Friday, February 28, 2020

खगोलशास्त्री कोपर्निकस


मुशाफिरी कलाविश्वातली

खगोलशास्त्री कोपर्निकस

आजच्या काळात विज्ञान खूप पुढं गेलंय. सगळेजण लहानपणापासून विज्ञान शिकत असल्यानं विज्ञानाची मुळं सर्वत्र खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळं आपल्याला युरोपमध्ये ५०० वर्षांपूर्वीची स्थिती कशी असेल याची कल्पना करणं थोडंसं अवघड जाईल. विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी आहे आणि सूर्य, चंद्र, तारे सारे पृथ्वीभोवती फिरतात असं या काळात मानण्यात यायचं !! प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या काळापासून शतकानुशतके विश्वाच्या रचनेचं हेच मॉडेल शिकवण्यात यायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्य, चंद्र, ग्रह तारे पृथ्वीभोवती फिरताना सगळ्याच माणसांना स्पष्टपणे दिसायचे. आणि आपण ज्या जमिनीवर राहतो ती जमीन, पृथ्वी स्थिर असल्याचं प्रत्येकजण क्षणोक्षणी अनुभवत होता. त्यामुळं स्थिर असणाऱ्या पृथ्वीभोवती सूर्य,चंद्र, ग्रह, तारे फिरतात ह्या गोष्टीवर शतकानुशतकं सर्व लोकांचा १००% विश्वास होता !!

या काळात (सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला) पोलंडमधला खगोल शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यानं इतरांपेक्षा वेगळा विचार केला. पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असं त्याला वाटायचं. खरंतर १५१४ मध्ये त्यानं आपल्या मित्रांना आपले विचार बोलूनही दाखवलेले होते. पण त्यानं हे विचार त्यावेळी प्रकाशित केले नाहीत. त्यानं मृत्यूच्या थोडंसं अगोदर म्हणजे १५४३ साली हे विचार एका पुस्तकातून (On the Revolutions of the Heavenly Spheres) प्रकाशित केले. १५४३ मध्ये ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासोबतच विज्ञानातल्या क्रांतीला सुरुवात झाली असं मानण्यात येतं. अर्थातच यानंतर विज्ञानाची घोडदौड कधीच थांबली नाही. त्यामुळं  विज्ञानाच्या इतिहासातला १५४३ हा एक प्रचंडच महत्वाचा टप्पा मानण्यात येतो.

एकोणिसाव्या शतकात पोलंडमध्ये एक महान चित्रकार होऊन गेला जॅन मॅतेको. या चित्रकाराला आपल्या मातृभूमीविषयी प्रचंड प्रेम होतं आणि आपल्या देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या प्रसंगांवर त्यानं एकाहून एक उत्कृष्ठ चित्रं काढली. १८७३ साली कोपर्निकसच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण होणार होती. १५४३ साली कोपर्निकसनं प्रकाशित केलेलं पुस्तक हा जसा विज्ञानाच्या इतिहासातला सुवर्णक्षण होता तसा तो पोलंडवासीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. कोपर्निकसच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं त्यानं कोपर्निकसचं एक चित्र काढायचं ठरवलं.

हे चित्र एक महान कलाकृती बनण्यासाठी त्यानं खूप कष्ट घेतले. कोपर्निकसच्या आयुष्याचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला. सोबत दिलेलं चित्र काढण्यापूर्वी त्यानं कित्येक रेखाटनं काढून पाहिली, दोन कच्ची तैलचित्रंही काढली. आपल्याला चित्रातून जे काही पोहोचवायचं आहे ते रसिकांपर्यंत नीट पोहोचावं आणि त्या अर्थानं आपलं चित्र एक उत्तम कलाकृती बनावी याचा त्याला नेहमीच विलक्षण ध्यास असायचा. क्रॅको या शहरातल्या आपल्या जुन्या छोट्याशा फ्लॅटमध्ये त्यानं १८७२ मध्ये हे चित्र काढायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं चित्र पूर्ण झालं.


या चित्रात आपल्याला पहाट होण्याआधीचं रात्रीचं दृश्य पाहायला मिळतं. कोपर्निकस आपल्या कामात गढून गेलाय, त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळं त्याला काहीतरी सत्य गावसलंय असं भासतं. त्याच्या हातात मापन करण्याचं एक साधन आहे. आजूबाजूला काही ग्रंथ दिसतात.  मागच्या बाजूला चर्चचं शिखर दिसतं. आकाशात चमचमणारे तारे दिसतात. आजूबाजूला दोरी आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी लागणारी काही उपकरणं दिसतात. सूर्याभोवती फिरणारे ग्रह दाखवणारी, त्याचा सिद्धांत मांडणारी एक आकृती त्याच्या बाजूला दिसते. जुन्या काळातला एक दिवाही दिसतो. चित्र अतिशय जिवंत वाटतं आणि आजूबाजूला अंधार असताना कोपर्निकसवर पडणारा प्रकाश खूप काही सुचवतो !!!  

दुर्दैवाचा भाग असा होता की कोपर्निकसच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं जो उत्सव आयोजित केला जाणार होता त्याच्या आयोजकांना या चित्रात फारसा रस नव्हता !! त्यांनी हे चित्र त्या उत्सवात प्रदर्शित करायला स्पष्ट नकार दिला. जर्मनीमधल्या एका शहरातील नगरपालिकेनं हे चित्र विकत घेण्याची तयारी दाखवली. पण या चित्रकारानं हे चित्र विक्री करून पैसे कमावण्याच्या उद्देशानं काढलं नव्हतं. त्यामागं पोलंडविषयी वाटणारं प्रेम आणि अभिमान होता. त्यामुळं जर्मनीतल्या नगरपालिकेला त्यानं हे चित्र द्यायला नकार दिला. शेवटी क्रॅकोमध्ये त्यानं स्वत:च्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं. या प्रदर्शनात झालेल्या विक्रीतून मिळालेला पैसे त्यानं सामाजिक संस्थांना दान केला. क्रॅकोमधल्या लोकांनी पैसे जमा करून हे चित्र नंतर विकत घेतलं आणि क्रॅकोच्या विद्यापीठात दिलं !! हे चित्र तिथं आजही पाहायला मिळतं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

🌺https://www.nationalgallery.org.uk/exhibitions/conversations-with-god-copernicus-by-jan-matejko
🌺https://en.wikipedia.org/wiki/Astronomer_Copernicus,_or_Conversations_with_God
🌺https://www.dailyartmagazine.com/jan-matejko-the-painter-of-polish-history/
🌺http://origins.osu.edu/milestones/february-2016-400-years-ago-catholic-church-prohibited-copernicanism
🌺https://en.wikipedia.org/wiki/Jan_Matejko

🍁Image Credit:
🌺https://commons.wikimedia.org/wiki/File:Jan_Matejko-Astronomer_Copernicus-Conversation_with_God.jpg
🌺Jan Matejko / Public domain


Friday, February 21, 2020

डोडो

मुशाफिरी कलाविश्वातली

डोडो

मॉरिशसच्या बेटावर पूर्वी एक खास पक्षी आढळायचा. जाड असणारा हा पक्षी सर्वसाधारण एक मीटर उंच असायचा. या पक्ष्याला उडता यायचं नाही. त्याचं वजन साडेदहा ते साडेसतरा किलोच्या मध्ये असायचं. या बेटावर विपुल प्रमाणात अन्न मिळायचं आणि या पक्ष्याला भक्ष्य करणारे कुणी प्राणीही नव्हते. त्यामुळं हे पक्षी हळूहळू उडणंच विसरून गेले असं मानण्यात येतं !! पण हे निरुपद्रवी पक्षी म्हणजे त्या बेटाची शान होती.

१५९८ साली डच दर्यावर्दी मंडळी या बेटावर आली. खरंतर आजचं बेटाचं असणारं नाव (मॉरिशस) हे त्यांनीच आपल्या 'मॉरिस' या राजपुत्राच्या नावावरून ठेवलं. ही दर्यावर्दी मंडळी आल्यापासून मात्र तिथल्या बेटावरच्या त्या पक्ष्याला वाईट दिवस आले. त्यांनी या पक्ष्याची शिकार सुरु केली. शिकार करण्यासाठी त्यांना काहीच कष्ट घ्यायला लागत नव्हतं पक्ष्यापर्यंत चालत जाऊन पक्ष्याला पकडणं एवढंच त्यांना ह्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी करावं लागायचं. या पक्ष्यांना आजपर्यंत कुठल्याच प्राण्यांनं इजा पोहोचवली नव्हती, त्यामुळं माणूस त्यांना पकडण्यासाठी जवळ आल्यानंतरही कसलीच भीती वाटायची नाही. आणि त्यामुळंच ते स्वत:चं  रक्षण करायचा काहीही प्रयत्न करायचे नाहीत. उलट बऱ्याचदा निरागस कुतुहलानं ते पक्षीच माणसांकडं जायचे !! या पक्ष्यांना डोडो असं नाव पडलं. (डोडो शब्दाचा अर्थ कमी बुद्धी असणारा असा होतो) या दर्यावर्दी मंडळींनी आपल्यासोबत पाळीव प्राणीही नेले होते. यापैकी मांजर डोडो पक्ष्यांच्या भविष्यासाठी घातक ठरले. कारण मांजर डोडो पक्ष्यांची अंडी खाऊन टाकायचं.

दुर्दैवानं मॉरिशस बेटाची शान असणारा डोडो हा पक्षी १६६२ च्या दशकात नामशेष झाला. आता त्याचे सांगाडे, हाडं पाहायला मिळतात. त्याकाळच्या डच लोकांनी काढलेली रेखाटनंही आजही उपलब्ध आहेत. पण या पक्ष्याचे बारकावे दाखवणारं एक उत्कृष्ठ रंगीत चित्र मिळतं ते एका भारतीय चित्रकारानं काढलेलं !! मॉरिशसमधल्या सतराव्या शतकात नामशेष होणाऱ्या पक्ष्याचं चित्र भारतीय चित्रकारानं कसं काय काढलं असावं ?

पीटर मंडी हा सतराव्या शतकातला इंग्रज व्यापारी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवायचा. त्यानं लिहून ठेवलंय की त्या काळात काही युरोपियन दर्यावर्दी लोकांनी गोव्यामध्ये डोडोंची जोडी आणली होती. ही जोडी नंतर तिथून गुजरातमधल्या सुरत इथं आणण्यात आली. नंतर ती जोडी बादशाह जहांगीर याला भेट म्हणून देण्यात आलीत. जहांगीरला वेगवेगळे प्राणी पक्षी पाळण्याचा शौक होता. त्याच्याकडं इतर प्राणीपक्ष्यांसोबत ईथुओपियामधला झेब्राही होता.

जहांगीरच्या दरबारात अनेक चित्रकार होते. यातला एक प्रतिभावंत चित्रकार होता उस्ताद मन्सूर. या मन्सूरचा निसर्गातल्या प्राण्यांची, पक्ष्याची, फुलांची चित्रं काढण्यात हातखंडा होता. खरंतर सुरुवातीच्या काळात मन्सूर पारंपरिक पद्धतीनं व्यक्तिचित्रं काढायचा. पण नंतर तो प्राणी, पक्षी वगैरे निसर्गातल्या गोष्टींकडं वळला. एकदा बादशहासोबत काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यानं काश्मीरमधल्या वेगवेगळ्या १०० फुलांची चित्रं काढल्याचा उल्लेख बादशहानं करून ठेवलाय. यापैकी बरीचशी चित्रं आज मिळत नाहीत. त्यानं काढलेलं ट्युलिपच्या फुलाचं चित्र प्रसिद्ध आहे.

चित्रांमध्ये खूप सारे बारकावे अचूकपणे आणि कलात्मक पद्धतीनं दाखवण्यातल्या त्याच्या कौशल्यामुळं त्याला 'नादीर-अल-अश्र' (म्हणजे त्याच्या काळातला अतुलनीय) असा किताब मिळाला होता.

जहांगीरच्या दरबारात डोडो आल्यानंतर त्याचं चित्र मन्सूरनं काढण्याचा योग जुळून आला. रंगांचा अतिशय सुंदर वापर करत मन्सूरनं डोडोचं चित्र काढलं. हे चित्र भविष्यकाळात खूपच मोलाचं ठरणार होतं. डोडोचं रंगीत चित्र काढण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. या आधीही डोडोची रेखाटनं काढण्यात आली होती पण मन्सूरच्या चित्रात आढळणारी परिपूर्णता त्या रेखाटनांमध्ये नव्हती. समोर डोडो पक्षी असताना त्याला पाहत एखाद्या चांगल्या चित्रकारानं चित्र काढणं असा योग नंतर जवळपास आलाच नाही. काही दशकांमध्ये डोडो नामशेष झाला.


चित्रात डावीकडं वर दिसतोय तो पक्षी पोपटाची एक जात आहे. वर उजवीकडं दिसणारा पक्षी हिमाचल प्रदेशाचं मानचिन्ह असणारा पक्षी. या पक्ष्यावर असणारे पांढरे ठिपके, त्याचे रंग बारकाईनं दाखवण्यात आले आहेत. चित्रात मध्यभागी डोडो दिसतोय. त्याचा रंग, पोत खरा भासतो.

हे चित्र सापडलं ते रशियातल्या सेंट पीटसबर्गमधल्या एका कलासंग्रहालयात. हे चित्र भारतातून रशियात कसं गेलं ते मात्र एक न उलगडलेलं कोडंच आहे !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🌹 https://www.forbes.com/sites/quora/2016/09/20/what-happened-to-the-last-dodo-bird/#1a26db6d9c2b
🌹 https://www.theatlantic.com/science/archive/2016/06/the-dodos-redemption/486086/
🌹 https://tbsnews.net/feature/travel/dodos-mughal-court
🌹 http://daak.co.in/nadir-al-asr-ustad-mansurs-miniatures-birds-tulips/
🌹 https://incois.gov.in/Tutor/science+society/lectures/illustrations/lecture19/ustadmansur.html

🌷 Image Credit
🌹 https://commons.wikimedia.org/wiki/File:DodoMansur.jpg
🌹 Ustad Mansur / Public domain

Saturday, February 15, 2020

पोकर खेळणारी कुत्री


मुशाफिरी कलाविश्वातली

पोकर खेळणारी कुत्री

काही कलाकृती समीक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत पण सामान्य लोक मात्र त्या उचलून धरतात. आज आपण एका अशाच चित्रमालिकेतील चित्रं पाहणार आहोत ती याच प्रकारात मोडणारी आहेत. गंमतीदार चित्रांची ही मालिका त्या काळच्या समीक्षक मंडळींना तितकीशी पसंत पडली नव्हती. अर्थातच या चित्रांचे विषयही फारसे गंभीर नव्हते. पण या मालिकेतली चित्रं आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. ही चित्रं 'अभिजात कलाकृती' या प्रकारात मोडत नसली तरी आज शंभरपेक्षा वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता वादातीत आहे.

ही चित्रमालिका समजून घेण्यासाठी त्या काळातली परिस्थिती समजणं उपयोगी ठरेल. ही चित्रं आहेत अमेरिकन चित्रकार कुलीज याची. एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालेला होता. कुलीजनं चित्रकलेचं फारसं शिक्षण घेतलं नव्हतं. उपजीविकेसाठी त्यानं बऱ्याच ठिकाणी हातपाय मारून बघितले. त्यानं औषधांच्या दुकानात काम करण्याचा प्रयत्न केला. बँक आणि वर्तमानपत्र काढण्याचाही त्यानं प्रयत्न केला. पण त्याची मूळ आवड कलेची होती. त्यानं न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात येऊन चित्रकलेत आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. हा काळ होता १८७० च्या दशकातला.

कुलीजला कलागुणांना वाव देणारी नोकरी मिळाली ती एका वर्तमानपत्रात. त्याचं काम होतं व्यंगचित्रं, अर्कचित्रं काढायचं. अर्कचित्रातला प्रसंग जिवंत करण्यात त्याचा हातखंडा होता. अर्कचित्रं रंगवणं ही त्याची खासियत होती. खरंतर अर्कचित्रं रंगवण्याचं त्यानं पेटंटही मिळवलं होतं. त्याच्या अर्कचित्रांमध्ये माणसांसारखेच हावभाव व्यक्त करणारे प्राणी दिसायचे. ते इतके जिवंत भासायचे की माणसं जत्रेमध्ये वेशभूषा बदलून प्राणांच्या वेशात येतात त्याची आठवण यायची.

या कुलीजला नंतरच्या काळात (१९०३) एका जाहिरात कंपनीत नोकरी मिळाली. ही कंपनी काहीतरी जाहिरात असणारी कॅलेंडर्स तयार करायची. सिगारची जाहिरात करणारं कॅलेंडर तयार करण्याचं काम या कंपनीला मिळालं आणि ते काम आलं कुलीजकडं. कुलीजनं यावर जे काही काम केलं त्यामुळं त्या कॅलेंडरमधली चित्रं अजरामर झाली !!

ह्या कॅलेंडरसाठी त्यानं काही चित्रं काढली. या चित्रांमध्ये हातात सिगार असणारी आणि चेहऱ्यावर माणसांसारखे हावभाव असणारी कुत्री दिसत होती. यातल्या बहुतांश चित्रांमध्ये पोकर (पत्त्यांचा एक खेळ) खेळणारी कुत्री दिसत असल्यानं ही चित्रमालिका 'पोकर खेळणारी कुत्री' या नावानं ओळखली जाते. या मालिकेत एकुण १८ चित्रं असली तरी त्यातल्या फक्त ११ चित्रांमध्ये पोकर खेळणारी कुत्री दिसतात.

टेबलवर मांडलेला पत्त्यांचा डाव, भोवती गंभीर चेहरे करून खेळ खेळणारी कुत्री, दारूच्या बाटल्या, ग्लास हे सारं त्यानं चित्रांमध्ये इतकं परिणामकारकरित्या दाखवलंय की ही कॅलेंडर्स अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होऊन अक्षरश: घरोघरी पोहोचली. ही सारी चित्रं खूप गंमतीदार वाटायची. नंतरच्या काळातही ही चित्रं लोकांच्या टी-शर्टवर, घरांमध्ये दिवाणखान्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागली.

या मालिकेतली दोन खूप लोकप्रिय असणारी चित्रं आपण पाहणार आहोत. यातलं पहिलं चित्र आहे 'कसोटीक्षणीचा मित्र' (A friend in need). यात टेबलभोवती बसलेली एकूण कुत्री पत्ते खेळताना दिसतात. यात समोर आणि बाजूला असणारी पाच कुत्री मोठी कुत्री आहेत. पाठमोरी बसलेली दोन कुत्री छोटी आहेत. साऱ्या  कुत्र्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे गंभीर भाव आहेत. प्रत्येक कुत्र्याच्या समोर एक मद्याचा ग्लासही दिसतोय. सुंदर वातावरणनिर्मिती केल्याचं जाणवतं. यात पाठमोऱ्या बसलेल्या कुत्र्यांमध्ये चांगली मैत्री दिसते. यापैकी एक कुत्रा दुसऱ्याला पत्त्यातलं एक पान गुपचूपपणे कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं देताना दिसतोय !! चित्रमालिकेतलं सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेलं हे चित्र !!



सोबत दिलेल्या चित्रांतलं दुसरं चित्र आहे 'धाडसी थाप' (A bold bluff). यातला एक कुत्रा हातातल्या पत्त्यांवर एक धाडसी आणि खोटं वक्तव्य करतोय. पण त्याच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव आहेत. तो खोटं बोललेलं कुणाला समजलं तर त्याच्यावर डाव उलटू शकतो. पण आपल्या चेहऱ्यावर खोटं बोलत असल्याचा तो कसलाही हावभाव येऊ देत नाही. समोरची सारी कुत्री त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बारकाईनं पाहताना दिसतात !!



इतकी लोकप्रिय ठरलेल्या चित्रमालिकेच्या या चित्रकाराच्या घरात मात्र या चित्रांचं खुप कौतुक नव्हतं. कारण त्याच्या बायकोला आणि मुलीला कुत्र्यांपेक्षा मांजरंच आवडायची !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🌹https://mymodernmet.com/dogs-playing-poker-painting/
🌹https://www.artsy.net/article/artsy-editorial-painting-dogs-playing-poker-endured-100-years
🌹https://www.mentalfloss.com/article/64108/15-things-you-should-know-about-dogs-playing-poker
🌹https://www.1st-art-gallery.com/Cassius-Marcellus-Coolidge/Dogs-Playing-Poker.html
🌹https://www.nytimes.com/2002/06/14/nyregion/artist-s-fame-is-fleeting-but-dog-poker-is-forever.html
🌹https://en.wikipedia.org/wiki/Cassius_Marcellus_Coolidge
🌹http://www.hellenicaworld.com/Art/Paintings/en/CassiusMarcellusCoolidge.html

🍁Image Credit:
🌹Cassius Marcellus Coolidge [Public domain]

Saturday, February 8, 2020

बांधलेला प्रॉमिथियस

मुशाफिरी कलाविश्वातली

बांधलेला प्रॉमिथियस

इतिहासात आपल्याला बऱ्याचदा एका विशिष्ट प्रकारचे नायक भेटतात.  सामान्य लोकांवर अन्याय करत धनाढ्य बनलेल्या लोकांकडून हे नायक संपत्ती लुटतात आणि गरीबांमध्ये वाटून टाकतात. असं करताना ते कुठलाही धोका पत्करायलाही तयार होतात. असे नायक चोर/दरोडेखोर असले तरी ते सामान्य लोकांसाठी ते आदर्शच बनतात. ग्रीक पुराणात आपल्याला अशाच प्रकारचा एक 'प्रॉमिथियस' नावाचा नायक भेटतो.

प्रॉमिथियस शब्दाचा अर्थ होतो पुढचा (म्हणजे भविष्यातला) विचार करू शकणारा. त्याच्या भावाचं नाव असतं एपिमीथस. एपिमीथसचा अर्थ होतो (एखादी गोष्ट  घडून गेल्यावर) नंतर विचार करणारा. ग्रीक पुराणामधली प्रॉमिथियस ही एक चलाख व्यक्तिरेखा आहे. पुढं काय घडणार याचा तो चांगला विचार करू शकत असतो.

ग्रीक पुराणातील देवांचा राजा म्हणजे झ्यूअस. या झ्यूअसशी प्रॉमिथियसचे सुरुवातीला चांगले संबंध असतात. एका विशिष्ट युद्धानंतर झ्यूअस देवलोक आणि मनुष्यलोकांचा राजा बनतो आणि त्यानंतर तो मनुष्यलोकांना चांगली वागणूक देत नाही. प्रॉमिथियसला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मनुष्यलोकांवर होणार अन्याय त्याला सहन होत नाही. मनुष्यलोकांसाठी काहीतरी चांगले करण्याची तळमळ त्याला कायम असते.

प्रॉमिथियसला झ्युअस एकदा एक काम सांगतो. एका बैलाच्या मांसाचे २ भाग करायला सांगतो. एक  भाग माणसांच्या जेवणात जाणार असतो तर एक देवांच्या. प्रॉमिथियस या ठिकाणी चलाखपणा दाखवतो. माणूसजातीवर होणार अन्याय तो विसरलेला नसतो. तो एका भागात हाडे आणि त्याभोवती चरबी लपेटून ठेवतो. तर दुसऱ्या भागात मांस ठेवतो. झ्युअसला ही चलाखी लक्षात येत नाही. वाटा बिघडण्याची पहिली संधी अर्थातच झ्युअसला मिळते. तो पहिला भाग (हाडे + चरबी) निवडतो. माणसांना मांस मिळते. पण जेंव्हा झ्युअसला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येते तेंव्हा तो भयानक संतापतो. माणसांना शिक्षा देण्याचं तो ठरवतो. माणूसजातीकडून तो अग्नी काढून घेतो !! आता कुठलाच माणूस अग्नीचा वापर करू शकत नाही.

प्रॉमिथियसला ही गोष्ट मनाला लागते. प्रॉमिथियस अग्नी चोरून मनुष्यलोकांमध्ये आणतो. असं म्हणतात की ऑलिम्पिकमधली रिले स्पर्धा आणि सुरुवातीचा अग्निप्रज्वलनाचा कार्यक्रम यांची सुरुवात एक प्रकारे प्रॉमिथियसचा सन्मान करण्यासाठीच झाली.

मानवजातीला अग्नी मिळाल्याचं लक्षात येताच झ्युअस संतापतो. तो मानवजातीला आणि प्रॉमिथियसला शिक्षा देण्याचं ठरवतो. आधी त्याला मानवजातीला शिक्षा द्यायची असते. पँडोरा नावाच्या स्त्रीला एका बंद पेटीसह पृथ्वीवर पाठवतो. एपिमीथसला (प्रॉमिथियसचा भाऊ) तिच्याशी लग्न करायला सांगतो. त्यांचं लग्न होतं.  या बंद पेटीत काय असावं हा प्रश्न एपिमीथसला पडायचा. पँडोराला ती पेटी उघडायची असते. पुढं काय होणार हे जाणू शकणारा प्रॉमिथियस मात्र ही पेटी उघडायला कायम मनाई करत असतो. त्यामुळं एपिमीथस पेटी उघडायला नकार देत असतो. पण तो झोपलेला असताना ती पेटी उघडते आणि त्यातून रोगराई, द्वेष, गुन्हेगारी अशा प्रकारच्या साऱ्या वाईट गोष्टी पृथ्वीवर पसरतात. झ्युअसची मानवजातीला शिक्षा देण्याची योजना यशस्वी होते.

प्रॉमिथियसला मात्र मानवजातीला मदत केल्याबद्दल अमानुष शिक्षा मिळते. एका पर्वतावर त्याला साखळदंडांनी दगडाला बांधण्यात येतं. दररोज एक गरुड येऊन त्याचं यकृत खात असतो. (प्राचीन ग्रीकवासीयांची समजूत होती की माणसाच्या साऱ्या भावभावना यकृतात असतात.) पण प्रॉमिथियस अमर असतो. त्यामुळं तो मरत नसतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या यकृताची पूर्ववत वाढ होत असते आणि तो गरुड पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन त्याचं यकृत खात असतो. असं हजारो वर्षे चालतं. जगणं म्हणजे त्याच्यासाठी एक प्रकारे शाप होऊन जातो. लोकांसाठी धोका पत्करून काहीतरी केल्याबद्दलची अमानुष शिक्षा तो वर्षानुवर्षे भोगतो. पण शेवटी झ्युअसचा मुलगाच त्याला सोडवतो.

आपल्या या कार्यामुळंच प्रॉमिथियस मानवजातीसाठी खूप मोठा नायक बनला.

आपल्याला सोबतच्या चित्रात दिसतंय ते १७६२ मध्ये निकोलस ऍडम यानं बनवलेलं प्रॉमिथियसचं एक शिल्प. या शिल्पात आपल्याला प्रॉमिथियस बांधलेला दिसतोय तर त्याच्या यकृतावर गरुड चोच मारताना दिसतोय. या शिल्पाची गणना १८ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट शिल्पांमध्ये होते. ह्या शिल्पात प्रॉमिथियसच्या स्थितीमुळं, विशिष्ट प्रकारे दाखवलेल्या गरुडामुळं एक प्रकारची हालचाल जाणवते, शिल्पात जिवंतपणा जाणवतो.



हे शिल्प सध्या पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध लूर कलासंग्रहालयात आहे .

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🌹 https://www.britannica.com/topic/Prometheus-Greek-god
🌹 https://www.greekmyths-greekmythology.com/prometheus-fire-myth/
🌹 https://en.wikipedia.org/wiki/Prometheus
🌹 https://www.ancient.eu/Prometheus/

🍁Image Credit:
🌹 https://commons.wikimedia.org/wiki/File:Prometheus_Adam_Louvre_MR1745_edit_atoma.jpg

Saturday, February 1, 2020

कोणार्कमधली सूर्याची मूर्ती


मुशाफिरी कलाविश्वातली

कोणार्कमधली सूर्याची मूर्ती

भारतात सूर्यदेवाची मूर्तिरूपात पूजा कधी आणि कशी सुरू झाली याविषयी जाणकार मंडळींचं एक विशिष्ट मत आहे. पूर्वीच्या काळी इराणमध्ये अग्नीची पूजा करणारे आणि सूर्याची पूजा करणारे असे वेगवेगळे पंथ होते. या दोन पंथांमध्ये काही कारणानं तंटे होऊ लागले. यात सूर्याची पूजा करणाऱ्या आपला देश सोडून द्यावा लागला. ह्या लोकांचा पंथ 'मग' या नावानं ओळखला जायचा. त्यानंतर हे लोक भारतात आले. ह्या लोकांनी इथं आल्यावर सूर्याच्या पूजेला सुरुवात केली. आणि मग भारतात सूर्याच्या मूर्तिरूपातील पूजेला सुरुवात झाली !! नेमकं ह्याच कारणामुळं इतर मूर्त्यांमध्ये न आढळणारी एक गोष्ट सुरुवातीच्या काळातल्या सूर्याच्या मूर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे सूर्याच्या पायातील पादत्राणे. आपल्याकडं मंदिरात चप्पल घालून जाण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मंदिरातल्या देवांच्या मूर्त्यांमध्येही चप्पल दिसत नाहीत. पण सुरुवातीच्या काळातल्या सूर्यदेवाच्या मूर्त्यांमध्ये सूर्यदेवाच्या पायात बूट दिसतात. देवीदेवतांच्या मूर्त्यांमध्ये पायात बूट दाखवण्याचा प्रकार प्राचीन इराणमध्ये चालायचा.

एकदा सूर्याची मूर्तिरूपात पूजा करायला सुरुवात झाल्यावर सूर्याची मंदिरंही बनू लागली. आजच्या पाकिस्तानमधल्या मुल्तानमध्ये अत्यंत प्राचीन असणारं एक सूर्य मंदिर होतं. कृष्णाचा मुलगा सांब यानं हे मंदिर बांधलं होतं असं मानलं जातं. हे मुलतान आधी काश्यपपूर नावानं ओळखलं जायचं. इ स पु ५१५ मध्ये या काश्यपपूरमध्ये आलेल्या एका ग्रीक नौदल अधिकाऱ्यानं या मंदिराचा केलेला उल्लेख आढळतो. इ स ६४१ इथं आलेला चिनी प्रवासी हुआन त्सांग यानं लिहिल्याप्रमाणं इथली मूर्ती शुद्ध सोन्याची होती. मूर्तीचे डोळे माणिक वापरून बनवले होते. मंदिराची दारं, खांब आणि शिखरं यात भरपूर प्रमाणात सोनं, चांदी आणि मौल्यवान खडे वापरण्यात आले होते !!

सूर्याचं आजच्या काळात सर्वात प्रसिद्ध असणारं मंदिर म्हणजे कोणार्कचं सूर्यमंदिर. या सूर्यमंदिरातली गाभाऱ्यातली सूर्याची मूर्ती सध्या दिल्लीमधल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालायात आहे. सोबत दिसणारी सूर्याची मूर्ती ती हीच. मंदिरातल्या मूर्त्या सुरक्षेसाठी आणि चांगली देखभाल होण्यासाठी पूर्वी अशा प्रकारे हलवण्यात आल्या होत्या.


या मूर्तीत आपल्याला बरीचशी बारीक कलाकुसर पाहायला मिळते. बारकाईनं पाहिलं तर सूर्यानं एक प्रकारचं चिलखतासारखं काहीतरी कवच धारण केलेलं दिसतं. तसंच पायामध्ये बूटही दिसतात. सूर्याच्या मुख्य मूर्तीशिवाय बाजूला २ पुरुषांची शिल्पं दिसतात. हे दोघं दंड आणि पिंगळ असल्याचं मानलं जातं. सूर्याच्या मूर्तीमध्ये सूर्याच्या हातात नेहमी कमळाची फुले दाखवली जातात. मूर्तीचे हात तुटल्यामुळं आता फक्तच कमळाची फुलं दिसतात. सूर्य नेहमी रथात बसलेला दाखवला जातो. बहुतेक वेळा सात अश्व रथ ओढतात. या मूर्तीतही आपल्याला सात घोडे सूर्याचा रथ ओढतांना दिसतात. रथाचा सारथी अरुण पुढं बसलेला दिसतो. सूर्याच्या बाजूला दिसणाऱ्या स्त्रिया छाया आणि सुर्वछासा असल्याचं मानलं जातं. वीणा वाजवणारे, फुलांचा वर्षाव करणारे गंधर्वही यात पाहायला मिळतात. मूर्तीमध्ये सूर्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे मंदस्मित जाणवते.

वेगवेगळ्या संस्कृत ग्रंथांमध्ये सूर्याच्या मूर्तीमध्ये घडवण्याचे तपशील वेगवेगळे दिसतात. वराहमिहीरच्या बृहतसंहिता या ग्रंथामध्ये लिहिलंय की सूर्याच्या मूर्तीला दोन असावेत, डोक्यावर मुकुट असावा. याच्या विरुद्ध विष्णू धर्मोत्तर ह्या ग्रंथात लिहिण्या की सूर्याच्या मूर्तीला चार हात असावेत. या चार हातांपैकी दोन हातात कमळाची फुलं असावीत. वराहमिहिरची बृहत संहिता असो किंवा विष्णुधर्मोत्तर, या दोन्ही ग्रंथात अरुण सूर्याचा सारथी असल्याचं लिहिलंय.

एकूण बारा महिन्यांमध्ये सूर्य वेगवेगळ्या बारा रूपांमध्ये दिसतो. एकूण बारा आदित्य आहेत असं मानून सूर्याची बारा नावं ठरवली गेली आहेत. वेगवेगळ्या ग्रंथात ही नावं वेगवेगळी आहेत. पण सर्वसाधारणपणे धात्री, मित्र, आर्यमन, रुद्र, वरूण, सूर्य अशी काही नावं साऱ्या ग्रंथात समान दिसतात. विश्वकर्माशास्त्र या ग्रंथात सूर्याच्या कोणत्या रूपातल्या मूर्तीच्या हातात काय दाखवायचं याविषयी तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत.

पायातल्या बुटांमुळं सूर्याची मूर्ती मात्र इतर मूर्त्यांपेक्षा वेगळी ठरते !!

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ :

🌹 Elements of Hindu Iconography – By T A Gopinatha Rao (The law printing house, Madras – 1914)
🌹 http://nationalmuseumindia.gov.in/prodCollections.asp?pid=30&id=2&lk=dp2
🌹 https://www.booksfact.com/archeology/5000-years-old-multan-sun-temple-pakistan.html
🌹 https://en.wikipedia.org/wiki/Surya

🌷Image Credit: