काही काळासाठी त्या कंपनीतलं एक पितळी हॉर्न असणारं फोनोग्राफ चित्रासाठी मॉडेल म्हणून हवं होतं. मॅनेजरनं ते चित्र एकदा पाहिलं आणि त्याला ते चित्र विक्रीसाठी उपलब्ध आहे का ते विचारलं.फ्रान्सिसनं अर्थातच होकार दिला. खरंतर या कंपनीचा प्रॉडक्ट फोनोग्राफ नसून ग्रामोफोन होता. दोन्हींमध्ये थोडासा फरक होता. मॅनेजरनं त्याला चित्रामध्ये फोनोग्राफऐवजी ग्रामोफोन दाखवता येईल का ते विचारलं.फ्रान्सिस आपलं चित्र विकलं जावं यासाठी त्या चित्रात बदल करायला तयार होता !!

Francis Barraud [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:His_Master%27s_Voice.jpg

१८९९ च्या सप्टेंबर महिन्यात ग्रामोफोन कंपनीनं फ्रान्सिसला एक पत्र पाठवलं. या पत्रात एक प्रस्ताव होता. फ्रान्सिसच्या चित्रासाठी ग्रामोफोन कंपनी त्याला ५० पौंड्स आणि चित्राच्या साऱ्या स्वामित्व हक्कांसाठी त्याला अजून ५० पौंड्स द्यायला तयार होती. फ्रान्सिसनं प्रस्तावाला पटकन होकार दिला !!

१९०० च्या जानेवारीमध्ये हे चित्र ग्रामोफोनच्या जाहिरातींमध्ये सर्वत्र दिसू लागलं !!

फ्रान्सिसनं उर्वरित आयुष्याचा बराचसा भाग ग्रामोफोन कंपनीच्या मागणीप्रमाणं या चित्राच्या प्रतिकृती बनवण्यात घालवला !! फ्रान्सिसच्या मृत्यूनंतरही इतर कलाकारांनी ह्या चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलं. पुढं १९२१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं 'एच एम व्ही' (हिज मास्टर्स व्हॉइस) नावाची संगीत विकण्यासाठी दुकानं सुरु केली.

 हे 'एच. एम. व्ही.' हे त्या चित्रावरूनच आलं होतं !!

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

Wednesday, May 15, 2019

मातृदेवता देवीश्री


मुशाफिरी कलाविश्वातली

मातृदेवता देवीश्री

'जावा' हे इंडोनेशिया देशातलं एक बेट. इंडोनेशियामधले जवळपास ६५% लोक हे जावामधले आहेत. या जावामध्ये चौथ्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत हिंदू/बौद्ध धर्माचं प्राबल्य होतं. इथं हिंदू धर्माचं आगमन झाल्यानंतर स्थानिक संस्कृतीमधल्या देवता आणि त्यांच्याशी मिळत्याजुळत्या असणाऱ्या हिंदु धर्मातल्या देवता यांचा संगम झालेल्या देवता दिसू लागल्या. यातलीच एक देवी म्हणजे देवीश्री. (ही देवी हिंदू धर्मातल्या लक्ष्मीसारखी अाहे.

जावामधल्या एका पुराणकथेप्रमाणं स्वर्गामध्ये एकदा 'महादेव बटारा गुरु' यांनी एकदा नवीन महाल बांधायचं ठरवलं. स्वर्गातल्या साऱ्या देवीदेवतांना त्यांनी आपापल्या शक्ती वापरत महाल बांधण्यात योगदान करायला सांगितलं. जो कुणी (किंवा जी कुणी) ही आज्ञा पाळणार नाही  त्याचं/ तिचं  डोकं उडवलं जाणार होतं!

सर्व देवी,देवता कामाला लागले. पण या देवतांपैकी एकाला मात्र प्रश्न पडला होता. या देवाचं नाव होतं 'अंता'. या अंताला हात आणि पाय नव्हते. तो नागदेवता होता.. महादेवाच्या महालात आपण कसं योगदान द्यायचं हे त्याला कळत नव्हतं. त्यानं महादेव बटारा गुरु यांचे धाकटे बंधू बटारा नारद यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण बटारा नारद अंताच्या दुर्दैवानं गोंधळात पडले.

अंता हताश होऊन रडायला लागला. त्याचे अश्रू जमिनीवर पडले. आणि या तीन अश्रूंची ३ अंडी बनली !! ही तीन अंडी मोत्यांसारखी चमकत होती. बटारा नारद यांनी त्याला ती अंडी घेऊन बटारा गुरुकडं जाण्याचा सल्ला दिला. यामुळं अंतावर अन्याय होणं टळलं असतं.

तिन्ही अंडी तोंडामध्येच धरून अंता बटारा गुरुंकडं चालू लागला. तो चालत असताना वाटेत त्याला एक गरुड भेटला. गरुडानं अंताला एक प्रश्न विचारला. पण अंता उत्तरच देऊ शकणार नव्हता कारण त्याच्या तोंडात ३ अंडी होती. पण अंता काहीच बोलत नसल्यानं गरुडाला राग आला. गरुडाला अंता उद्धट वाटला. त्यानं अंतावर हल्ला केला. अंताच्या तोंडातून एक अंडं पडलं !! अंता पटकन झुडुपांमध्ये लपण्यासाठी गेला. पण दुर्दैवानं तिथं तो गरुड तिथं टपूनच बसला होता. अंताच्या तोंडातून दुसरं अंडं पडलं. आता अंताकडं एकाच अंडं शिल्लक राहिलं. ते अंडं नीट सांभाळत अंता बटारा गुरुंकडं निघाला.

शेवटी अंता बटारा गुरुंकडं पोहोचला. बटारा गुरूंना त्यानं अंड्याच्या रुपातला आपला अश्रू दिला. बटारा गुरूंनी तो स्वीकारला. त्यांनी अंताला ते अंडं एखाद्या घरट्यात ठेवायला सांगितलं. अंता ते अंडं घेऊन परत निघून गेला. काही दिवसांनी चमत्कार होऊन त्या अंड्यातून एक गोंडस कन्यारत्न बाहेर आलं !! अंतानं ती कन्या बटारा गुरूंना आणि त्यांच्या पत्नीला दिली.

या कन्येचं नाव 'न्याई पोहाची' असं ठेवण्यात आलं. ही कन्या वाढत्या वयासोबत अधिकाधिक रूपवान होत गेली. तिच्या अलौकिक सौंदर्यानं तिला पाहणारा प्रत्येक पुरुष तिच्याकडं आकर्षित व्हायचा. यामुळं स्वर्गातल्या देवतांची आपापसात वैर होण्याची शक्यता झाली.!! नंतर तर बटारा गुरु स्वत:च तिच्याकडं नकळत आकर्षित व्हायला लागले.


User:Davenbelle aka User:Moby Dick aka Jack Merridew [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:DewiSri.jpg

आता मात्र सारे देव चिंतेत पडले. जे काय चाललंय ते त्यांना चांगलं कळत होता. त्यांना स्वर्गामध्ये शांतीही राखायची होती आणि कन्येचं असणारं चांगलं नावही सुरक्षित ठेवायचं होतं. शेवटी त्यांनी एक कट रचला- त्यांनी तिला विष देऊन ठार केलं आणि पृथ्वीवर आणून कुठंतरी पुरलं !!


Gunawan Kartapranata [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Dewi_Sri_Java_Bronze.jpg

तिच्या निरागसपणात एक प्रकारची दैवी शक्ती होती. तिला पृथ्वीवर जिथं पुरलं होतं त्या ठिकाणी एक चमत्कार दिसून यायला लागला. मानवजातीला सदैव उपयोगी पडणाऱ्या वनस्पती तिला पुरलं होतं त्या ठिकाणी उगवायला लागल्या. तिच्या डोक्यातून नारळाचं झाड उगवलं. तिचे नाक, ओठ आणि कान यातून वेगवेगळ्या पालेभाज्या आणि मसाले यांच्या वनस्पती उगवल्या. केसांमधून वेगवेगळी फुलांची झाडं, गवत तर छातीतून फळं देणारी झाडं उगवली. तिच्या हातांमधून सागवान आणि इतर वृक्ष उगवले. पायांमधून बांबू आणि अन्नसाठा करणाऱ्या  (बटाटे, रताळे यासारख्या) वनस्पती उगवल्या. तिच्या बेंबीमधून भाताचं रोपटं उगवलं. (काही इतर कथांप्रमाणं तिच्या एका डोळ्यांमधून पांढऱ्या भाताचं तर दुसऱ्या डोळ्यांधून तांबड्या भाताचं रोपटं उगवलं.

Tropenmuseum, part of the National Museum of World Cultures [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:COLLECTIE_TROPENMUSEUM_Beeld_van_Dewi_Sri_de_rijstgodin_TMnr_60016918.jpg

Tropenmuseum, part of the National Museum of World Cultures [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:COLLECTIE_TROPENMUSEUM_Pop_van_gevlochten_lontarblad_voorstellende_de_rijstgodin_Dewi_Sri_TMnr_1100-20.jpg

The original uploader was Sumbuddi at English Wikipedia. [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Indonesia_1952_10r_o.jpg

मानवजातीला उपयोगी पडणाऱ्या साऱ्या वनस्पती तिच्या मृतदेहापासून आल्याचं मानलं जातं !! पुराणकाळापासून तिला भाताची देवता आणि जननदेवता (Goddess of fertility) मानलं जातं. प्राचीन काळी तिला सर्वश्रेष्ठ देवी मानलं जायचं. जन्म, जीवन आणि धान्य यांची ती देवता आहे. हीच देवी 'देवीश्री' या नावानंही ओळखली जाते.
शिल्पकलेत तिला दाखवताना तरुण, नाजूक आणि सुंदर दाखवलं जातं. तिला दागदागिण्यांसहित शुभ्र, पीत किंवा हरित रंगाची वस्त्रं परिधान केल्याचं दाखवलं जातं. तिच्या हातात भाताची फांदी दाखवली जाते. गौर वर्ण, अर्धोन्मीलित नयन आणि चेहऱ्यावर एक प्रकारची शांती ही तिच्या मूर्तींमध्ये नेहमीच दिसून येते. बाली देशातले लोक काही विधींमध्ये नारळाच्या (किंवा इतर पाम वृक्षाच्या) कोवळ्या पानांपासून, तांदळाच्या पिठापासून तिची प्रतिमा करतात. तिथल्या बऱ्याचशा विधींमध्ये देवीची पूजा केली जाते.

भाताची देवता असल्यानं भाताच्या शेतात आढळणाऱ्या सापाशीही हीच संबंध जोडला जातो. जावामधल्या ग्रामीण भागात आजही तिथल्या परंपरेप्रमाणं घरी साप आला तर त्याला हुसकावून न लावता त्याला एक प्रकारचा नैवेद्य दाखवतात. घरी साप येणं हा तिथं चांगलं पीक येण्यासाठी शुभशकुन मानला जातो.

आजही तिथल्या भाषेत भाततोडणीच्या कार्यक्रमाला 'मपागश्री' म्हणतात. या शब्दाचा अर्थ , 'देवीश्रीला  बोलावणं किंवा आवाहन करणं' असा होतो !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🔘 https://en.m.wikipedia.org/wiki/Dewi_Sri?wprov=sfla1

🔘 https://broomcloset.wordpress.com/2013/04/03/dewi-sri-the-indonesian-rice-goddess/

🔘 https://mirrorofisis.freeyellow.com/id573.html


Tuesday, May 7, 2019

आशेची कांती

मुशाफिरी कलाविश्वातली
आशेची कांती

म्हैसूरचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे जगमोहन पॅलेस. एके काळी 'वाडियार' राजघराण्यातल्या लोकांचा हा राजवाडा होता. आता त्याचं रूपांतर कलादालनात (art gallery) झालंय. या कलादालनाला भेट देण्यासाठी कित्येक पर्यटक/कलारसिक नेहमी इथं येत असतात.

या कलादालनाच्या दुसऱ्या मजल्यावर एक खास कलाकृती आहे. दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी प्रकाशयोजना मुद्दामच मंद ठेवण्यात आली आहे. या काहीशा अंधारमय ठिकाणी आपल्याला एक महान चित्रकृती पहायला मिळते. चित्रावर एक पातळसा पारदर्शक पडदा आहे. या पडद्यातून आपल्याला चित्रामधली स्त्री पितळेची समई घेऊन उभी दिसते. अंधारमय वातावरणात ही समई, त्यातून बाहेर पडणारा प्रकाश हे सगळं खरंखुरं भासायला लागतं. पडदा बाजूला केला तर चित्रातल्या स्त्रीनं नेसलेल्या साडीवरच्या गुलाबी, जांभळ्या छटा अजूनच स्पष्ट दिसायला लागतात.

या चित्रात आपल्याला एक भारतीय स्त्री दिसते. तिनं एका हातात पितळेची समई धरली आहे तर तिनं दुसरा हात (वाऱ्यानं दिव्याची ज्योत विझू नये म्हणून) दिव्याभोवती धरलाय. या स्त्रीनं साधीच अशी पारंपारिक भारतीय साडी नेसलीये. या दिव्याचा तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडलाय तर मागच्या भिंतीवर तिची सावली पडली आहे. 
  


या चित्राचं नाव आहे 'आशेची कांती' (glow of hope). भारतीय चित्रांपैकी जगभर ख्याती असणाऱ्या चित्रांपैकी हे एक. साधेपणा, मृदू रंग, संवेदनशीलता, बोटांमधून पडणारा प्रकाश या साऱ्यामुळं ही चित्र एक महान कलाकृती बनली आहे.

हे चित्र आहे 'सावळाराम हळदणकर' यांचं. हळदणकर मूळचे सावंतवाडीचे. लहानपणीच त्यांची चित्रकलेतली प्रतिभा शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ध्यानी आली. त्याकाळच्या तिथल्या राजाकडं त्यांनी हळदणकरांच्या प्रतिभेविषयी सांगितलं. राजाच्या पाठिंब्यानं सावळारामचं पुढं मुंबईच्या 'सर जे जे स्कूल आॅफ अार्ट्समध्ये' शिक्षण झालं. पुढं हळदणकर भारतातले एक प्रसिध्द चित्रकार बनले.

हे चित्र १९४०च्या दशकातलं. १९४५/४६ च्या दरम्यान दिपावलीच्या सणाचे दिवस चालू होते. हळदणकरांची तृतीय कन्या 'गीता' एका हातात समई घेऊन दुसरा हात ज्योतीभोवती धरून बाहेर येत होती. बाहेर येताना तिला वडिलांनी पाहिलं आणि त्यांच्या चित्रकार मनात एक कल्पना चमकून गेली. समईचा प्रकाश, आजूबाजूचा अंधार, प्रकाशानं उजळलेला चेहरा आणि तळव्यांना झाकली जाणारी ज्योत यामुळं एक सुंदर चित्र बनू शकणार होतं आणि हळदणकरांच्या कलाकार मनानं ते पटकन टिपलं !!

हळदणकरांनी हे चित्र काढण्यासाठी तैलरंगाऐवजी जलरंगाचं माध्यम वापरायचं ठरवलं. तैलरंग वापरून काढलेल्या चित्रात बदल करणं सहज शक्य असतं. जलरंगात मात्र असं नसतं. यामुळं जलरंगात चित्र काढणं आव्हानात्मक होतं. एकही चूक केल्याशिवाय हे चित्र पूर्ण करून हळदणकरांना जगाला दाखवून द्यायचं होतं. हळदणकर हे चित्र काढत असताना गीता तीन तास हातात समई घेऊन उभी होती !! आणि मग या कलाकृतीची निर्मिती झाली.

म्हैसूरला त्याकाळात 'दसऱ्याचे खास कार्यक्रम' असायचे. चित्र काढल्यानंतर दोन वर्षांनी म्हैसूरच्या राजानं दसऱ्यानिमित्त भरवलेल्या (स्पर्धा असणाऱ्या) प्रदर्शनामध्ये हे चित्र पाठवण्यात आलं. ह्या चित्रानं स्पर्धेत पहिलं पारितोषिक पटकावलं !! कालांतरानं म्हैसूरच्या राजानं हे चित्र खरेदी केलं आणि हे चित्र म्हैसूरच्या राजवाड्यात आणण्यात आलं. नंतर हे चित्र कलादालनात हलवण्यात आलं.

म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधल्या 'जयचमराजेंद्र' कलादालनामधलं हे चित्र गेली ६५ वर्षं तिथल्या कलादालनातलं प्रमुख आकर्षण आहे !!
    
- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा 
#कारागिरी

संदर्भ: 

🍀 https://www.kokuyocamlin.com/blog/the-real-story-behind-the-glow-of-hope-a-painting-by-s-l-haldankar.html

🍀 https://en.m.wikipedia.org/wiki/Glow_of_Hope?wprov=sfla1

🍀 https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/how-a-woman-with-a-lamp-turned-a-plain-canvas-into-a-masterpiece/articleshow/50033938.cms