Saturday, July 25, 2020

पुस्तकी कीडा


मुशाफिरी कलाविश्वातली

पुस्तकी कीडा

वाचनाच्या महत्वाबद्दल जितकं लिहावं ते कमीच. वाचन करताना आपण एका वेगळ्याच विश्वात बुडून जातो. आणि या विश्वातून बाहेर येताना आपल्या ज्ञानात भर पडलेली असते. आणि नोकरी, पैसा, आरोग्य यासारख्या गोष्टी आपल्याला सोडून गेल्या तरी आपल्यासोबत कायम राहते ते ज्ञान !!

काही लोकांना वाचनाचं प्रचंड वेड असतं. दिवस रात्र जसा वेळ मिळेल तसं हे लोक अधाशासारखं वाचत असतात. एखाद्या विषयाचं वाचन करताना त्यात खोल बुडायला त्यांना आवडतं. अशा लोकांसाठी 'पुस्तकी कीडा' हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. काही शतकांपूर्वी युरोपमध्ये bookworm (पुस्तकी कीडा) हा शब्द नकारात्मक अर्थानं वापरला जायचा, पण नंतरच्या काळात मात्र या शब्दातली नकारात्मकता निघून गेली.

सोबतच्या चित्राचं नाव आहे 'पुस्तकी कीडा' आणि हे चित्र काढलं गेलं १८५० च्या आसपास. १८४८ हे वर्ष युरोपमध्ये क्रांतीचं वर्ष म्हणून ओळखलं जातं. या वर्षी युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी राजेशाहीचा शेवट झाला होता. त्यामुळं आता युरोपमध्ये नवीन विचारांचं वारं वाहू लागलं होतं. एका बाजूला लोकांचा वाचनावरचा भर वाढत होता तर दुसऱ्या बाजूला वाचनात बुडणाऱ्या विद्वान मंडळींची (आयुष्यातल्या क्षुल्लक गोष्टींकडं दुर्लक्ष केल्यामुळं) 'पुस्तकी कीडा' म्हणत तर उडवली जायची.


चित्रात आपल्याला ग्रंथालयातलं एक दृश्य दिसतं. उतारवयातला एक माणूस उंच शिडीवर चढून हातात एक पुस्तक घेऊन वाचताना दिसतोय. त्याची दृष्टी अधू झाल्याचं दिसतंय. एकुण वेशभुषेवरून (विशेषतः पायातल्या गुढघ्यापर्यंतच्या विशिष्ट कपड्यावरून) हा राजाच्या दरबारामध्ये उच्चपदावर काम करत असावा असं वाटतं. तो पुस्तक डोळ्याजवळ घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी वाचताना तो पूर्णपणे बुडून गेलेला दिसतोय. त्याच्या दुसऱ्या हातात, काखेत आणि पायांमध्येही पुस्तकं दिसतात. खिशातून अव्यवस्थितपणे बाहेर आलेला रुमाल त्याचे क्षुल्लक गोष्टींविषयी नसणारे भान दाखवतो. ग्रंथालयाच्या वरच्या बाजूला काढलेल्या चित्रांमुळं हे ग्रंथालय त्या काळातही खूप जुनं असल्याचं दिसतं. चित्रात डाव्या बाजूला खाली पृथ्वी दिसते. अर्थातच पृथ्वीकडं त्याचं लक्ष नाही. आजूबाजूला जगात काय चाललंय याकडं लक्ष न देता तो जुन्या पुस्तकांच्या दुनियेत रमलाय.

चित्रातल्या माणसावर एक प्रकाशझोत पडलेला दिसतोय. ज्ञानानं माणसाचं उजळून जाणारं व्यक्तिमत्व यातून दर्शवलंय. गंमत म्हणजे हा माणूस जमिनीपासून बराच वर आलाय. अर्थात वाचनाच्या वेडामुळं तो एका वरच्या पातळीवर आलाय. चित्रात जमीन दिसतच नाही. तो जमिनीपासून बराच वर आलाय !!  तो ग्रंथालयातल्या ज्या विभागात उभा आहे तो विभाग आहे "metaphysics". Metaphysics म्हणजे उच्च प्रकारचं तत्वज्ञान. यात गोष्टींचं अस्तित्व, काळ, मन आणि जडद्रव्ये यातला संबंध यासारख्या अमूर्त संकल्पनांचा अभ्यास केला जातो. चित्रातला माणूस या विषयात बुडून गेलाय.

चित्रात मध्यभागी असणाऱ्या या माणसाकडं आपलं लक्ष सहजच वेधलं जातं. त्यात त्याच्यावर पडलेल्या प्रकाशामुळं आणि त्याच्या चारही बाजूला असलेल्या अंधारामुळं एक खास परिणाम साधला गेलाय. चित्रातल्या उभ्या रेषा स्थिरता दर्शवतात. या चित्रात आपल्याला ग्रंथालयाच्या कपाटाच्या उंच आणि उभ्या रेषा हाच परिणाम साधतात.

हे चित्र काढलंय कार्ल स्पिट्झवेग या जर्मन चित्रकारानं. काही फेरफार करून त्यानं हे चित्र एकूण ३ वेळा काढलं. यातलं पहिलं चित्र १८५० तर शेवटचं १८८४ मध्ये काढलं गेलं. शेवटला काढलं गेलेलं चित्र सध्या अमेरिकेमधल्या एक अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे. वर दिल्याप्रमाणं, सोबतचं चित्र १८५० मध्ये काढलं गेलं होतं. ते सध्या जर्मनीमधल्या एका कलासंग्रहालयात आहे. ४९.५ से मी X २६.८ से मी या आकाराचं हे तैलचित्र आहे.

आपल्या विश्वात बुडून गेलेला वाचणारा माणूस यात प्रभावीपणे दाखवला गेल्यामुळं हे चित्र यशस्वी ठरतं. आजही या चित्राच्या प्रती लोक विकत घेताना दिसतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:


Saturday, July 18, 2020

यक्ष आणि शेतकरी


मुशाफिरी कलाविश्वातली

यक्ष आणि शेतकरी

इसापनीतीत एक छान कथा येते - यक्ष आणि माणूस यांची. (खरंतर मूळ कथेत यक्ष या पात्राऐवजी satyr म्हणजे ग्रीक पुराणातील घोड्याचे कान, घोड्यासारखी शेपटी, पाय पण माणसाचे धड असणारा अरण्यातील एक प्रकारचा देव येतो. )

कथेत माणसाची आणि यक्षाची मैत्री होते. ते दोघे अरण्यात तसंच माणसाच्या घरी वरचेवर भेटू लागतात.

एके दिवशी संध्याकाळी माणूस आणि यक्ष अरण्यातून चालत निघालेले असतात. कडाक्याची थंडी पडलेली असते. माणूस चालता चालता आपल्या बोटांवर फुंकर घालत असतो.

यक्षाला प्रश्न पडतो. तो माणसाला विचारतो, " मित्रा, तू हे काय करतो आहेस ?"

माणूस म्हणतो, " मी  माझ्या बोटांना ऊब देण्याचा प्रयत्न करतोय."

नंतर ते दोघे माणसाच्या घरी पोहोचतात. घरी लापशी बनवली जात असते. माणूस आणि यक्ष जेवणासाठी टेबलावर बसतात. समोर वाफाळणारी गरमागरम लापशी येते.

आता तो माणूस लापशी पिण्यापुर्वी लापशीवर पुन्हा फुंकर मारतो. यक्ष गोंधळतो. तो पुन्हा विचारतो, " तू हे काय करत आहेस ?"

माणूस उत्तर देतो, "मी लापशी थंड करण्याचा प्रयत्न करतोय."

हे ऐकून यक्ष तिथून उठतो आणि निघून जातो. तो जाताना म्हणतो, "एकाच प्रकारच्या श्वासातून गरम आणि थंड फुंकर घालणारी व्यक्ती माझा मित्र होऊ शकत नाही !"

(वैज्ञानिक सत्य थोडंसं बाजूला ठेवू.) कथेचं तात्पर्य आहे की एकाच गोष्टीवर वेळ पडेल त्याप्रमाणं दोन्ही बाजूनं बोलणाऱ्या व्यक्तींशी शहाण्या माणसानं दोस्ती करू नये.

काही वेळा या गोष्टीत थोडेफार बदलही दिसतात. गोष्टीतला माणूस प्रवासी किंवा शेतकरी असल्याचे वाचावयास मिळते.  

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात जेकब जॉर्डन नावाचा एक चित्रकार होऊन गेला. त्यानं इसापनीतीतल्या या गोष्टीवर आधारित सात चित्रं काढलीत. गंमत म्हणजे त्यानं साऱ्या चित्रांमध्ये एकच प्रसंग दाखवलाय - तो म्हणजे लापशी फुंकण्याचे कारण समजल्यावर यक्ष उठून जातानाचा प्रसंग. जेकबनं साऱ्या चित्रांमध्ये लापशी पिणारा माणूस शेतकरी दाखवलाय. साऱ्या चित्रांमध्ये त्यानं शेतकऱ्याचं कुटुंबही दाखवलंय. सोबत दिसणारं चित्र हे याच चित्रांपैकी एक.


सोबतच्या चित्रामध्ये शेतकऱ्याच्या घरात आढळणाऱ्या साऱ्या गोष्टी दिसत आहेत. चित्रातला यक्ष अचानक उठून, हात उंचावून काहीतरी सांगत उठताना दिसतोय. चित्रामध्ये कमी जागेमध्ये जास्त पात्रं बसवल्याचं जाणवतं. शेतकऱ्याचं घर असल्यानं बैल, कोंबडी, कुत्रा आणि मांजर हे प्राणीही चित्रात दिसतात. याशिवाय शेतकऱ्याच्या कुटुंबातील विविध वयोगटातील व्यक्तीही दिसतात. चित्रातला शेतकरी चमच्यानं लापशी पीत यक्षाच्या बोलण्याकडं लक्ष देताना दिसतोय. त्याच्या डाव्या हातात लापशीची मोठी वाटी दिसत आहे. त्याच्या मागं एक लहान मुलगा आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध स्त्री दिसते. तिच्या हातात एक लहान मुलगी दिसतीये. वृद्ध स्त्री यक्षाच्या बोलण्याकडं लक्ष देताना दिसत आहे तर चित्रातली लहान मुलं आपल्याच विचारात आहेत. यक्षाच्या मागं एक तरुण स्त्री दिसते. टेबलावर खाण्यासाठी ठेवलेली फळंही दिसतात. भिंतीवर अडकलेलं पितळेचं भांडं कौशल्यपूर्ण पद्धतीनं रंगवण्यात आलंय.

चित्रात प्रकाशयोजनेत एक प्रकारचा समतोल साधलेला दिसतोय. उजवीकडं वर अंधार आहे तर डावीकडंही कडेला अंधार दिसतोय. चित्रात मध्यभागी मात्र टेबलावरचे शुभ्र कापड आणि लहान मुलीचे पांढरे कपडे आणि गोरा चेहरा उठून दिसतो. चेहऱ्यावरच्या हावभावांमुळं, शेतकऱ्याच्या आणि यक्षाच्या दाखवलेल्या देहीबोलीमुळं आणि चित्रात दाखवलेल्या तपशीलांमुळं हे चित्र एकदम जिवंत झालंय.

१६२० च्या दशकात जेकबच्या चित्रांमध्ये काही गोष्टी वारंवार आढळतात - त्या म्हणजे मजबूत बांधा असणारी माणसं (बहुतेक वेळा शेतकरी), एखाद्या कथानकाचं कल्पकतेनं केलेलं सादरीकरण आणि चित्रांमध्ये दिसणारे भरगच्च तपशील. याच गोष्टी आपल्याला सोबतच्या चित्रातही प्रकर्षानं जाणवतात.

हे चित्र जेकब आपल्या सहाय्यक चित्रकारांना आणि शिष्यांना चित्रकला शिकवताना वापरायचा असं मानण्यात येतं, याचं कारण म्हणजे हाच प्रसंग दाखवला गेलेली त्यानं काढलेली सात वेगवेगळी चित्रं. या चित्रांवर त्याचं नाव दिसत नाही.

हे चित्र आकारानं मोठं आहे. (आकार १७४ से. मी. X २०५ से. मी.) हे चित्र सध्या जर्मनीतल्या म्युनिकमधल्या एका कलासंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:
Jacob Jordaens / Public domain

Sunday, July 12, 2020

पिकासोच्या आयुष्यातला निळा कालखंड

मुशाफिरी कलाविश्वातली


पिकासोच्या आयुष्यातला निळा कालखंड

कार्लोस कॅसागेमॅसचा जन्म १८८० मध्ये स्पेनमधली बार्सिलोना इथं एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्याचे वडील विद्वान होते. त्यांचं स्वतःचं मोठं ग्रंथालय होतं. ते सात भाषांमध्ये संवाद साधू शकायचे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती.

कार्लोसची पिकासोशी ओळख झाली ती वयाच्या विसाव्या वर्षी. याकाळात पिकासोचंही वय सर्वसाधारण वीसच्या आसपासच होतं. पिकासोला विश्वविख्यात चित्रकार म्हणून अजून ओळखलं जायला अजून बरीच वर्षे बाकी होती. ओळख झाल्यानंतर लगेचच त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली. दोघांनीही स्पेनमध्ये बराच  प्रवास केला. बार्सिलोनाला परतल्यानंतर त्यांनी चित्रकलेच्या साधनेसाठी एकाच स्टुडिओमध्ये काम केलं. या काळात पिकासोनं आपल्या मित्राची म्हणजे कार्लोसची बरीचशी चित्रं काढलीत. खरंतर कार्लोस एक चित्रकार तर होताच पण तो एक कवीही होता. मात्र त्याला नैराश्यानं (depression) ग्रासून टाकलं होतं. शिवाय त्याला नपुंसकत्वही होते. या काळात पिकासो आणि कार्लोस वेश्यांकडंही जायचे. तिथं गेल्यावर कार्लोस फक्तच आपला मित्र पिकासो येईपर्यंत वाट बघत बसायचा.

फेब्रुवारी १९०० मध्ये पिकासोनं स्वत:च्या चित्रांचं एक प्रदर्शन भरवलं होतं. त्यातल्या एका चित्राची पॅरिसमध्ये ऑक्टोबरमध्ये होणार असणाऱ्या प्रसिद्ध प्रदर्शनासाठी निवड झाली. ऑक्टोबरमध्ये पिकासो पॅरिसला गेला. त्याच्यासोबत त्याचा मित्र कार्लोसही होताच. तिथं त्यांनी एक स्टुडिओही भाड्यानं घेतला. या ठिकाणी जर्मेन, तिची बहीण आणि ऑडेट या तिघी जणी मॉडेल म्हणून यायच्या. यातल्या जर्मेनच्या प्रेमात कार्लोस पटकन पडला. जर्मेनवर खूप प्रेम असलं तरी तो स्वतः नपुंसक असल्यानं त्यांच्यात नातं प्रस्थापित होणां शक्य नव्हतं. यामुळं कार्लोस अजूनच नैराश्यात गेला. कार्लोस आत्महत्येची भाषा बोलू लागला. पिकासोनं त्याला स्पेनला परत जायचं सुचवलं.

दोघंही पॅरिसहून स्पेनला परत आले. पण कार्लोसच्या डोक्यातून जर्मेन जात नव्हती. तो तिला दररोज एकापेक्षा जास्त पत्रं लिहायचा.

पिकासो आपल्या गावी असताना कार्लोस एक दिवस अचानक बार्सिलोनाहून पॅरिसला गेला. त्याला जर्मेनला भेटायचं होतं. पॅरिसला गेल्यावर त्यानं जर्मेनला पुन्हा एकदा स्वतःसोबत राहण्यासाठी विचारणा केली. तिनं स्पष्टच नकार दिला. मग त्यानं स्पेनला परतण्याचं ठरवलं. पण, पॅरिस सोडण्यापूर्वी त्यानं तिथल्या ओळखीच्या लोकांना एक पार्टी देण्याचा बेत केला. पार्टीत त्यानं जर्मेनला आपल्याशी लग्न करण्याविषयी शेवटची विचारणा केली. तिनं त्याला नकार दिला. यानंतर त्यानं एक पिस्तूल काढली आणि तिच्यावर गोळी झाडली. तिला गोळी लागली नाही पण ती जमिनीवर पडली. यानंतर त्यानं स्वतःवर एक गोळी झाडली. कार्लोस थोड्या वेळानं मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिकासोच्या मनावर अत्यंत खोल परिणाम झाला. २-३ महिन्यांनंतर तो पॅरिसला आला. ज्या स्टुडिओत तो कार्लोससोबत  राहायचा तिथंच तो राहू लागला. जिथं कार्लोसनं आत्महत्या केली त्या ठिकाणाला तो भेट देऊ लागला. हा त्याच्यासाठी अतिशय नैराश्याचा काळ होता. १९०१ ते १९०४ हा काळ पिकासोच्या आयुष्यातला निळा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातली जवळपास त्याची सारी चित्रं निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये दिसतात. पिकासो म्हणतो की कार्लोसच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यानं "निळ्या" चित्रांना सुरुवात केली.

आता पिकासो नैराश्याच्या गर्तेत खोल जाऊ लागला. पूर्वी तो सर्व लोकांमध्ये मिसळायचा. आता तो एकटा एकटा राहू लागला. त्याच्या चित्रांमध्ये आता गरीब लोकांचं जीवन, वेश्यांचं जीवन असे विषय जास्त येऊ लागले. (या काळातल्या पिकासोच्या चित्रांमध्ये अंध लोकही बऱ्यापैकी दिसतात.) लोकांनी त्याच्या चित्रांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. जीवनातल्या वेदना दाखवणारी ही 'निळी' चित्रं विकत घेऊन स्वत:च्या घरात भिंतीवर लावायला कुणीच तयार नव्हतं.

कार्लोसच्या मृत्यूच्या घटनेशिवाय पिकासोच्या मनावर परिणाम करणारी अजून एक घटना होती. ती म्हणजे त्यानं सेंट लॅझर तुरूंगाला दिलेली भेट. हा स्त्रियांचा तुरुंग होता. इथं पिकासोच्या स्त्रियांच्या आयुष्यातल्या वेदना, नैराश्य जवळून पाहायला मिळालं.


या काळात पिकासोनं काढलेलं एक चित्र म्हणजे 'हाताची घडी घातलेली स्त्री'. चित्रातली स्त्री सेंट लॅझर तुरूंगातली स्त्री असावी असं मानण्यात येतं. काहींच्या मते या स्त्रीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. चित्र स्पष्टपणे निळ्या रंगाच्या छटांमध्ये दिसतं. चित्रातली स्त्री नैराश्यात गेलेली दिसते. ती शून्यात पाहताना दिसते. अतिशय साधं दिसणारं हे चित्र मनाला भेदून जातं. चित्रातल्या स्त्रीची आयुष्यातली निराशा आपल्याला जाणवल्यावाचून राहत नाही.

त्या काळात पिकासोची असली चित्रं विकत घ्यायला कुणीच तयार नव्हतं. आज मात्र हे चित्र जगातल्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक म्हणून ओळखलं जातं !! हे चित्र २००० साली साडेपाच कोटी अमेरिकन डॉलर्सना विकलं गेलं !!


 - दुष्यंत पाटील


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
http://www.pablopicasso.net/blue-period/
https://en.wikipedia.org/wiki/Carles_Casagemas
https://www.masterworksfineart.com/artists/pablo-picasso/blue-period
https://www.pablopicasso.org/femme-aux-bras-croises.jsp
http://www.pablopicasso.net/femme-aux-bras-croises/
https://bonjourparis.com/history/picasso-and-the-womens-prison-of-saint-lazare/

Image Credit:
https://en.wikipedia.org/wiki/File:Pablo_Picasso,_1901-02,_Femme_aux_Bras_Crois%C3%A9s,_Woman_with_Folded_Arms_(Madchenbildnis),_oil_on_canvas,_81_%C3%97_58_cm_(32_%C3%97_23_in).jpg

Saturday, July 4, 2020

अकबर, तानसेन आणि स्वामी हरिदास


मुशाफिरी कलाविश्वातली

अकबर, तानसेन आणि स्वामी हरिदास

सम्राट अकबरच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक म्हणजे तानसेन. तानसेन हे भारतीय शास्त्रीय संगीतातलं एक अजरामर नाव. त्याच्याविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की तो मल्हार राग गायला लागला की आकाशात मेघ दाटून यायचे आणि पाऊस पडायला लागायचा ! तो दीपक राग गायला लागला की दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे !!

तानसेन गाताना सारे लोक मंत्रमुग्ध व्हायचे. अकबर तानसेनच्या गायनानं खूपच प्रभावित व्हायचा. एक दिवस अकबरानं तानसेनचं कौतुक करत तानसेनला विचारलं, "तुझे गुरु तुझ्याइतकंच सुंदर गातात का?". तानसेन म्हणाला, "कृपया माझी तुलना माझ्या गुरूंशी करू नका. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. ते गायक नाहीत तर ते स्वतः: संगीत आहेत." तानसेनच्या गुरूंचं नाव 'स्वामी हरिदास' असं होतं. तानसेननं आपल्या गुरुविषयी माहिती दिल्यावर अकबराची उत्सुकता वाढली. अकबरानं स्वामी हरिदासांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण तानसेननं सांगितलं की ते अकबरच्या आदेशावरून दरबारात येण्याची शक्यता शून्य होती. स्वामी हरिदास अरण्यात एका छोट्याशा झोपडीत राहायचे. आणि ते स्वत:ला इच्छा होईल तेंव्हाच गायचे. त्यांना गायनाचा आदेश कुणीच देऊ शकत नव्हतं. अकबर मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. अकबर म्हणाला, "आपण दोघं अरण्यात जाऊ. हवं तर मी वेष बदलून तुझा सेवक बनून तुझ्यासोबत येईन. पण मला त्यांचं संगीत ऐकायचंच आहे."

तानसेन आणि सेवकाच्या वेषातील अकबर अरण्यात निघाले. स्वामी हरिदास जिथं राहायचे तिथं ते पोहोचले. स्वामी हरिदास एका वृक्षाखाली शांत बसले होते. तानसेन आपल्या गुरूसमोर येऊन येऊन बसला. सेवकाच्या वेषातल्या अकबराला त्यानं धीर धरायला आधीच सांगितलं होतं. आधी तो स्वत: गाणार होता. आपल्या गुरूंसमोर त्यानं गायला सुरुवात केली. तानसेननं गाताना जाणूनबुजून एक चूक केली. स्वामी हरिदासांनी त्याला योग्य प्रकारे कसं गायचं ते सांगताना त्याला स्वतगाऊन दाखवलं. मागे उभा असणारा अकबर मंत्रमुग्ध झाला. स्वामी हरिदास यांचं गायन खरंच जादू करणारं होतं. त्यांचं गायन संपल्यावर अकबरला एक प्रकारची समाधी भंग झाल्यासारखं वाटलं.

यानंतर अकबर आणि तानसेन अरण्यातून राजधानीत परत आले. अकबराच्या डोक्यातून स्वामी हरिदासांच्या गायनाचा जादुई अनुभव जातच नव्हता. राहवून एक दिवस त्यानं तानसेनला विचारलं, "तुझे गुरु जो राग गात होते तो राग तुला माहीत आहे का? तो राग तुला गाता येईल का?". तानसेनला तो राग अर्थातच माहीत होता. त्यानं अकबराच्या इच्छेप्रमाणं तो राग गाण्याचं मान्य केलं. त्यानं तो राग अकबराला गाउनही दाखवला, पण अकबराला काही तो जादुई अनुभव आला नाही. अकबर अस्वस्थ झाला. त्यानं तानसेनला विचारलं, "तुझ्या गुरूंच्या गायनात जी जादू आहे ती तुझ्यात नाही. असं का?". तानसेननं उत्तर दिलं, "याचं कारण म्हणजे मी तुमच्यासाठी म्हणजे लोकांच्या सम्राटासाठी गातो. पण ते विश्वाच्या सम्राटासाठी म्हणजे परमेश्वरासाठी गातात." अकबर नि:शब्द झाला.


 भारतीय शास्त्रीय संगीताचं स्वरूप, त्याचा उद्देश समजावून देताना बहुतेक वेळा ही कथा सांगितली जाते. सोबतच्या चित्रात या कथेतला तानसेन आणि सेवकाच्या वेषात असणाऱ्या अकबराच्या स्वामी हरिदासांच्या भेटीचा प्रसंग दाखवलाय. हे चित्र सर्वसाधारण १७५० ते १७६० च्या दरम्यान काढलं गेलंय. चित्रात उजवीकडं स्वामी हरिदास दिसतात. मध्यभागी तानसेन तर डावीकडं सामान्य वेषात असणारा अकबर दिसतो. चित्रात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आणि पार्श्वभूमीला काळं आकाश दिसतं. वृक्षांवर मोर, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि माकडं दिसतात. वृक्षांची पानं बारकाईनं आणि सुंदर प्रकारे दाखवल्याचं जाणवतं.

चित्रकारानं चित्रातल्या तिन्ही व्यक्तींच्या बाजूला त्यांची नावं लिहिली आहेत. अकबर, तानसेन यांचे पांढरे शुभ्र कपडे आणि पार्श्वभूमीला असणारा वृक्षांचा हिरवा तर आकाशाचा काळा रंग यांच्यातल्या विसंगतीनं एक खास परिणाम साधलेला आहे. हिरवीगार वनराई, विविध पक्षी आणि पांढरी शुभ्र फुले यामुळं चित्र पाहताना एक प्रकारच्या शांतीचा अनुभव येतो. अकबर सामान्य वेषात असला तरी तो सम्राट आहे हे दाखवण्यासाठी त्यानं मोठ्या चतुराईनं त्याच्या डोक्यावर चक्रासारखे सूर्यफूल दाखवलं आहे. त्याच्या दोन्ही बाजूला (आणि वर) केळीची झाडं अशी दाखवली आहेत की दरबारातल्या त्याच्या आसनाच्या वर असणाऱ्या छत्राची आठवण व्हावी.

त्या काळच्या चित्रांमध्ये देवनागरीमध्ये चित्रामधील पात्रांची नावं लिहिण्याची पध्दत दिसत नाही. त्यांची नावं चित्रात नंतर टाकलेली दिसतात. 

राजस्थानी शैलीतलं हे चित्र सध्या नवी दिल्लीत असणाऱ्या राष्ट्रीय कलासंग्रहालयात आहे. चित्राचा आकार २५ से. मी. X ३१ से. मी. असा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचं स्वरूप या छोट्याशा चित्रातून खूप परिणामकारकरित्या दाखवल्याचं नक्कीच जाणवतं !!

- दुष्यंत पाटील


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ : 


🌸http://www.nationalmuseumindia.gov.in/prodCollections.asp?pid=21&id=3&lk=dp3#:~:text=As%20the%20tradition%20has%20it,court%20and%20performed%20for%20him
🌸https://southasia.typepad.com/south_asia_daily/2013/05/akbar-tansen-and-swami-haridas.html
🌸https://www.thehindu.com/features/friday-review/music/The-Tansen-legacy/article14958498.ece
🌸https://angel1900.wordpress.com/2013/11/09/akbar-visiting-guru-haridas/

🌻 Image Credit:
🌸https://commons.wikimedia.org/wiki/File:Akbar_and_Tansen_visit_Haridas.jpg
🌸unknown painter in Rajasthani miniature style / Public domain