Saturday, June 20, 2020

ब्रूटसच्या मुलांचे मृतदेह

मुशाफिरी कलाविश्वातली

ब्रूटसच्या मुलांचे मृतदेह

पू सहाव्या शतकात रोममध्ये राजेशाही होती. या शतकाच्या शेवटच्या काळात टारक्वीन नावाचा राजा राज्य करत होता. हा राजा अतिशय अहंकारी होता. काही लोकांच्या हत्या करून यानं गादी मिळवली होती. याची राजवट अत्यंत जुलमी होती.

या राजाच्या बहिणीचा मुलगा (म्हणजे राजाचा भाचा) ल्युशियस ब्रूटस याला मात्र आपल्या मामाच्या जुलमी राजवटीविषयी मनात प्रचंड राग होता. (खूप वर्षांनी ज्युलिअस सीझरच्या काळात होऊन गेलेला ब्रूटस वेगळा. तो या ल्युशियस ब्रूटसचा वंशज.)

पू ५१० च्या दरम्यान एक घटना घडली. या टारक्वीन राजाच्या मुलानं एक उच्च घराण्यातल्या शीलवान स्त्रीवर बलात्कार केला. या स्त्रीचं नाव होतं लूक्रेशिया. लूक्रेशियानं या घटनेनंतर स्वत:च्या छातीत खंजीर करून आत्महत्या केली. ही अतिशय संतापजनक घटना होती. ब्रूटसनं लूक्रेशियाच्या मृतदेहासमोरच एक शपथ घेतली. या शपथेनुसार रोममधली राजेशाही तो संपवणार होता आणि कायमसाठी प्रजासत्ताक आणणार होता.

या काळात राजा रोमपासून ३५ किमी अंतरावर असणाऱ्या आर्डिया या ठिकाणी होता. त्याच्यासोबत रोमचं सैन्य होतं. ब्रूटस काही सशस्त्र माणसांसहित आर्डियाकडं निघाला. रोममध्ये काय चाललं होतं याची खबर राजाला मिळालीच होती. ब्रूटस येण्यापूर्वीच राजा पळून गेला. सैन्यानं ब्रूटसचं स्वागत केलं.

ब्रूटसनं राजाची सत्ता उलथवून टाकली. त्याला राजेशाहीविषयी इतका तिटकारा होता की त्यानं रोमवर पुन्हा कुठल्याही राजाला राज्य करू देण्याची शपथ रोमवासीयांना घ्यायला सांगितली !! (ब्रूटस आणि कोलेटिनस (लूक्रेशियाचा पती) ह्या दोघांना रोमच्या लोकांनी रोमवर राज्य करण्यासाठी निवडून दिलं होतं.)

यानंतरच्या काळात राजघराण्यातल्या लोकांनी परत सत्तेवर येण्यासाठी कट रचला. दुर्दैवाचा भाग म्हणजे या कटात ब्रूटसच्या बायकोचा भाऊ (म्हणजे त्याचा मेहुणा) आणि त्याची दोन मुलं ही देखील सामील होती. रोम प्रजासत्ताकातल्या राज्यकर्त्यांनी कट रचणाऱ्या लोकांना मृत्युदंड (शिरच्छेद) देण्याचा निर्णय घेतला. मृत्यदंड देताना कठोरता दाखवू शकलेल्या कोलेटीनसला आपलं पद सोडावं लागलं. ब्रूटस मात्र स्वत:च्या मुलांना मृत्युदंड देताना जराही कचरला नाही. यानंतर शिक्षेचा भाग म्हणून कटात सामील असणाऱ्या लोकांना विवस्त्र करून काठीनं फटके देण्यात आले आणि मग मृत्युदंड देण्यात आला. प्रजासत्ताकाचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं कर्तव्य पार पाडताना, स्वत:च्या मुलांना मृत्युदंड देणारा ब्रूटस इतिहासात अमर झाला.


सोबतच्या चित्रात आपल्याला ब्रूटसच्या घरातली स्थिती बघायला मिळत आहे. प्राचीन रोममध्ये प्रचलित असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या खुर्चीवर ब्रूटस बसलेला पाहायला मिळतो. ब्रूटसच्या मुलांच्या मृतदेहांना घरात आणलं गेलं तो प्रसंग या चित्रात दाखवण्यात आलाय. चित्रात डावीकडं ब्रूटस शोकावस्थेत बसलेला दिसतोय. चित्राच्या मध्यभागी मृत पुत्रांची माता दिसतीये. तिच्याजवळ तिच्या दोन मुली आहेत. आपल्या भावांच्या मृत्यूच्या धक्क्यानं यातली थोरली मुलगी बेशुद्ध होताना दिसतीये. उजवीकडं बसलेल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीलाही शोक अनावर झालेला दिसतोय. चित्रात मध्यभागी असणाऱ्या टेबलवर एका बास्केटमध्ये एक धारदार कात्री दिसतीये. ती मृत्युदंडाची (शिरच्छेदाची) आठवण करून देते. आपल्या मुलांच्या मस्तकहीन मृतदेहांकडे ब्रूटस पाहताही नाही आहे

ब्रूटसच्या देहबोलीवरून त्याच्या मनातल्या द्विधा मनस्थितीची कल्पना येते. ब्रूटसच्या मागं एका देवतेचं शिल्प दिसतंय आणि या देवतेच्या खाली रोम असं लिहिलेलं. डावीकडं सरकारी अधिकारी मुलांचे मृतदेह आणताना दिसत आहेत. ब्रूटसच्या पत्नीच्या स्थितीत एक प्रकारची गतिमानता जाणवते. आपली नजर तिच्या हाताच्या दिशेने जाते आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाचा भाग आपल्याला दिसतो.

जॅकस डेव्हिड नावाच्या फ्रेंच चित्रकारानं हे चित्र १७८९ साली काढलं. (डेव्हिड या चित्रावर २ वर्षांहून अधिक काळ काम करत होता.) हा काळ होता फ्रेंच राज्यक्रांतीचा. या काळात राजाची सत्ता उलथावून प्रजासत्ताक आणण्यासाठी क्रांतिकारक लोक प्रयत्न करत होते. त्यामुळं या चित्राला एक प्रकारचं राजकीय, ऐतिहासिक महत्व होतं. डेव्हिडनं फ्रेंच राज्यक्रांतीला मनापासून पाठिंबा दाखवणारी बरीच चित्रं काढलीत.  

हे चित्र ३२३ से मी X ४२२ से मी  आकाराच्या विशाल कॅनव्हासवर काढलं गेलं. हे चित्र सध्या पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध लूर कलासंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ : 
Image Credit
Jacques-Louis David / Public domain

Saturday, June 13, 2020

सीतेचा भूमिप्रवेश


मुशाफिरी कलाविश्वातली

सीतेचा भूमिप्रवेश

रामायणातल्या सीतेच्या जन्माविषयी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कथा वाचायला मिळतात. यातली वाल्मिकींनी रचलेल्या रामायणामध्ये लिहिलेली सीतेच्या जन्माची कथा सर्वात जास्त ग्राह्य मानली जाते. वाल्मिकी रामायणाप्रमाणे सीता विदेह देशात जमिनीची नांगरणी चालू असताना सापडली. खरंतर 'सीता' या शब्दाचा अर्थ होतो नांगरणी चालू असताना जमिनीवर तयार होणारा खोलगट भाग (चर).  यामुळं सीतेची माता ही धरणी असल्याचं मानण्यात येतं. या काळात विदेह देशाचा राजा जनक यानं सीतेचा सांभाळ केला. त्यामुळे सीताजानकी’ या नावानंही ओळखली जाते. तर विदेह देशाची राजकन्या असल्यानं तीवैदेही’ अशा नावानंही ओळखली जाते. मिथिला नगरात राहत असल्यानं तिलामैथिली’ असंही नाव पडलं.

यानंतरचं सीता स्वयंवर, रावणानं केलेलं सीतेचं हरण, राम-रावण युद्ध हे सारं रामायण आपण जाणतोच. कितीही पवित्र असली तरी सीतेला यानंतर रावणाकडून परत येताना अग्निपरीक्षा द्यावी लागली. आणि नंतर अयोध्येतल्या प्रजेच्या  मानसिकतेमुळं रामाला सीतेचा त्याग करावा लागला. गर्भवती असणाऱ्या सीतेनं अरण्यामध्ये जाऊन आश्रमामध्ये लव आणि कुश यांना जन्म दिला. पुढं रामानं केलेल्या अश्वमेध यज्ञाचा घोडा या लव कुश यांनी अडवला. सीतेच्या बाजूनं धर्म असल्यानं या बालकांचा विजय झाला तर अयोध्येच्या सैन्याचा पराभव झाला असं मानण्यात येतं.

आपली सीता पवित्र आहे हे रामाला पूर्वीपासूनच माहीत होतं. सीतेनं आपल्यासोबत राहायला परत यावं असं रामाला वाटत होतं. पण अयोध्येच्या प्रजेच्या मानसिकतेचा विचार करत त्यानं सीतेला पुन्हा एकदा अग्निपरीक्षा द्यायला सांगितलं. यावेळी मात्र सीतेनं अग्निपरीक्षा देण्याऐवजी वेगळा निर्णय घेतला. जर आपण पवित्र आणि शुद्ध असू तर आपण जिथून आलो (म्हणजे धरणी मधून) त्या ठिकाणी परत जाण्याची घोषणा तिनं केली. आणि त्याच क्षणी धरणी मातेनं सीतेला आपल्या पोटात घेतलं.

सीता धरणीच्या पोटात जाताना सारे लोक थक्क झाले. दुखी आणि असहाय राम तिला जाताना पाहून काहीच करू शकला नाही. ज्या अयोध्येच्या जनतेनं सीतेला एके काळी त्यागलेलं होतं त्याच जनतेचा आता सीतेनं त्याग केला.


राजा रवी वर्मा यांनी भारतातल्या पुराणांमधले बरेचशे प्रसंग मोठ्या कल्पकतेनं कॅनव्हासवर आणले. ही चित्रे छापली गेली आणि ती भारतातल्या घराघरांत पोहोचली. आपल्याला सोबत दिसतंय ते सीतेच्या भूमिप्रवेशाचं चित्र राजा रविवर्मा यांनीच काढलंय. चित्रात आपल्याला सीतेला धरणीमातेनं पकडलेलं दिसतंय. सीता जमिनीत जायला सुरुवात झालेली आहे. राम आणि सीता एकमेकांकडं पाहत आहेत. झालेल्या घटनेकडं ऋषी आश्चर्यानं पाहत आहेत. लव कुश शोकाकुल झालेले दिसताहेत तर लक्ष्मण प्रश्नात पडलेला दिसतोय. पार्श्वभूमीला भव्य प्रासाद, भगव्या रंगाचे ध्वज आणि अंधार दिसतोय.

चित्रात दिसणारे दोन ऋषी वसिष्ठ, वाल्मिकी असावेत असं मानलं जातं. जेव्हा राजा सिंहासनावर बसतो तेव्हा धनुष्य किंवा तत्सम शस्त्र बाळगत नाही फक्त खड्ग धारण करतो. ते देखिल आत्म रक्षणासाठी. त्यामुळं रामाजवळ आपल्याला तलवार दिसत आहे. देवी सीत भूमीगत होण्याचा प्रसंग वाल्मिकी रामायणानुसार राजदरबारात घडला आहे. 

रामानं परिधान केलेलं वस्त्र अंगरखा नाही, तर पितांबर व उत्तरीय आहे. तसेच उत्तरिया खाली चिलखत सदृश छातीसाठी संरक्षण आहे. त्याचा रत्नजडित भाग खांद्यावर गोलाकार दिसतो.

राजा रविवर्मा  चित्रामध्ये राम आणि सीता यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त प्रकाश दाखवला आहे. पार्श्वभूमीला असणाऱ्या अंधारामुळं आपलं लक्ष आपोआपच राम आणि सीता यांच्याकडं खेचलं जातं. पार्श्वभूमीला असणारा अंधार आणि राम, सीता यांच्यावर असणारा प्रकाश यामुळं चित्राच्या रचनेत एक प्रकारे समतोल साधला जातो. रामाचा चेहरा चित्राच्या उजवीकडच्या आणि वरच्या भागात आहे तर सीतेचा डावीकडच्या आणि खालच्या भागात आहे. यातही आपल्याला समतोल दिसून येतो. पार्श्वभूमीला असणाऱ्या भव्य प्रसादाच्या उभ्या रेषांमुळे, सोनेरी शिखरांमुळे आणि चित्रातल्या पुढच्या भागातल्या सिंहासन, मुकुट, दागिने यांच्या सोनेरी रंगामुळं आपल्याला अयोध्येच्या ऐश्वर्याची जाणीव होते.

गुजरातमधल्या बडोदा इथल्या महाराज फतेह सिंग कलासंग्रहालयात सध्या हे चित्र आहे. या चित्राची नक्की तारीख आज ज्ञात नाही, पण हे चित्र एकोणिसाव्या शतकात काढलं गेलं असल्याचं मानण्यात येतं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:
Raja Ravi Varma / Public domain

Saturday, June 6, 2020

विजापूरचे आदिलशहा


मुशाफिरी कलाविश्वातली

विजापूरचे आदिलशहा

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली. त्यापूर्वीच्या आठशे वर्षांत इराणवर राज्य करणारे लोक अरब, मंगोलियन किंवा इतर कुणीतरी परकीय होते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इस्माईल (पहिला) यानं एका साम्राज्याची स्थापना करायला सुरुवात केली. इराणच्या इतिहासातली ही एक महत्वाची घटना मानली जाते. पुढं त्याच्या घराण्यानं जवळपास दोनशे वर्षे राज्य केलं. त्याचं साम्राज्य इराणच्या बाहेरही पसरलं होतं. आपल्या कारकिर्दीत त्यानं इस्लाममधल्या शिया पंथाचा पुरस्कार केला.

सोबतच्या चित्रात मध्यभागी सोन्याची किल्ली हातात देणारा व्यक्ती म्हणजे हाच इस्माईल (पहिला). तो ज्या व्यक्तीला किल्ली देतोय ती व्यक्ती म्हणजे युसूफ आदिल शहा. विजापूरच्या आदिल शहांपैकी हा युसूफ आदिल शहा पहिला.

या युसूफच्या पूर्वजांविषयी नक्की माहिती मिळत नाही. पण त्याचा इराणशी संबंध होता असं मानलं जातं. तो बहमनी राज्यात काम करायचा. त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचं शौर्य पाहून बहमनी सुलतान प्रभावी झाला होता. त्यानं या युसुफला विजापूर प्रांताचा एक प्रकारचा प्रशासक बनवलं. बहमनी सत्ता खिळखिळी झाल्यावर युसुफनं स्वत:ला विजापूरचा सुलतान बनवलं. इथून विजापूरच्या आदिलशहा घराण्याला सुरुवात झाली.  त्याच्या राज्यात अधिकृत भाषा फार्सी (म्हणजेच इराणी) होती.  

नंतरच्या काळात आदिलशहाच्या राज्याच्या सीमा बदलत गेल्या. युसूफ आदिल शहाचे वंशज गादीवर येत राहिले. त्यातले बहुतेक सारे लोक सहिष्णू होते. या सर्व घराण्यामध्ये राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो तो इब्राहिम आदिल शहा (दुसरा) याच्या काळात. तो एक उत्कृष्ठ प्रशासक तर होताच पण शिवाय तो एक कवी आणि कलाकारही होता. त्याच्या काळात चित्रकलेची भरभराट झाली. इतर धर्मांविषयी तो खूप सहिष्णू होता. त्यानं 'किताब--नवरस' नावाचं भारतीय सौंदर्यशास्त्रावरचं पुस्तकही लिहिलं होतं. (या पुस्तकाची सुरुवात त्यानं सरस्वती देवीच्या प्रार्थनेनं केली होती.) इब्राहिम आदिल शहा (दुसरा) याच्या कारकीर्दीनंतर आदिलशहा राज्याला उतरती कळा लागली.

एकूणच साऱ्या आदिलशहांच्या काळात कलेची भरभराट झाली. या काळात दूरदूरच्या राज्यांमधून विद्वान मंडळी, कवी, चित्रकार, नर्तक, संगीतकार आणि सुलेखन (calligraphy) करणारे लोक विजापूरला येऊन स्थायिक झाले. त्यामुळं या काळात विजापूर एक प्रकारे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जायचं.

या घराण्यातला शेवटचा बादशहा म्हणजे सिकंदर आदिल शहा. १६७२ मध्ये वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी तो गादीवर आला. १६८५ साली औरंगजेबानं विजापूर ताब्यात घेतलं. प्रचंड मुघल सेनेसमोर सिकंदर काही करू शकला नाही.

सोबतचं चित्र १६८० साली काढलं गेलं. म्हणजे अदिलशहाच्या राज्याचा शेवट होण्यापूर्वी काढलं गेलेलं चित्र. हे चित्र त्याकाळचे चित्रकार कमाल मुहम्मद आणि चांद मुहम्मद यांनी काढलं. या चित्रात युसूफ आदिल शहा पासून ते सिकंदर आदिल शहा पर्यंत घराण्यातले सारे सुलतान दाखवण्यात आलेले आहेत. वर पाहिल्याप्रमाणं युसुफच्या हातात किल्ली देतोय तो इराणचा इस्माईल (पहिला). यातून युसुफची इराणशी आणि शिया पंथाशी असणारी निष्ठा दाखवण्यात आली आहे.  या चित्रात बसलेल्या लोकांपैकी सर्वात उजवीकडं दिसणारा मुलगा म्हणजेच सिकंदर आदिल शहा.  



विजापूरच्या चित्रांमध्ये दिसून येणाऱ्या काही गोष्टी या चित्रातही दिसतात. उदा. चित्रामध्ये गुलाबी रंगाचा वापर भरपूर प्रमाणात दिसतो. चित्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कोनांमधून दिसतात (varying perspective). याशिवाय विजापूरच्या चित्रशैलीत आढळणारी एक प्रकारची कल्पनारम्यता (या जगात सापडणारी गोष्ट दाखवणं. हा परिणाम साधण्यासाठी काहीतरी अतार्किक गोष्टी दाखवल्या जातात) इथंही दिसते. उदा. गालिच्याकडं नेणाऱ्या अधांतरी पायऱ्या पहा. पाठीमागं दाखवण्यात आलेले उंच पर्वत इराणशी संबंध दाखवतात. चित्रातल्या साऱ्या मंडळींची आसनं ज्या गालीचावर आहेत त्यावर सुंदर नक्षीकाम दिसते. प्रत्येकाच्या आसनाला जोडूनच असणारे छत्रही आपल्या चित्रात दिसते. चित्रात दूर मागं पाणी दिसतं. विजापूर राज्य अरबी समुद्रापर्यंत असल्याचं यातून सूचित केलंय. चित्रात दाखवण्यात आलेल्या लोकांजवळ असणाऱ्या कट्यारांची रचनाही त्या त्या लोकांच्या काळानुसार आहे !!

जलरंगात काढल्या गेलेल्या या चित्रात सोन्याचा आणि चांदीचाही वापर केला गेला आहे. विजापूरच्या घराण्यातील साऱ्या सुलतान मंडळींना एकत्रित दाखवणारं हे चित्र सध्या न्यूयॉर्कमधल्या कलासंग्रहालयात आहे.


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :


Image Credit
Metropolitan Museum of Art / Public domain