Friday, December 20, 2019

गॅब्रिएलची दैवीवाणी


मुशाफिरी कलाविश्वातली

गॅब्रिएलची दैवीवाणी

बायबलप्रमाणं येशू ख्रिस्ताच्या जन्माआधीची एक कथा आहे. या कथेप्रमाणं येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी महिने गॅब्रिएल नावाच्या देवदूतानं मेरीला दर्शन दिलं होतं. ही घटना इस्रायलच्या उत्तर भागातल्या नाझारेथ या ठिकाणी घडली होती. याप्रसंगी मेरीचं लग्न झालं नव्हतं. पण तिचा वाङ्निश्चय जोसेफशी झाला होता.

गॅब्रिएलनं मेरीला परमेश्वराचे आशीर्वाद असल्याचं सुचवलं. मेरीला याचा अर्थ कळाला नाही. तेंव्हा गॅब्रिएलनं सांगितलं की परमेश्वराच्या कृपेनं मेरी गर्भवती राहणार असून ती एका दिव्य बालकाला जन्म देईल. तो धर्म संस्थापक होणार असून ख्रिश्चन धर्माचे प्रवर्तन करणारा म्हणून तो येशू ख्रिस्त म्हणून ओळखला जाईल. तो सर्वांचा त्राता बनणार असून परमेश्वराचा अवतार असेलमेरी कुमारिका होती. त्यामुळं ती गोंधळून गेली. पण दैवी शक्तीमुळं हे शक्य होणार असल्याचं गॅब्रिएलनं स्पष्ट केलं. शेवटी मेरीनं परमेश्वराच्या या इच्छेला आपली संमती दर्शवली.

ख्रिस्ती धर्मीय कलेमध्ये सर्वाधिक दाखवल्या जाणाऱ्या प्रसंगांपैकी हा एक प्रसंग. मध्ययुगातल्या आणि प्रबोधनकाळातल्या जवळपास सर्वच महान चित्रकारांनी हा विषय आपल्या चित्रांमधून मांडला. वेगवेगळ्या कलाकारांनी मेरीचं पवित्र कौमार्य आणि गॅब्रिएलची दैवीवाणी आपल्या प्रतिभेचा वापर करत आपापल्या कलाकृतींमधून व्यक्त केला. काचेवरची चित्रं, कोरीव कामं, शिल्पं, तैलचित्रं अशा साऱ्याच माध्यमात ह्या कलाकृती बघायला मिळतात. जवळपास चवथ्या शतकापासून पुढं घडल्या गेलेल्या ह्या विषयावरच्या हजारो कलाकृती पाहायला मिळतात.

मध्यकाळातल्या आणि प्रबोधकाळातल्या बहुतेक साऱ्या चित्रांमध्ये काही गोष्टी सामान आढळतात. या काळातल्या चित्रांमध्ये गॅब्रिएल देवदूत डावीकडं दिसतो. उजवीकडं मेरी बहुतेकवेळा बसलेली दिसते. गॅब्रिएल बाजूनं दिसतो तर मेरीचा पूर्ण चेहरा बऱ्याचदा दिसतो. हा प्रसंग काही वेळेला घराच्या आत घडताना दिसतो तर काही वेळेला घराच्या बाहेरच्या व्हरांड्यात मेरी बसलेली दिसते. घराच्या बाहेर दाखवल्या गेलेल्या प्रसंगात बहुतेक वेळा डावीकडं बंदिस्त बगीचा दिसतो. मध्ययुगातल्या एका श्रद्धेप्रमाणं मेरी बऱ्यापैकी विदुषी मानली जायची. त्यामुळं बऱ्याचदा मेरीसोबत एखादं पुस्तकही दाखवलं गेलेलं दिसतं.

मेरीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या चित्रांमध्ये पाहायला मिळतात. गॅब्रिएलच्या दैवीवाणीनं सुरुवातीला गोंधळून, एक प्रकारे घाबरून गेलेली मेरी, हे कार्य आपल्याकडून कसे होणार असा प्रश्न पडलेली आणि काहीसा विरोध असणारी मेरी आणि परमेश्वराच्या ह्या कार्याला स्वीकारून शेवटी संमती देणारी मेरी आपल्याला पाहायला मिळतात. मेरीच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रियांवरून आणि तिच्या एकूणच बसण्याच्या पद्धतीतून, देहबोलीतून ह्या प्रतिक्रिया व्यक्त होतात.

काही वेळेला पवित्र कुमारिका असणाऱ्या मेरीला दैवी शक्तीमुळं होणारी गर्भधारणा प्रतीकात्मक रूपानं दाखवण्यासाठी खिडकीतून येणारा प्रकाश मेरीवर पडत असल्याचं दिसतं. काहीवेळेला हा प्रकाश पांढऱ्या कबुतरापासून येताना दिसतो.

सोबतच्या चित्रांपैकी पहिलं चित्र १३३३ सालचं आहे. (एका विशिष्ट प्रकारे तीन लाकडी पट्ट्यांचा वापर करत ते काढण्यात आलंय). इटलीमधल्या एका चर्चमध्ये ठेवण्यासाठी ते काढण्यात आलं होतं. या चित्रात आपल्याला डावीकडं देवदूत गॅब्रिएल दिसतो तर उजवीकडं मेरी दिसते. मेरीचा सुरुवातीला असणारा विरोध तिच्या हावभावांवरून दिसतो. तिच्या हातात एक पुस्तकही दिसतं. ही कलाकृती ३ लाकडी पट्ट्यांची बनली असून त्यातल्या डाव्या पट्टीवर आपल्या येशू ख्रिस्तानंतरच्या काळात होऊन गेलेले सेंट अँसॅनस दिसतात तर उजवीकडच्या पट्टीवर दिसणारी स्त्री सेंट मॅक्सिमा असल्याचं मानण्यात येतं.

१३३३ साली काढलं गेलेलं चर्चमधलं चित्र  
 १४७२ च्या दरम्यान लिओनार्दो दा विंचीनं काढलेल्या चित्रात हाच प्रसंग घराच्या बाहेर घडताना दाखवलाय. यात लिओनार्दो दा विंचीनं गॅब्रिएल देवदूत डावीकडं बगिच्यामध्ये दाखवलाय. लिओनार्दोनं कल्पना स्वातंत्र्य घेत पार्श्वभूमीला रम्य निसर्ग दाखवलाय. गम्मत म्हणजे त्यानं काढलेल्या नंतरच्या अनेक चित्रांमध्ये जवळपास असाच निसर्ग येतो !!

लिओनार्दो दा विंचीनं काढलेलं चित्र

१५४५ च्या दरम्यान इटालीमधल्या बेक्काफ्युमी नावाच्या चित्रकारानं काढलेल्या चित्रात हा प्रसंग घराच्या आत घडताना दाखवलाययात वर दैवी प्रकाश असणारं कबुतर वर दिसतं.

बेक्काफ्युमीनं काढलेलं चित्र

१६२८ मध्ये रुबेन्सनं काढलेल्या चित्रात वर कबुतरदैवी प्रकाश आणि बाळंही दाखवलेली आहेत.  रुबेन्सच्या चित्रात गॅब्रिएलच्या खांद्यावर त्याचा पंख दिसतोय. घरातलं वातावरण अधिक जिवंत भासवण्यासाठी रुबेन्सनं उजवीकडं खालच्या कोपऱ्यात शिवकामाची बास्केट आणि एक झोपलेलं मांजर दाखवलंय.

रुबेन्सनं काढलेलं चित्र

१९१४ मध्ये जॉन विल्ल्यम वॉटरहाऊस या इंग्रज चित्रकारानं गॅब्रिएलचं बोलणं ऐकून प्रश्नात पडलेली मेरी दिसते.

वॉटरहाऊसनं काढलेलं चित्र 

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

Image Credit:
Simone Martini [Public domain]
Leonardo da Vinci [Public domain]
Peter Paul Rubens [Public domain]
Domenico di Pace Beccafumi [Public domain]
John William Waterhouse [Public domain]

Saturday, December 14, 2019

पोलीस स्टेशनबाहेरची रांग

मुशाफिरी कलाविश्वातली

पोलीस स्टेशनबाहेरची रांग

जवळपास प्रत्येक समाजात नोकरी/कामधंदा नसलेल्या, भयानक आर्थिक स्थिती असणाऱ्या लोकांचा एक वर्ग असतो. अशा लोकांचं जीवन खूप खडतर असतं. उद्या आपल्याला खायला मिळेल की नाही याची त्यांना शाश्वती नसते. असा वर्ग पूर्वीही प्रत्येक समाजात असायचा आणि आजही आहे.

अशा लोकांचं जीवन थोडंसं सुसह्य व्हावं म्हणून इंग्लंडमध्ये 'वर्कहाऊस' नावाचा प्रकार सोळाव्या शतकात सुरु झाला. पण नंतरच्या काळात, म्हणजे एकोणिसाव्या शतकात वर्कहाऊसमधली स्थिती तितकीशी चांगली नव्हती. पण वर्कहाऊसमध्ये प्रवेश मिळाल्यावर लोकांचा खायचा आणि राहायचा प्रश्न सुटायचा. त्यामुळं एकदा लोक वर्कहाऊसमध्ये गेले की मरेपर्यंत तिथंच राहायचे. असं असलं तरी दरिद्री लोक वर्कहाऊसमध्ये जाणं टाळायचे. कारण एकदा वर्कहाऊसमध्ये गेलं की कुटुंबाशी जन्मभरासाठी ताटातूट व्हायची.

या वर्कहाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ एक खास विभाग असायचा - 'कॅज्यूअल्टी वॉर्ड'. हा विभाग बेघर असणाऱ्या दरिद्री लोकांसाठी आणि ट्रॅम्प (घर आणि काम नसणारे भटकणारे गरीब/भिकारी लोक) यांसाठी असायचा. या विभागात एकावेळी एका रात्रीसाठी प्रवेश मिळू शकायचा. एकदा प्रवेश मिळाला त्यांना तिथला गणवेश मिळायचा. त्यांच्यासोबतचं साहित्य/कपडे त्यांना जमा करायला लागायचं. दुसऱ्या दिवशी हा विभाग सोडताना सामान/कपडे त्यांना परत मिळायचं. रात्रभर राहण्याच्या बदल्यात लोकांना थोडा वेळ काम करून मग बाहेर पडत येऊ शकायचं.

या कॅज्यूअल्टी वॉर्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लोकांना पोलिसांकडून एक प्रकारचं प्रमाणपत्र मिळवायला लागायचं. या प्रमाणपत्राद्वारे पोलीस त्या व्यक्तीला कॅज्यूअल्टी वॉर्डमध्ये राहण्याची खरंच गरज असल्याचं सांगायचे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर रांगेत उभे राहायचे. आदल्या रात्री राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी पुन्हा एकदा प्रमाणपत्राची गरज भासायची. बरेच लोक प्रवेश मिळवण्यासाठी दररोज प्रयत्न करायचे. दारिद्र्य आणि बेघरता हा या काळातला इंग्लंडमधला भेडसावणारा प्रश्न होता. १८६४ मध्ये पोलिसांकडून कॅज्यूअल्टी वॉर्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन लाख प्रमाणपत्रं देण्यात आली तर १८६९ मध्ये हा आकडा लाख झाला !!

बेघर आणि दरिद्री लोकांशी संबंधित एक कायदा लंडनमध्ये १८६४ साली करण्यात आला होता. ह्या विषयी 'दि ग्राफिक' नावाच्या एका साप्ताहिकात एक बातमी छापण्यात आली होती. त्यात 'बेघर आणि भुकेले' नावाचं एक चित्र छापण्यात आलं होतं. त्याचा मूळ कलाकार होता 'ल्युक फिल्ड्स'. लंडनमध्ये आल्यानंतर ल्युकला जे काही दिसलं होतं त्याचंच चित्रण ल्यूकनं यात केलं होतं.

काही वर्षांनी ल्युकनं ह्याच विषयावर एक मोठं चित्र काढलं. ह्या चित्रात त्यानं पोलीस स्टेशनबाहेर असणारी कॅज्यूअलिटी वॉर्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांनी केलेली रांग दाखवलेली होती. आपल्या आधीच्या चित्रात त्यानं आता बरेच बदल केलेले होते. आता त्याच्या चित्रात स्त्रिया आणि लहान मुलंही आली होती. चित्रात हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आलेल्या लोकांची वेगवेगळी कारणं दिसतात. रांगेत एक दारू पिलेला माणूस दिसतो तर एक वृद्ध माणूस दिसतो. लहान मुलाला घेतलेला एक पिताही दिसतो तर आपल्या मुलांसहित आलेली विधवांची दिसते. समाजातल्या एका विशिष्ट वर्गाचं ह्या रांगेत आपल्याला दर्शन होतं. चित्रात डाव्या बाजूला एक चांगल्या कपड्यांमधला माणूस पोलिसाशी बोलताना दिसतोय. तो दरिद्री लोकांविषयी तक्रार करत असल्यासारखं वाटतंय.


हे चित्र नंतर बरंच गाजलं. ह्या चित्रात साधेपणा होता. चित्रातल्या पात्रांमध्ये खरेपणा होता. हे चित्र जसं समीक्षकांच्या पसंतीस उतरलं तसंच ते सामान्य लोकांनाही आवडलं. प्रदर्शनात हे चित्र पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. विश्वविख्यात चित्रकार वॅन गॉग ह्या काळात लंडनमध्ये होता. त्यानं या चित्राची एक प्रत विकत घेतली आणि भावाला लिहिलेल्या पत्रात चित्राचं बरंच कौतुक केलं.

हे चित्र सध्या लंडनमधल्या एका महाविद्यालयाच्या संग्रहालयात आहे. हे चित्र मोठ्या आकाराचं (२४० सेमी X १४० सेमी) आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :


🍁Image Credit:
🌹 Luke Fildes [Public domain]

Friday, December 6, 2019

दारा शिकोहच्या लग्नातली मिरवणूक


मुशाफिरी कलाविश्वातली

दारा शिकोहच्या लग्नातली मिरवणूक

मुघल घराण्यांपैकी शांत, कलाप्रेमी आणि विद्वान असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे दारा शुकोह. मुघल सम्राट शाह जहानचा दारा शिकोह हा सर्वात मोठा मुलगा होता. त्याला तत्वज्ञानाची आवड होती. त्याचं एक महत्वाचं योगदान म्हणजे त्यानं उपनिषदांचं पर्शियन भाषेत करवून घेतलेलं भाषांतर. खरंतर शाह जहानला वाटायचं की आपल्यानंतर दारा शिकोह यानंच गादीवर यावं. शाह जहानच्या थोरल्या मुलीलाही असंच वाटायचं. पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं.

दारा शुकोह याचं लग्न नात्यातलीच मुघल राजकन्या नादिरा बानू हिच्याशी झालं. दारा शिकोहचं आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. इतर मुघल सम्राटांप्रमाणं त्यानं अनेक लग्ने केली नाहीत. आपल्या पत्नीशी तो अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिला. कलेवर प्रचंड प्रेम असल्यानं त्यानं लग्नानंतर आपल्या पत्नीला सुंदर चित्रांचा एक संग्रह भेट म्हणून दिला होता. मुघल शैलीमधल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कलापूर्ण अशा  चित्रांमुळं हा संग्रह आजही प्रसिद्ध आहे.

दारा शिकोहचं लग्न त्याची आई मुमताज महल हिनं १७३१ मध्ये नादिरा बानू हिच्याशी ठरवलं होतं. पण नंतर हे लग्न होण्याआधीचा मुमताजचा मृत्यू झाला. शाहजहानचं आपली पत्नी मुमताज हिच्यावर प्रचंड प्रेम होतं. असं म्हणतात की तिच्या मृत्यूनंतर तो इतका दुःखाच्या खाईत गेला की एका वर्षात त्याचे सारे केस पांढरे झाले, पाठीला बाक आला आणि चेहरा जर्जर झाला. अशा परिस्थितीत शाहजहानची थोरली मुलगी (म्हणजे दारा शिकोहची बहीण) जहानारा बेगम हिनं शाहजहानला धीर देण्याचा, त्याला दुःखातून बाहेर आणण्याचा बराच प्रयत्न केला. कुटूंबातलं वातावरण आनंदी करण्यासाठी तिनं दार शिकोहचं लग्न प्रचंड थाटामाटात करायचं ठरवलं.

दारा शिकोहचं लग्न मुघल घराण्यातल्या लग्नांपैकी एक प्रचंड खर्च करून केलेलं लग्न मानलं जातं. दारा शिकोहच्या बहिणीनं या लग्नात (आजच्या काळातल्या हिशोबानं) तब्बल चोवीस कोटी रूपये खर्च केले !! राजघराण्यांमधल्या वेगवेगळ्या लोकांना, सरदार मंडळींना मौल्यवान भेटी देण्यासाठी तिनं यातले बरेचसे पैसे खर्च केले होते. वधूकडच्या (नादिरा बानू) मंडळींनी वेगवेगळ्या भेटींच्या स्वरूपात (आजच्या काळातल्या हिशेबाप्रमाणं) तब्बल बारा कोटी रुपये खर्च केले. 


दारा शिकोहचं लग्न, त्याची थाटामाटातली मिरवणूक या विषयांवर मुघल काळातल्या चित्रकारांनी बरीच चित्रं काढली. सोबत दिलेलं चित्र हे याच विषयावरचं एक सुप्रसिद्ध असणारं चित्र. यात दारा शिकोहची मोठ्या थाटामाटात आलेली मिरवणूक दाखवण्यात आलेली आहे. 

दारा शिकोह आणि वरपक्षाची मंडळी आल्यानंतर वधूपक्षाची मंडळी त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. वारपक्षाची बहुतेक सारी मंडळी घोड्यांवरून येताना दिसतीये. मिरवणुकीत सर्वात पुढं, चित्राच्या मध्यभागी तपकिरी रंगाच्या घोड्यावर दारा शिकोह दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर मोत्यांचा सहेरा दिसतो. त्यानं भरजरी, चमकदार कुडता परिधान केलाय आणि गळ्यात मोत्यांची माळही घातलेली आहे. मागं सम्राट शाहजहान दिसतोय. शाहजहानच्या डोक्यामागं तो सम्राट आहे हे दाखवण्यासाठी एक प्रकारचं तेजोवलय दाखवलंय. डोळे दिपवून टाकणारी आतषबाजी पार्श्वभूमीला दाखवण्यात आली आहे. मुघल विवाहसोहळ्यातलं हे एक वैशिष्ट्य असायचं. चित्रात डावीकडं वरच्या बाजूला वरपक्षाच्या स्त्रिया हत्तीवरून येताना दिसत आहेत. हत्तीवर बसून नगारे वाजवणारे लोकही बाजूलाच दिसतात. उजव्या बाजूला वधूपक्षाचे लोक संगीताच्या साथीनं वरपक्षाचं स्वागत करत आहेत. रात्रीची वेळ असल्यानं प्रकाशासाठीही बऱ्याच लोकांनी मेणबत्या घेतल्या आहेत. उजव्या बाजूला खाली  एक मुलगा संगीतावर नाच करताना दिसतोय. मुघल चित्रकारांना चित्रात खूप सारी माणसे दाखवायला आवडायची. या चित्रातही आपल्याला बरेच लोक दिसतात. दोन्ही पक्षांच्या लोकांनी दागदागिने वापरलेले दिसतात.

दारा शिकोहच्या लग्नातला थाटमाट चित्रकारानं प्रभावीरित्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चित्रात उठावदार रंगांचा वापर करण्यात आलेला आहे. यात सोनेरी रंग बऱ्याच प्रमाणात वापरण्यात आलाय. हे चित्र मुघल शैलीचा वापर करून काढण्यात आलंय. सध्या हे चित्र दिल्लीमधल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात आहे. हे चित्र ३८० सेमी X ५८५.८ सेमी इतक्या आकाराचं आहे. चित्राचा काळ १७४० ते १७५० या दरम्यानचा आहे. ह्या चित्राच्या चित्रकाराचं नाव आहे हाजी मटनी.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

Image Credit:
National Museum [Public domain]