Tuesday, August 28, 2018

दारिद्र्य आणि संपत्ती यांची टक्कर

ओळख कलाकृतींची

दारिद्र्य आणि संपत्ती यांची टक्कर

विख्यात लेखक चार्ल्स डिकन्स याची 'ब्लीक हाऊस' नावाची कादंबरी १८५२-५३ मध्ये एका लेखमालिकेतून प्रकाशित झाली. त्यावेळच्या कायदाव्यवस्थेवर भाष्य करणारे हे उपहासात्मक लिखाण (satire) होते. ही कादंबरी चांगलीच गाजली. या कादंबरीत एक पात्र होतं - 'जो' नावाचं. कथानकात हा 'जो' गरीब असणारा एक लहान मुलगा होता. पोटापाण्यासाठी रस्त्यावर सफाई करुन तो लोकांकडे पैसे मागायचा. इंग्रज समाजातल्या शहरातल्या गरीब वर्गाचं दर्शन या पात्रातून होत होतं. 'ब्लीक हाऊस'मुळं हे पात्र सर्वांना परिचयाचं झालं.

या काळात रस्त्यावरची सारी वाहतूक घोडागाड्यांमधूनच होई. रस्त्यावर बऱ्याचदा कचरा असे. घोड्यांच्या शेणामुळं रस्ते अजुनच अस्वच्छ होत. एखाद्या उच्चभ्रू व्यक्तीला  रस्त्याच्या पलीकडं जायचं असल्यास ही सफाई करणारं मुलं झाडूनं रस्ता साफ करुन पैसे मागत. त्यांना मग बहुतेक वेळा 'टिप'च्या स्वरुपात पैसे मिळत. भीक मागण्याला तिथं अजिबातच परवानगी नसल्यानं पोटापाण्यासाठी काही मुलं (किंवा बऱ्याचदा वयस्कर माणसं) असे मार्ग निवडत. घोडागाड्यांना अचानक ब्रेक लावता येत नसल्यानं रस्ता खूप काळजीपूर्वक पार करावा लागे. लहान मुलांसाठी हे थोडसं धोक्याचंच काम होतं. उच्चभ्रू समाजातून त्यांना फारसा चांगला प्रतिसाद मिळायचाच असे नाही - ते लोक झाडलोट करणाऱ्या मुलांना अगदी तुच्छ नजरेनं पहात. 

४-५ वर्षांनी १८५८ मध्ये विल्यम फ्रिथ नावाच्या एका चित्रकारानं समाजातल्या विषमतेवर भाष्य करताना एक चित्र काढलं - 'The crossing sweeper' (रस्ता पार करणारा सफाईकामगार). यात रस्त्याची सफाई करणाऱ्या गरीब मुलाच्या बाजूलाच त्यानं एक उच्चभ्रू महिला दाखवली. फ्रिथनं या चित्रात उच्चभ्रू लोकांपैकी काहीजणांना या मुलांविषयी वाटणारा तिरस्कार नेमका टिपला. रस्त्यावर एखादी घोडा गाडी वेगानं येत आहे का हे ते दोघंही पाहत आहेत. झाडलोट करणाऱ्या त्या अनवाणी मुलाकडं उच्चभ्रू स्त्री सहानुभूतीनं पाहण्याऐवजी त्याच्याकडं दुर्लक्ष करणं पसंत करते असं हे चित्र पाहताना जाणवतं.
  

८५८ मध्ये काढलेलं चित्र

हे चित्र 'दारिद्र्य आणि संपत्ती यांची लंडनच्या रस्त्यावरील टक्कर' चित्रित करणारी कलाकृती म्हणून त्या काळात गाजलं होतं. फ्रिथनं हेच चित्र बदलत्या फॅशनला प्रतिबिंबित करत बर्‍याचदा काढलं. पण त्यापैकी १८५८ मध्ये काढलेलं चित्र जास्त प्रसिध्द आहे.
   

८९३ मध्ये काढलेलं चित्र


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Saturday, August 25, 2018

आफ्रिकेतले मुखवटे

कुतूहल कलाविश्वातलं
 
आफ्रिकेतले मुखवटे
 
आफ्रिकेतील जमातींमध्ये बऱ्याचशा प्रथा आहेत. तिथल्या वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या लोकांच्या प्रथांमध्ये वेगवेगळेपण असले तरी साऱ्या लोकांमध्ये एक समानता आहे - मुखवट्यांच्या वापराची.
 
वेगवेगळ्या धार्मिक विधींच्या वेळी हे लोक वेगवेगळे मुखवटे परिधान करतात. त्यांच्या समजुतीप्रमाणं मुखवटे धारण केल्यानंतर मुखवटाधारक व्यक्तीच्या देहात ज्याचा मुखवटा आहे ती देवता (किंवा पितर किंवा एखादी शक्ती वगैरे) संचारते. अशा विधींच्या दरम्यान बऱ्याचदा ठराविक संगीताची साथ असते. हे मुखवटे काही निवडक लोकच परिधान करु शकतात. अंगात देवता/शक्ती वगैरे संचारल्यानंतर ठराविक मंडळी त्यांच्याशी संवाद साधू शकतात. जन्म, वयात येणं, विवाह, अंत्यविधी अशा प्रसंगी होणाऱ्या विधींमध्ये हे मुखवटे येतातच, पण नृत्याचा सामाजिक कार्यक्रम, युध्दाआधीचे विधी अशा प्रसंगीही हे मुखवटे वापरले जातात. असे मुखवटे बनवणाऱ्या कलाकारांना त्यांच्या समाजात विशेष मान असतो. ही मुखवटे बनवण्याची विद्या पिढ्यान् पिढ्या बापाकडुन मुलांकडे जात राहते. 
 
हे मुखवटे आफ्रिकेतल्या लोकांची खरीखुरी पारंपारिक कला आहे. लाकूड, पितळ, तांबे वगैरेपासुन हे मुखवटे बनवतात. त्यांना वेगवेगळे रंग दिले जातात. त्यांचे आकार वास्तववादी नसतात. ज्या शक्ती/देवतेचा तो मुखवटा असेल त्या शक्ती/देवतेला व्यक्त करणारा तो मुखवटा असतो. उदा. मुखवट्याला असणारी म्हैशीची शिंगे ताकत दर्शवतात. हे मुखवटे मानवी चेहरा, पशूचा चेहरा (किंवा दोन्हींचं मिश्रण) दर्शवितात.          
 
 
     
विसाव्या शतकाआधी गोऱ्या लोकांनी कृष्णवर्णीय मंडळींच्या या कलेची हेटाळणी केली. वास्तववादी नसल्यानं या कलेला कमी दर्जाचं लेखण्यात आलं. पण विसाव्या शतकात एक स्पॅनिश कलाकार आफ्रीकेतल्या कलेच्या शैलीनं भारावून गेला - त्याचं नाव पाब्लो पिकासो. पिकासोनं या कलेतून बऱ्याच गोष्टी उचलल्या. आधुनिक कलेवर (modern art) या आफ्रिकन कलेचा बराच प्रभाव आहे - ते आपण नंतर पाहूच. (आपण यातले बरेचशे मुखवटे, त्यातली कला, त्यांचा हेतु हे सारं आपण नंतर पाहू.) पण एकेकाळी कमी दर्जाची मानली गेलेल्या ह्या कलेला नंतर प्रचंड मान मिळाला. आज जगभरचे कलाप्रेमी लोक आफ्रिकेतले मुखवटे आपल्या वैयक्तिक संग्रहात ठेऊ लागले आहेत.       
 
- दुष्यंत पाटील
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
 
संदर्भ :
 

Monday, August 20, 2018

रुगन् इथल्या चुनखडीच्या कडा

ओळख कलाकृतींची
 
रुगन् इथल्या चुनखडीच्या कडा
 
कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक हा युरोपमधला एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीचा एक महत्वाचा चित्रकार. याच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे ती वरवर निसर्गचित्रं असली तरी ती प्रतिकात्मक असतात. त्यात जीवनाचा खोल अर्थ सापडतो. त्याचं एक चित्र म्हणजे 'chalk cliffs at Regen' (रिगन् इथल्या चुनखडीच्या कडा). हे चित्र त्यानं १८१८ च्या दरम्यान म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी काढलं. 
 
१८१८ मध्ये त्याचं लग्न झालं अणि लग्नानंतर काही दिवसांनी तो त्याचा भाऊ राहायचा त्या बेटावर (म्हणजे रुगन् इथं) गेला होता. त्याच दरम्यान त्यानं हे चित्र काढलं. या चित्रातल्या व्यक्ती ह्या डावीकडून अनुक्रमे त्याची पत्नी, तो स्वतः आणि त्याचा भाऊ आहे असं मानलं जातं. त्याची पत्नी त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होती. 
 
या चित्रात आपल्याला लाल रंगाचे कपडे घालणारी  त्याची पत्नी सुरक्षित प्रकारे बसलेली दिसते. लाल रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तिचं लक्ष जवळपासच आहे. चित्रात दोन बाजूला दोन झाडं दिसतात. सफेद रंगाच्या धोकादायक वाटणाऱ्या चुनखडीच्या कडा दिसतात. पण आपलं लक्ष वेधून घेतो तो  समोर पसरलेला अथांग समुद्र. चित्रकाराचा भाऊ झाडाला टेकून उभा आहे. त्याचं लक्ष समोरच्या समुद्राकडं आहे. चित्रकार स्वतः सुरक्षित जागा सोडून समोर दरीमध्ये उतरण्याचा रस्ता आहे का ते बघतोय. समुद्रात दोन नौकाही दिसतात.
 
 
 
या चित्राचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. या चित्रकाराचा समकालीन असणारा एक तत्वज्ञ होता - Friedrich Schleiermacher. या तत्वज्ञाचं १८०९ मध्ये लग्न झालं होतं तेंव्हा त्यानं आपल्या पत्नीला लिहिलं होतं - "तू मला पहिल्यांदा दिसलीस ती आनंदी आणि हसतखेळत असणारी.... बाजूला खोल दरी असताना तू मजेमध्ये फुलं तोडत होतीस.. जेंव्हा काहीतरी भयानक गोष्ट घेऊन आपल्या बाजूला काळ येईल तेंव्हा असंच हसतखेळत तू काळाकडुन भयानक गोष्ट हिरावून घेशील का?" ("As joyful and lighthearted as you first seemed to me . . . . frolicking around with me on the edge of the precipice picking flowers, so will you also frolic with me on the edge of this ominous time and wrest from it whatever it may offer."). नुकतंच लग्न झालेल्या चित्रकारानं नेमकं ह्याच विषयावर चित्र काढलं असावं असं मानलं जातं. 
 
काहींच्या मते हे चित्र चित्रकाराचा मृत्यूविषयीचा दृष्टिकोन दाखवतं. समोर अथांग पसरलेला समुद्र मृत्यू दर्शवतो. किनाऱ्यापर्यंतचं जग हे मर्यादा असणारं जीवन दर्शवतं. लाल, निळे आणि हिरवे कपडे घातलेले त्याची पत्नी, तो स्वतः आणि त्याचा भाऊ हे लोक (कपड्याच्या रंगांवरून) ख्रिस्ती धर्मातली तीन तत्वं प्रेम, श्रध्दा आणि आशा दर्शवितात. 
 
- दुष्यंत पाटील
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
 
संदर्भ :
 

Friday, August 17, 2018

कोण होता बलबाहू?

कुतूहल कलाविश्वातलं
 
कोण होता बलबाहू?
 
तेराव्या शतकात चेंगीझखानचा नातू असणाऱ्या कुबलाई खानचं चीनमध्ये साम्राज्य होतं. या कुबलाई खानवर बौद्ध धर्माचा खूप प्रभाव होता. त्याचा आध्यात्मिक गुरु होता फाग्सपा. तो तिबेटमध्ये असायचा. सम्राट कुबलाई खाननं आपल्या गुरुंना तिबेटमध्ये सुवर्णस्तूप बांधायला सांगितलं. या काळात वास्तुशिल्पक्षेत्रात नेपाळी कलाकारांचा दबदबा होता. त्यामुळं या सुवर्णस्तूपाच्या निर्मितीसाठी नेपाळच्या राजाकडं १०० कुशल कारागिरांची मागणी करण्यात आली. नेपाळचा राजा जयभीमदेव मल्ल फक्त ८० कारागीरच देऊ शकला. गंमत म्हणजे या ८० कारागीरांचं नेतृत्व एक सोळा-सतरा वर्षांचा मुलगा करत होता - त्याचं नाव बलबाहू.
 
बलबाहूची लहानपणीची खात्रीलायक अशी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्याच्याकडं लहानपणापासूनच असामान्य अशी प्रतिभा होती. त्याला लहानपणापासुनच कलेची अावड होती. त्याला कलेविषयीचे ग्रंथ पाठ होते असं मानण्यात येतं. ८० कारागीरांचं नेतृत्व करण्याची तयारी बलबाहूनं दाखवली. राजा जयभीमदेव मल्लिकार्जुन यानं त्याची असामान्य प्रतिभा पाहूनच त्याला वयानं कमी असूनही कारागिरांचा नेता म्हणून मान्यता दिली होती. बलबाहूच्या नेतृत्वाखाली हे ८० कारागीर तिबेटमधल्या ल्हासा या ठिकाणी सुवर्णस्तूप बांधण्यासाठी निघाले.     
 
बलबाहू चीनमध्ये अरनीको नावानं ओळखला जाऊ लागला. सुवर्णस्तूपाचं काम अप्रतिम झालं. हा स्तूप बनायला जवळपास दोन वर्षं लागली. फाग्सपा अरनिकोच्या प्रतिभेनं खूप प्रभावित झाला. अरनिकोला आता मायदेशी जायचं होतं, पण फाग्सपाला त्याला परत जाऊ द्यायचं नव्हतं. अरनीकोला त्यानं एक प्रकारची दीक्षाही दिली. त्यामुळं अरनीकोचं स्थान कारागीरांपेक्षा वरचं झालं. फाग्सपानं अरनीकोला सम्राट कुबलाई खानला भेटायला सांगितलं. 
 

 
अरनीकोचा पुतळा
 
 
सम्राट कुबलाई खानला भेटण्यासाठी अरनीको राजधानीला (आजच्या काळातलं बीजिंग)  पोहोचला. सुरुवातीच्या संवादानंतर सम्राट कुबलाईखान प्रभावित झाला. त्याच्याकडं एक खराब झालेलं, भग्नावस्थेतलं पितळी शिल्प होतं. हे शिल्प होतं मानवी शरीराचं. यात शरीरातील नसा, नीला, रोहिणी वगैरे दाखवल्या होत्या. हे शिल्प अॅक्युपंक्चर उपचारपध्दतीशी संबंधित होतं. हे शिल्प पूर्वीच्या काळी मंगोलियामधुन भेट मिळालं होतं. ते शिल्प सम्राटानं अरनिकोला पूर्ववत करायला सांगितलं. हे काम करायला अरनीकोला दोन वर्षं लागली, पण पूर्ववत झालेलं शिल्प पाहून मोठमोठे चिनी कलाकारही अचंबित झाले.  
 
यानंतर अरनिकोनं बऱ्याच मोठमोठ्या वास्तूंच्या रचना (design) केल्या. यात सर्वात प्रसिद्ध असणारी वास्तूरचना म्हणजे आजच्या बीजिंगमध्ये असणारे धवलस्तूप. जवळपास ५१ मीटर उंची असणाऱ्या या स्तूपाचा पायाशी ३० मीटर व्यास अाहे. शिखराला छत्रीसारखी रचना असून त्यावर ३६ पितळेच्या घंटा आहेत. ही वास्तू चीननं पूर्वीच राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केली आहे.            
 
 
धवलस्तूप
 
 
सम्राट कुबलाई खान युध्दापूर्वी संरक्षणासाठी एक विधी करायचा. या विधीत अरनीकोनं बनवलेली 'महाकाल' नावाची प्रतिमा वापरली जायची. आणि कुबलाई खान सारी युध्दं जिंकायचा. त्याकाळात 'महाकाल' ही प्रतिमा सम्राटाच्या शक्तिशाली सत्तेचं प्रतिक बनली होती. 
 
अरनीकोनं काही वैज्ञानिक उपकरणंही बनवली. यात अवकाशातील ग्रहांची परिभ्रमण दाखवणारी प्रतिकृती, पाण्याच्या प्रवाहावर चालणारं घड्याळ यासारख्या उपकरणांचा समावेश होतो.
 
अरनिकोनं वास्तुकलेवर कार्यशाळाही घेतली होती. या कार्यशाळेत चीन, तिबेट, मंगोलिया, नेपाळ इथून २०० कलाकार सहभागी झाले होते. अरनिकोनं बुध्दशिल्प कसं बनवावं (मापं, प्रमाणं) यावर एक पुस्तकही लिहिलं. 
 
अरनीकोनं तीन स्तूप, नऊ बौद्ध मंदिरे यांच्यासहित अनेक वास्तूंच्या रचना केल्या. वास्तूरचनेशिवाय तो चित्रकलेतही प्रवीण होता. राजघराण्यातील कित्येक मंडळींची त्यानं व्यक्तिचित्रं काढलीत. त्याला चीनमधले सर्वोच्च किताब, मानसन्मान मिळाले. 
 
आज इतकी आतलं उलटून गेल्यावरही चीन आणि नेपाळ दोन्ही देशांना या प्रतिभावंत कलाकाराचा अभिमान आहे.
 
- दुष्यंत पाटील
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
 
संदर्भ :

Monday, August 13, 2018

आनंदी भाऊ आणि बिचारी आई

ओळख कलाकृतींची

आनंदी भाऊ आणि बिचारी आई

उरॉस प्रिडिक हा सर्बियामधला कलाकार. त्या काळी सर्बिया ऑस्ट्रियन साम्राज्याचाच एक भाग होता.

या कलाकाराचं कलेमधलं उच्च शिक्षण व्हिएन्ना  इथं झालं. शिक्षण झाल्यावर तो तिथंच सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीलाही लागला. व्हिएन्नामधल्या संसदभवनात त्यानं तिथल्या पुराणांमधल्या विषयांवर आधारित अशीच बरीच चित्रं रंगवली.

वय सर्वसाधारण २९-३० असताना त्याचे वडील, त्याचा भाऊ वारला आणि आई आजारी पडली. व्हिएन्नामधली नोकरी सोडून  तो आपल्या गावी परत आला. त्याचं गाव म्हणजे खरंतर खेडेगाव होतं. या गावात त्यानं दैनंदिन जीवनावर आधारित कित्येक चित्रं काढलीत. हा चित्रकार फक्तच खेडेगावातल्या जीवनाचं चित्रण करत नव्हता तर तो आपल्या चित्रातून काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करायचा, लोकांच्या वाईट सवयींवर काहीतरी भाष्य करण्याचा  प्रयत्न करायचा. अशाच प्रयत्नातलं त्याचं एक चित्र म्हणजे 'आनंदी भाऊ आणि बिचारी आई' !!

या चित्रकारानं खेडेगावामध्ये एक गोष्ट पाहिली होती - बरीच मद्यपी मंडळी रात्रभर दारू ढोसून पहाटे रस्त्यावरून मोठमोठ्यानं आवाज करत, लोकांची झोपमोड करत जात असत. त्यानं १८८७ मध्ये  विषयावर हे चित्र काढलं. या चित्रात चार तरुण लोक नशेमध्ये  रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. यापैकी समोरचा संगीत वाजवताना दिसतोय. पहाटेची वेळ आहे. त्या चौघांपैकी एकाची आई त्रस्त होऊन हाक मारत बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. पण  तिच्या मुलाला त्याची पर्वा दिसत नाही. कच्चा रस्ता, ग्रामीण भागातली घरं, जनावरं या सगळ्यांमुळं खेडेगावातलं वातावरण जिवंत झालं आहे. या चित्रात चित्रकारानं प्रामुख्यानं काळा, पांढरा आणि लाल रंग वापरलेला आहे.



चित्रकारानं ज्या हेतूनं हे चित्र काढलं होतं तो हेतू साध्य झाला नाही. गावातल्या मद्यपी मंडळींनी यातून काहीही संदेश घेतला नाही. उलट आपलं इतकं अचूक चित्र काढल्याबद्दल त्यांना कौतुक वाटत होतं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

http://www.urospredic.ch/wp-content/uploads/2017/11/UrosPredic_english.pdf

https://steemit.com/serbia/@milovancevic/ten-masterpiece-of-serbian-art

http://www.muddycolors.com/2012/01/uros-predic-orlovat-1857-belgrade-1953/

https://en.wikipedia.org/wiki/Happy_Brothers

Saturday, August 11, 2018

आशा

कुतूहल कलाविश्वातलं

आशा

बराक ओबामा राइट नावाच्या एका धर्मोपदेशकाच्या भाषणानं प्रभावित झाले होते. ते भाषण होतं "आशा" या विषयावर. या भाषणात त्या धर्मोपदेशकांनी "आशा" या चित्राचाही उल्लेख केला होता. राइट म्हणाले होते, "हिरोशिमामधला बळी असल्यासारखी या मुलीची वस्त्रं आहेत. पण तरीही तिच्यात आशा करण्याचं धाडस (audacity to hope) आहे." बराक ओबमांवर "आशा करण्याचं धाडस (audacity to hope)" या शब्दप्रयोगाचा खोलवर परिणाम झाला. त्यांनी आपल्या भाषणात हा शब्दप्रयोग वरचेवर वापरला. (नंतर त्यांनी audacity to hope ह्या नावाचं पुस्तकही लिहिलं.) बराक ओबामा यांचं "आशा" हे आवडतं चित्र.

चित्रामध्ये "आशे"च प्रतीक असणारी मुलगी एक वाद्य वाजवताना दिसते. ह्या आशेनं डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. एक प्रकारे वास्तव तिला दिसत नाही. तिच्या संगीत वाद्याच्या जवळपास सार्‍या तारा तुटल्या आहेत. वाद्यातली एकमेव तार शिल्लक आहे. ही आशा कान वाद्याच्या जवळ नेऊन संगीत वाजवत ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. ही आशा पृथ्वीवर बसली आहे. स्वर्गाचं प्रतीक असणारा एक तारा आकाशात दिसतोय. एकूणच प्रकाशयोजना बऱ्यापैकी मंद आहे. वास्तव अंधुक आहे. चित्रातली निळसर करड्या रंगाची पार्श्वभूमी आर्तता दर्शावते.



काही लोकांच्या मते ह्या चित्राचं नाव "आशा" याऐवजी "निराशा" असं जास्त शोभलं असतं.

हे चित्र वॉट्सनं १८८६ मध्ये काढलं. चित्रकाराच्या दत्तक घेतलेल्या मुलीच्या एक वर्षाच्या बाळाच्या मृत्यूमुळं झालेलं दु:ख या चित्रातल्या दु:खी,  निराशाजनक भावांमधून प्रतिबिंबित होतं असं मानलं जातं. कसंही असलं तरी हे चित्र समीक्षक आणि लोकांच्या पसंतीसाठी उतरलं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

https://www.tate.org.uk/art/artworks/watts-hope-n01640

https://www.telegraph.co.uk/culture/art/3563194/Barack-Obamas-favourite-painting.html

https://mydailyartdisplay.wordpress.com/2012/05/21/hope-by-george-frederic-watts/

Monday, August 6, 2018

बेजवॉटर ओम्नीबस

कुतूहल कलाविश्वातलं

बेजवॉटर ओम्नीबस

इंधनांवर चालणारी वाहनं यायच्या आधी एका विशिष्ट प्रकारच्या गाड्या युरोप आणि अमेरिकेमध्ये चालायच्या. त्या 'ओम्नीबस' या नावानं ओळखल्या जायच्या. ह्या बस घोडे ओढायचे. शहरांमध्ये लोकांची प्रवासाची गरज तर भरपुर असायची. या बसमध्ये दोन बेंच समोरासमोर असायचे. चालक मात्र बाहेर उंचावर असणार्‍या ठिकाणी बसायचा. काही वेळा डबलडेकर बसही असायच्या. डबलडेकर बसमध्ये वरच्या डेकवर छप्पर नसायचे. ह्या ऑम्नीबस प्रकारच्या बसेस लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असायच्या.

ह्या ऑम्नीबस ठरलेल्या मार्गानं जायच्या. मार्ग ठरलेला असल्यामुळं लोक आपल्याला हव्या त्या ठिकाणी ओम्निबसमध्ये चढायचे, आपलं ठिकाण आलं की उतरायचे. मध्यमवर्गीय मंडळींचा हा प्रवासासाठीचा आवडता पर्याय होता. गरीब लोकांना याचं भाडं परवडायचं नाही तर श्रीमंत लोकांच्या स्वतःच्या घोडागाड्या असायच्या !! भाडं घ्यायला आणि प्रवाशांना बसमध्ये चढायला मदत करायला कंडक्टरही असायचे.

जॉर्ज विलियम जॉय ह्या चित्रकारानं 'बेजवॉटर ओम्निबस' नावाच्या चित्रामध्ये दैनंदिन जीवनातलं एक दृष्य टिपताना हे चित्र काढलंय. हे तैलचित्र काढलं गेलंय १८९५ मध्ये. बसमधल्या एका बेंचवर बसल्यानंतर समोरच्या बेंचवर बसलेले लोक कसे दिसायचे ते ह्या चित्रात दाखवलंय. चित्रात दिसणार्‍या बेंचवर सगळ्यात डावीकडं एक त्यातल्या त्यात गरीब दिसणारी बाई आपल्या मुलीसहित बाळाला घेऊन बसलेली दिसते. चित्रकारानं मॉडेल म्हणून आपल्या पत्नीचा आणि मुलीचा आधार घेतला होता. तिच्या बाजूला फॅशनवाले कपडे परिधान केलेली एक तरुण स्त्री एक प्रकारची छत्री आणि फुलं घेऊन बसलेली दिसते. तिच्या बाजूला एक माणूस वर्तमानपत्र वाचताना दिसतो. त्याकाळी लोकप्रिय असणारी उंच टोपी त्याच्या डोक्यावर दिसते. उजवीकडं एक बसलेली नर्स आणि नव्यानं आलेली स्त्री दिसते.  वरच्या बाजूला बर्‍याचशा जाहिराती चिकटावलेल्या दिसतात.



प्रवासात आपल्याला नेहमी वेगवेगळ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर अगदी वेगवेगळे भाव दिसतात. ह्या चित्रात चित्रकारानं प्रवाशांच्या चेहऱ्यावरले भाव अप्रतिमरित्या टिपलेले आहेत - सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला वेगवेगळे भाव दिसतात. चित्रात एक प्रकारचा जिवंतपणा आपल्याला जाणवतो.

हा चित्रकार उत्कृष्ट व्हायोलीनवादकही होता. आपल्या करियरसाठी संगीत निवडावं की चित्रकला हा प्रश्न आधी त्याला भेडसावयाचा. पण चित्रकार बनण्याचा निर्णय त्यानं घेतला. त्याचं हे चित्र बर्‍यापैकी गाजलं. सध्या हे चित्र लंडनच्या एका संग्रहालयामध्ये आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

http://www.mheu.org/en/timeline/bayswater-omnibus.htm

https://en.wikipedia.org/wiki/The_Bayswater_Omnibus

Saturday, August 4, 2018

मॅन प्रपोजेस् गॉड डिस्पोजेस्

कुतूहल कलाविश्वातलं

मॅन प्रपोजेस् गॉड डिस्पोजेस्
 
१९ मे १८४५ मध्ये दोन जहाजं इंग्लंडमधुन उत्तरेकडं एका मोहिमेवर निघाली. सरकारी पाठबळावर ही मोहिम सुरू झाली होती. इंग्लंडमधुन प्रशांत महासागरात जाण्यासाठी उत्तर ध्रुवाकडुन दुसरा मार्ग शोधणं हे या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. यामध्ये पूर्वी कधी न गेलेल्या समुद्रक्षेत्रांमधुन या जहाजांना प्रवास करायचा होता.  ध्रुवावरचं टोकांचं हवामान हे या मोहिमेपुढचं खडतर आव्हान होतं. पण इंग्रजांना अर्थातच अशा साहसांची आवड होती.
 
या मोहिमेचा कप्तान होता जॉन फ्रँकलीन. यापूर्वी त्यानं आर्क्टिक प्रदेशातून तीन मोहिमा केल्या होत्या. दोन जहाजांपैकी दुसऱ्या जहाजावरचा कप्तान क्रोझिअर याला अंटार्क्टिकाच्या मोहिमेचा अनुभव होता. याशिवायही या मोहिमेत बरेच अनुभवी आणि ज्ञानी दर्यावर्दी होते. या दोन जहाजांवर एकूण २४ अधिकारी आणि ११० बाकीचे लोक होते. दोन्ही जहाजं (त्यावेळच्या) अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज होती. सगळ्या लोकांना पुढची तीन वर्षं पुरेल इतकं पारंपारिक पध्दतीनं कॅनमध्ये जतन (preserve) केलेलं अन्न होतं. जहाजांवरच्या ग्रंथालयात १००० पुस्तकं होती. एकूणच काळजीपूर्वक तयारीनिशी ह्या मोहिमेला सुरुवात झाली.
 
ही जहाजं थोडसं उत्तरेला जाऊन स्कॉटलॅंडला थांबली. पुढं ग्रीनलँडच्या पश्चिम किनाऱ्यावर ही जहाजं थांबली - याठिकाणी जहाजांवर अन्नासाठी ताजं मांस घेण्यात आलं. लोकांनी आपापल्या कुटुंबासाठी लिहिलेली पत्रं दिली. १३४ जणांपैकी ५ जणांना परत पाठवण्यात आलं. १२९ लोकांचा पुढचा प्रवास सुरु झाला. 
 
पुढच्या प्रवासात त्यांना वाटेत एक जहाज भेटलं. या वाटेत भेटलेल्या जहाजावरच्या लोकांच्या वृत्तांतानुसार मोहिमेची जहाजं हवामान ठीक होण्यासाठी काही काळाकरता थांबली होती. त्यानंतर मोहिमेचा पुढचा प्रवास सुरू झाला. यानंतर मात्र या जहाजांचा बाकीच्या जगाशी जो संपर्क तुटला तो कायमचाच. 
 
जवळपास ३ वर्षं झाली. या मोहिमेविषयीची इंग्लंडच्या जनतेत असणारी काळजी वाटू लागली. मोहिमेचा शेवट भयानक पद्धतीनं झाला असावा अशी शंकेची पाल लोकांच्या मनात चुकचुकत होती. प्रत्यक्षात निसर्गाच्या रौद्र रुपापुढं मोहिम चक्काचूर झाली होती. काळजीपूर्वक केलेलं नियोजन पूर्णपणे  फसलं होतं. यानंतरही मुख्य कप्तान असणाऱ्या फ्रँकलीनची लोकप्रियता कायम राहिली. फ्रँकलीनच्या पत्नीच्या इच्छेप्रमाणं (तसंच लोकांच्या इच्छेप्रमाणं) पुढं शोधमोहिमा झाल्या. महत्वाची माहिती देणाऱ्या लोकांना प्रचंड रक्कमेची (आजच्या काळातील कोट्यावधी रूपयांची)  बक्षिसं जाहीर करण्यात आली.  
 
१८६४ मध्ये एडवीन लँडसीअर नावाच्या चित्रकारानं या मोहिमेविषयी एक चित्र काढलं - "Man proposes God disposes". पंधराव्या शतकातील एका ख्रिस्ती धर्माशी संबंधित असणाऱ्या ग्रंथामध्ये "Man proposes God disposes" अशा अर्थाचं विधान आहे.. तेच या चित्रकारानं आपल्या चित्रासाठी निवडलं. माणसानं किती ठरवलं, कितीही काळजीपूर्वक नियोजन केले, कितीही स्वप्नं पाहिली तरी नियतीसमोर त्याचं काही चालत नाही असा या चित्राचा आशय होता. या चित्रात त्यानं उध्वस्त झालेल्या मोहिमेचे अवशेष दाखवले आहेत. जगावर सत्ता गाजवणाऱ्या साम्राज्याच्या एका महत्वाकांक्षी योजनेचे भग्न अवशेष मुकपणे नियतीची करामत दाखवतात. चित्रात दोन ध्रुवीय अस्वलं दिसतात. निळसर असणारी रंगसंगती ध्रुवीय प्रदेशातील अतिशीततेची जाणिव करुन देतात. लाल रंगाचं वस्त्र ब्रिटिशांच्या एका विशिष्ट ध्वजाचा भाग आहे. लाल रंग एकप्रकारे जिवितहानीची जाणिव करुन देतो. बाजूला विज्ञानाचं प्रतिक असणारी दुर्बिण निर्जीवपणे पडलेली दिसते. स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव वैशिष्टपूर्ण ध्रुवीय हवामान दाखवतो.
 
 
 
 
या जहाजांचं पुढं काय झालं ते शोधण्यासाठी १८४८ नंतर पुढची १५० वर्षं कित्येक मोहिमा झाल्या. हाती आलेल्या छोट्या छोट्या पुराव्यांमधुन शास्त्रज्ञांनी बरेच अंदाज बांधले. निर्जन बेटांवरच्या या मोहिमेतल्या लोकांचे अखेरचे दिवस वाईट प्रकारे गेले होते.
 
फ्रँकलीन आणि ही मोहिम यांवर बरीच गीतं, बऱ्याच कविता, कादंबऱ्या झाल्या. हा विषय जनतेसाठी जिव्हाळ्याचा होता. 
 
थॉमस हॉलोवे नावाच्या एका गडगंज श्रीमंत असणार्‍या उद्योगपतीनं १८८६ मध्ये लंडनमध्ये एक कन्यामहाविद्यालय सुरू केलं. त्याकाळच्या सुप्रसिद्ध असणार्‍या चित्रकारांची ७७ चित्रं त्यानं महाविद्यालयात भिंतींवर लावण्यासाठी विकत घेतली. त्यात ह्या "Man proposes God disposes" चाही समावेश होता. त्या चित्रासाठी हॉलोवेनं तब्बल ६६१५ पौण्ड्स मोजले !!! चित्रं पाहून विद्यार्थीनिंचं कुतूहल जागृत व्हावं असं त्याला वाटायचं..
 
पण ह्या चित्राचा भलताच परिणाम होत गेला.. १९२० ते १९३० च्या दरम्यान एक अंधश्रद्धा पसरली.. परीक्षेमध्ये ह्या चित्राजवळ ज्याचा नंबर येईल तो नापास होतो असा (गैर)समज पसरू लागला. आजही हे चित्र परीक्षेच्या दरम्यान यूनियन जॅक ध्वजानं झाकून ठेवतात !!

- दुष्यंत पाटील
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :