Monday, July 29, 2019

दि ग्लिनर्स

मुशाफिरी कलाविश्वातली

दि ग्लिनर्स

बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये एक प्रकारचा विरोधाभास बघायला मिळतो. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे, कशाचीच कमतरता नसणारे विलासी जीवन जगणारे श्रीमंत लोक तर दुसऱ्या बाजूला अगदी नगण्य पैशांसाठी प्रचंड राबणारे, जगण्यासाठी संघर्ष करणारे गरीब लोक. हा टोकाचा विरोधाभास, आर्थिक विषमता ही आजची गोष्ट नाही आणि एखाद्या देशापुरती मर्यादित असणारी ही गोष्ट नाही !!

या आर्थिक विषमतेवर, सामाजिक विषमतेवर आजपर्यंत कित्येक लोकांनी लिखाण केलंय.. पण आज आपण एका थोर चित्रकाराचं एक अजरामर झालेलं याच विषयावरचं चित्र बघणार आहोत. या चित्रकाराचं नाव होतं 'मिलेट'. हा चित्रकार फ्रेंच होता. तो एकोणिसाव्या शतकात होऊन गेला. त्यानं हे चित्र जवळपास एकशे त्रेसष्ट वर्षांपूर्वी काढलंय. या चित्राचं नाव आहे 'दि ग्लिनर्स'.

ग्लिनर्स कुणाला म्हणतात? चित्र बघितल्यावर आपल्याला (ह्या शब्दाचा खरा अर्थ माहित नसेल तर) वाटतं की 'ग्लिनर्स'चा अर्थ शेतामध्ये काम करणारे लोक. ग्लिनर्सचा अर्थ ह्यापेक्षा बराच वेगळा आहे. एखादा हंगाम संपल्यानंतर शेतातलं सारं धान्य मालकानं नेल्यानंतर शेतात उरलेले, मातीत पडलेले धान्याचे दाणे पोटापाण्यासाठी वेचून नेण्याचं काम करणारे लोक म्हणजे 'ग्लिनर्स'.

समाजातल्या विषमतेवर वाच्यता करणारं मास्टरपीस म्हणजे हे 'दि ग्लिनर्स' चित्र. या चित्रात चित्रकारानं चित्रात ठळकप्रकारे तीन ग्लिनर्स स्त्रिया दाखवल्या आहेत. त्यांच्या वाकून धान्यांचे दाणे शोधून वेचण्याच्या कामामुळं त्यांना होणाऱ्या शारीरिक कष्टाची जाणीव होते. याविरूद्ध चित्रात पार्श्वभूमीला  शेतावर देखरेखीचं काम करणारा माणूस घोड्यावर जाताना दिसतो. एक एक धान्याचे दाणे शोधण्याचं ग्लिनर्स स्त्रियांचं काम चालू असताना मागं आपल्याला धान्याचे ढिगारे दिसतात. एका घोडागाडीतून खूप सारं धान्य नेलं जातानाही दिसतंय. ग्लिनर्स स्त्रियांची काळी सावली त्यांच्या बाजूलाच दिसते. याउलट पार्श्वभूमीला धान्यांच्या ढिगाऱ्यांवर प्रकाश पडलेला दिसतो. या ग्लिनर्सचे चेहरे दाखवणं चित्रकारानं टाळलंय. सामाजिक विषमतेवर भाष्य करण्याचं काम हे चित्र अतिशय परिणामकारकरित्या करतं. चित्रात अगदी मागच्या बाजूला एक अस्पष्ट खेडेगावही दिसतं. 


चित्रकारानं हे चित्र पहिल्यांदा लोकांसमोर आणलं १८५७ मध्ये. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांना हे चित्र मुळीच आवडलं नाही. नुकतीच १८४८ मध्ये क्रांती घडून गेली होती. युरोपमध्ये क्रांतीचं वारं वाहत होतं. उच्चवर्गीय लोकांना ह्या चित्रात कष्टकरी गरीब लोकांचं चित्रण केल्याचं नजरेत भरत होतं. हे चित्र पाहताना त्यांना एक प्रकारची अस्वस्थता यायची. त्यामुळं या चित्राला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

या चित्राचा आकार मोठा होता '८४ सेमी X ११२ सेमी.' इतक्या मोठ्या आकाराचं गरिब लोकांच्या आयुष्याचं चित्रण करणारं चित्र आधी काढलं गेलं नव्हतं. खरंतर एवढ्या मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर बायबलमधली किंवा ग्रीक पुराणांतील चित्रं काढली जायची. खरंतर ग्लिनर्स हा विषय चित्रकलेसाठी नविन नव्हता. ग्लिनर्सची बायबलमध्ये सांगितलेल्याप्रमाणे चित्रं पूर्वी काढली गेली होती. पण ह्या चित्राचा आणि बायबलचा काहीच संबंध नव्हता.

प्रदर्शित केल्यानंतर चित्रकारानं काही दिवसांतच हे चित्र विकून टाकलं. आपल्या चित्राची किंमत त्यानं ४००० फ्रँक्स ठेवली होती. पण ह्या चित्राची किंमत त्याला ३००० फ्रँक्स इतकीच मिळाली. पैशांची खूप गरज असल्यानं तो कमी किंमतीत चित्र विकण्यास तयार झाला. चित्राला कमी किंमत मिळाल्याचं चित्रकारानं गुपितच ठेवलं. त्याच्या हयातीत ते चित्र फारसं प्रसिद्ध झालंच नाही.    

१८७५ मध्ये चित्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर मात्र या चित्राची लोकप्रियता वाढत गेली. १८८८ मध्ये एका लिलावात हे चित्र तब्बल ३००००० फ्रँक्सना विकलं गेलं !! हे चित्र विकत घेणारी व्यक्ती मात्र निनावीच राहिली होती. चित्र खरेदी करणारा व्यक्ती कुणीतरी अमेरिकन असावा असा लोकांचा अंदाज होता. चित्र खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर (मृत्यूपत्राप्रमाणं) ते चित्र पॅरिसमधल्या विश्वविख्यात 'लुव्र' कलासंग्रहालयात देण्यात आलं. सध्या हे चित्र फ्रान्समधल्याच एक कलासंग्रहालयात आहे.

या चित्रानं मिलेटची सामाजिक विषमतेविषयीची संवेदनशीलता अधोरेखित झाली. त्याचं निरीक्षणही अफलातून होतं. या चित्राची प्रेरणा घेऊन नंतरच्या काळात 'The Gleaners and I' नावाचा एक चित्रपटही निघाला !
           
- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Gleaners

http://www.visual-arts-cork.com/paintings-analysis/gleaners-millet.htm

https://www.theartstory.org/artist-millet-jean-francois-artworks.htm

Sunday, July 21, 2019

जखमी देवदूत

मुशाफिरी कलाविश्वातली

जखमी देवदूत

फिनलंडचा चित्रकार 'ह्युगो सिम्बर्ग' याचं एक चित्र त्या देशात प्रचंड लोकप्रिय आहे. ह्या चित्राचं नाव आहे 'जखमी देवदूत' (The Wounded Angel). २००६ मध्ये तिथल्या एका कलासंग्रहालयानं आयोजित केलेल्या लोकमत चाचणीत हे चित्र सर्वात जास्त लोकप्रिय ठरलं होतं !!   

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी युरोपमध्ये कलाक्षेत्रात एक चळवळ सुरु झाली होती - 'सिम्बॉलिझम'. या चळवळीची एक खासियत म्हणजे यामध्ये कलाकार आपल्या कलाकृतींमध्ये बरीच प्रतीकं वापरायचे. फिनलंडमध्ये ह्युगो सिम्बर्गनं सिम्बॉलिझम चळवळ आणली. त्यानं या चळवळीची तत्त्वे वापरत 'सिम्बॉलिझम' प्रकारात मोडणारी चित्रं काढली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यानं युरोपमधल्या कलाक्षेत्रात ज्या चळवळी सुरु होत्या त्यांचे प्रयोग करतही चित्रं काढण्याचा प्रयत्न केला.

सोबत दिलेल्या चित्रात ह्युगोनं देवदूताच्या रूपात एका मुलीला दाखवलंय. तिच्या पंखांमधून रक्त येताना दिसतंय. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलीये. तिनं मोठ्या कष्टानं स्ट्रेचरला पकडलेलं दिसतंय. एका असहाय अवस्थेत ही देवदूताच्या रूपातील मुलगी दिसतीये. दोन निरोगी, सुदृड मुलं तिला स्ट्रेचरवरून घेऊन जाताना दिसत आहेत. ह्या चित्रात पार्श्वभूमीला आपल्याला जे काही दिसतंय ते दृश्य आहे एलेनतारा पार्कमधलं. ही पार्क आजही फिनलँडमधल्या हेलसिंकी ह्या शहरात आहे. आणि आज जवळपास सव्वाशे वर्षांनंतरही तिथलं दृश्य तसंच आहे. त्या काळात ह्या पार्कमध्ये (आणि आजूबाजूला) अनेक धर्मादायी संस्था होत्या. चित्रामध्ये मुलं त्या देवदूत मुलीला अंध मुलींच्या शाळेत किंवा अपंग मुलांच्या आश्रमात घेऊन जाताना दिसत आहेत. तिच्या हातात एक प्रकारची विशिष्ट फुलं आहेत. ही फुलं आजारातून बरं होण्याचं किंवा पुनर्जन्माचं प्रतीक म्हणून ओळखली जातात.

चित्रकाराला ह्या चित्रातून काय दाखवायचं असावं? ह्या चित्रात असं काय दाखवलंय की हे चित्र फिनलँडच्या लोकांना सर्वात जास्त आवडावं ? हे चित्र काढताना चित्रकार एका गंभीर आजारातून जात होता. त्याला झालेल्या आजाराचं नाव होतं 'मेनिन्जायटीस'. ह्या आजारात रुग्णाला मान हलवायला/वळवायला त्रास होतो. रुग्ण निरुत्साही होतो. रुग्णाला प्रकाश सहन होत नाही - तो प्रकाशाला खूप संवेदनशील बनतो. आपण ह्या चित्रातल्या देवदूत मुलीला पाहिलं तर आपल्याला तिच्यात ही तिन्ही लक्षणं दिसतात. चित्रातल्या देवदूताला पंखांना (wings) वरच्या बाजूला जखम झालेली दाखवली आहे. प्रत्यक्षात चित्रकाराला फुफुसांत (lungs) वरच्या बाजूला जखम झालेली होती. म्हणजे wings ऐवजी lungs असं आपण वाचलं तर आपल्याला जखमेचा उलगडा होतो.

चित्रकारानं ह्या चित्रासाठी बरेच कष्ट घेतले. त्यानं ह्या चित्रावर काम करायला सुरुवात केली होती १८९८ साली. त्याचं चित्र पूर्ण झालं १९०३ मध्ये. त्यानं चित्र काढण्यासाठी काढलेल्या रेखाटनांवरून आणि मॉडेल्सच्या काढलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट कळतं की ह्या चित्रासाठी त्यानं वेगवेगळ्या कल्पना वापरून पाहिल्या. उदा. सुरवातीला त्यानं देवदूत मुलीला छोटे सैतान एका ढकलगाडीतून ढकलताना दाखवलं होतं. त्यानं देवदूत मुलीच्या चित्रासाठी वेगवेगळे मॉडेल्स वापरून पाहिलं.

चित्रकाराचं हे चित्र प्रदर्शित झाल्यावर प्रचंड यशस्वी ठरलं. ह्या चित्रासाठी त्याला पारितोषिकही मिळालं. याकाळात आपली बहीण 'ब्लेंडा' हिला पाठवलेल्या एका पत्रात तो म्हणतो - "मला तुला एक चांगली बातमी सांगायची आहे - इथला परीक्षक अतिशय कडक असला तरी त्यानं ह्या वर्षी मला नाकारलं नाही आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या आणि परीक्षकांच्या नजरेतून माझ्या चित्राला प्रचंड यश मिळालाय असं दिसतंय."

कलेची दैवी देणगी असणाऱ्या कलाकाराला एखाद्या व्याधीनं असहाय्य केल्यावर कलाकाराला जो अनुभव येतो तो आपल्याला ह्या चित्रात प्रतीकरूपानं दिसतो.

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी


संदर्भ: 
◆https://www.dailyartmagazine.com/wounded-angel-by-hugo-simberg/
◆https://artsandculture.google.com/asset/the-wounded-angel/WAHm6ruBFNfnLw
◆https://celestialkitsune.wordpress.com/2009/02/28/the-wounded-angel-by-hugo-simberg/
◆https://fi.wikipedia.org/wiki/Haavoittunut_enkeli

◆◆Image Credit:
Hugo Simberg [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:The_Wound/File:The_Wounded_Angel_-_Hugo_Simberg.jpg



Monday, July 8, 2019

चॅटरटनचा मृत्यू



मुशाफिरी कलाविश्वातली

चॅटरटनचा मृत्यू 

अठराव्या शतकातली गोष्ट. इंग्लंडमधल्या ब्रिस्टॉल शहरात एका गरीब घरात एक मूल जन्मलं. त्याच्या जन्माच्या आधीच त्याचे वडील वारले होते. घरी फक्त आई आणि मोठी बहीण होते. मुलाच्या जन्मानंतर आईनं एका पोटापाण्यासाठी शिवणकाम, विणकाम करायला सुरुवात केली.

या मुलाचं नाव होतं थॉमस. थॉमसला सारेचजण मंद समजायचे. साडेसहा वर्षांचा झाल्यावरही त्याला काहीच जमत नव्हतं. इतर मुलांसोबत खेळायला तो सरळ नकार द्यायचा. तो एकटाच काहीतरी विचार करत बसायचा. 'मंद' असल्यानं त्याला पहिल्या शाळेतून काढून टाकण्यात आलं !!

थॉमसचे वडील हयात असताना संगीताशी संबंधित काम करायचे. ते कवीही होते आणि त्यांना जुन्या नाण्यांमध्येही रस होता. त्यांनी आणलेल्या एका जुन्या संगीताच्या पुस्तकाचं पण थॉमसची आई शिवणकाम करताना फाडत होती. ते छोट्या थॉमसच्या हाती पडलं. त्यावरची नक्षीदार अक्षरं पाहून थॉमस त्या अक्षरांच्या प्रेमातच पडला. मग आईनं त्याला वाचायला शिकवलं. आता मात्र थॉमस वाचायला शिकला. त्यानं हळूहळू मध्ययुगीन काळातली नक्षीदार अक्षरं, चित्रं असणारी पुस्तकं वाचायला सुरुवात केली.

वयाच्या आठव्या वर्षी त्याला एका धर्मादायी शाळेत घालण्यात आलं. ही शाळा अक्षरश: भयानक होती. थॉमसला ही शाळा एखाद्या तुरुंगासारखी वाटायची. इथले नियम खूप कडक होते आणि नियम तुटले तर शिक्षाही कडक होत्या !!

 वयाच्या दहाव्या वर्षी त्यानं कविता रचायला सुरुवात केली. सुरुवातीला तो धार्मिक कविता करायचा. पण नंतर त्यानं उपहासात्मक काव्य रचायला सुरुवात केली. एखाद्या प्रगल्भ कवीनं केलेल्या कवितेसारखं त्याचं काव्य असायचं.

पंधराव्या वर्षी त्यानं शाळा सोडली. एका वकिलाकडं त्यानं काम करायला सुरुवात केली. काम करून पैसे कमावण्याचा अनुभव तो पहिल्यांदाच घेत होता. त्याचं काम कायद्याच्या दस्तावेजांमधला मजकूर कॉपी करण्याचं होतं. हे काम अगदीच कंटाळवाणं होतं. रिकामा वेळ मिळाला की तो कविता करायचा, रेखाटनं करायचा आणि अधाशासारखं वाचायचा. कॉपी करण्याच्या कामानं कंटाळलेली इतर मुलं त्याची मित्र बनू लागली.

यानंतर थॉमसनं एक शक्कल लढवली. तो मध्ययुगीन भाषेत लिहू लागला. त्यानं स्थानिक मासिकात 'मध्ययुगीन कागदपत्रं' म्हणून काही कागदपत्रं दिलीत. खरंतर ही कागदपत्रं बनावट होती. स्थानिक इतिहासाशी संबंधित अशी ही कागदपत्रं थॉमसनं स्वत: तयार केली होती !! पण मासिकवाल्यांनी ती कागदपत्रं स्वीकारली. यानंतर थॉमसनं बनावट कागदपत्रं विकण्याचं काम सुरु केलं. तो आता मध्ययुगीन कविता आणि कागदपत्रं विकू लागला !! अर्थातच १५ वर्षांचा थॉमस ही बनावट मध्ययुगीन कागदपत्रं आणि त्यावरचा मजकूर स्वत:च्या प्रतिभेनं लिहीत होता.

कवी होण्याऐवजी बनावटीचं काम कारण्यामागं काही कारणं होती. त्याच्या मनात समाजाविषयी कुठंतरी एक प्रकारचा राग होता. तो प्रचंड हुशार असूनही त्याचं कौतुक कुणीच केलेलं नव्हतं. उलट आजपर्यंत त्याचं खच्चीकरण मात्र बऱ्याच जणांनी केलं होतं. काही वेळेला त्यानं स्वत: कवी असल्याचं सांगितलं पण त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही !! कारण लोक त्याला काहीसा मंद समजायचे !! याशिवाय साऱ्या 'मध्ययुगीन' कविता आपण रचल्याचा सांगितलं तर लोक त्या कवितांची टर उडवण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळं त्यानं स्वत:चं नाव पुढं आणता एका मध्ययुगीन धर्मगुरूंच्या नावानं आपलं साहित्य पुढं आणलं !!
शेवटी त्यानं वकिलाचं काम सोडून द्यायचं ठरवलं. पण वकिलाशी असणाऱ्या करारामुळं हे अवघड होतं. तो निराशेच्या गर्तेत जाऊ लागला. त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण त्याला कामावरून सोडून द्यायला शेवटी वकील तयार झाला.

Henry Wallis [Public domain]

थॉमस आता लंडनला येऊन आपलं साहित्य प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू लागला.. तिथं तो बऱ्याचशा मासिकांच्या प्रकाशकांना भेटला. त्यानं केलेल्या कविता आणि उपहासात्मक लिखाण त्यानं विकलं. खूप सारं लिखाण विकूनही त्याला खूपच कमी पैसे मिळत होते. पैसे वाचवण्यासाठी तो अगदी स्वस्तातल्या लॉजवर राहू लागला. त्याला अन्नासाठीही पैसे उरले नाहीत.अशा अपयशी अवस्थेत त्याला ब्रिस्टॉललाही परत जायचं नव्हतं.

एके दिवशी त्यानं विष पिऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी त्या खोलीत बेडवर त्याचं प्रेत मिळालं. मरण्यापूर्वी त्यानं हस्तलिखितांचे तुकडे तुकडे केले होते.

पुढच्या काळात बऱ्याचशा साहित्यिकांसाठी, कलाकारांसाठी थॉमसचं आयुष्य प्रेरणादायी ठरलं !

हेन्री वॉलिस नावाच्या चित्रकारानं त्याच्या मृत्युवरचं चित्र जगप्रसिद्ध झालं. हे चित्र १८५६ मध्ये पूर्ण करण्यात आलं होतं आणि सध्या ते बर्मिंगहॅममधल्या एका कला संग्रहालयामध्ये आहे.    

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ: 


Tuesday, July 2, 2019

डाॅक्टर

मुशाफिरी कलाविश्वातली

डाॅक्टर

काल झालेल्या 'डाॅक्टर' दिनाच्या साऱ्या डाॅक्टर मंडळींना शुभेच्छा !!

१८७७ ची गोष्ट. इंग्लंडमध्ये फिलिप नावाच्या एका मुलाला एक गंभीर आजार झाला होता. त्याच्या वडिलांचं नाव होता ल्यूक फिल्ड्स. त्याच्यावर उपचार करत होते डॉक्टर मुरे. आजार गंभीर होता आणि मुलगा वाचण्याची शक्यता नव्हती. पण डॉक्टरांनी आपल्यावतीनं सारे प्रयत्न करण्यात काहीही कसर सोडली नव्हती. रुग्ण असणारा मुलगा त्या वर्षी नाताळच्या दरम्यान एके सकाळी वारला.

पण डॉक्टरांचं ते रुग्णाविषयीचं समर्पण, निष्ठा यांचा मुलाच्या वडिलांवर कायमचा प्रभाव पडला. ते इंग्लंडमधले एक सुप्रसिद्ध चित्रकार होते. 

यानंतर बऱ्याच वर्षांनी १८९० मध्ये 'सर ल्यूक फिल्ड्स' यांना एक काम मिळाले. त्यांना 'नॅशनल गॅलरी ऑफ ब्रिटिश आर्ट' साठी स्वत:च विषय निवडून एक चित्र काढायचं होतं. ह्या चित्रात त्यांना सामाजिक वास्तववाद (social realism) दाखवायला सांगितलं होता. ह्या कामाचे त्यांना ३००० पौंड्स मिळाले होते. ही रक्कम त्याकाळात बऱ्यापैकी मोठी होती. पण त्यांनी ह्या चित्रासाठी ही रक्कम कमीच वाटली.

फिल्ड्स यांना आपल्या काळात डॉक्टर कसे असायचे ते चित्रातून दाखवायचं होतं. फिल्ड्स यांच्या डोक्यात हा विषय लगेचच आला होता. पण त्यांनी या चित्रावर काम करायला सुरुवात केली नाही. जवळपास ३-४ वर्षांनी गॅलरीवाले लोक मागं लागल्यानंतर त्यांनी चित्र काढण्यासाठी हालचाल सुरु केली.

फिल्ड्स यांनी मॉडेल म्हणून स्वत:च्या कुटुंबाचाच (आणि स्वत:चा) वापर करायचं ठरवलं. फिल्ड्सनं आपल्या मित्रांना डॉक्टर म्हणून वापरताना चेहरा मात्र स्वत:चे जुने फोटो पाहत स्वत:शी मिळताजुळता काढला. रुग्ण म्हणून स्वत:च्या मुलीला मॉडेल बनवलं. रुग्णाची आई म्हणून एका व्यावसायिक मॉडेलचा वापर केला.

'फिल्ड्स' यांच्या परिवाराचं मूळ मासेमारीशी संबंधित होतं. त्यांचे वडील समुद्रात काम करायचे. त्यांची स्मृती म्हणून 'फिल्ड्स' यांनी चित्रात एक मासेमारीचं जाळंही दाखवलं.

File Page URL: https://commons.wikimedia.org/wiki/File:The_Doctor_Luke_Fildes_crop.jpg
Attribution : Luke Fildes [Public domain]

दिव्याचा प्रकाश दोनच व्यक्तींवर स्पष्टपणे पडताना दाखवलाय - एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरी रुग्ण मुलगी. टेबलावरचा औषध आणि कप यापासून डॉक्टर दूर पाहत आहेत. त्यांचं थेट रुग्नाकडं लक्ष आहे. रुग्णासाठी बेड बनवलाय तो दोन खुर्च्यांचा वापर करून. पांढऱ्या रंगाचा night dress घातलेल्या त्या मुलीच्या अंगावर निस्तेज रंगाचं पांघरून आहे. तिचे केस विस्कटलेले असून डावा हात लटकताना दिसतोय. रुग्ण मुलगी शांततेत झोपलेली दिसतीये. उजव्या बाजूला मागं तिचे आई वडील दिसत आहेत. प्रकाश नसल्यानं ते स्पष्ट दिसत नाहीत. वडील उभे आहेत तर आई टेबलावर डोकं ठेवून बसलेली दिसत आहे.  वडिलांनी आपला डावा हात आधार देण्यासाठी आईच्या खांद्यावर ठेवला आहे. पण त्यांचं लक्ष मात्र डॉक्टरांच्याकडे आहे. एकूणच हे सारं दृश्य आर्थिक परिस्थिती फारसी चांगली नसणाऱ्या घरातलं आहे. घरातलं फर्निचर अगदी साध्या प्रकारचं आहे.
हे चित्र प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झालं. विशेषतः डॉक्टर मंडळींना हे चित्र खूपच आवडलं. चित्रातल्या डॉक्टरांच्या समर्पणामुळं, रुग्णाला समजून घेण्याच्या हावभावांमुळं या चित्राला खास महत्व होतं. अमेरिका आणि ब्रिटन यांच्या पोस्टाच्या तिकिटांवरही हे चित्र नंतर आलं.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:

http://medhum.med.nyu.edu/view/10350
https://www.tate.org.uk/art/artworks/fildes-the-doctor-n01522
https://en.wikipedia.org/wiki/The_Doctor_(painting)