Monday, July 30, 2018

जीवनप्रवास


ओळख कलाकृतींची

जीवनप्रवास

माणसाचं जीवन हा एक प्रकारचा प्रवास असतो.. आधी सोनेरी बालपण.. मग खूप सारी स्वप्नं घेऊन येणारं यौवन.. त्यानंतर आयुष्यातला खडतर प्रवास सुरू होतो.. आणि शेवटी आयुष्याचा शेवट करणारं वृध्दत्व येतं.. कुठल्याही देशात कुठल्याही काळात गेलं तरी माणसाच्या आयुष्यातले हे  टप्पे सर्वसाधारण तसेच असतात.. हा सारा जीवनप्रवास कुंचल्यानं कॅनव्हासवर उतरवलाय थॉमस कोल या चित्रकारानं. १८४२ साली या चित्रकारानं जीवन प्रवासातल्या या सार्‍या टप्प्यांची चित्रं काढली. ह्या चित्रकारानं एकूण चार चित्रं काढली आहेत - बालपण, यौवनाची सुरूवात, जीवनातला जबाबदारी पाडण्याचा खडतर काळ आणि वृद्धत्व. त्यानं हा जीवन प्रवास नदीतून दाखवलाय.

पहिल्या चित्रात त्यानं बालपण दाखवलंय.. एखाद्या अज्ञात विश्वातून आपण ह्या जगात प्रवेश करतो.. आपण नेमकं कुठून इथं येतो ते आपल्याला कळत नाही.. चित्रकारानं दाखवलंय की एका अंधार्‍या गुहेतून आपला प्रवास सुरू होतो.. बालपणी आपल्याला सर्वांचं प्रेम आपोआपच मिळतं.. आपली काळजी आपोआपच घेतली जाते.. चित्रात दाखवल्याप्रमाणे लहान बाळाचा जीवन प्रवास सुरू होताना त्याच्या मागं एक देवदूत उभा आहे.. याठिकाणी नदीचं पाणी संथ आहे. नदीच्या दोन्ही बाजूला रंगीबेरंगी फुलं आहेत. क्षितिजावर सूर्य उगवाताना दिसतोय.. ज्या नावेमधून प्रवास सुरू झालाय त्याच्या समोरच्या टोकाला एक काळ दाखवणारं वाळुचं घड्याळ आपल्याला दिसतंय.



यानंतर दुसर्‍या चित्रात यौवनाची सुरूवात होताना दिसत आहे.. या चित्रात देवदूत किनार्‍यावरुन नावेचा निरोप घेतोय.. पण प्रवास करणार्‍या नवयुवकाचं लक्ष देवदुताकडं नाही तर त्याला खुणावणार्‍या आकाशातल्या स्वप्नांकडं (हवेतला किल्ला) आहे.. इथून पुढचा प्रवास नवयुवकाला स्वतंत्रपणे करावयाचा आहे.. वातावरण प्रसन्न आहे.. नदीचा प्रवाह संथ आहे.. आकाश निरभ्र आहे.. या चित्रातली नवयुवकाची थोडीशी पुढच्या दिशेला झुकलेली स्थिती त्याच्यात भरलेला उत्साह, उर्जा दाखवते..


 
 तिसर्‍या चित्रात प्रौढपणाचा काळ दाखवलाय.. हा आयुष्यातला खडतर काळ असतो.. खूप सार्‍या जबाबदार्‍या माणसाला पेलाव्या लागतात.. खूप सार्‍या कठीण परीक्षांना, संकटांना माणसाला सामोरं जावं लागतं.. आणि गंमत म्हणजे याठिकाणी बर्‍याचशा गोष्टी माणसाच्या हातात नसतात.. चित्रकारानं नदीच्या प्रवाहाचा वेग वाढताना दाखवलाय.. नदीच्या दोन्ही बाजूला कठीण खडक दाखवले आहेत.. आकाशात आता काळे मेघ आलेले आहेत.. आणि हवेतला किल्ला कुठतरी विरून गेलांय.. देवदूत आता आकाशात दिसतोय. आणि प्रवास करणारा माणूस आता त्याची प्रार्थना करतोय..

 
चौथ्या चित्रात वृध्दत्व आणि मृत्यू हे प्रतिकरुपानं दाखवलंय.. नदीच्या आजूबाजूला किनारा नाही.. समोर अनंत सागर आहे.. नावेच्या समोर असणारं वाळुच घड्याळ कुठंतरी हरवलंय.. वृद्ध माणसाला नेण्यासाठी देवदूत आलाय.. तो देवदूत त्याला स्वर्गाचा रस्ता दाखवतोय.. तिकडे अजूनही देवदूत दिसतात..


 

 - दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

https://www.theodysseyonline.com/voyage-life
https://en.wikipedia.org/wiki/The_Voyage_of_Life

Sunday, July 29, 2018

चार कला

कुतूहल कलाविश्वातलं

चार कला

 
चित्रकलेची दीर्घ आणि अखंड परंपरा असणारा एक देश म्हणजे चीन. चिनी चित्रकारांची चित्रं पाहण्यापूर्वी आपण थोडंसं चिनी संस्कृती जाणून घ्यायचा प्रयत्न  करू. चिनी संस्कृतीप्रमाणं एखाद्या माणसाला 'विद्वान सद्गृहस्थ' व्हायचं असेल तर चार कलांमध्ये पारंगत असणं आवश्यक आहे. 'विद्वान सद्गृहस्थ' होण्याची ही संकल्पना तिथं शतकानुशतके तशीच आहे. या चार कला अशा आहेत :
 
१) किन नावाचं तंतुवाद्य वाजवता येणं: चिनी लोकांच्या विश्वासप्रमाणं या तंतूवाद्यानं हृदयातील खोल भावना दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. (त्यांच्या मते) ह्या वाद्याच्या वादनानं व्यक्तिमत्व फुलते, नैतिकता म्हणजे काय ते कळते, देव किंवा दानव यांच्याकडं काहीही मागता येतं, जीवन समृद्ध होतं. खरंतर हे वाद्य वाजवण्याची सर्वोकृष्ट पध्दत म्हणजे बाहेर सुगंधी धूपज्वलन करत चन्द्र प्रकाशात हे वाद्य वाजवावं.  
 
एका दंतकथेप्रमाणं सर्वसाधारण २५०० ते २७०० वर्षापूर्वी एक बोया नावाचा वादक होऊन गेला. तो बाहेर मोकळ्या वातावरणात वादन करत असताना एका लाकुडतोड्यानं ते वादन ऐकलं. या लाकूडतोड्याला पटकन कळलं की तो वादक संगीतातून उत्तुंग पर्वत आणि त्यातून वाहणारं पाणी व्यक्त करत होता. आपलं संगीत समजल्यानं लाकुडतोड्यासोबत त्या वादकाची घट्ट मैत्री झाली. पुढं लाकुडतोड्याचा मृत्यू झाल्यावर वादकानं आपल्या वाद्याच्या तारा तोडल्या आणि ते वाद्य जमिनीवर फेकून दिलं !!
 
तेंव्हापासून ते अजतागायत चीनमध्ये "चांगले मित्र" असं सांगण्यासाठी "आवाज समजणारे" आणि चांगल्या दोस्तीसाठी किंवा सुंदर संगीतासाठी "उत्तुंग पर्वत आणि वाहतं पाणी" हे शब्दप्रयोग वापरतात !!!
 
२)  बुद्धिबळासारखाच 'की' नावाचा एक पटावर खेळायचा एक खेळ खेळता येणं: ह्या खेळात बुद्धिबळापेक्षाही जास्त शक्यता असतात. ह्या खेळाची सुरूवात कधी आणि कशी झाली याविषयी बरेच वादविवाद आहेत.
 
३)  चिनी कॅलिग्राफी : हजारो अक्षरं (खरंतर चित्रं) असणार्‍या चिनी लिपीमध्ये लिहीणं ही एक कला समजली जाते. शाई आणि कुंचला यांच्या सहाय्यानं लिहीण्याच्या या कलेला प्राचीन काळापासूनची परंपरा आहे.  खरंतर ही चिनी अक्षरं चौरसाकृती असतात. पण कलाकार मंडळी कुंचल्यानं कमी अधिक जाडी वापरुन, घट्ट किंवा पातळ शाई वापरुन, कुंचल्याची गती बदलत या अक्षर लिहिण्यात प्रचंड विविधता आणतात.  कॅलिग्राफीमधून भावना व्यक्त करता येऊ शकतात.
 
४)  चित्रकला : चीनमध्ये चित्रकलेची परंपराही खूप जुनी आहे. ही चित्रकला आपण कारागिरीच्या उपक्रमांमधून (ओळख कलाकृतींची / कुतूहल कालाविश्वातलं) जवळून पाहु. ह्या चित्रकलेमध्ये मुख्यत्वे निसर्गचित्रं येतात. चित्रामध्ये चित्र, लिहिलेलं काव्य (ते लिहिण्यासाठी कॅलिग्राफी) अशा तीन कला एकत्र येतात. बर्‍याचदा ही चित्रं कृष्णधवल असतात आणि त्यात रेघेवरच्या प्रभूत्वाला खूप महत्व असते.
 
- दुष्यंत पाटील
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :
 
 
तंतुवाद्य वादन
 

की नावाचा खेळ
 
 
चित्रकला आणि कॅलिग्राफी
 

Saturday, July 28, 2018

प्राचीन इजिप्तमधली कला - ४

कुतुहल कलाविश्वातलं

प्राचीन इजिप्तमधली कला - ४


युरोपियन अभ्यासकांना  इजिप्तमधल्या कबरींचा अभ्यास करताना एक गोष्ट ध्यानी आली.. बऱ्याचशा कबरींमध्ये त्यांना चित्रलिपीमध्ये लिहिलेला मजकूरांमध्ये साम्य आढळलं.. त्यांनी या मजकुराला एकत्र करून नाव दिले - "The book of dead"  (मृताचे पुस्तक).. हा मजकूर कबरीमधल्या भिंतींवर, तिथल्या वस्तूंवर तसंच एक प्रकारच्या भूर्जपत्रांवर लिहिलेला असायचा..  मृत्यूनंतरच्या जीवनावर इजिप्तमधल्या लोकांचा विश्वास होता.. हा सारा लिहिलेला मजकूर मृत व्यक्तीस पुढच्या (म्हणजे नव्या) जीवनामध्ये जायला मदत करायचा असं त्यांना वाटायचं.. या मजकुरासोबत बरीचशी चित्रंही असायची.. राजे मंडळी आणि श्रीमंत कुटुंबातल्या व्यक्तींच्या कबरीत वैयक्तिक असाही मजकूर लिहिला जायचा.. पण मध्यमवर्गीयांना मात्र हे परवडण्यासारखं नव्हतं.. ३५०० वर्षांपूर्वीच्या साऱ्या कबरींमध्ये असणाऱ्या मजकुरांमध्ये बरंचंसं साम्य आढळतं.. पण इ पु १५०० मध्ये (म्हणजे सर्वसाधारण ३५०० वर्षांपूर्वी) या मजकुरात बराचसा बदल करण्यात आला.. या The book of dead मध्ये बराचश्या परंपरांमधल्या कथा आणि त्या कथांमधली चित्रंही आहेत...
आज आपण एका कबरीमधली दोन चित्रं थोडीशी जवळून पाहणार आहोत.. ही चित्रं राजाश्रय असणाऱ्या हुनेफर नावाच्या मजकूर लिहीणाऱ्या व्यक्तीच्या कबरीमधली आहेत..

पहिल्या चित्रात आपल्याला मध्यभागी हुनेफरचं ममी दिसतंय. ह्या ममीला आधार देणारी (कोल्ह्याचा चेहरा दिसतो ती) देवता म्हणजे अनिबस. हुनेफरची पत्नी आणि कन्या समोर रडत रडत आपला शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या मागं असणारे पुजारी एक प्रकारचा विधी करत आहेत. ममीच्या मागच्या बाजूला कबरीचं चित्र दिसतंय.

याच चित्राच्या खालच्या भागात उजव्या बाजुला आपल्याला एका टेबलवर आपल्याला सारं विधीचं साहित्य ठेवलेलं दिसतं. तिथं एका वासराचा पूढचा पाय कापून नैवेद्य दाखवण्याचं दृष्य आहे. यामध्ये आपल्याला पुढचा पाय नसणारं ते वासरुही आईसोबत दिसतंय. अशा प्रसंगी प्राण्यांचे बळी दिले जायचे.

दुसऱ्या चित्रात आपल्याला हुनेफरचा मृत्यूनंतरचा प्रवास दिसतोय, हे चित्र डावीकडून उजवीकडे वाचायचं आहे. डावीकडं आपल्याला हुनेफरला घेऊन येताना कोल्हयाचा चेहरा असणारा अनिबीस हा देव दिसतोय. त्याच्या दुसऱ्या हातात हुनेफरच्या पुढच्या आयुष्याची एक प्रकारची किल्ली आहे. याठिकाणी हुनेफरचा न्यायनिवाडा होणार असतो. अनिबीस देवता त्याचं हृदय आणि एका पक्ष्याचं पीस यांच्या वजनाची तराजुनं तुलना करणार असतो. त्या काळाच्या लोकांच्या कल्पनेप्रमाणं बुद्धी, भावना, चारित्र्य यांचं स्थान हृदयात असायचं.. जर व्यक्तिचं चारित्र्य शुद्ध असेल तर त्याचं हृदय  पिसापेक्षाही हलकं असतं असं त्यांना वाटायचं !!!  तराजुच्या बाजुला पक्ष्याचं डोकं असणारी एक देवता नोंद घेताना दिसतीये.. जर त्याच्या हृदयाचं वजन कमी निघालं तर त्याला पुढचं जीवन मिळणार असतं.. जर जड निघालं तर ? जड निघालं तर त्याचा प्रवास संपणार असतो.. आपल्याला तराजूच्या बाजूला एक विचित्र प्राणी दिसतोय, त्याचं डोकं मगरीचं आहे तर  उरलेलं शरीर सिंह आणि हिप्पोपोटेमसच आहे. हृदय जड निघालं तर हा प्राणी हुनेफरला  खाणार असतो !! उजवीकडं आपल्याला त्याला जीवन मिळताना दिसतंय तर चित्राच्या वरच्या भागात हुनेफर सार्‍या देवतांची पूजा करताना दिसतोय.

 - दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स






दि लेडी ऑफ शॅलॉट

ओळख कलाकृतींची

दि लेडी ऑफ शॅलॉट

आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन (१८०९ - १८९२) याचं एक प्रसिद्ध काव्य म्हणजे 'दि लेडी ऑफ शॅलॉट'.. या काव्यात एक प्रकारची कथा आहे त्याचा सारांश असा:

काव्यात सुरुवातीला एका नदीचं वर्णन येतं. नदीमध्ये बेटासारखी जमीन असते. हे बेट शॅलॉट या नावानं ओळखलं जातं. नदीच्या बाजूला शेत असतं. त्यातून जाणारा रस्ता केमलॉट नावाच्या शहराकडं जातो. रस्त्यावरून जाणारे लोक या अशा बेटाकडं पाहत असतात. या बेटावर वेगवेगळी फुलं फुललेली दिसतात.. या बेटावर एक दगडी रंगांचं ४ भिंतींचं आणि ४ टॉवर असणारं एक घर असतं. त्यामध्ये एक स्त्री राहत असते. ही स्त्री सदैव घरामध्ये बंदिस्त असते आणि ही गूढ स्त्रीच कवितेतलं मुख्य पात्र (दि लेडी ऑफ शॅलॉट) आहे. या नदीतून सामान वाहणार्‍या तसेच छोट्या छोट्या होड्या केमलॉट शहराकडे जात असतात. पण आजपर्यंत ह्या स्त्रीला कुणीच पाहिलेलं नसतं.. फक्त सुगीच्या दिवसात शेतकरी तिच्या गाण्याचे स्वर अस्पष्टपणे ऐकत असतात. रात्रीच्या वेळी तिचं गाणं ऐकल्यावर शेतकरी म्हणत असतात, "हे त्या शॅलॉटच्या परीचं गाणं आहे !!"
शॅलॉटची ही स्त्री घरामध्ये हातमागावर कलात्मक रंगीबेरंगी चित्रण असणारं विणकाम करत असते. तिनं एक वाणी ऐकलेली असते - तिनं जर घरातून (खिडकीतून) बाहेर बघितलं तर तिला एक शाप लागणार असतो. पण तो शाप नेमका काय असणार ते तिलाही माहीत नसतं.. यामुळं ती सतत आपल्या विणकामाकडं लक्ष देत असते. आपली नजर बाहेर जाऊ नये म्हणून ती काळजी घेत असते. पण याठिकाणी एक गंमत असते - ती विणकाम करताना समोरच्या आरशामध्ये तिला जगात काय चाललाय याचं प्रतिबिंब दिसत असते. यात तिला वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या घटना दिसत असतात. एखादी अंत्ययात्रा किंवा विवाहसोहळा पाहताना मात्र तिला वैफल्य येत असतं.. कधी कधी तिला हे असं फक्त प्रतिबिंब बघणं नकोसं होत असतं.

एकदा एक पितळेचं चिलखत परिधान केलेला एक सैनिक (त्याचं नाव लॅन्सलॉट) बाजूच्या शेतात येतो. त्याचं चिलखत सूर्यप्रकाश पडल्यानं चमकत असतं. त्याच्या घोड्याच्या वेसणावर असणारे खडे आकाशातील तार्‍यांप्रमाणे चमचमत असतात.  याठिकाणी कविनं सैनिकाच्या पुरुषी सौंदर्याचं वर्णन बरंचसं तपशीलवार केलेले आहे (उदा. चमकणारे भव्य कपाल, शिरस्त्राणातून आलेले काळेभोर कुरले केस). ह्यावेळी आकाश निरभ्र असतं.  ह्याठिकाणी तो सैनिक काहीतरी गायला लागतो.. शॅलॉटमधल्या त्या स्त्रीला आरशामध्ये त्याची प्रतिमा दिसत असते..  ज्या क्षणी तो काहीतरी गाणं गायला लागतो त्या क्षणी तिचं मन विचलीत होतं. ती विणायचं थांबवते. ती खिडकीतून बाहेर पाहते.. एवढ्यात सूत हातमागातून बाहेर येतं.. त्या आरशालाही तडा जातो.. आणि शाप लागल्याचं तिला समजून चुकतं...

आता बाहेरचं वातावरणही बदलू लागतं.. वादळाला सुरूवात होते..  ती स्त्री खाली उतरून होडीमध्ये बसते.. होडीमध्ये बसल्यावर ती तिथं आपलं नावही लिहिते..  तिला दुर्दैवाची चाहूल लागलेली असते.. तिनं सफेद रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं.. होडीमध्ये बसल्यावर होडी प्रवाहासोबत केमलॉटकडे जाते.. होडीमध्ये प्रवास करताना ती गायला सुरूवात करते, पण हळूहळू तिचं रक्त गोठतं , डोळे काळे होतात आणि शेवटी तिचा मृत्यू होतो..

नंतर होडी केमलॉट नगरामध्ये पोहोचते.. लोक होडीत लिहिलेलं तिचं नावही वाचतात.. सारे महालात राहणारे लोकही बाहेर येऊन तिला पाहतात.. यामध्ये लॅन्सलॉटही असतो.. तो तिला पाहून म्हणतो - "किती सुंदर आहे हिचा चेहरा!" आणि तिच्यासाठी परमेश्वराकडं शांतियाचना करतो..

लोक या काव्याचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावतात.. त्यापैकी एक आपण पाहुया..

ती सुंदर विणकाम करणारी स्त्री एका खऱ्याखुर्‍या कलाकाराचं प्रतीक आहे.. स्वतःच्या कलेमध्ये व्यस्त असणारी ती बाकीच्या दुनियेपासून आणि दैनंदिन कामांपासून दूर आहे.. तिच्यामध्ये आणि बाकीच्या जगामध्ये नदी वाहत असते.. तरीही जगात काय चाललंय याचं प्रतिबिंब तिला दिसत असतं.. (आणि तिच्या विणकामात म्हणजे कलाकृतीत ते उमटतही असतं).. पण ज्या क्षणी ती बाहेरच्या जगाकडे मोहित होते आणि आपली कला सोडते, त्या क्षणी तिच्यातल्या कलाकाराचा शेवट सुरू होतो..

इतक्या अर्थगर्भ काव्यानं चित्रकारांना भुरळ न पाडली तरच नवल !! आपण या काव्यातल्या मुख्य प्रसंगांवर काढलेली प्रसिद्ध चित्रं पाहु..

वॉटरहाउस यानं या काव्यावर तीन चित्रं काढली.. एका चित्रात ती सततच्या प्रतिबिंबांच्या जगाला कंटाळलेली दिसते.. दुसऱ्या चित्रात ती त्या सैनिकाला खिडकीतून बाहेर पाहताना दिसते.. तिसऱ्यामध्ये ती होडीमध्ये बसलेली आहे.. हंट यांचं आरशाला तडा गेल्याचं, हातमागातलं सूत विस्कटल्याचं आणि शाप लागलेलं तिच्या लक्षात आलेलं तिचं चित्र आहे. यामध्ये तिचे केसही विस्कटलेले दाखवेळेले आहेत..

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स












अॅथेन्सचं विद्यालय

ओळख कलाकृतींची

अॅथेन्सचं विद्यालय (The school of Athens)

कल्पना करा एका कलात्मक पद्धतीनं बांधलेल्या महालामध्ये एक प्रशस्त, भव्य दालन आहे.. त्यामध्ये सारी मराठी साहित्याच्या पुस्तकांचं ग्रंथालय आहे.. आता कल्पना करा की या दालनाच्या भिंतींवर कुणीतरी अगदी खरी वाटणारी चित्रं रंगवलीयेत.. या चित्रांमध्ये आपल्याला मराठी साहित्यात महत्वाचं योगदान देणारे सर्व काळातील सारे साहित्यिक आहेत.. आणि महत्वाचं म्हणजे चित्रांमध्ये भेटणारे साहित्यिक गप्पा मारण्यात, लिहिण्यात, विचार करण्यात गुंग आहेत अशी कल्पना करा.. काय जिवंतपणा येईल ना त्या ग्रंथालयाला ?
नेमकी हीच कल्पना काही शतकांपूर्वी ग्रीसमध्ये प्रत्यक्षात आणण्यात आली.. आणि त्यातून साकारलं गेलं एक महान चित्र.. रोममधल्या पोपच्या निवासस्थानी असणाऱ्या ग्रंथालयांच्या भिंतींवर अशी चित्रं काढायची होती.. 'अथेन्सचं विद्यालय' हे चित्र राफेलनं एका भिंतीवर काढलं.. हे चित्र त्यानं १५०९ ते १५११ च्या दरम्यान काढलं..

या चित्राची खासियत म्हणजे या चित्रात आपल्याला ग्रीसमधले (वेगवेगळ्या काळात होऊन गेलेले) तत्वज्ञ, विचारवंत, गणिती वगैरे मंडळी एकदम जिवंतपणे काहीतरी करताना दिसतात..  अगदी मध्यभागी आपल्याला प्लेटो आणि ऍरिस्टोटल बोलत येताना दिसतात.. दोघांच्याही हातामध्ये पुस्तकं आहेत - स्वत: लिहिलेली.. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहा - दोघं काहीतरी मुद्द्यावर तावातावानं चर्चा करताना दिसतात.. प्लेटो वर बोट दाखवून स्वर्ग दाखवतोय तर ऍरिस्टोटल मात्र जमीन दाखवतोय..

राफेलनं जवळपास ६० व्यक्तींना यात दाखवलंय.. यातले अनेकजण राफेलच्या आधीच्या काळात होऊन गेले होते.. अशा लोकांची त्यानं त्याकाळी अस्तित्वात असणारी चित्रं, शिल्पं पाहून चित्रं काढली.. या चित्रात आपल्याला पायथागोरस, युक्लिड सारखे गणितीही भेटतात..

या चित्रातल्या लोकांच्या ओळखीबाबत तज्ञ मंडळींची मतमतांतरे आहेत.. एक गोष्ट मात्र नक्की - राफेलचं हे चित्र इतिहासात अजरामर झालं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

Raphael - लेखक: Strachey, Henry ( प्रकाशन वर्ष 1902)

Journal of Humanistic Mathematics - Vol 2 Issue 2 July 2012 (लेखक: Robert Haas)
(http://scholarship.claremont.edu/cgi/viewcontent.cgi?article=1050&context=jhm)

विकिपीडिया
https://en.wikipedia.org/wiki/The_School_of_Athens



 

दी स्लेव्ह शिप

ओळख कलाकृतींची

दी स्लेव्ह शिप

अठराव्या शतकातलं शेवट शेवटचा काळ.. त्या काळात माणसांना गुलाम म्हणून विकता यायचं, विकत घेता यायचं.. गुलामीच्या प्रकाराला कायद्यानं अधिकृत मान्यता होती...

आफ्रिकेत पकडलेल्या माणसांना एका जहाजात भरण्यात आलं.. या जहाजात जवळपास ४४१ कृष्णवर्णीय लोक भरण्यात आले होते.. खरं तर जहाजात इतकी जागा नव्हतीच.. जहाज भरगच्च भरून गेलं होतं..
या माणसांना अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून विकण्यात येणार होतं.. जितकी जास्त माणसं तितका जास्त फायदा  असं ते साधं गणित होतं.. कोलिन्गवूड नावाचा माणूस या जहाजाचा कप्तान होता.. त्याला आता निवृत्तीचे वेध लागले होते.. त्यामुळे जास्तीत जास्त माणसांना नेऊन कंपनीकडून भरपूर पैसे कमवायचा त्याचा बेत होता..

अटलांटिक सागराच्या मध्यापर्यंत जहाज गेलं तेंव्हा बऱ्याचशा लोकांना कुपोषणामुळं वेगवेगळे आजार होऊ लागले होते.. बरेचशे लोक मरत होते.. कप्तानाला चिंता वाटू लागली.. लोक मरत होते याची त्याला मुळीच चिंता नव्हती - पण मेलेल्या लोकांना तिकडं नेऊन त्याला काहीच पैसे मिळणार नव्हते.. एकूणच व्यापारातल्या तोट्याची चिंता त्याला भेडसावत होती..

जहाजाच्या कंपनीनं या पकडलेल्या माणसांचा (खरंतर मालमत्तेचा) विमा उतरविलेला होता.. त्याकाळच्या नियमांप्रमाणं जहाजावरचे गुलाम लोक आजारी पडून मेले तर तो नैसर्गिक मृत्यू असल्यानं विमा कंपनीकडून काहीच पैसे मिळणार नव्हते.. पण काहीतरी योग्य कारणासाठी जर त्यांना मारावं लागलं असतं तर मात्र विमा कंपनीकडून पैसे मिळणार होते !!

कप्तानानं 'आर्थिकदृष्ट्या योग्य' असा निर्णय घेतला.. त्यानं आजारी असणाऱ्या महिला आणि मुलं यांना समुद्रात फेकून दिलं.. त्यानं अजून काही लोकांना दुसऱ्या दिवशी समुद्रात फेकून दिलं.. त्यानं एकूण १३३ लोकांना समुद्रात फेकून दिलं..

जहाज शेवटी २२ डिसेंबर १७८१ ला जमैकाला पोहोचलं.. ज्या प्रवासाला ६० दिवस लागत त्या प्रवासाला १०८ दिवस लागले होते.. अजूनही २०८ लोक जिवंत होते.. त्यांना विकण्यात आलं.. जहाजाचा कप्तानही जहाज जमैकाला पोहोचल्यावर ३ दिवसांत वारला..

जहाजाची कंपनी लिव्हरपूल (इंग्लंड) इथली होती.. जहाज लिव्हरपूलला परत आल्यावर जहाजाच्या मालकानं विमा कंपनीकडं विम्याच्या रक्कमेचा दावा केला.. त्याच्या मते जहाजावर पुरेसं पाणी नव्हतं आणि काही लोकांचे प्राण (खरंतर मालमत्ता) वाचविण्यासाठी काही लोकांना समुद्रात फेकणं गरजेचं होतं.. विमा कंपनीच्या मते जहाज जमैकाला पोहोचलं तेंव्हा जहाजामध्ये पुरेसं पाणी असल्याचं रेकॉर्ड होतं..

पण १३३ जिवंत माणसांना क्रूरपणे समुद्रात फेकून देणं हे मात्र कुणालाच चुकीचं वाटत नव्हतं !!
ही केस कोर्टात गेली.. कोर्टानं विमा कंपनीला विम्याची रक्कम  जहाज कंपनीला देण्याचे आदेश दिले.. पुढे विम्याची कंपनी वरच्या न्यायालयात गेली..

पुढं बऱ्याच वर्षांनी, १८३३ मध्ये ब्रिटिश साम्राज्यातून गुलामीचा व्यापार बेकायदेशीर ठरवण्यात आला..
पण चित्रकार टर्नर आणि गुलामीच्या विरोधात असणारी एक संघटना (Anti Slavery Society) यांना गुलामी हा प्रकार जगातच नको होता..

टर्नरनं या जहाजावर झालेल्या प्रकाराचं चित्र काढलं.. त्यानं १८४० मध्ये काढलेल्या या चित्रात अशांत समुद्र दिसतो.. एखादं वादळ येतंय असं वाटतं.. सूर्यास्ताचा आणि समुद्राच्या पाण्याचा रंग लाल आहे..  टर्नरनं चित्रातल्या रंगांवर खूप भर दिला.. नीट जवळून बघितलं तर आपल्याला दिसतं की जहाज पुढं गेलंय.. जहाजामधून लोकांना फेकण्यात आलंय आणि समुद्रात पडलेल्या माणसांना भक्षक माशांनी घेरलंय.. आपल्याला गुलामांना बांधण्यासाठी वापरलेल्या साखळ्याही समुद्रात दिसतात..  

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

J.M.W. Turner (by Wyllie, W. L. (William Lionel)) - प्रकाशनवर्ष 1905

FAMOUS PAINTINGS (various authors) - प्रकाशनवर्ष 1902

विकीपेडीया

 

प्राचीन इजिप्तमधली कला - १

कुतूहल कलाविश्वातलं

प्राचीन इजिप्तमधली कला - १

तो काळ खूप वेगळा होता.. राजाला जवळपास देवासारखंच मानलं जायचं.. त्याचा मृत्यू म्हणजे ज्या देवलोकातून तो खाली पृथ्वीवर आला त्या वरच्या देवलोकात त्याचं परत जाणं असं समजलं जायचं.. आकाशाकडं जाणारी पिरॅमिड्स त्याला 'वर' परत जाण्यासाठी मदत करत असावीत असं मानलं जातं.. मृत्यूनंतरही त्याचं शरीर खराब होऊ नये म्हणून सारी काळजी घेतली जायची.. कारण जोपर्यंत शरीर सुरक्षित आहे, तोपर्यंत त्याचा आत्मा जगू शकेल अशी त्या लोकांची श्रद्धा होती !!!

अशा ह्या काळात इजिप्तमधल्या लोकांच्या जीवनात कलेची काही खास प्रयोजन होती.. 

राजाचं, आणि इतर देवीदेवतांचं उदात्तीकरण हे त्याकाळच्या कलेचं खास प्रयोजन.. आज भग्नावशेष शिल्लक असणाऱ्या त्या काळाच्या वास्तू म्हणजे राजांची निवासस्थानं किंवा देवीदेवतांची एक प्रकारची मंदिरं होती.. आपल्या वास्तू, आपलं कोरीव काम, आपली चित्रं अनंतकाळ सुरक्षित राहावीत असं ह्या लोकांना मनापासून वाटे.. त्यामुळं त्यांनी दगडांमध्ये बरंचंसं कोरीवकाम केलं..  राजांच्या थडग्यांमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली, धार्मिक आयुष्यातली आणि राजकीय आयुष्यातली चित्रं रंगवलेली असायची..

या उदात्तीकरणासोबत त्या काळाच्या कलेचं  अजून एक उद्दिष्ट होतं.. त्याकाळच्या राजवाड्यांची, मंदिरांची रचना अशा असायची की आत उष्णता आणि प्रकाश फारसा येऊ नये.. पण यामुळं आत गेल्यानंतर काहीसं निरुत्साही वाटण्याची शक्यता होती.. आत गेल्यावर उत्साही वाटावं यासाठी आतमध्ये कोरीवकाम आणि  रंगकाम केलेलं असायचं.. त्यामुळं जिवंतपणा यायचा.. राजाचे लढाईच्या प्रसंगाची, न्यायनिवाड्याची, धार्मिक विधीप्रसंगीची, राण्यांसोबत (फासे टाकून उभी आडवी घरे असणाऱ्या कागदी बोर्डवर  खेळतात तसले) खेळ खेळतानाची चित्रे यामध्ये असत.. वास्तूंमध्ये साऱ्या भिंतींवर रंगांचा प्रचंड प्रमाणात वापर केलेला असायचा.. बहुतेकवेळा वर छत निळ्या रंगाने रंगवून त्यात सोनेरी रंगांचे तारे दाखवलेले असायचे..

थोडक्यात सांगायचं झालं तर राजा/देवीदेवता यांचं उदात्तीकरण आणि सुशोभीकरण ही त्याकाळच्या कलेची खास प्रयोजनं..

पुढच्या भागात आपण त्याकाळची चित्रं, त्यातली शैली थोडी जवळून पाहू.

- दुष्यंत पाटील

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
*#कारागिरी*


संदर्भ:

1) History of Painting - JOHN C. VAN DYKE, L.H.D  (प्रकाशनवर्ष: 1894)
2) The Story of Art – E. H. Gombrich (प्रकाशनवर्ष: 1950)


 

जीवनातल्या वृथाभिमानाचे रुपकचित्रण

ओळख कलाकृतींची

जीवनातल्या वृथाभिमानाचे रुपकचित्रण

हर्मन स्टीन्वीक हा सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातला डच चित्रकार.. 'An Allegory of Vanities of the Human Life'  (मानवी वृथाभिमानाचे रुपकचित्रण ) ह्या चित्रामुळं तो कायमचा गाजला..

'An Allegory of the Vanities of Human Life'  हे चित्र मानवी जीवनाचा एक प्रकारे अर्थ सांगतं.. यामध्ये जीवनातल्या वृथाभिमानाचे रुपकचित्रण केलं गेलं आहे.. यातल्या साऱ्या वस्तू खूप काळजीपूर्वक निवडल्या आहेत.. त्यामुळं ह्या चित्राला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.. एकूणच हे चित्र जीवनातला पोकळपणा दाखवतं..

चित्र पाहिल्या पाहिल्या जर काही आपलं लक्ष वेधून घेत असेल तर ती आहे कवटी... साऱ्या जगभर कवटी हे मृत्यूचं प्रतीक मानलं जातं.. चित्रातला सोन्याचा बनलेला तेलाचा दिवा संपत जाणारं मानवी आयुष्य दर्शवतो..
पॉलिश केलेला शंख हा काही ठिकाणी (दुर्मिळतेमुळं) संपत्तीचं प्रतीक मानलं जायचं.. फक्त धनाढ्य व्यक्तींनाच ते परवडायचं.. चित्रात आपल्याला पुस्तक आणि संगीताची वाद्यांची दिसतात.. पुस्तक हे निर्विवादपणे ज्ञानाचं प्रतीक आहे.. संगीत वाद्य हे एक प्रकारे उच्च ऐहिक सुखाचं प्रतीक समजलं जायचं.. चित्रात आपल्याला रेशमी वस्त्र दिसतं.. रेशमी वस्त्र हे शारीरिक ऐशआरामीचं प्रतीक आहे.. (त्यातही जाम्भळ्या रंगांचं वस्त्र सर्वात किंमती मानलं जायचं)..

चित्रातली जपानी सामुराई तलवार दोन अर्थ सुचवते.. एक तर तलवार ही लष्करी सत्ता, ताकत दाखवते.. दुसरं म्हणजे ह्या तलवारीवर कुशल कारागिरानं केलेल्या कलाकुसरीमुळं ती एक मौल्यवान वस्तु बनते.. आपल्याला चित्रात एक  पाणी किंवा तेल ठेवायचं एक भांडंही दिसतं.. जीवनावश्यक वस्तू साठा करून ठेवण्याचं ते एक साधन आहे..

चित्रात सर्वसाधारण उजव्या बाजूला साऱ्या वस्तू आहेत तर समतोल साधत ह्या सर्वांवर डाव्या बाजूनं एक प्रकाशकिरणही पडतो !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स


 

पाईनचे वृक्ष

ओळख कलाकृतींची
पाईनचे वृक्ष

जपानमध्ये सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात एक चित्रकार होऊन गेला - हासेगावा तोकाहु. घडीचित्रांसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचं घडीचित्रांमधलं 'पाईन वृक्ष' नावाचं एक चित्र आहे. ह्या चित्राचा समावेश जपानच्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये करण्यात आला आहे. हे चित्र कागदावर शाईनं काढण्यात आलं आहे. या चित्राचे २ भाग आहेत. प्रत्येक भाग सहा पडद्यांचा बनला आहे. प्रत्येक पडद्यावर बरेचशे कागद वापरण्यात आलेले आहेत.
या चित्रामध्ये धुक्यामधले पाईन वृक्ष दाखवण्यात आलेले आहेत. धुक्यामुळं दूरचे वृक्ष धूसर दिसतात तर जवळचे वृक्ष स्पष्ट दिसतात. वृक्षांचे बारीकसारीक तपशील यात अप्रतिमरित्या दाखवण्यात आलेले आहेत. या चित्राची खासियत म्हणजे यातलं प्रकर्षानं जाणवणारं धुक्याचं अस्तित्व. वृक्षांचं चित्र म्हणून हे चित्र सुंदरच आहे, पण ह्या चित्राला जपानमध्ये एक प्रकारचा आध्यात्मिक अर्थही आहे.

तिथल्या तत्वज्ञानात एक संकल्पना आहे 'मा' नावाची. मा म्हणजे दोन वस्तूंच्या/रचनांच्या मधली रिकामी जागा किंवा दोन घटनांमधला रिक्त काळ. उदा. घरच्या भिंतींमधली जागा 'मा' असतो. जपानमध्ये मुलांना वाकून अभिवादन करायला शिकवताना सांगतात की वाकल्यानंतर काही क्षण थांबायला हवं, 'मा' व्यवस्थित असायला हवा. संगीतात स्वरांच्या मध्ये 'मा' असतो. 'मा' म्हणजे मुद्दामची विश्रांती (purposeful pause). या 'मा'ला तिथं अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनात 'मा' असायला हवा.  प्रत्येक शहाण्या माणसानं विचार करताना 'मा' घ्यायला हवा. जपानमध्ये एखाद्याला मूर्ख म्हणायचे असेल  तर त्याला 'मा'शून्य असं म्हणतात !!

ह्या चित्रात हा 'मा' दाखवण्याचा प्रयत्न केलाय.  यामुळंच या चित्राला प्रचंड महत्व आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

http://www.theartwolf.com/landscapes/hasegawa-tohaku-pine-trees.htm
https://en.wikipedia.org/wiki/Sh%C5%8Drin-zu_by%C5%8Dbu
https://www.treehugger.com/culture/cultural-concept-ma-heart-japanese-minimalism.html



 

डॅबसमधले जिराफ

कुतूहल कलाविश्वातलं

डॅबसमधले जिराफ

आफ्रिकेमध्ये नायजेरियाच्या उत्तरेला नायजेर नावाचा एक देश आहे. या देशाच्या उत्तर पूर्व दिशेला एक डॅबस नावाचे एक ठिकाण आहे. या ठिकाणी वाळवंट संपून डोंगर सुरू होतात.  या डॅबसचे वैशिष्ट म्हणजे इथल्या पाषाणांवर प्रागैतिहासिक काळातल्या माणसांनी कोरलेली प्राण्यांची चित्रे. हे कोरीव काम तब्बल ८००० वर्षांपूर्वीचे आहे !! या ठिकाणाची जिराफांची कोरलेली चित्रं जगप्रसिद्ध आहेत.

१९८७ मध्ये एका फ्रेंच पुरातत्वतज्ञाला हे कोरीव काम दिसलं. जिवंत जिराफाच्या आकाराचं काम असल्यानं आणि कलेमधल्या वास्तववादाच्या अगदी जवळ जाणारी कला असल्यामुळं हा तज्ञ थक्क झाला. त्यानं हे काम सर्वांसमोर आणलं. या कोरीवकामात २ जिराफ अाहेत. यातला एक नर तर एक मादी मानली जाते. नर जिराफाची उंची सर्वसाधारण साडेपाच मीटर आहे.  कोरीवकामातली बरीचशी तंत्रं या ठिकाणी वापरली गेली आहेत. जिराफांच्या तोंडातून (किंवा नाकातून) एक रेष एका छोट्या आकाराच्या माणसाकडं जाते. याचा अर्थ खात्रीपूर्वक कुणाला समजलेला नाही. जमिनीवरुन हे कोरीव काम दिसत नाही. त्यासाठी थोडसं डोंगरावर चढून जायला लागतं.

हे सारं काम ८ हजार वर्षांपूर्वीचं आहे. ८ हजार वर्षांपूर्वी इथलं वातावरण खूपच वेगळं होतं. आज वाळवंट असलं तरी त्याकाळात इथं पाणी उपलब्ध होतं. ह्या भागात त्या काळात बरेच सस्तन प्राणी राहायचे. जिराफांची चित्रं प्रसिद्ध झाली असली तरी आजूबाजूच्या दगडांवर अजूनही बर्‍याचशा प्राण्यांची कोरलेली चित्रं दिसतात. ही चित्रं जवळपास सव्वाआठशेच्यावर आहेत. यात उंट, हत्ती, माकड, कुत्रे, गेंडा, सिंह हे प्राणी आहेत.
देशाच्या या समृद्ध वारशाची (जिराफाच्या कोरीवकामाची) जवळच्या एका शहरातील विमानतळावर अॅल्यूमिनियम वापरुन प्रतिकृती करण्यात आली आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

http://www.bradshawfoundation.com/giraffe/index.php
https://africanrockart.britishmuseum.org/country/niger/dabous/

 

अवगुंठीत पवित्रा

कुतुहल कलाविश्वातलं

अवगुंठीत पवित्रा
(अर्थात पडद्याआडची कुमारिका/The Veiled Virgin)


जिओवॅनी स्ट्रॅझा (१८१८ - १८७५) हा इटालियन शिल्पकार १९व्या शतकात होऊन गेला. मिलानमध्ये जन्मलेल्या या कलाकाराची फारशी माहिती आज उपलब्ध नाही. त्यानं १८४० ते १८५८  या दरम्यान रोममध्ये काम केलं. त्यानं बनवलेल्या "अवगुंठीत पवित्रा" या शिल्पामुळं तो प्रसिद्ध झाला.

"अवगुंठीत पवित्रा" हे ख्रिस्ती धर्मातील व्हर्जिन मेरीचं शिल्प आहे. या शिल्पाचं वैशिष्ट म्हणजे या शिल्पामधला चेहऱ्यावर असणारा पातळ असा पडदा. पारदर्शक असणारा हा पडदा आणि आतला चेहरा अक्षरश: खराखुरा भासतो. हे सारं शिल्प कठीण असणार्‍या संगमरवरात बनवलं गेलंय. पडद्यावरच्या वळ्या, त्यातून आत दिसणारा चेहरा, पडद्यातून दिसणारी कपाळावरची विशिष्ट केशरचना हे या शिल्पकारानं इतक्या अप्रतिमपणे दाखवलंय की पाहताना हे एकाच संगमरवरातून बनवलंय असं वाटतच नाही !! अशा प्रकारे पातळ, पारदर्शी वस्त्रातून मनुष्यदेह शिल्पामध्ये दाखवण्याच्या तंत्राला कलेच्या पारिभाषेत 'wet drapery' असं म्हणतात.

शिल्पकारानं ह्या शिल्पाचं काम १८५० च्या दशकाच्या सुरुवातीला रोममध्ये केलं. त्यानंतर हे शिल्प कॅनडामध्ये पाठवण्यात आलं. कॅनडामध्ये हे शिल्प पाहताच लोक थक्क झाले. तिथं दुसर्‍याच दिवशी वर्तमानपत्रात या शिल्पाचं कौतुक छापून आलं.
आज कॉन्वेंट (ख्रिस्ती धर्मातला मठासारखा एक प्रकार) मध्ये असणारं हे शिल्प लोकांना पाहण्यासाठी जाहीररित्या खुलं नाही. पण आधी विनंती करून ठरवून दिलेल्या वेळी जाऊन हे शिल्प पाहता येतं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

https://www.ancient-origins.net/artifacts-other-artifacts/unrivalled-classical-art-giovanni-strazzas-exquisite-veiled-virgin-008169
https://en.wikipedia.org/wiki/The_Veiled_Virgin

 

चित्रकार रोझा

ओळख कलाकृतींची

चित्रकार रोझा

रोझा बोन्हर ही एक फ्रेंच चित्रकार. तिची कारकीर्द सर्वसाधारण एकोणिसाव्या शतकातल्या उत्तरार्धातली.
खरंतर बोलायला शिकण्याआधी ती रेखाटनं करायला शिकली होती.. लहानपणी तिला वाचायला आणि लिहायला कठीण जात होतं. तिच्या आईनं तिला प्रत्येक अक्षर शिकण्यासाठी त्या अक्षरानं सुरू होणारा प्राणी रेखाटायला सांगण्याची शक्कल लढवली.. आणि मग रोझा जे प्राण्यांची चित्रं काढण्याच्या प्रेमात पडली ते शेवटपर्यंत.

वयाच्या विशीच्या शेवटी शेवटी तिनं केलेल्या चित्रकलेच्या अभ्यासाची एक गोष्ट. तिच्या स्टुडिओपासून बर्‍याच अंतरावर एक कत्तलखाना होता. या कत्तलखान्याकडं ती दररोज जायची. प्राण्यांची कत्तल करणार्‍या खाटिकांमध्ये थांबून निरीक्षण करताना तिला एकच ध्यास होता - आपल्या कलेत परिपूर्णता आणणं. सारी खाटिकमंडळी तिला तिथं दररोज पाहून आश्चर्यचकित व्हायची, त्यांना तिचं तिथं येणं पसंत नव्हतं. ते तिला टोमणेही मारायचे. पण एका दयाळु खाटिकानं तिला मदत केली. तिला त्यानं आधार दिला. तिनं याठिकाणी प्राण्यांचा चांगला अभ्यास केला. यानंतर तिनं काढलेल्या एका चित्रानं ती प्रसिद्ध झाली. ते चित्र होतं एका शेतातल्या नांगरणीचं. (चित्राचं नाव निवर्नीजमधली नांगरणी). या चित्रातल्या गाई, नांगरलेली जमिन वगैरे अप्रतिमरित्या रंगवलेलं आहे.

चार वर्षानंतर तिनं काढलेल्या एका चित्रानं ती जगप्रसिद्ध झाली. ते चित्र होतं - "घोडेबाजार". घोड्यांच्या बाजाराचा अभ्यास करायला तिला बर्‍याच कसरती करायला लागल्या.. घोडेबाजारातही तिला पुरुषांनी कत्तालखान्याप्रमाणेच त्रास दिला. कत्तलखान्यात तिला मदत करायला एक खाटिक तरी होता. घोडेबाजारात कुणीच नव्हतं. मग तिनं घोडेबाजारात जाताना पुरुषांचा वेष परिधान करायला सुरूवात केली !! तिनं काढलेलं घोडेबाजाराचं चित्र प्रचंडच गाजलं !! या चित्रातले वेगवेगळ्या स्थितीत असणारे घोडे, उडणारी धूळ, गतिमानतेचा आभास खूप छान जमलं आहे.

रोझा ही एकोणिसाव्या शतकातली सर्वात प्रसिद्ध स्त्री चित्रकार मानली जाते..

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

ROSA BONHEUR (Bell's miniature series of painters) - Frank Hits
(प्रकाशनवर्ष १९०४)

इंटरनेटवरच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स



 

इव्हान शिष्कीन यांची निसर्गचित्रे

ओळख कलाकृतींची

इव्हान शिष्कीन यांची निसर्गचित्रे

"रशिया - निसर्गरम्य दृष्यांची भूमी !! एक काळ असा येईल की रशियातला निसर्ग जिवंत होऊन,  रशियन कलाकारांच्या हृदयाला स्पर्श करून कॅनव्हासवर उतरेल.." हे उद्गार आहेत रशियन चित्रकार इवान शिष्कीन याचे.. त्यानं इतकी सुंदर निसर्गचित्रं काढली, की तो 'अरण्याचा राजा' अशा नावानंही ओळखला जातो.. त्यानं रंगवलेल्या शेकडो अप्रतिम, जिवंत निसर्गचित्रांकरिता चित्रकलेच्या इतिहासात तो अमर झाला.. आपल्या ४० वर्षांच्या कलेतील कारकिर्दीत शेकडो चित्रांसहित त्यानं हजारो रेखाटनंही काढली.. त्यानं कलेतलं बर्‍यापैकी उच्च शिक्षण घेतलं होतं.. पदवीच्या परीक्षेत त्याला सुवर्णपदकही मिळाले होते..  अरण्यातले ऋतू, पशु आणि पक्षी आणि अरण्याचं नैसर्गिक सौंदर्य हे सारं चित्रांमध्ये दाखवण्याचा त्याचा हातखंडा होता. सेंट पीटर्सबर्गच्या दक्षिण बाजूला एका छोटयाशा गावात शिष्कीनचं एक छोटंसं घर होते. या घरामध्ये त्यानं बरीचशी चित्रं काढली.

आपल्या शिक्षणानंतर तो कलेतल्या एका चळवळीत सामील झाला. ही चळवळ होती कलेतल्या भटकंती करणाऱ्या लोकांची खास चळवळ.. ही चळवळ सुरू होण्यापूर्वी रशियामध्ये कला ही सर्वसाधारणपणे उच्च वर्गापुरती मर्यादित होती.. पण चळवळीमुळे कला सामान्य लोकांपर्यंत पोहोचली..  ह्या चळवळीतले लोक देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कलेचे प्रदर्शन भरवायचे..  यामध्ये शिष्कीन हा एक आघाडीचा कलाकार होता..  हे चळवळीतले लोक शक्यतो निसर्गचित्रं काढायचेत..

अस्तावस्त पसरलेल्या रशियामधील निसर्गाची विविध रूपे या चित्रकाराच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरली. शिष्कीनची अरण्ये, पर्वत, विस्तीर्ण गवताळ प्रदेश, तळी यांची स्वच्छ सूर्यप्रकाश असणार्‍या ग्रीष्म ऋतुतील, हिमाच्छादित  करणार्‍या शिशिर ऋतुतील, पाणझडीच्या हेमंत ऋतुतील अशी सारी चित्रं आपल्याला पाहायला मिळतात.

या चित्रकारच्या सन्मानार्थ रशियामध्ये नंतर पोस्ट कार्ड काढण्यात आले. अवकाशातील एका छोटयाशा ग्रहालाही याचं नाव देण्यात आलं.

- दुष्यंत पाटील

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
*#कारागिरी*


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स





















 

हाक मातृभूमीची

कुतुहल कलाविश्वातलं

हाक मातृभूमीची

रशियामधल्या व्होल्गाग्राडला एक भव्य असं शिल्प आहे. हे शिल्प आहे प्रतीकात्मक रशियन मातृभूमीचं. यातली 'रशियामाता' ५२ मीटर उंच आहे. आणि तलवारीसकट या शिल्पाची उंची ८५ मीटर आहे. या शिल्पाचं वजन आहे ८००० टन !!! जेंव्हा हे शिल्प बनवलं गेलं तेंव्हा जगातील सर्वात उंच असणारं शिल्प म्हणून या शिल्पाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डस् मध्ये नोंद झाली. आजही युरोपमधलं हे सर्वात उंच शिल्प आहे. जगातलं सर्वात उंच असणारं स्त्रीचं शिल्प हेच आहे.

या चित्रातली प्रतिकात्मक 'रशियन मातृभूमी' एका हातात तलवार घेऊन दुसऱ्या हातानं आपल्या मुलामुलींना लढण्यासाठी बोलवत आहे. या 'रशियामाते'चे उडणारे केस, चेहऱ्यावरचे उग्र, करारी हावभाव, उडणारा पदर, त्यावरच्या वळ्या, मागे वळत अापल्या मुलामुलींना बोलवण्याची देहबोली अाणि एकूणच प्रमाणबद्धता थक्क करणारी आहे.

हे शिल्प इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका युध्दातल्या रशियाच्या विजयाचं प्रतिक आहे. दुसऱ्या महायुध्दातल्या सर्वात रक्तरंजित लढायांमधली एक लढाई या शहरात झाली. हे शहर आधी स्टॅलिनग्राड नावानं ओळखलं जायचं. या लढाईनं किती आहुती मागाव्यात? फक्त ७ महिन्यांच्या कालावधीत या लढाईत २० लक्ष रशियन सैनिकांचा आणि नागरिकांचा बळी गेला. (जर्मनीचे १५ लक्ष लोक या शहरात युध्दात मारले गेले ते वेगळेच.) युध्दाच्या दरम्यान या शहरात लढायला येणाऱ्या सैनिकाचं सरासरी उर्वरीत अपेक्षित आयुष्य होतं २४ तास !! इथल्या एक एक घरातल्या लोकांच्या देशासाठीच्या बलिदानाच्या स्मृती अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. युध्दातले हजारो बाँब आणि युध्दातले इतर अवशेष इथं अजूनही सापडत असतात. या शिल्पाच्या पायाशी ३४५०५ हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह ओतलेले आहेत.

महायुद्धानंतर स्टॅलिननं या विजयाचं इथं अजरामर असं स्मारक बनवण्याचे आदेश दिले. रशियातल्या साऱ्या शिल्पकारांनी या स्मारकासाठीच्या आपापल्या कल्पना पाठवल्या. स्टॅलिननं येवगेनी वुचेतीच या शिल्पकाराची यातून निवड केली. हा शिल्पकार समाजवादाशी संबंधीत वास्तववादी शिल्पांसाठी सुप्रसिद्ध होता. शिल्पकाराला या ठिकाणी कलात्मक आव्हान होतं ते मातृभूमीची हाक दाखवण्याचं. त्यानं 'रशियामातेचं' शिल्प तयार करताना माॅडेल म्हणून कुणाला वापरलं याविषयी बरेच मतप्रवाह आहेत. 

या शिल्पस्मारकाकडं जायला २०० पायऱ्या आहेत. त्या युध्दातल्या २०० दिवसांचं प्रतिक आहेत. या पायऱ्या चढून जाताना बाजूला सैनिक अाणि त्यांचं ब्रीदवाक्य 'एक पाऊलही मागं नाही' दाखवलं आहे. 'रशियामातेचं' मुख्य शिल्प त्याग, वीरता, शक्ती, नैतिकता आणि लष्करी वृत्ती यांचं प्रतिक आहे.

हे स्मारक बांधताना अभियांत्रिकी स्वरूपाची कित्येक आव्हानं होती. पण रशियन अभियंत्यांनी आपली सारी कामगिरी चोखपणे पार पाडली. शिल्पाचं अनावरण झाल्यावर अतिशय कुशल अशा गिर्यारोहकांची एक खास टीम या शिल्पाची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आली. अजूनही नेमलेले कुशल गिर्यारोहक शिल्प व्यवस्थित आहे की नाही याची नियमितपणे तपासणी करत असतात. शिल्पावरच्या छोट्या छोट्या भेगांचीही ते नोंद घेत असतात. गरज असेल तिथं दुरुस्तीचं कामही करतात. नोकरी म्हणून हे गिर्यारोहक काम करत असले तरी काम करताना त्यांच्यात एक वेगळाच पवित्र भाव, अभिमान आणि समाधान दिसून येतं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स




 
 
 

 

 

बसलेला दैत्य

कुतूहल कलाविश्वातलं

बसलेला दैत्य

या चित्रात आपल्याला पर्वतावर बसलेला एक दैत्य दिसतो. दैत्य म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रतिमा येते, पण या चित्रात दिसणारा दैत्य त्या प्रतिमेला छेद देतो. दुःखी आणि उदास अशा चेहऱ्यानं हा दैत्य काहीतरी विचार करताना दिसतो. हा दैत्य अंतर्मुख झाल्यासारखा वाटतो. प्रेमासाठी व्याकूळ झाल्यासारखा हा दैत्य वाटतो. पार्श्वभूमीला सूर्यास्त दिसतो. चित्रकारानं हे चित्र काढताना दैत्याच्या वर किंवा खाली फारशी जागा सोडलेली नाही, त्यामुळं हा दैत्य एकप्रकारे चित्रात अडकल्यासारखा वाटतो. हे चित्र नंतर जगप्रसिद्ध झाले.

चित्रकारानं अशा प्रकारचा दैत्य का दाखवला असावा? हे चित्र 'दैत्य  (demon)' नावाच्या एका प्रसिद्ध कवितेवर आधारित आहे. कवितेची थीम अगदी थोडक्यात अशी: स्वर्गातल्या एका बंडखोर देवदूताला शाप मिळतो. त्याला स्वर्गातून हद्दपार करण्यात येतं. दैत्य बनून तो पृथ्वीवर येतो. सतत दुष्टकर्मं करत राहतो. एकदा काॅकेशस पर्वतावरून उडताना तो तमारा नावाच्या सुंदर युवतीच्या विवाहाची चाललेली तयारी पाहतो. तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. दरोडेखोरांकरवी तो तिच्या नियोजीत वराला संपवतो. विवाहसोहळा अर्थातच रद्द होतो. तिला मोहपाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो. तिचं रक्षण करणारा एक देवदूतही असतो, पण दैत्य त्याचाही पराभव करतो. शेवटी ती त्याच्या मोहपाशात अडकते. तो तिचं चुंबन घेताक्षणीच तिचा मृत्यू होतो अाणि ती स्वर्गात जाते. तो मात्र भयानक दुःखामध्ये पृथ्वीवरच उरतो.

आता आपल्याला चित्रात दाखवलेले दैत्याचे हावभाव, त्याची देहबोली चांगली समजू शकेल.
ही कविता बऱ्यापैकी मोठी आणि खरोखरच अप्रतिम आहे. मिखाईल लेर्मेंटोव यानं ती लिहिली असून उत्कृष्ट दर्जाच्या साहित्यकृतींमध्ये या कवितेची गणना होते. कवीनं ही कविता लिहायला वयाच्या चौदाव्या वर्षीच सुरूवात केली. या कवितेच्या थीमनं तो इतका भारून गेला होता की आयुष्यभरात त्यानं तीच कविता सहा वेगवेगळ्या प्रकारे लिहिली !!

या चित्राचा चित्रकार वृबेल. सुरूवातीला त्याच्या या चित्रावर समीक्षक मंडळींनी बऱ्यापैकी कठोर टीका केली होती. पण नंतर या चित्रामुळंच तो गाजला. पुढं त्यानं दैत्यांशी संबंधित अजूनही चित्रं काढलीत.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स

 

मॅन हँगींग आऊट

कुतूहल कलाविश्वातलं

मॅन हँगींग आऊट

मानसशास्त्रातल्या मनोविश्लेषणाचा जनक सिग्मंड फ्राॅईड याला कोण ओळखत नाही? या फ्राॅईडनं चाळिशीमध्ये बरंचसं महत्वाचं कार्य केलं.. याच दरम्यान त्याला बरेचसे मानसिक आजारही सुरु झाले.. यापैकी एक म्हणजे मृत्यूची वाटणारी प्रचंड भिती..

आयुष्यात शेवटी फ्राॅईडला कर्करोग झाला. त्याला धूम्रपानाची सवय होती. त्याची शस्त्रक्रियाही झाली पण तो पूर्णपणे बरा झाला नाही. पुढं पुढं त्याला होणाऱ्या वेदना प्रचंड वाढु लागल्या. एके काळी मृत्यूचं प्रचंड भय वाटणाऱ्या फ्राॅईडच्या डोक्यात आता आत्महत्येचे विचार येऊ लागले. डाॅक्टर असणाऱ्या आपल्या शूर नावाच्या मित्राशी बोलून त्यानं एक निर्णय घेतला - आत्महत्येचा. माॅर्फीनचा वापर करुन मग त्यानं आत्महत्या केली.

फ्राॅईडचा जन्म आजच्या काळातील चेक रिपब्लिकमधला. या चेक रिपब्लिकची राजधानी असणाऱ्या प्रागमध्ये फ्राॅईडचं एक विचित्रसं शिल्प आहे. चेअर्नी नावाच्या शिल्पकारानं हे शिल्प बनवलं आहे. या शिल्पकृतीचं नाव आहे 'man hanging out'.  एका उंच इमारतीवरुन बाहेर आलेल्या काठी/बांबूसारख्या भागाला फ्राॅईड लोंबकळताना दाखवला आहे. काठीला सोडून आत्महत्या करावी की काठीला पकडून जीवन जगावं अशा द्विधा मनस्थितीत फ्राॅईड आपल्याला इथं दिसतो.

प्रागमधल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी हे एक. हे शिल्प इतकं लोकप्रिय बनलं की याच्या प्रतिकृती लंडन, बर्लिन, शिकागो (आणि इतर काही ठिकाणी) बनवण्यात आल्या. रस्त्यावरच्या लोकांना हे शिल्प दुरून एखाद्या आत्महत्या करू पाहणाऱ्या माणसासारखे भासते. शिल्पाची कल्पना नसणाऱ्या अनेकांनी आजपर्यंत घाबरून पोलिसांना फोन केल्याच्या घटना घडल्या आहेत !!

असंही समजलं जातं की चेअर्नीनं 'नव्या (म्हणजे एकविसाव्या) शतकात बुद्धिजीवी लोक नेमकी काय भूमिका पार पाडतील?' या प्रश्नाचं उत्तर देताना हे शिल्प बनवलं. नव्या शतकातील बुद्धिजीवी लोकांच्या विषयी चेअर्नीला वाटणारी साशंकता आपल्याला यात दिसते.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स