Tuesday, January 29, 2019

माणसाचं आयुष्य

ओळख कलाकृतींची

माणसाचं आयुष्य

जॅन स्टीन हा सतराव्या शतकातला एक विख्यात डच चित्रकार. त्याची बरीचशी चित्रं दैनंदिन आयुष्यातलं चित्रण करणारी असायचीत. पण, त्यातून तो काहीतरी संदेश द्यायचा. त्याचं 'आनंदी कुटुंब' हे चित्र आपण पूर्वी पाहिलंय. जॅनचं एक गाजलेलं चित्र होतं 'माणसाचं आयुष्य'. सर्वसाधारण १६६५ च्या दरम्यान त्यानं हे चित्र काढलं.



माणसाचं अायुष्य नाट्यमय घटनांनी भरलेलं असतं. म्हणूनच आयुष्याला बऱ्याचदा रंगभूमीची उपमा दिली जाते. चित्रकारानं या चित्रात माणसाच्या आयुष्याचं चित्रण करताना एक रेस्टाॅरंटमधलं दृश्य दाखवलं असलं तरी बाहेर अशा तऱ्हेनं पडदा दाखवलाय की हे रेस्टाॅरंट एखाद्या रंगभूमीवर असल्याचा भास होतो.
या 'रंगभूमी'वर आपल्याला माणसं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमून गेलेली दिसतात. यात आपल्याला लहान मुलंही खेळण्यात दंग झालेली दिसतात. चित्रात मागच्या बाजूला काही लोक टेबलवर त्या काळात लोकप्रिय असणारा एक खेळ खेळत आहेत. 

मध्यभागी एक माणूस गिटार वाजवताना दिसतोय, तर त्याच्या बाजूला बसलेला लठ्ठ माणूस संगीतात रममाण झालेला दिसतोय. लठ्ठ माणसाच्या शेजारी एक स्त्री बसली आहे. समोर जेवणाची प्लेट असली तरी तिच्या बाजूला बसलेल्या हातात गिटार असणाऱ्या माणसाच्या गाण्यात ती रमली आहे. हा गिटारवाला माणूस आपल्याला पाठमोरा दिसतोय. चित्रातल्या मध्यभागी असणाऱ्या गिटारवादकाच्या समोर एक वृध्द माणूस एका स्त्रीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. चित्रात डाव्या बाजूला खिडकीजवळ एक पुरूष आणि स्त्री विनोदगप्पांमध्ये मग्न दिसतात.

एकूणच चित्रातली सारी मंडळी चविष्ट जेवण, गप्पा, प्रितीचेष्टा (flirting), विनोद, संगीत, खेळ यामध्ये रमून गेलेले दिसतात. चित्रकाराच्या मते हेच माणसाचं आयुष्य आहे का? त्यानं या चित्रात सहजासहजी न लक्षात येणारा, पण माणसाच्या आयुष्यावरचं भाष्य सुचवणारा एक  धागा (clue) दिलाय. चित्रातल्या डाव्या बाजूच्या खिडकीवर एक माळा आहे. त्यात एक मुलगा बुडबुडे उडवतोय आणि  त्याच्या बाजूला एक कवटी आहे. बुडबुड्यांची खासियत म्हणजे ते मनमोहक दिसतात. पण एखाद्या क्षणी ते असं काही नाहीसे होतात की जणू काही त्यांना कधीच अस्तित्व नव्हते. मुलाच्या बाजूला असणारी कवटी माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणारा मृत्यू दर्शवते.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
https://www.wga.hu/html_m/s/steen/page2/life_man.html
https://mydailyartdisplay.wordpress.com/2011/08/26/the-life-of-man-by-jan-steen/
https://www.mauritshuis.nl/en/explore/the-collection/artworks/the-life-of-man-170/

Saturday, January 26, 2019

ध्यानस्थ तत्वज्ञ

कुतूहल कलाविश्वातलं

ध्यानस्थ तत्वज्ञ

जगविख्यात चित्रकार रेंब्राँ यानं हे चित्र १६३२ मध्ये काढलं. या चित्राचं नाव आहे 'ध्यानस्थ तत्वज्ञ'.

चित्राकडं पाहण्यापूर्वी आपण या काळात तत्वज्ञ हा शब्द कोणकोणत्या अर्थानं वापरला जायचा ते पाहू. माणसाच्या अवस्था, अस्तित्वाविषयीचे प्रश्न हे तर तत्वज्ञान या प्रकारात यायचंच, पण या शिवाय त्या काळात 'natural philosophy' नावाचा एक प्रकार होता. या शब्दाचा अर्थ आहे निसर्गाचा किंवा विश्वाचा अभ्यास. आधुनिक काळातल्या विज्ञानाची ही एक प्रकारे सुरुवात होती.


सोबतच्या चित्राला चित्रकारानं नाव दिलंय "Philosopher in meditation". या चित्रात त्यानं चित्राच्या जवळपास मध्यभागी एक वृद्ध तत्वज्ञ दाखवलाय. त्याच्या टेबलवर काही कागदही आहेत. पण तो काहीतरी विचारात पूर्णपणे बुडून गेलाय. चित्रामधली प्रकाशयोजना अशी काहीतरी आहे की आपल्याला या वृद्धाजवळ प्रकाश जाणवतो. प्रकाश हे अर्थातच ज्ञानासाठी प्रतीक म्हणून वापरलं जातं. वृद्ध खिडकीजवळ बसला असला तरी घराची भिंत जाड आहे. एक प्रकारे बाहेरच्या दुनियेच्या कलकलाटापासून त्याच्यामध्ये अंतर आहे. खोलीतल्या भिंती ओबडधोबड आहेत. त्यावर कसलीही सजावट नाही. जमिनीवर फरशीच्या ठिकाणी दगड दिसतात. विलासी जीवनापासून हा वृद्ध खूपच अलिप्त असल्याचं जाणवतं.  विचार करण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी आवश्यक असणारं शांत वातावरण सोडून ह्या वृद्धाला दुसऱ्या कशातही रस दिसत नाही. आणि त्याला हवं ते वातावरण त्याला मिळालेलं आपल्याला ह्या चित्रात दिसतं.

चित्राच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात आपल्याला एक वृद्ध स्त्री दिसते.  ही वृद्ध स्त्री मात्र काहीतरी सांसारिक गोष्टींमध्ये मग्न दिसते. कदाचित ती जेवण बनवत आहे असं दिसतंय.

चित्रकारानं या चित्रात कुतूहल वाढवणाऱ्या दोन गोष्टी दाखवल्या आहेत. त्या वृद्ध माणसाच्या मागच्या भिंतीवर आपल्याला कमान असणारे एक छोटेसे दार दिसते. ते उघडल्यावर आत काय असावे? तो काळ लक्षात घेतला तर असं वाटतं की कदाचित हा वृद्ध किमयागार (alchemist) असावा. ह्या किमयागार मंडळींच्या अशा प्रयोगशाळाही असायच्या.

चित्रातली कुतूहल वाढवणारी दुसरी गोष्ट म्हणजे वर जाणारा जिना!हा वृद्ध वर जाऊन आकाशातल्या ग्रहताऱ्याचा अभ्यास करणारा खगोलशास्त्रज्ञ तर नसावा ?

या चित्राचा आकार २८ सेमी X ३४ सेमी इतका आहे. हे चित्र सध्या पॅरिसमधल्या लूर वस्तुसंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

http://grandearte.net/rembrandt/philosopher-meditation

https://beautyofbaroque.wordpress.com/2014/07/20/the-philosopher-in-meditation-by-rembrandt-van-rijn-1632/

Monday, January 21, 2019

निवडुंग प्रेमी

ओळख कलाकृतींची

निवडुंग प्रेमी

एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेला एक महत्वाचा जर्मन चित्रकार म्हणजे कार्ल स्पिट्झवेग. चित्रकलेमधल्या तंत्रांपेक्षा चित्रांच्या विषयांमुळं त्याची चित्रं गाजली. त्याच्या जवळपास प्रत्येक चित्रात काहीतरी satire असायचं. वास्तववाद (realism), कल्पनाविलास (fancy) आणि विसंगतीतून होणारा विनोद (humour) यांचं अजब मिश्रण त्याच्या चित्रांमध्ये असायचं. त्याच्या चित्रात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातल्या जर्मनीमधल्या शहरांची दृश्यं बघायला मिळतात.

त्याचं एक प्रसिद्ध चित्र म्हणजे 'निवडुंग प्रेमी'. या चित्रात आपल्याला त्या काळातल्या एका कचेरीमधलं एक दृश्य बघायला मिळतं. एक वयोवृद्ध कर्मचारी खिडकीजवळच्या निवडुंगाच्या रोपट्याकडं प्रेमानं पाहताना दिसतोय. निवडुंगाचं रोपटं सूर्यप्रकाशाच्या दिशेपेक्षा त्याला प्रेमानं वाढवणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या दिशेनं झुकलेलं दिसतंय. त्याला फुलंही आलंय. सकाळी उशीरचा वेळ झालाय आणि या कर्मचाऱ्यानं कामातून एक ब्रेक घेतलाय. भिंतीवर घड्याळ आहे. भिंतीच्या बाजूला काम पूर्ण झालेले दस्तावेजांचे गठ्ठे आहेत तर अजून काम बाकी असलेले दस्तावेजांचे गठ्ठे खोलीत दिसतात.

चित्रातलं घड्याळ पुढं सरकणारा काळ दाखवतो. कर्मचाऱ्याच्या आयुष्यातून निघून गेलेल्या काळाची आठवण हे घड्याळ करून देतं. निवडुंग हे रुक्ष वाळवंटाची आठवण करून देणारं रोपटं. पण या रोपट्याला तांबड्या रंगाचं फुल आलेलं दिसतंय. ज्याप्रकारे तो कर्मचारी फुललेल्या निवडुंगाकडं पाहतोय, त्यातून त्या कर्मचाऱ्याला त्याच्या रूक्ष आयुष्यातही बहर येण्याची असणारी आशा सूचित होते.



- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
https://artsandculture.google.com/asset/the-cactus-lover/6AGI3v9hQ4R2kg
http://www.thefamousartists.com/carl-spitzweg

Sunday, January 20, 2019

सिंहासारख्या चेहऱ्यांचं रेखाटन

कुतूहल कलाविश्वातलं

सिंहासारख्या चेहऱ्यांचं  रेखाटन

प्राचीन ग्रीसमध्ये एक गंमतीदार  शास्त्र होतं. खरं तर त्याला शास्त्र म्हणणं चुकीचं होईल...या शास्त्राप्रमाणं एखादी व्यक्ती कशी दिसते, (विशेषतः चेहरा कसा दिसतो) यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आडाखे बांधण्यात येत. याला physiognomy म्हणतात. हा सारा प्रकार आजच्या काळात अशास्त्रीय मानण्यात येतो. प्राचीन ग्रीसमध्ये ह्या physiognomy वर लोकांचा विश्वास असला तरी मध्ययुगात मात्र तो एक वादग्रस्त विषय बनला.

सतराव्या शतकात होऊन गेलेल्या एका फ्रेंच चित्रकारानं या विषयावर काम केलं. त्याचं नाव चार्ल्स ली ब्रून. हा चित्रकार चौदाव्या लुईच्या दरबारात चित्रकार म्हणून काम करायचा. चौदाव्या लुईनं तर त्याला 'आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ फ्रेंच कलाकार' म्हणून जाहीर केलं होतं.

या ब्रूनला physiognomy मध्ये विशेष रस होता. १६७१ मध्ये 'Royal Academy of Painting and Sculpture' ( रॉयल अकॅडमी ऑफ पेंटिंग अँड स्क्लप्चर) मध्ये त्यानं याच विषयावर एक व्याख्यान दिलं. वेगवेगळ्या भावनांमुळं मानवी चेहऱ्यामध्ये नेमके काय बदल होतात याविषयी त्यानं इथं आधी व्याख्यानं घेतली होती. पण physiognomy वर त्यानं १६७१ मध्ये पहिल्यांदाच व्याख्यान दिलं. या व्याख्यानात त्यानं मांडलेल्या विचारांपैकी काही भाग आज छापील स्वरूपात उपलब्ध आहे.

चार विशेष मुद्द्यांवर त्यानं भर दिला होता. सुप्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या चेहऱ्याची वैशिष्ट्यं यातला संबंध हा यातला एक महत्वाचा मुद्दा होता. त्यानं मानवी चेहऱ्याच्या वैशिष्टयांची प्राण्याच्या चेहऱ्याच्या वैशिष्टयांशी केली होती. यात डोळे, भुवया आणि मेंदू यांवर त्यानं भर दिला होता.

फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध लूर या वस्तुसंग्रहालयात या चित्रकाराचे या विषयावरच्या रेखाटनांचे २ अल्बम आहेत. यात मानवी आणि प्राण्यांच्या चेहऱ्याची तुलना करणारी जवळपास अडीचशे रेखाटनं आहेत.  सोबत दिलेलं रेखाटन हे त्यापैकी एक. यात सिंहाशी साधर्म्य असणारे मानवी चेहरे दाखवले आहेत.





- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.louvre.fr/en/oeuvre-notices/relationship-human-figure-lion
https://en.wikipedia.org/wiki/Charles_Le_Brun

Monday, January 14, 2019

भूगोलाचा पाठ

ओळख कलाकृतींची

भूगोलाचा पाठ

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रान्समध्ये एक 'बॉयली' नावाचा चित्रकार होऊन गेला. त्यानं फ्रान्समधल्या त्या वेळच्या मध्यमवर्गीय समाजातल्या दैनंदिन जीवनातले प्रसंग दाखवणारी बरीचशी चित्रं काढली. या चित्रांमुळेच तो प्रसिद्ध झाला.

'भूगोलाचा पाठ' हे त्याचं एक गाजलेलं चित्र. त्यानं हे चित्र काढलंय १८१२ मध्ये. त्या वेळच्या फ्रान्सच्या प्रशासनात 'गॉड्री' नावाचा माणूस महत्वाच्या पदावर काम करायचा. गॉड्री आणि ह्या चित्राचा चित्रकार यांचे घनिष्ट संबंध होते. हा चित्रकार बऱ्याचदा गॉड्रीच्या घरी जायचा तेंव्हा गॉड्री आपल्या मुलीला भूगोल शिकवताना दिसायचा.

असाच एक प्रसंग या चित्रात दाखवला गेलाय.  चित्रकारानं या चित्रात गॉड्री आणि त्याची मुलगी यांना चित्रित केलंय. चित्रात वडील आपल्या मुलीला भूगोलाचे पाठ देताना दिसत आहेत. टेबलवर आपल्याला काही पुस्तकं दिसतात. एका बाजूला पृथ्वीचा गोलही दिसतोय - त्यामध्ये आपल्याला युरोप आणि आफ्रिका दिसत आहेत. टेबलवर खूप सारे नकाशे दिसत आहेत. अगदी जवळून पाहिल्यास आपल्याला यातल्या सर्वात खाली असणाऱ्या नकाशावर 'स्फिन्क्सचा पिरॅमिड' दिसतो. वडीलांचं नकाशावर काहीतरी काम चालू असताना मुलगी मागे उभी आहे. वडील काय करताहेत याकडं तिचं लक्ष आहे. 

गॉड्रीच्या घरी असणारं कुत्रंही चित्रकारानं या चित्रात दाखवलंय. हे कुत्रं आपल्या भुंकण्यामुळं बरंच प्रसिद्ध होतं. या कुत्र्याच्या भुंकण्यामुळं एकदा चोरांनाही पळून जावं लागलं होतं !! गॉड्री बसलेल्या खुर्चीचे हात आणि या कुत्र्याचा चेहरा बराचसा एकसारखा आहे. तसंच खुर्चीचे पाय आणि कुत्र्याचे पाय बरेचसे एकसारखे आहेत.

हे चित्र काढलं गेलं तेव्हा फ्रान्समध्ये नेपोलिअनचं राज्य होतं. मुलामुलींना शिक्षणात भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी या काळात खूप प्रोत्साहन दिलं जायचं. नेपोलिअननं जिंकलेल्या नवीन प्रदेशाबरोबर भूगोलाचीही सुधारित आवृत्ती यायची !!
१७९८ ते १८०१ च्या दरम्यान नेपोलिअननं इजिप्तची मोहीम हाती घेतली होती. त्याचा संबंध या चित्राशी जोडला जातो. 


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.kimbellart.org/collection/ap-199001

https://en.wikipedia.org/wiki/Louis-L%C3%A9opold_Boilly

Sunday, January 13, 2019

डेल्फीमधला रथचालक

कुतूहल कलाविश्वातलं

डेल्फीमधला रथचालक

प्राचीन ग्रीसमध्ये अनेक स्पर्धा चालायच्या. त्यापैकी लोकप्रिय असणारी एक म्हणजे रथांची शर्यत. सर्वसाधारण इ. पु. सातव्या शतकात ग्रीसमध्ये मानाच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये रथांच्या शर्यतीचा समावेश करण्यात आला. यामध्ये रथाला २ किंवा ४ घोडे असायचे. या शर्यतीत भाग घेणं हे अगदीच जोखमीचं काम असायचं. बऱ्याचदा या रथचालकांना गंभीर इजा व्हायची. कधी कधी त्यांचा या स्पर्धेतच दुर्दैवी अंत व्हायचा  ही स्पर्धा फक्त रथचालकांसाठी नव्हे तर घोड्यांसाठीही धोक्याची असायची.

फक्त आॅलिंपीकच नव्हे तर अशा अॅथलेटिक स्पर्धा बऱ्याच ठिकाणी चालायच्या. डेल्फीमध्ये अशीच एक शर्यत जिंकलेल्या एका रथचालकाचं शिल्प इ पू पाचव्या शतकात बनवलं गेलं. सिसीलीच्या राजानं हे काम करायला सांगितलं होतं. एका भव्य वास्तूचा हे शिल्प एक भाग होतं. मुळ शिल्पात रथचालक, रथ आणि घोडेही होते. आज त्यातला रथचालक उपलब्ध आहे.

हे शिल्प ग्रीसच्या अभिजात कलेच्या सुरूवातीच्या काळात येतं. पाश्चिमात्य कलेच्या इतिहासात हे शिल्प खूप महत्वाचं मानलं जातं. हे शिल्प चांगल्या प्रकारे जतन करण्यात आलंय. हे शिल्प कास्याचं आहे. शर्यत जिंकल्यानंतर हा रथचालक प्रेक्षकांना आपल्या रथ आणि घोड्यांसहित अभिवादन करतोय. इतकी लोकप्रिय आणि धोक्याची स्पर्धा जिंकूनही या रथचालकाच्या चेहऱ्यावर आवेश दिसत नाही आहे. त्याच्या स्वभावातला विनम्रता, भावनांचं नियंत्रण दिसतं. त्यामुळं या शिल्पात एक प्रकारे त्याच्या शारीरिक सौंदर्याबरोबर मानसिक सौंदर्यही दिसून येतं.

या कास्यशिल्पात रथचालकाचे ओठ आणि पापण्या मात्र तांब्याच्या बनवल्या आहेत. डोक्याची पट्टी चान्दीची बनली आहे. काळ्या आणि चमकदार असणाऱ्या अशा एका प्रकारच्या काचेसारख्या एका प्रकारच्या नैसर्गिक द्रव्यापासून डोळे बनवलेत. हा चालक सरळ उभा असल्यानं त्यात एक प्रकारची स्थिरता भासते. 


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.ancient-greece.org/art/chiarioteer.html

https://en.wikipedia.org/wiki/Chariot_racing

https://youtu.be/A-Q79HlORtM

Tuesday, January 8, 2019

ऑर्फिअसचं मस्तक घेतलेली मुलगी

ओळख कलाकृतींची

ऑर्फिअसचं मस्तक घेतलेली मुलगी


ग्रीक पुराणात ऑर्फिअसचं स्थान खास आहे. तो दैवी संगीतकार आहे. माणसंच काय त्याच्या संगीताची जादू प्राण्यांवरही चालते. त्याची आणि युरिडीस (त्याची पत्नी) यांची कथा विलक्षण आहे. तिच्या मृत्यूनंतर तिला स्वर्गातून परत आणण्यासाठी त्यानं केलेल्या प्रयत्नांची गोष्ट प्रसिध्द आहे. आणि त्यावर बऱ्याच कलाकारांनी चित्रं काढली.

त्याच्या मृत्यूविषयी बरीच कथानकं आहेत. त्यापैकी एक कथा अशी काहीतरी आहे:  या कथेनुसार, ज्या संगीतामुळं ऑर्फिअसनं साऱ्या लोकांना मंत्रमुग्ध केलं तेच संगीत त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. अनेक स्त्रिया त्याच्यावर लुब्ध झाल्या होत्या. युरिडीसच्या मृत्यूनंतर त्यांनी ऑर्फिअसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीच्या मृत्यूनंतरही ऑर्फिअस तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नव्हता. जवळीक साधण्यात असफल ठरलेल्या त्या स्त्रिया मत्सरानं आणि क्रोधानं वेड्या झाल्या. त्यांनी ऑर्फिअसला ठार केलं. ऑर्फिअसचं नदीत टाकलेलं मस्तक मात्र गातच राहिलं. पुराणकथेप्रमाणं हे मस्तक समुद्रात जाऊन मिळालं. 

पण चित्रकारानं इथं सर्जनशीलता दाखवत एक वेगळी कल्पना मांडली आहे. त्यानं चित्रात दाखवल्याप्रमाणं एका मुलीनं त्याचं मस्तक आणि वाद्य नदीतून उचलून घेतलं आहे. ऑर्फिअसच्या झालेल्या दुर्दैवी अंताबद्दल दोघंही डोळे मिटून एक प्रकारे चिंतन करत आहेत. चित्रामध्ये हा विचार टाकणारा प्रसंग चालू असतानाच पार्श्वभूमीला शांत, नयनरम्य निसर्गाचं दृश्य आहे. यात चित्राच्या डाव्या, वरच्या कोपऱ्यात काही मुलं संगीत वाजवताना दिसत आहेत. तर उजव्या खालच्या कोपऱ्यात कासवं दाखवली आहेत. ऑर्फिअस जे वाद्य वाजवायचा (जे आपल्याला चित्रातही दिसतंय) त्याला 'लायर' म्हणतात. ग्रीक पुराणकथेप्रमाणं पहिलं लायर बनवताना कासवाच्या कवचाचा वापर केला गेला होता. 



या चित्राचा चित्रकार आहे गुस्टाव मोऱ्यु. हा फ्रेंच चित्रकार प्रतीकात्मक चित्रं काढण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यानं हे चित्र १८६५ मध्ये काढलंय.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:


https://artsandculture.google.com/asset/orpheus/dAFxzrkQpFJilw

ग्रीकपुराण - सुप्रिया सहस्त्रबुद्धे

Saturday, January 5, 2019

सॅम्युएल माॅर्सचं एक चित्र

कुतूहल कलाविश्वातलं

सॅम्युएल माॅर्सचं एक चित्र

सॅम्युएल माॅर्स ओळखला जातो तो त्याच्या तारायंत्राच्या (telegraph) संशोधनामुळं. एकाच तारेतून संदेश पाठवण्याची पद्धत त्यानं शोधून काढली. टिंब आणि रेघ यांचा वापर करून त्यानं तयार केलेला माॅर्स कोड (Morse code) आजही संदेश पाठवण्यासाठी वापरला जातो. त्याचं संशोधन संदेशवहनाच्या क्षेत्रात अर्थातच क्रांतिकारक ठरलं.

या माॅर्सच्या व्यक्तिमत्वाला दुसरी एक महत्वाची बाजू होती. तो एक उत्कृष्ट चित्रकार होता. त्याला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याच्या वडिलांना त्याचं चित्रकलेत रस घेणं बिलकुल पसंत नव्हतं. पण तरीही त्यानं चित्रकार होण्याचाच निर्णय घेतला !! पण कलेसारखीच त्याला विज्ञानाचीही आवड असल्यानं त्याचं विज्ञानाविषयीचं प्रेम मध्ये मध्ये उफाळून येई.

सुरूवातीच्या काळात त्याला व्यक्तिचित्रं काढायच्या बऱ्याच आॅर्डर्स मिळायच्या. नंतरच्या काळातही त्यानं बरीच चित्रं काढली, पण त्याची आर्थिक परिस्थिती फारशी सुधारली नाही. त्यानं शेवटी चित्रकलेला रामराम ठोकला. त्यानं काढलेलं शेवटचं चित्र आपण बघूया. हे चित्र काढताना त्याचं तारायंत्रावरचं काम चालू होतं.       

ग्रीक पुराणांमध्ये कलेच्या (किंवा विज्ञानाच्या) देवतांना म्यूज (muse) म्हणतात. ह्या चित्रात त्यानं एक म्यूज रंगवली आहे. त्यानं चित्रकलेच्या देवतेला मानवी रूपात दाखवलंय. खरंतर चित्रात म्यूजच्या रूपात दाखवलेली मुलगी म्हणजे माॅर्सची थोरली कन्या सुझान आहे. चित्रातल्या मुलीनं स्केचबुक आणि पेन्सिल घेतली आहे. आणि ती कसल्यातरी विचारात गढून गेल्यानं शून्यात बघत आहे. हे चित्र वास्तववादी शैलीत काढलेलं आहे. चित्राचा आकार १८७.३ सेमी x १४६.४ सेमी असा आहे. हे चित्र १८३६-३७ च्या दरम्यान काढण्यात आलं. त्यानं हे चित्र १८३७ मध्ये नॅशनल अॅकेडमी आॅफ डिझाईनमध्ये प्रदर्शित केलं आणि तिथं त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.metmuseum.org/art/collection/search/11605
संवाद - अच्युत गोडबोले

Tuesday, January 1, 2019

ग्रामीण विवाह

ओळख कलाकृतींची

ग्रामीण विवाह

जवळपास २०० वर्षांपूर्वी होऊन गेलेला जॉन लुईस क्रेमेल हा चित्रकार जन्मानं जर्मन होता. पण त्यानं आपलं सारं आयुष्य अमेरिकेत घालवलं. आपल्या चित्रांमध्ये दैनंदिन जीवन दाखवणारा हा पहिलाच अमेरिकन चित्रकार मानला जातो. त्याचं 'ग्रामीण विवाह' (country wedding) आज आपण जवळून बघू.

१८१० च्या दशकातलं अमेरिकेमधल्या एका बऱ्यापैकी चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीच्या विवाहाचं एक दृश्य चित्रकारानं ह्या चित्रात दाखवलंय. चित्रामध्ये उजवीकडून दुसरी दिसणारी तरुणी वधू आहे तर तिच्या डाव्या बाजूला असणारा तरुण वर आहे.

वधूचे कपडे (वेडिंग गाऊन) जवळपास घोट्यापर्यंत आहेत. श्रीमंत मुली लग्नामध्ये काही मीटर लांबी असणारा (मागे जमिनीवर लोळत जाणारा) गाऊन वापरत. जमिनीवर न लोळणारे गाऊन शेतकऱ्याच्या मुलींसाठी लग्नानंतरच्या वापरासाठीही योग्य ठरायचे. असे कपडे लग्नानंतरच्या काळात रविवारी चर्चमध्ये जाताना वापरले जायचे. चित्रातल्या वधूनं परिधान केलेला गाऊन पांढऱ्या रंगाचा आहे. पण त्या काळात वेगवेगळ्या रंगाचे गाऊन लग्नामध्ये वधू परिधान करायच्या. चित्रामध्ये वधू पटकन ओळखून येण्यासाठी तिच्यासाठी अशा रंगाचे कपडे निवडले असावेत असं मानण्यात येतं.

चित्रात सर्वात उजव्या बाजूला दिसतीये ती स्त्री आहे bridesmaid. ही bridesmaid वधूला विवाहाच्या दिवशी सतत साथ देते. तिने वधूच्या उजव्या हाताचा हातमोजा पकडला आहे. वधूनं उजव्या हातात वराचा हात घेतला आहे आणि वराचा एक हात तिच्या खांद्यावर आहे. हे कृत्य त्याकाळातही चांगलं / सुसंस्कृत वर्तनाचं मानलं जायचं नाही !!

वर आणि वधू यांच्या मागं भिंतीवर पिंजऱ्यामध्ये दिसणारे पक्षी lovebirds असावेत असं मानण्यात येतं. हे lovebirds प्रेमाचं, वचनबद्धतेचं प्रतीक असतात. (किंवा ते पक्षी आनंद आणि शांती यांचं प्रतीक असणाऱ्या पांढऱ्या कबूतरांचं (doves) असावेत असंही काहींचं मत आहे)  bridesmaid च्या मागच्या कपाटावर एक मांजर बसलंय तर खोलीत पुढच्या बाजूला एक कुत्रं बसलेलं दिसतंय. ह्या चित्रकाराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यानं आपल्या प्रत्येक चित्रात किमान एक तरी प्राणी दाखवलाय !! चित्रातल्या लहान मुलाच्या हातात आपल्याला भोवऱ्याची दोरी दिसतीये. खोलीत दिसणारं फर्निचर, खोलीतली सजावट, लोकांचे कपडे हे सारं कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी जवळपास असंच असायचं.

वधू आणि वर यांच्या डाव्या बाजूला दिसणारा, हातामध्ये छोटंसं पुस्तक घेतलेला वृद्ध माणूस म्हणजे त्यांच्या विवाहाचा धार्मिक विधी पार पाडणारा त्यांच्या धर्मातला क्लर्जीमॅन. तो आताच आलेला दिसतो. त्याची टोपी, काठी, पिशवी वगैरे चित्रातल्या डावीकडच्या खुर्चीवर ठेवलेले दिसतात.

चित्रामध्ये हिरवा कोट घालून  खुर्चीवर बसलेला माणूस वधूचा पिता आहे. त्याच्या बाजूला बसलेली काहीशी उदास असणारी स्त्री म्हणजे वधूची आई. त्यांना समोर बसलेली अजून एक लहान मुलगी आहे. वधूचा पिता आपल्या पत्नीची समजूत काढताना आपल्या दुसऱ्या कन्येकडं बोट दाखवतोय.

खोलीचं दार एका लहान मुलीनं उघडलंय आणि एक वृद्ध स्त्री आत येताना दिसतीये. वर आणि वधू यांची जवळीक तिला पसंत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर आपल्याला प्रश्नचिन्ह दिसंतय !! 


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://commons.wikimedia.org/wiki/File:1820-Country-Wedding-John-Lewis-Krimmel.jpg

https://www.pafa.org/collection/country-wedding-bishop-white-officiating

https://en.wikipedia.org/wiki/John_Lewis_Krimmel