Monday, June 24, 2019

विख्यात चित्रकार धुरंधर (उत्तरार्ध)

मुशाफिरी कलाविश्वातली 

विख्यात चित्रकार धुरंधर (उत्तरार्ध)


धुरंधर भारतात बऱ्याच ठिकाणी फिरले. हा काळ सर्वसाधारण शंभर वर्षांपूर्वीचा होता. या काळातल्या भारतीय स्त्रियांची स्थानिक परंपरेनुसार पोशाख परिधान केलेली चित्रं त्यांनी काढली. ही सारी चित्रं नंतर प्रकाशितही झाली. समीक्षकांनी आणि रसिक मंडळींनी या चित्रांना दाद दिली. या चित्रात समाजाताल्या सर्व स्तरातल्या स्त्रिया पाहायला मिळतात. यातली काही चित्रं सोबत दिली आहेत. या चित्रांमध्ये त्याकाळच्या सिंध प्रांतातली कोळी समाजातली स्त्री, कच्छ प्रांतातली राजपूत स्त्री, म्हैसूर मधली स्त्री, पठाणी स्त्री, झाडूवाली स्त्री, अहमदाबादमधली पाणी घेऊन जाणारी स्त्री, उत्तर भारतातील मुसलमान स्त्री, बंगाली स्त्री, जैन साध्वी, विणकर स्त्री, गवळी स्त्री, मुंबईमधली कोळी समाजातली स्त्री, भिल्ल मुलगी , मिर्झापूरची नर्तिका, तंजावरची नर्तिका, कर्नाटकातील नायकीण, गुरख्याची पत्नी, काश्मिरी स्त्री, दख्खनमधली विधवा स्त्री, भटक्या समाजातली स्त्री आणि त्या काळातल्या इतर बऱ्याच स्त्रियांचा समावेश होतो.

मेवाडमधली स्त्री


पठाण स्त्री

सिंध प्रांतातली कोळी समाजाची स्त्री

अहमदाबादमधली पाणी घेऊन जाणारी स्त्री


धुरंधरांचं लग्न बापूबाई यांच्याशी झालं होतं. पण लग्नानंतर दीड वर्षातच त्या प्लेगनं वारल्या. यानंतर धुरंधरांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं गंगुबाई. धुरंदराच्या कलेच्या क्षेत्रातल्या कार्याचं बरंचंसं श्रेय या गंगुबाईंना जातं. घर आणि संसार यांच्या जबाबदाऱ्या गंगुबाईंनी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळंच  धुरंधर कलेसाठी व्यवस्थित वेळ देऊ शकले.

धुरंधरांनी आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीचीही बरीचशी चित्रं आणि रेखाटनं केली होती. यातली काही रेखाटनं समोर बसून अगदी कमी वेळेत झटपट केली होती तर काही रेखाटनं फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर केली होती. अर्थात ही रेखाटनं/चित्रं त्यांनी नंतर पूर्ण केली होती. नोकरीचं पर्व संपल्यानंतर निवृत्तीकाळात त्यांनी आपल्या रेखाटनांच्या वहीतून आपल्या पत्नींची चित्रं वेगळी केली. या साऱ्या चित्रांचं त्यांनी उत्कृष्ठ दर्जाचं कव्हर वापरून एक नवीन पुस्तक बनवलं. या पुस्तकाला त्यांनी नाव दिलं - 'कलेमध्ये माझी पत्नी' (My wife in art). स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी या पुस्तकाला अत्यंत हृदयस्पर्शी अशी प्रस्तावना लिहिली. आपल्या पत्नीच्या स्मृतींस त्यांनी हे पुस्तक समर्पित केलं.

नंतरच्या काळात धुरंधरांच्या कन्येनं हे पुस्तक प्रकाशित करण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते काही प्रकाशित होऊ शकलं नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक आज कुठं आहे ते कुणालाच माहीत नाही. आपल्या पत्नीच्या चित्रांचा, रेखाटनांचा एखाद्या चित्रकारानं इतक्या प्रेमानं केलेला कदाचित हा एकमेव अल्बम असावा !!
ब्रिटिश काळात 'राव बहादूर' असा एक किताब मोठ्या कार्यासाठी दिला जायचा. ब्रिटिशांकडून धुरंधरांना 'राव बहादूर' हा किताब मिळाला.

निवृत्तीनंतर धुरंधरांना बराच निवांत वेळ मिळू लागला. या काळात त्यांनी आपल्या आयुष्यातल्या आठवणी लिहिल्या. धुरंधरांचा १८९० पासूनच सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् या महाविद्यालयाशी संबंध आला होता. नंतर ते याच महाविद्यालयात शिकवूही लागले. त्यांचा १९३१ पर्यंत या महाविद्यालयाशी संबंध राहिला. धुरंधरांनी जानेवारी १८९० पासून ते जानेवारी १९३१ पर्यंतच्या काळातल्या विविध आठवणी लिहिल्या. हे सारं लिखाण नंतर 'कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे' या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित झालं. हे पुस्तक आजही बाजारात मिळतं. या पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आणि महाविद्यालयातल्या साऱ्या महत्वाच्या घटना वाचायला मिळतात. कलेच्या विद्यार्थ्याना आणि कलाकारांना उपयोगी असणारं, अशा प्रकारचं हे मराठी भाषेतलं पहिलंच पुस्तक असावं असं मानण्यात येतं. या शिवाय धुरंधरांनी अजून एक महत्वाचं लिखाण केलं. त्यांनी १९३३ च्या दरम्यान 'माझे समकालीन चित्रकार' या शीर्षकाखाली एक लेखमाला लिहिली. या लेखमालेत त्यांनी १५ चित्रकार, त्यांची वैयक्तिक माहिती आणि त्यांच्या कलेची माहिती यांचा समावेश केला. लेखक म्हणूनही त्यांचं कलेच्या क्षेत्रातलं योगदान महत्वाचं मानलं जातं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat.asp
https://www.livemint.com/Leisure/PaYpPqk31KkultIyyaDVGP/MV-Dhurandhar-Servant-of-the-Raj-painter-of-the-soil.html
https://en.wikipedia.org/wiki/M._V._Dhurandhar


Monday, June 17, 2019

विख्यात चित्रकार धुरंधर (पूर्वार्ध)


मुशाफिरी कलाविश्वातली

विख्यात चित्रकार धुरंधर (पूर्वार्ध)

आपली स्केचबुक आपल्या जवळ ठेवायची त्यांना कॉलेजच्या काळापासूनच सवय होती. जे काही समोर दिसेल त्याचं रेखाटन ते या स्केचबुकमध्ये करत असत. ते भारतात बऱ्याच ठिकाणी फिरले आणि ठिकठिकाणांची रेखाटनं त्यांच्या स्केचबुक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक रेखाटनाखाली त्यांनी तारीख आणि स्थानही लिहिलेलं आहे. हा काळ विसाव्या शतकातील सुरुवातीचा असल्यानं आपल्याला या रेखाटनांमध्ये इंग्रजांच्या राज्यातलं भारतातलं सामाजिक जीवन पाहायला मिळतं. मृत्यूसमयी त्यांची जवळपास ८० ते ८५ स्केचबुक्स भरली गेली होती. हा एक मोठा अमूल्य खजिना मानला जातो. यामध्ये ३'' X ६'' अशा छोट्या आकाराच्या स्केचबुकपासून ते १२'' X १५'' अशा मोठ्या आकाराची स्केचबुक्स आहेत. यामधली बरीचशी रेखाटनं फक्त पेन्सिलची असली तरी काही रेखाटनं जलरंगात रंगवली आहेत.

ब्रिटिशांच्या काळातले हे प्रसिद्ध चित्रकार कोल्हापूरचे होते, त्यांचं नाव होतं 'महादेव विश्वनाथ धुरंधर' !

कोल्हापूरच्या राजघराण्याशी निष्ठावंत असणाऱ्या एका प्रतिष्ठित घराण्यात महादेव धुरंधर यांचा जन्म झाला. खरंतर त्यांचा जन्म त्याच्या आजोळात म्हणजे मुंबईमधल्या 'फणसवाडी' इथं झाला. यानंतर ते कोल्हापूरमध्येच वाढले. कोल्हापूरमधल्या राजाराम हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. रेखाटन करण्यात त्यांचं शालेय काळातही प्रभुत्व होतं आणि त्यांना  शालेय जीवनात चित्रकलेतली वेगवेगळी पारितोषिकं मिळाली  होती .

त्याकाळचे कोल्हापूरमधले सुप्रसिद्ध असणारे चित्रकार म्हणजे 'आबालाल रहिमान.' आबालाल रहिमान यांची चित्रं छोट्या महादेवला लहानपणी खूप आवडायची. एक दिवस त्यांच्या भावानं आबालाल रहिमान यांना छोट्या महादेवाला चित्रकलेमध्ये मार्गदर्शन करण्याची विनंती केली. आबालाल रहिमान यांनी महादेवला रेखाटन आणि चित्र रंगवण्यासाठीच्या काही महत्वपूर्ण सूचना केल्या.


राधा आणि कृष्ण यांचं 
धुरंधर यांनी काढलेलं एक चित्र

मॅट्रिकच्या परीक्षेनंतर महादेव धुरंधर यांना चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली. याठिकाणी धुरंधर कलेचा ध्यास घेऊन शिकले. तिथल्या साऱ्या शिक्षकांचा ते आवडता विद्यार्थी बनले. या काळातला सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मधला अभ्यासक्रम लंडनमधल्या रॉयल अकॅडेमी ऑफ आर्टस् या संस्थेच्या तत्त्वांप्रमाणं बनवला होता आणि त्यामध्ये वास्तववादी चित्रकलेला महत्त्व होतं.  चित्रामधली शरीराची प्रमाणबद्धता, बारीकसारीक तपशिलांमधली अचूकता आणि प्रकाशयोजना या गोष्टींचा सखोल अभ्यास या अभ्यासक्रमात होता. वास्तववादी चित्रणावर प्रभुत्व येण्यासाठी या अभ्यासक्रमात रेखाटनं काढण्यावर खूप जास्त भर देण्यात आलेला होता. त्यांना वेगवेगळे विषय असणारी छोट्या छोट्या गोष्टींची कित्येक रेखाटनं करायला लागत असत. रेखाटनांवर एकदा प्रभुत्व आले की मगच तिथं जलचित्रं किंवा तैलचित्रं काढण्याचं शिक्षण दिलं जायचं. इथल्या साऱ्या परीक्षांमध्ये त्यांचा नेहमीच पहिला क्रमांक यायचा !!

विद्यार्थी असतानाच त्यांनी 'महाराष्ट्रीयन स्त्रियांचं स्वयंपाकघरात व्यस्त असतानाचं 'एक रेखाटन काढलं होतं. या रेखाटनाला एका ठिकाणी सर्वोत्कृष्ठ रेखाटनाचं पारितोषिक मिळालं. (सध्या हे रेखाटन औंधच्या कलासंग्रहालयात आहे.) यामुळं धुरंधर यांना प्रेरणा मिळाली. यानंतर धुरंधर यांनी आपली चित्रं 'बॉम्बे आर्ट सोसायटी'च्या प्रदर्शनांमध्ये वरचेवर प्रदर्शित करायला सुरुवात केली.

धुरंधर यांच्या आधी भारतामध्ये चित्रकलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मा यांचा दबदबा होता. राजा रविवर्मा महाभारत/हिंदू पुराणे यामधल्या घटना आपल्या चित्रांमध्ये दाखवण्याबद्दल विख्यात होते. अर्थातच धुरंधर यांच्यावरदेखील राजा रविवर्मा यांचा प्रभाव होता. धुरंधर हे देखील बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनीही हिंदू देवी-देवता यांची चित्रं काढायला सुरुवात केली. इतिहासातल्या घटना दाखवणारी चित्रंही ते काढायचे. पण या शिवाय आजूबाजूच्या समाजात जे काही दिसतंय याचीही ते चित्रं काढायचे. त्यावेळच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग त्यांच्या चित्रांमध्ये दिसून यायचे. वेगवेगळे सण, धार्मिक विधी किंवा विवाहासारखे कार्यक्रम या विषयीची त्यांची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat.asp
https://www.livemint.com/Leisure/PaYpPqk31KkultIyyaDVGP/MV-Dhurandhar-Servant-of-the-Raj-painter-of-the-soil.html
https://en.wikipedia.org/wiki/M._V._Dhurandhar

Monday, June 3, 2019

धुक्याचा इशारा

मुशाफिरी कलाविश्वातली

धुक्याचा इशारा

विन्स्लो होमर हा एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेला एक महान अमेरिकन चित्रकार. याची निसर्गचित्रं तर प्रसिद्ध आहेतच, पण याची अजरामर झालेली चित्रं आहेत ती समुद्राशी संबंधित असणारी चित्रं !! यातल्या बऱ्याचशा चित्रांमध्ये आपल्याला माणसाचं समुद्रातलं जीवन पहायला मिळतं.

विन्स्लोला कलेची आवड लहानपणापासूनच होती. खरंतर ही आवड त्याला आईपासून मिळाली होती. त्याची आई कलाकार होती. ती जलरंगातली चित्रं काढायची. चित्रकलेचं स्वतंत्र असं शिक्षण न घेताच तो 'illustrator' म्हणून कामाला लागला. २० वर्षांच्या illustrator च्या कामात त्यानं वेगवेगळ्या मासिकांसाठी लेखातल्या मजकुराला शोभतील अशी चित्रं त्यानं काढली.

वीस वर्षे व्यावसायिक काम केल्यानंतर होमरनं चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्याचं चित्रकलेतलं शिक्षण सुरू झालं. एकाच वर्षाच्या आत होमर उत्कृष्ठ चित्रं काढू लागला. त्याच्या आईनं पैसे जमवून त्याला युरोपमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न केला. पण याच दरम्यान अमेरिकन नागरी युद्ध सुरु झालं आणि एका मासिकानं त्याला या युद्धात प्रत्यक्षात काय चाललं होतं ते (प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन) चित्रांमध्ये टिपण्याचं काम दिलं. तेंव्हा होमरनं युद्धातली दृश्यं, सैनिकांच्या आयुष्यातली दृश्यं, सैनिकांच्या आयुष्यातले निवांत क्षण, त्यांच्या आयुष्यातले कसोटीचे क्षण आपल्या रेखाटनांमध्ये अचूकरीत्या टिपले. युद्ध संपल्यानंतर त्यानं दैनंदिन जीवनातले प्रसंग दाखवणारी बरीच चित्रं काढलीत. या चित्रांमध्ये सुंदर स्त्रिया, लहान मुलं आणि त्यांच्या आयुष्यातले आनंदी आणि निरागस क्षण दिसायचे.

१८८१/८२ या काळात होमर इंग्लंडमधल्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका छोट्याशा खेडेगावात राहायला गेला. त्याच्या २ वर्षाच्या या वास्तव्यात एक चित्रकार म्हणून त्याचा दृष्टिकोन खूपच प्रगल्भ होणार होता. इथल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातली काटकता त्याला भावली. त्याच्या चित्रांचे विषय आता बदलू लागले. उठावदार रंगांऐवजी तो आता काहीसे मवाळ प्रकारचे रंग वापरू लागला. तो आता मोठ्या आकाराची चित्रं काढू लागला. आशयपूर्ण चित्रं काढण्यावर आता तो भर देऊ लागला. त्याची ह्या काळातली सारी चित्रं फक्त जलरंगातलीच आहेत.

१८८२ च्या शेवटी होमर अमेरिकेत परत आला. त्याची चित्रं पाहून त्याच्या शैलीत झालेला बदल  कलासमीक्षकांच्या पटकन लक्षात आला. बाहुल्यांसारख्या स्त्रियांऐवजी त्याच्या चित्रात आता काटक, न घाबरणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या समर्थ अशा स्त्रिया दिसत होत्या.

१८८३ मध्ये होमर समुद्रकिनाऱ्यालगत राहायला गेला. त्याचं घर समुद्राला अगदी लागूनच होतं. या काळात होमर कोळ्यांसोबत समुद्रातही जायचा. आणि तिथं (जहाजावर) चारकोलचा वापर करून रेखाटनं करायचा. हे सारं करतांना कोळ्यांशी संवाद साधायचा, त्यांचं जीवन जवळून पाहायचा. समुद्राशी संबंधित त्यानं जी अजरामर चित्रं काढलीत ती ह्याच काळात. ह्या चित्रांमधलं एक महत्वाचं चित्र म्हणजे ‘धुक्याचा इशारा’ (The Fog Warning). 

◆◆Image credit
Winslow Homer [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Winslow_Homer_-_The_Fog_Warning_-_Google_Art_Project.jpg

या चित्रात आपल्याला एक कोळी होडीत बसलेला दिसतो. मासे पकडण्यात त्याला यश मिळालंय. पण  त्याचं लक्ष जहाजाकडं आहे. क्षितिजावरून धुकं येताना दिसतंय. एकदा का ह्या धुक्यात कोळी अडकला की दिशा समजणं निव्वळ अशक्य. म्हणून धुकं यायच्या आधी त्याला त्या जहाजापर्यंत पोहोचायचं आहे. समुद्राच्या लाटांमधून वाट काढत जहाजापर्यंत पोहोचणं हे एक कठीण काम आहे आणि इथं तर त्याला धुकं येण्यापूर्वी तिथं पोहोचण्यावाचून गत्यंतर नाही !! हे चित्र एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करतं. चित्रातला कोळी जहाजापर्यंत पोहोचेल की नाही हा चित्र पाहणाऱ्याला प्रश्न पडतो.

काही वेळा आयुष्यात कठीण परीक्षेचे प्रसंग येतात. एखादा मोठा प्रॉब्लेम काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेला दिसतो. या प्रॉब्लेममध्ये अडकलं तर आपण काही करू शकणार नाही ही धोक्याची घंटी आपल्या डोक्यात सतत वाजत असते. अशा वेळी आपल्याला काहीतरी मार्ग शोधायचा असतो. बऱ्याचदा या मार्गानं जाणं म्हणजे कठीण काम असतं, पण आपल्याला दुसरा पर्यायच नसतो. आपण शर्थीचे प्रयत्न करून त्या मार्गानं जायला सुरुवात करतो. आणि मग सुरु होते खरे नाट्य. एका बाजूला काळ पुढे चाललेला असतो आणि दुसऱ्या बाजूला आपण !! अशाच प्रकारचा मानसिक तणाव, एक प्रकारचं नाट्य चित्रकारानं ह्या चित्रात टिपलंय.

अमेरिकेतल्या शाळांमध्ये ह्या चित्राचा समावेश कलेच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो !

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

◆http://www.winslowhomer.org/the-fog-warning.jsp
◆https://www.mfa.org/collections/object/the-fog-warning-31042
◆https://en.wikipedia.org/wiki/The_Fog_Warning