Tuesday, February 26, 2019

गंगावतरण

कुतूहल कलाविश्वातलं 

गंगावतरण

सर्वसाधारण सातव्या शतकाच्या मध्यात तामिळनाडूमध्ये पल्लव घराण्यात नरसिंहवर्मन (पहिला) नावाच्या राजाचं राज्य होतं. आपल्या वडिलांसारखंच (महेंद्रवर्मन - पहिला) नरसिंहवर्मनचंही कलेवर प्रेम होतं. इ. स. ६४२ मध्ये चालुक्य घराण्यातला महान राजा पुलकेशी (दुसरा) याच्याकडून झालेल्या पराभवाचा त्यानं बदला घेतला. पुलकेशीवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी त्यानं भव्य कलाकृती बनवली. महाबलीपुरम (आजच्या तामिळनाडूमधल्या कांचीपुरम जिल्ह्यातलं किनाऱ्यावरचं एक ठिकाण) या ठिकाणी भव्य पाषाणावर कोरीव काम करून ही कलाकृती बनवण्यात आली.

या ठिकाणी दोन भव्य शिलांवर कोरीव काम करण्यात आलंय. पुराणातल्या भगीरथानं पृथ्वीवर गंगा आणल्याच्या कथेचं चित्रण या कोरीव कामात पाहायला मिळतं. काहींच्या मते अर्जुनानं घोर साधना करून शिवाकडून पशुपती अस्त्र मिळवल्याच्या कथेचं हे चित्रण आहे. या कोरीव कामात दाखवलेली दृश्यं दोन्ही कथांसाठी तितकीच लागू पडतात.

या कोरीव कामाचा एकूण आकार १५ मी X ३० मी इतका महाकाय आहे. गंगेला पृथ्वीवर आणण्याचा (किंवा अर्जुनाला पशुपती अस्त्र मिळण्याचा) प्रसंग देवी, देवता, किन्नर, गंधर्व, नागलोक, अप्सरा आणि गणलोक पाहताना या शिल्पकृतीत आपल्याला पाहायला मिळतात. वन्य आणि पाळीव पशूही हे दृश्य पाहताना दिसतात. कोरलेल्या एकूण आकृतींची संख्या जवळपास १४६ आहे.

डावीकडच्या शिळेवर ,उजवीकडच्या भागात आपल्याला एका पायावर उभा असणारा (आणि डोक्यावर हात जोडलेला) भगीरथ दिसतो. त्याच्या डावीकडं पशुपती अस्त्र हातात घेतलेला शंकर दिसतो. दोन शिलांच्या मधल्या जागेचा वापर वाहणारी गंगा दर्शवण्यासाठी केलेला आहे. एके काळी वरच्या बाजूला पाण्याची टाकी होती. या टाकीमधून पाणी खाली यायचं. ते स्वर्गातून पृथ्वीवर येणाऱ्या गंगेसारखं भासायचं. वाहत्या पाण्याच्या ठिकाणी आपल्याला कोरलेल्या नागदेवता दिसतात.



Image credit:
Bernard Gagnon [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Descent_of_the_Ganges_01.jpg

उजव्या बाजूच्या शिळेवर, खालच्या बाजूला आपल्याला हत्तींचा कळप गंगेचं पाणी पिण्यासाठी गंगेकडं येताना दिसतोय. यात हत्तींसोबत त्यांची पिल्लंही आहेत. हे कोरलेले हत्ती खरोखरच्या हत्तीच्या आकाराचे आहेत. हत्तींशिवाय यामध्ये आपल्याला हरणं, माकडे, सिंह वगैरे प्राणीही दिसतात.

शंकराच्या आजूबाजूला दिसणारे बुटके जीव म्हणजे वालकिल्य मुनी. ह्यांची उंची कमी असून ते सदैव शंकराजवळ असायचे. ह्याच शिळेवर वरच्या बाजूला सर्वात डावीकडून तिसऱ्या आणि चौथ्या ठिकाणी दिसणारी जोडी 'किन्नर' या प्रकारात मोडते. (हे उजवीकडच्या शिळेवरही दिसतात.) पुरुष किन्नरानं काहीतरी वाद्य घेतलंय तर त्याच्या मागं असणारी स्त्री किन्नर टाळ वाजवत आहे. या किन्नर मंडळींचं निम्मं शरीर मानवी तर निम्मं शरीर पक्ष्यांचं असायचं. या ठिकाणी किन्नरांचे पाय पक्ष्यांचे दाखवण्यात आलेले आहेत.

'युनेस्को'नं ह्या ठिकाणाला जागतिक वारशाचं स्थळ म्हणून घोषित केलंय.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

Frontline Volume 24 - Issue 25 :: Dec. 22, 2007-Jan. 04, 2008

भारतीय कलेचा इतिहास - प्रा. जयप्रकाश जगताप

https://en.wikipedia.org/wiki/Descent_of_the_Ganges_(Mahabalipuram)   

Sunday, February 24, 2019

बाफ़ुऑनचं मंदिर - भाग १ (त्रिमितीय चित्रकोडं)

कुतूहल कलाविश्वातलं 

बाफ़ुऑनचं मंदिर - भाग १ (त्रिमितीय चित्रकोडं) 

१९९५ मधली गोष्ट - फ्रेंच पुरातत्वतज्ञांची एक टीम एका प्राचीन मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी कंबोडियात जमली होती. त्या मंदिरासाठी वापरले गेलेले दगड इतस्ततः विखुरलेले होते. हे मंदिर जवळपास सव्वानऊशे ते साडेनऊशे इतकी वर्षं जुनं होतं. मंदिरासाठी वापरल्या गेलेल्या दगडांची संख्या ३,००,००० इतकी होती. खरंतर, हे मंदिर शतकानुशतके अस्थिर बनत गेलं होतं. कारण, एकतर या मंदिरातल्या दगडांचं वजन जास्त होतं आणि दुसरं म्हणजे वालुकाश्मांनी बनलं असल्यानं यात खूप पाणी साचून राहत होतं. मंदिराचा पाया अजून भक्कम असायला हवा होता. काही दशकांपूर्वी त्यातले सारे दगड बाहेर काढण्यात आले होते. ह्याच दगडांनी मंदिर पुन्हा बांधायचं होतं. पण कंबोडियात सुरु झालेल्या नागरी युध्दामुळं हे काम १९७५ मध्ये थांबवणात आलं होतं.

मंदिराच्या पुनर्बांधणीचा हा प्रकल्प १९६० च्या दशकातच सुरु झाला होता. हे 'बाफ़ुऑन' या नावानं ओळखलं जाणारं मंदिर एके काळचं कंबोडियामधल्या सर्वात महान मंदिरांपैकी एक. पण काही कारणानं ते अस्थिर बनत गेलं. १९६० मध्ये फ्रेंच पुरातत्वतज्ञाच्या टीमनं ह्या मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं. हे मंदिर पुन्हा भक्कम प्रकारे बांधण्याचा एकच मार्ग होता. मंदिरातले सारे दगड बाहेर काढणं, काँक्रीटचा पाया तयार करणं आणि मग सारे दगड  मूळच्या ठिकाणी रचत पूर्ण मंदिर पुन्हा बांधणं.

प्रकल्पाच्या योजनेप्रमाणं मंदिरातले सारे दगड बाहेर काढण्यात आले. या दगडांना ओळखण्यासाठी एका बाजूला हलकासा रंग देण्यात आला. एका मास्टरप्लॅनवर या दगडांची नोंद करण्यात येत होती. संपूर्ण मंदिराचे दगड बाहेर काढल्यानंतर या दगडांची संख्या जवळपास ३,००,००० बनली. हे सारे दगड २५ एकरच्या क्षेत्रात पसरले गेले होते. या कामाला कित्येक वर्षे लागली. १९७५ मध्ये मात्र कंबोडियामध्ये नागरी युद्ध सुरु झाल्यानं हे काम थांबवण्यात आलं. आणि ह्या नागरी युद्धाच्याच दरम्यान प्रकल्पाचा मास्टरप्लॅन गायब झाला!!


Image Credit: Photo: Marcin Konsek / Wikimedia Commons (https://commons.wikimedia.org/wiki/File:2016_Angkor,_Angkor_Thom,_Baphuon_(17).jpg)

आता १९९५ मध्ये फ्रेंच टीम पुन्हा एकदा कामाला लागली. मास्टरप्लॅन नसल्यानं आता हे तीन लाख दगड एकत्र लावून मंदिर कसं बनवायचं हे प्रचंड अवघड असं कोडं होतं. पण काही गोष्टी या फ्रेंच टीमच्या बाजूनं होत्या. यातल्या प्रत्येक दगडावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम होतं. याचा फायदा आजूबाजूचे दगड शोधण्यासाठी नक्कीच होणार होता. दुसरं म्हणजे यातल्या प्रत्येक दगडाचं मंदिराच्या रचनेत स्वतःचं असं खास स्थान होतं. प्रत्येक दगडाची मापं, आकार वेगवेगळे होते. यामुळं एखाद्या ठिकाणी चुकून वेगळाच दगड बसवून चालणारच नव्हतं.


Image Credit
Jean-Pierre Dalbéra from Paris, France [CC BY 2.0 (https://creativecommons.org/licenses/by/2.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Le_Baphuon_(Angkor)_(6832283873).jpg

यानंतर अविरतपणे १६ वर्षं काम करत पुरातत्वतज्ञांच्या या टीमनं जगातलं सर्वात मोठं त्रिमितीय 'जिगसॉ पझल' पूर्णपणे सोडवलं. मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम २०११ मध्ये संपलं. हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यासाठीच्या कार्यक्रमात कंबोडियाच्या राजासोबत फ्रेंच पंतप्रधानही हजार होते. यानंतर ह्या मंदिराला जगभरातून लाखो पर्यटक भेट देऊ लागले !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.bbc.com/news/world-asia-pacific-14005258

https://web.archive.org/web/20060507030824/http://www.cambodianonline.net/angkorwat518.htm

https://www.orientalarchitecture.com/sid/19/cambodia/angkor/bapuon-temple

https://en.wikipedia.org/wiki/Baphuon

Tuesday, February 19, 2019

शिवाजीमहाराज

ओळख कलाकृतींची

शिवाजीमहाराज

'राजा रविवर्मा' हे भारतातल्या महान चित्रकारांपैकी एक. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची विलक्षण ओढ होती. लहानपणी राजाच्या दरबारामध्ये  एका पाश्चात्त्य चित्रकाराला चित्र रंगवताना पाहताना त्याच्या वास्तववादी शैलीचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला. ही शैली नंतर त्यांनी आत्मसात केली.

समकालील लोकांच्या वास्तववादी व्यक्तिचित्रांमुळं ते प्रसिद्ध झाले. त्यांनी पुराणाकथांमधल्या प्रसंगांची ,कल्पनाशक्तीचा वापर करत खूप सारी चित्रं काढली. त्यांनी भारतीय चित्रकलेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांच्या या साऱ्या किर्तीमुळं त्या काळातले राजघराण्यातले बरेचसे लोक स्वतःची व्यक्तिचित्रं काढण्यासाठी त्यांना बोलवायचे.

कलेच्या क्षेत्रातलं त्यांचं एक महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी सामान्य लोकांपर्यंत चित्रकला पोहोचवली. १८९४ मध्ये त्यांनी मुंबईमधल्या 'घाटकोपर' इथं छापखाना सुरू केला. काही वर्षांनी हा छापखाना लोणावळ्याजवळ हलवण्यात आला. यामध्ये राजा रविवर्मा यांच्या चित्रांच्या हजारो प्रती छापल्या जायच्या. यात प्रामुख्यानं रामायण, महाभारत आणि इतर पुराणकथा यातले प्रसंग रंगवलेली असायचे. त्यांचा छापखाना त्या काळातला सर्वोत्कृष्ट छापखाना मानला जायचा.

सोबत दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र हे त्यांच्या एका तैलचित्रावरून याच छापखान्यात छापलं गेलेलं एक चित्र. मूळ तैलरंगातलं चित्र त्यांनी १८९० मध्ये काढलं होतं. राजा रविवर्मा यांनी महाराजांविषयी ऐकलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर करून त्यांनी ही चित्रकृती बनवली. शिवाजीमहाराज आपल्या निवडक सैनिकांसोबत घोड्यावरून जातानाचा हा प्रसंग या चित्रात सुंदररित्या रंगवलाय. पार्श्वभूमीला एक किल्ला दिसतोय. 



ह्या चित्राचा पूर्वी बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पुस्तकासाठी मुखपृष्ठाच्या चित्रासाठी वापर झाला आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://artsandculture.google.com/asset/shivaji/pAFu_9OUrMTVgQ

http://www.museumsofindia.gov.in/repository/record/vmh_kol-R6687-16665

Sunday, February 10, 2019

लुरिस्तानच्या कांस्यवस्तू

कुतूहल कलाविश्वातलं

लुरिस्तानच्या कांस्यवस्तू

इराणच्या पश्चिम भागात 'लुरिस्तान' नावाचा एक प्रदेश आहे. हा प्रदेश पर्वतमय आहे. इराण आणि इराक यांच्या सीमारेषेवरच हा प्रदेश आहे. या प्रदेशाचं इतिहासकार आणि पुरातत्त्वतज्ञ यांच्यासाठी खास महत्त्व आहे.

या प्रदेशात खूप प्रमाणात इ. पु. १५०० ते इ. पु. ५०० या दरम्यान बनवल्या गेलेल्या खूप साऱ्या कांस्यवस्तू मिळाल्या आहेत. या वस्तू नेमक्या कोणत्या लोकांनी बनवल्या आहेत, ते लोक मूळचे कुठले यासारख्या प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळालेली नाहीत. एक मात्र निश्चित, या कांस्यवस्तू बनवणारे लोक भटक्या टोळींमध्ये राहायचे. मृत व्यक्तींना पुरलेल्या ठिकाणी या कांस्यवस्तू सापडल्या आहेत. इ. पु. ४००० नंतरची 'मेसोपोटेमिया' संस्कृतीचा भाग असणाऱ्या, याच भागात सापडणाऱ्या कांस्यवस्तू आणि ही कांस्यवस्तू यांच्या शैलीमध्ये फरक जाणवतो.

ब्रिटीश लोकांना या प्रकारच्या कांस्यवस्तू पहिल्यांदा १८५४ मध्ये मिळाल्या. त्या कांस्यवस्तू नंतर ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात पोहोचल्या. कालांतरानं इतर युरोपियन लोकांनीही अधूनमधून या प्रदेशातून कांस्यवस्तू घेऊन आपापल्या देशात नेल्या. १९२० च्या दशकात शेवटी शेवटी युरोप आणि अमेरिकेमधल्या बऱ्याचशा वस्तुसंग्रहालयात या कांस्यवस्तू दिसायला लागल्या. त्यांची लंडन आणि न्यूयॉर्क इथं विक्रीही होऊ लागली. यानंतर युरोप आणि अमेरिकेच्या प्राचीन कलावस्तूंच्या बाजारपेठेत या कांस्यवस्तूंची मागणी प्रचंड वाढली. लुरिस्तानचे स्थानिक लोक बेकायदेशीररित्या जमीन खोदून अशा कांस्यवस्तू शोधू लागले. त्यांना अक्षरश: हजारो कांस्यवस्तू मिळाल्या आणि त्या युरोपच्या/अमेरिकेच्या वस्तुसंग्रहालयात आणि कलावस्तूंच्या संग्राहकांना विकण्यात आल्या. यातली बरीचशी विक्री बेकायदेशीर झाल्यानं आज या कांस्यवस्तूंचा अचूकरीत्या इतिहास लिहिणं कठीण झालंय.

या वस्तू बऱ्याच प्रकारच्या आहेत. काही वस्तू फक्त सजावटीकरता बनवल्या गेल्या आहेत. काही दैनंदिन जीवनात वापरायच्या वस्तू आहेत. तंबू बांधताना आधारासाठी लागणारे खांब आहेत. तलवार, कुऱ्हाड यासारखी संरक्षणासाठी लागणारी हत्यारंही आहेत. घोड्याला सजवण्यासाठी त्याच्या डोक्यावर लावायचा अलंकारही (horse cheekpiece) आहे. 



सोबत दिलेलं चित्र हे अशाच एका घोड्याच्या अलंकाराचं आहे. यात 'पशूंचा मालक' दाखवण्यात आलाय. प्राचीन इजिप्त आणि आजूबाजूच्या ठिकाणच्या कलेमध्ये वरचेवर येणारा हा विषय. यात मध्यभागी मालक असणारा माणूस दिसत असून बाजूला दोन पशू दिसत आहेत.

जवळपास इ. पु. ५०० पर्यंत तिथल्या भटक्या टोळ्यांमध्ये कांस्यवस्तू बनवण्याचा व्यवसाय जोरात चालायचा हे मात्र निश्चित !

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

http://www.iranicaonline.org/articles/bronzes-of-luristan

http://www.cais-soas.com/CAIS/Art/porada/porada-luristan.htm

https://en.wikipedia.org/wiki/Luristan_bronze

Sunday, February 3, 2019

चिंताग्रस्त कवी

कुतूहल कलाविश्वातलं

चिंताग्रस्त कवी

विल्यम हाॅगर्थ हा अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रज चित्रकार होता. तो वर्तमानपत्रात व्यंगचित्रंही  काढायचा आणि समाजातल्या वाईट गोष्टींवर उपहासात्मक पध्दतीनं भाष्य करायचा. लंडनमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कर्जात बुडाल्यामुळं त्याच्या वडिलांना एकदा तुरुंगात जावं लागलं होतं. या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर कायमचा राहिला. त्याच्या बऱ्याच कलाकृतींमध्ये आपल्याला हे दिसून येतं. 



१७४० च्या दरम्यान त्यानं 'चिंताग्रस्त कवी' नावाचं एक चित्र काढलं. या चित्रात त्यानं एका छोट्याशा खोलीत राहणाऱ्या कवीच्या आयुष्यातला प्रसंग दाखवलाय. ही खोली म्हणजे एका घराचा माळा आहे. या खोलीत मोजकंच फर्निचर आहे. खोलीत नीटनेटकेपणा नाही. भिंतींना भेगा पडल्या आहेत. कपाट रिकामं झालंय. चित्रकार यातून आपल्याला कवीची खराब आर्थिक परिस्थिती दाखवतोय.

कवीच्या/लेखकाच्या जीवनात कधी कधी  'writer's block' ही अवस्था येते जेंव्हा लेखकाला/कवीला काही सर्जनशील असं लिहायला सुचत नाही. या चित्रातला कवी अशाच अवस्थेत अडकलेला दिसतोय. त्याच्या हातात लिहण्यासाठी पीस आहे. टेबलवर 'The Art of English Poetry' नावाचं मार्गदर्शनपर पुस्तक आहे. लिहता लिहता काही सुचत नसल्यानं तो डोकं खाजवतोय!!

कवीपासून काहीच अंतरावर त्याची बायको बसली आहे. ती फाटलेले कपडे कपडे शिवत आहे. काही फाटके कपडे जमिनीवर पडलेले आहेत आणि त्यावर आरामात मांजर बसलेलं दिसतंय. बिछान्यावर एक बाळ रडताना दिसतंय आणि त्याकडं कुणाचंच लक्ष नाहीये. उजवीकडं दार उघडून एक गवळण (milkmaid) आपलं बिल मागायला आलेली दिसत आहे. पैसे बरेच दिवस ना मिळाल्यानं ती भडकलेली दिसतीये.

कवी जी कविता लिहण्याचा प्रयत्न करतोय त्या कवितेचं नाव "Upon Riches" असून ती श्रीमंतीवरची कविता आहे. घरामध्ये खायला मिळणंही अवघड दिसत असताना अशा विषयावर कविता रचण्याचा प्रयत्न करणारा कवी कल्पनेत रमणारा दिसतो.

'अलेक्झांडर पोप' नावाच्या कवीच्या एका उपहासात्मक काव्यानं प्रेरित होऊन चित्रकारानं हे चित्र काढलं असावं असं मानण्यात येतं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

http://grandearte.net/works-william-hogarth/distressed-poet

https://en.wikipedia.org/wiki/The_Distrest_Poet