Saturday, March 23, 2019

गांधार कला - १


मुशाफिरी कलाविश्वातली

गांधार कला - १

भारतातल्या कलेच्या इतिहासातल्या अतिशय प्राचीन शैलींपैकी एक म्हणजे 'गांधार शैली.' गांधार शैली खऱ्या अर्थानं भरभराटीस आली ती इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स. पाचव्या शतकापर्यंत.
या शैलीची खासियत म्हणजे यात झालेला भारतीय कलेचा आणि ग्रीक कलेचा मिलाफ. ग्रीक शैलीमध्ये बनवल्या गेलेल्या शिल्पाचे विषय पूर्णतः भारतीय (बौद्धधर्मीय) असल्याचे यात आपल्याला आढळून येतात. भगवान बुद्धांची पहिली प्रतिमा बनवली गेली ती या गांधार कलेमध्येच !! पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कलांचा संगम असणारी अशी ही शैली विकसित होण्यामागच्या कारणांचा उलगडा आपल्याला गांधार प्रदेशाच्या इतिहासात (आणि भूगोलातसुद्धा) होतो. गांधार कला आणि गांधार शैलीतल्या कलाकृती जवळून पाहण्यापूर्वी आपण थोडासा गांधार प्रदेशाचा इतिहास पाहूया.

'गांधार' म्हणजे आजचं अफगाणिस्तानमधलं 'कंदाहार' असं मानलं जातं. गांधारचा उल्लेख आपल्याला थेट ऋग्वेदात मिळतो. गांधारमध्ये राहणाऱ्या लोकांचा 'गंधारी' असा उल्लेख ऋग्वेदात दिसतो. म्हणजे ‘गांधार’ प्रदेश ऋग्वेदासारखाच अतिप्राचीन आहे. ऋग्वेदाप्रमाणंच अथर्ववेद, पुराणं वगैरे ग्रंथांतही गांधारचा उल्लेख आहे. हे लोक सुवासी वनस्पती आणि मसाले यांचा व्यापार करायचे आणि सुवासिक वनस्पती स्वत:च्या अंगाला चोळायचे. म्हणूनच या लोकांचं नाव 'गंधारी' असं पडलं असं समजलं जातं !! 'गांधार'चा उल्लेख रामायण आणि महाभारतातही येतो. गांधारमधलं 'तक्षशिला' हे शहर भरतानं वसवल्याचा उल्लेख रामायणात येतो तर महाभारतातले गांधारचे शकुनी आणि गांधारी आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहेत.

सोबत दिलेला इ.स.पू.सहाव्या शतकातला भारताचा नकाशा पहा. यातल्या सीमारेषा अर्थातच धूसर आहेत. आजच्या पाकिस्तानचा उत्तर-वायव्य भाग आणि अफगाणिस्तानचा पूर्व भाग मिळून हा 'गांधार' बनलेला यात दिसतो. 'तक्षशिला'आणि 'पुष्कलावती' ही शहरं या गांधारमध्ये आपल्याला दिसतात. या काळात भारतामध्ये १६ महाजनपदं होती. महाजनपद म्हणजे त्या काळच्या एखाद्या स्वतंत्र राज्यासारखं मानता येईल. या महाजनपदांपैकी भारतातलं सर्वात जास्त पश्चिमेला असणारं महाजनपद म्हणजे गांधार. या गांधारमधली महत्त्वाची तीन शहरं म्हणजे 'तक्षशिला, पुष्कलावती आणि पुरुषपूर (आजच्या काळातलं पाकिस्तानमधलं पेशावर). 'स्वात' आणि 'काबूल'या दोन मोठ्या नद्यांचा जिथं संगम होतो तिथं 'पुष्कलावती' हे शहर वसलं होतं. खरं तर अजूनही इथं ज्या ठिकाणी नद्यांचा संगम होतो तो भाग 'प्रांग' या नावानं ओळखला जातो आणि प्रांग हा शब्द संस्कृत प्रयाग (दोन नद्यांचा संगम होणारं पवित्र स्थान) या शब्दापासून आला असावा. स्थानिक लोक अजूनही या ठिकाणाला पवित्र ठिकाण मानतात.


Image credit:
Avantiputra7 [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Mahajanapadas_(c._500_BCE).png

इ.स.पू. सहाव्या शतकात या  'पुक्कूसती' नावाचा राजा राज्य करायचा. मगधमधल्या 'बिंबिसार' राजाचा हा समकालीन होता. ह्या शतकाच्या उत्तरार्धात गांधार देश इराणी (पर्शियन) साम्राज्यात सामील झालेला दिसतो. या काळात गांधार सागवानच्या वृक्षांसाठीही प्रसिद्ध असावं असं दिसतं. इराणचा सम्राट 'दरायस'(Darius) याचा राजवाडा बांधण्यासाठी गांधारमधून सागवान वृक्ष आणल्याचा उल्लेख आढळतो.

इ .स. पू चौथ्या शतकात सिकंदरानं गांधारवर आक्रमण केलं. या काळात गांधारच्या पूर्व भागावर 'अंभी' राजाचं राज्य होतं तर पश्चिम भागावर 'अस्तकराजा' राज्य करत होता. हे ग्रीक लोक खूप मोठ्या प्रमाणावर इथं वास्तव्य करून राहिले नाहीत पण भविष्यातल्या गांधार कलेच्या शैलीची मूळं आपल्याला इथंच सापडतात.

सिकंदर निघून गेल्यावर काही वर्षांतच हा प्रदेश चंद्रगुप्त मौर्यानं जिंकला. मौर्यांचं या प्रदेशावरचं राज्य सम्राट अशोकाच्या काळातही चालूच राहिलं. या काळात 'तक्षशिला' ही गांधारची राजधानी होती असं बौद्ध जातककथांवरून आणि त्या वेळच्या ग्रीक लिखाणावरून दिसतं. कित्येक शतकं कला आणि विज्ञान यांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असणारं ऐतिहासिक विद्यापीठ इथं होतं.

इ. स. पूर्वीची २ शतके गांधारवर पुन्हा ग्रीक लोकांची सत्ता होती.डिमीट्रीयस नावाच्या राजापासून ही सुरुवात होते. ह्या काळाला यवन युग (hellinistic era) म्हणता येईल. हा डिमीट्रीयस आपल्याकडं धर्ममित या नावानं ओळखला जातो. या काळातला सर्वात महत्वाचा राजा म्हणजे मिनँडर (आपल्याकडं हा मिलिंद म्हणून ओळखला जातो.) ह्यानं बौद्ध धर्म स्वीकारला असं मानलं जातं. ज्ञात असणारी बुद्धांची पहिली प्रतिमा या मिलिंदच्याच काळात बनवली गेली असं मानलं जातं. या राज्यातच गांधार कला बहरायला सुरुवात झाली.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी


संदर्भ:

🍀 History and culture of ancient Gandhara and western Himalayas – B K Kaul deambi (Ajantha publishing house 1985)

🍀 Gandhara sculptures from Pakistan museums – Benjamin Rowland

🍀 Hellenism in Ancient India – Gauranga Nath Banerjee (BUTTERWORTH & Co. (INDIA), LTD 1920)


Sunday, March 17, 2019

ऍनिमेशन - शंभर वर्षांपूर्वीचं

कुतूहल कलाविश्वातलं

ऍनिमेशन - शंभर वर्षांपूर्वीचं

टी व्ही वरच्या कार्टून चॅनेल्समुळं आता द्विमितीय ऍनिमेशन हा प्रकार नित्याचाच झालाय. आजच्या युगात संगणकाच्या मदतीनं हे ऍनिमेशन अगदी सहजासहजी करता येतं. पण जवळपास शंभर वर्षांपूर्वीही असंच ऍनिमेशन असणारे चित्रपट यायचे. संगणकाचा जन्म व्हायलाच अजून बराच अवकाश होता. कसं व्हायचं या काळात ऍनिमेशन?


चित्रातल्या वस्तूंची स्थानं बदलत जाणारी चित्रं एकामागोमाग एक दाखवून आपल्याला हालचालीचा आभास करता येतो. पण ही चित्रं एका सेकंदाला १०-१२ पेक्षा जास्त दाखवायला हवीत. एखादी वस्तू 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी जाताना दाखवण्यासाठी आपण १२ चित्रं काढलीत आणि पहिल्या चित्रात वस्तू अ या ठिकाणी दाखवून प्रत्येक चित्रात ही वस्तू थोडीशी पुढं सरकवत बाराव्या चित्रात ब या ठिकाणापर्यंत नेली व ही १२ चित्रं जर आपण एकाच सेकंदात दाखवलीत तर आपल्याला ती वस्तू 'अ' या ठिकाणाहून 'ब' पर्यंत जात असतानाच्या हालचालीचा भास होतो. हेच ऍनिमेशनचं मूळ तत्त्व आहे आणि शंभर वर्षांपूर्वीच्या चित्रपटातही ऍनिमेशन दाखवताना नेमकं हेच तत्त्व वापरलं जायचं.

प्रत्येक सेकंदासाठी १२ कॅनव्हास घेऊन पूर्ण चित्रं काढायची झाली तर चित्रपट बनवणं हे प्रचंड कष्टाचं काम होणार होतं. ऍनिमेशन करणारी मंडळी त्याऐवजी एक शक्कल लढवत. एकदा चित्रपटाचा, त्यातल्या चित्रांचा वेळेसहित  आराखडा ठरला की चित्रपटातली महत्त्वाची चित्रं (key scenes) काढली जायची.

आता हे लोक प्रत्येक सीनमधले स्तर (layers) ठरवायचे. उदा. एखाद्या सीनमध्ये पार्श्वभूमीला जंगल  असून पुढच्या बाजूला काही बसलेले पण फारशी हालचाल न करणारे प्राणी आणि सर्वात पुढं खूप हालचाल करणारे प्राणी असायचे. अशा वेळी प्रत्येक चित्रामध्ये तीच पार्श्वभूमी पुन्हा पुन्हा काढणं म्हणजे फुकटचं काम वाढवण्याचा प्रकार होता. ही मंडळी चित्रं काढण्यासाठी पारदर्शक प्लॅस्टिकच्या शीट्स वापरायची. पारदर्शक शीट्स वापरण्याचं कारण म्हणजे चित्रं काढलेल्या शीट्स एकामागोमाग ठेवल्या तर ते एकच चित्र दिसायचं. पार्श्वभूमीचं चित्र तेच ठेवून समोरच्या बाजूची चित्रं बदलणं मग शक्य व्हायचं. गम्मत म्हणजे हे लोक चित्रपटातल्या एक एक सेकंदाचं प्लॅनिंग करायचे आणि प्रत्येक सेकंदात किती पारदर्शक शीट वापरायच्या, कुठल्या शीटमध्ये काय चित्र ठेवायचं याचे सारे तपशील असायचे. अशा प्रकारामुळं पार्श्वभूमीचं चित्रं एकदाच काढलं की ते बराच वेळ चित्रपटात वापरलं जायचं.


या प्लास्टिकच्या शीट्सना 'सेल' असं म्हणायचे. त्यामुळं ऍनिमेशनच्या या पारंपारिक पद्धतीला सेल ऍनिमेशन असंही म्हटलं जातं.

एकदा ही सारी चित्रं प्लॅनप्रमाणं काढून झाली की एकमेकांवर ठेवून प्लॅनप्रमाणं त्यांचे फोटो घेतले जायचे. चित्रपटातल्या पात्रांचे संवाद आणि त्यांच्या ओठांच्या हालचाली यामध्ये ताळमेळ असणंही गरजेचं होतं. हे सगळं काम एक प्रकारे द्रविडी प्राणायाम होतं. पण खूप साऱ्या कलाकारांच्या मदतीनं ऍनिमेशनचे चित्रपट बनायचे आणि ते चालायचेसुद्धा !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
https://conceptartempire.com/cel-animation/

https://www.futurelearn.com/courses/explore-animation/0/steps/12225

https://en.wikipedia.org/wiki/Traditional_animation

Monday, March 11, 2019

हवेच्या पंपातल्या पक्ष्यावरचा प्रयोग

ओळख कलाकृतींची

हवेच्या पंपातल्या पक्ष्यावरचा प्रयोग


अठराव्या शतकाचं एक वैशिष्ट्य होतं. या काळात युरोपमध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात माणसाच्या बुध्दिमत्तेनं उत्तुंग झेप घेतली होती. हा काळ 'age of reason, age of enlightenment' अशा नावानंही ओळखला जातो. ह्या काळात विज्ञानाला जवळपास देवच मानण्यात यायचं.

या काळात विज्ञान इतिहास घडवत होतं. ह्या काळातला एक नाट्यमय प्रसंग इंग्रज चित्रकार राईट यानं आपल्या एका चित्रात दाखवलाय. 'राईट' हा अठराव्या शतकातला एक गाजलेला इंग्रज चित्रकार. या चित्राबरोबर त्यानं चित्रांचा एक वेगळाच प्रकार सुरू केला. हा प्रकार म्हणजे genre painting (दैनंदिन जीवनातल्या प्रसंगांचं चित्रण), portrait painting (व्यक्तिचित्रं) आणि history painting (ऐतिहासिक दृश्यांचं चित्रण) यांचं एक मिश्रण होतं.

या चित्रात त्यानं एक शास्त्रीय प्रयोग चालू असल्याचं दाखवलंय. हा प्रयोग एका घरामध्ये चालू आहे. आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या व्यक्तीचं हे घर दिसतं. चित्राच्या मध्यभागी आपल्याकडे पाहणारा लाल कपड्यांमधला माणूस हा प्रयोग करतोय. एक काचेच्या हंडीमधली हवा काढून तो तिथं निर्वात पोकळी तयार करतोय. ही पोकळी करण्यासाठी तो हवेच्या पंपचा वापर करतोय. या काचेच्या हंडीमधल्या पोकळीत एक पक्षी आहे. तो पक्षी जवळपास मरणाच्या दारात आहे. या पक्ष्याचा जीवन/मृत्यू प्रयोग करणाऱ्याच्या हातात आहे.



या चित्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या चेहऱ्यांवर दाखवलेले गेलेले उत्कृष्ट हावभाव! पक्ष्याचे हाल बघून उजवीकडच्या मुलीला दुःख अनावर झालंय. तिचे वडील तिला जीवनाच्या कठोरतेची जाणीव करून देत तिला समजावत आहेत. प्रयोग करणारा माणूस निश्चयी दिसतो, पक्ष्याच्या मृत्यूनं त्याला काही फरक पडत नाही. त्याला प्रयोगातून निष्कर्ष काढायचा आहे. भावनांपेक्षा तर्क या ठिकाणी त्याला महत्वाचा आहे. डावीकडं एक प्रेमी युगुल आहे, ते एकमेकांच्या सहवासात मग्न दिसतात. त्यांना ना प्रयोगाशी काही देणंघेणं आहे, ना पक्ष्याच्या मृत्यूशी. हा प्रसंग पाहून अंतर्मुख झालेला एक व्यक्तीही आपल्याला या चित्रात उजवीकडं दिसतेय आणि प्रयोगानं उत्कंठा वाढलेला एक युवकही आपल्याला चित्रात डावीकडं दिसतोय.

चित्रकारानं मेणबत्तीच्या प्रकाशाचा वापर करत ह्या प्रसंगाताली नाट्यमयता वाढवली आहे. दिवसाच्या उजेडात इतकी नाट्यमयता कदाचित येऊ शकली नसती.

विज्ञानाच्या इतिहासातला एक नाट्यमय प्रसंग दाखवणारं हे चित्र चित्रकलेच्या इतिहासातही अजरामर ठरलं !

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ: 

https://www.independent.co.uk/arts-entertainment/art/great-works/great-works-an-experiment-on-a-bird-in-the-air-pump-1768-183-x-244-cm-joseph-wright-of-derby-2369978.html

➤ https://www.nationalgallery.org.uk/paintings/joseph-wright-of-derby-an-experiment-on-a-bird-in-the-air-pump

Saturday, March 9, 2019

महाकपि जातककथा

कुतूहल कलाविश्वातलं

महाकपि जातककथा


कोरीव कामांमधून दाखवलेल्या जातककथा हा बौद्ध कलेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. जातककथा म्हणजे गौतम बुध्दांच्या पूर्वजन्मीच्या कथा. या कथांमध्ये बुद्ध एखाद्या व्यक्ती किंवा प्राणी यांच्या रूपात येतात. कथेत अर्थातच इतरही पात्रं असतात. बुध्दांच्या पूर्वजन्मीच्या पात्रामध्ये काहीतरी खास सद्गुण असतात. या कथांमध्ये काही घटनांमुळं काहीतरी समस्या येते. कथेतील पात्रं अडचणीत येतात. मग बुध्दांच्या कथेतील चांगल्या कृतीनं या समस्या दूर होतात. कथेचा शेवट गोड होतो. एकूणच बौद्ध कलेमध्ये जातककथांचं स्थान खूपच महत्त्वाचं आहे.

मध्यप्रदेशमधल्या 'सतना' जिल्ह्यामध्ये एक गाव आहे भरहूत. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं प्राचीन बौध्दकलेचे अवशेष मिळालेले आहेत.  हे अवशेष २००० वर्षांहूनही जास्त जुने आहेत. ह्या अवशेषांमध्ये प्रामुख्यानं शिल्पांचा समावेश होतो. ह्यातली बहुतेक सारी शिल्पं आता कोलकातामधल्या पुराणवस्तुसंग्रहालयात आहेत. यातलं एक कोरीव काम म्हणजे  'महाकपि जातककथा'.

या कथेमध्ये 'बुद्ध' पूर्वजन्मी वानरजातीचे राजा असतात. जवळपास ८०,००० वानरांचं त्यांचं राज्य असतं. ही सारी वानरं गंगेच्या बाजूलाच कुठंतरी राहत असतात.

एके दिवशी ही वानरं एका आंब्याच्या वृक्षावर आंबे तोडून खात असतात. इतक्यात तिथं काशीचा राजा ब्रह्मदत्त' येतो. त्यालाही त्या वृक्षाचे आंबे हवे असतात. राजाचे सैनिक वृक्षाभोवती गोळा होतात. त्यांना वानरांना मारायचं असतं. पण, वानरांचा राजा म्हणजेच पूर्वजन्मीचे बुध्द दोन वृक्षांमध्ये लोंबकळत राहत इतर वानरांना आपल्या पाठीवरून जाऊन सुटका करून घेता यावी यासाठी स्वतःच्या पाठीचा पूल तयार करतात. त्यांच्या पाठीवरून सारी वानरे जाऊन स्वतःची सुटका करून घेतात. यामध्ये बुध्दांचा मत्सर करणारा दुष्ट भाऊ देवदत्तही वानरजन्मामध्ये असतो. तो वानरांच्या राजाच्या पाठीवर इजा करण्याच्या उद्देशाने मुद्दामच उडी मारतो. यामुळं वानरांच्या राजाच्या हृदयाला इजाही होते.

वानराच्या राजाच्या या कृत्यामुळं काशीच्या राजाचे विचार बदलतात. स्वतः वानरांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला पश्चात्ताप होतो. तो वानराच्या राजाची मृत्यू येईपर्यंत काळजी घेतो. मृत्यूनंतर अंत्यविधीही मोठ्या आदरानं राजेशाही पद्धतीत करतो. 


Image credit:
https://commons.m.wikimedia.org/wiki/File%3AMahakapi_Jataka_in_Bharhut.jpgp
G41rn8 [CC BY-SA 4.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]

ही कथा आपल्याला भारहूत इथं सापडलेल्या एका कोरीव कामात पाहायला मिळते. यात आपल्याला पाठीचा पूल केलेला वानरांचा राजा दिसतो. पाठीवरून पलीकडं जाणारी वानरं दिसतात. वृक्षाखाली सैनिक दिसतात. वानरांचा राजा खाली पडल्यानंतर त्याला इजा होऊ नये म्हणून सैनिकांनी चादरही पकडल्याचं दिसतं. मध्ये छोट्याशा भागात नदीच्या पाण्यातले मासे दिसतात. चित्रात खालच्या भागात वानरांचा राजा (बरा झाल्यानंतर) काशीच्या राजाला उपदेश करताना दिसतोय. 

प्राचीन भारतातल्या कलेमध्ये भारहूतमधल्या शिल्पांचं, कोरीव कामांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ: 
   
        
 भारतीय कलेचा इतिहास - प्रा. जयप्रकाश जगताप
 प्राचीन कलाभारती - म श्री माटे.
 https://en.m.wikipedia.org/wiki/Mahakapi_Jataka?wprov=sfla1 

Tuesday, March 5, 2019

सम्राट कनिष्क

ओळख कलाकृतींची 

सम्राट कनिष्क

'कुशाण' घराण्यातला एक महान सम्राट म्हणजे 'सम्राट कनिष्क'. आजच्या काळातलं उझबेकीस्तान, ताजिकीस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीनचा काही भाग आणि भारतातला उत्तर भाग या ठिकाणी त्याचं साम्राज्य पसरलं होतं. आपल्या कारकिर्दीत यानं बौद्धधर्माचा प्रचंड प्रसार केला. हा सम्राट कलेचा आश्रयदाता होता. त्याच्या साम्राज्याची राजधानी पुरुषपूर (आजच्या काळातलं पाकिस्तानातलं पेशावर) हे शहर होतं.

सोबतच्या चित्रात आपल्याला सम्राट कनिष्कचं एक व्यक्तिशिल्प दिसतंय. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात बनलेलं हे शिल्प मिळालं मथुरा इथं! दुर्दैवानं हे शिल्प तुटल्यामुळं त्याचं मस्तक आणि हात आज शिल्पमध्ये नाहीत. पण तरीही आपण खात्रीनं सांगू शकतो की हे शिल्प कनिष्कचंच आहे. याचं कारण म्हणजे यातल्या अंगरख्यावर ब्राह्मी लिपीमध्ये 'महाराजाधिराज कनिष्क' असं लिहिलंय. खरंतर कनिष्क राजाचंच अजून एक असंच शिल्प सापडलंय ज्यामध्ये कनिष्कला दाढी आणि डोक्यावर उंच टोपी आहे.


कनिष्कच्या एका हातात म्यानासहित तलवार आहे तर दुसऱ्या हातात धातूचं जड असणारं एक शस्त्र (इं. Mace) आहे. या शिल्पामध्ये कनिष्कचे पाय एकमेकांपासून दूर अशा काही प्रकारे दाखवले आहेत की जणु काही तो कुठंतरी उंच ठिकाणी उभा राहून आपल्या विस्तीर्ण साम्राज्याकडं पहात असावा. त्याची वस्त्रं (पायघोळ अंगरखा) आणि जाडजूड बूट हे त्याच्या मूळच्या वसतिस्थानाचं (म्हणजे मध्य आशियाचा पूर्व भाग) असावं असं मानण्यात येतं. हे कपडे मध्य आशियातल्या त्या काळच्या भटक्या लोकांच्या कपड्यांशी जास्त मिळतेजुळते आहेत.

नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा कट्टर पुरस्कर्ता बनून बौद्ध धर्माचा प्रचार करणारा हा राजा या शिल्पात मात्र एका योद्ध्याप्रमाणं उभारलेला दिसतो.अशी ठासून उभा राहण्याची पध्दत तो राजपुरूष असल्याचं मनावर बिंबवते.

हे शिल्प तांबड्या वालुकाश्मात (pink sandstone) बनवलं असून त्याची उंची १.७० मीटर आहे. हे शिल्प सध्या मथुरेमधल्या एका प्राचीन वस्तूंच्या संग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
            
भारतीय कलेचा इतिहास - प्रा. जयप्रकाश जगताप
➤ Ancient Arts of Central Asia - Tamara Talbot Rice
➤ प्राचीन कलाभारती - म श्री माटे
➤ हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास - प्रा. राजाराम विनायक ओतूरकर

Monday, March 4, 2019

बाफ़ुऑनचं मंदिर - भाग २ (मंदिराची रचना)

कुतूहल कलाविश्वातलं

बाफ़ुऑनचं मंदिर - भाग २ (मंदिराची रचना)

कंबोडियामधलं शिवाला समर्पित केलेलं हे एक प्राचीन मंदिर !! या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी आपण मागच्या भागात पाहिलं.
हे मंदिर पूर्वी आज जसं दिसतंय त्यापेक्षा बरंच वेगळं दिसायचं. १२९६-१२९७ च्या दरम्यान चीनचा सम्राट तिमूर खान याच्या एका दूतानं ह्या मंदिराला भेट दिली होती. त्यानं लिहिलंय,
"ह्या मंदिरावर कांस्यस्तंभ (bronze tower) असल्यासारखे वाटतात आणि हे एक अद्भुतरम्य दृश्य आहे."

मंदिराच्या शिखरावर त्याकाळी कांस्य आवरण असावे असं दिसते.
कंबोडियामधल्या इतर बऱ्याचशा मंदिरांसारखं हे मंदिर प्रतिकारूपात मेरु पर्वत दाखवतं. (हिंदू कल्पनेप्रमाणं मेरु पर्वत देवांचं वसतिस्थान आह. आणि हा पर्वत विश्वाच्या केंद्रस्थानी आहे.) मंदिर उंच पिरॅमिडसारखं आहे. मंदिराभोवतीची कुंपणं मेरु पर्वताभोवतीच्या पर्वतरांगा दाखवतात तर तलाव सागर दाखवतात. मंदिराची दक्षिण-उत्तर रुंदी १०० मीटर आहे तर लांबी (पूर्व पश्चिम) १२० मीटर आहे. शिखराशिवाय मंदिराची उंची ३४ मीटर आहे  तर शिखरासकट ती ५० मीटर होते.



मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार (गोपुरम्) पूर्वेला आहे. हे प्रवेशद्वार भव्य असून यात खूप साऱ्या हिंदू देवता कोरलेल्या आहेत. या प्रवेशद्वारापासून मंदिराकडे जाणारा वालुकाश्मांचा बनलेला एक परत आहे. हा पथ जमिनीपासून थोड्या उंचीवर आहे. मुख्य प्रवेशद्वार आणि मंदिर यांच्या मध्ये खोलीसारखं एक विश्रांतीस्थान आहे. या ठिकाणी भिंतींवर प्राणी, शिकारी आणि योद्धे कोरलेले आहेत. परत ज्या ठिकाणी संपतो तिथं दक्षिण बाजूला एक तलाव आहे. मंदिराच्या आवारात दोन ग्रंथालयाचे अवशेषही आहेत. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला (म्हणजे पश्चिमेला) दुसरं एक प्रवेशद्वार आहे. बुद्धाची अाडवी असणारी भव्य मूर्ती याच बाजूला आहे.


Image credit:
Leon petrosyan [CC BY-SA 4.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Baphuon2012.jpg

(पंधराव्या शतकात ह्या मंदिराचं  बौद्धधर्मीय मंदिरात रूपांतर करण्यात आलं. बुद्धाची एक भव्य अशी आडवी प्रतिमा करण्यात आली. ही प्रतिमा ८ मीटर उंच तर जवळपास ६० मीटर लांब आहे. ही प्रतिमा बनवण्यासाठीचा 'वालुकाश्म' मंदिराच्या दगडांमधून घेऊनच वापरण्यात आला आहे.)


Image Credit:
Diego Delso [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Baphuon,_Angkor_Thom,_Camboya,_2013-08-16,_DD_28.jpg

या मंदिराच्या भिंतींवर खूप कोरीव काम आहे. यातलं बरंचंसं काम वास्तववादी आहे तर बरंचंसं काल्पनिक आहे. या कोरीव कामात आपल्याला कमळाची फुलं, जंगली प्राणी आणि त्यांचे शिकारी, युद्ध करणारी माणसं पाहायला मिळतात. पुराणकथांमधले प्रसंग, रामायणासारख्या महाकाव्यातले प्रसंगही इथं दिसतात. मंदिराच्या वरच्या भागात (पिरॅमिडच्या वर) ३६ मी X ४२ मी आकाराचा गाभारा आहे. हा जसाच्या तसा आज उपलब्ध नाही. यामध्ये मंदिरातलं सर्वात महत्वाचं असणारं शिवलिंग आहे.


Image credit:
Diego Delso [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Baphuon,_Angkor_Thom,_Camboya,_2013-08-16,_DD_14.jpg

११ व्या शतकाच्या मध्यात राजा 'उदयादित्यवर्मन (दुसरा)' यानं  हे मंदिर बांधलं. साम्राज्याची राजधानी 'अंजीर थोम' इथं त्यानं हे मंदिर बांधलं. राजाचा राजवाडा आणि नंतरच्या काळात बांधलं गेलेलं सुप्रसिद्ध बौध्दधर्मीय 'बेयाॅन मंदिर' यांच्या मधोमध हे मंदिर आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.siemreap.net/visit/angkor/temples/baphuon/
http://www.theangkorguide.com/cgi-bin/MasterFrameReunion.cgi?http%3A//www.theangkorguide.com/text/part-two/angkorthom/baphuon.htm
https://en.wikipedia.org/wiki/Baphuon