Friday, February 21, 2020

डोडो

मुशाफिरी कलाविश्वातली

डोडो

मॉरिशसच्या बेटावर पूर्वी एक खास पक्षी आढळायचा. जाड असणारा हा पक्षी सर्वसाधारण एक मीटर उंच असायचा. या पक्ष्याला उडता यायचं नाही. त्याचं वजन साडेदहा ते साडेसतरा किलोच्या मध्ये असायचं. या बेटावर विपुल प्रमाणात अन्न मिळायचं आणि या पक्ष्याला भक्ष्य करणारे कुणी प्राणीही नव्हते. त्यामुळं हे पक्षी हळूहळू उडणंच विसरून गेले असं मानण्यात येतं !! पण हे निरुपद्रवी पक्षी म्हणजे त्या बेटाची शान होती.

१५९८ साली डच दर्यावर्दी मंडळी या बेटावर आली. खरंतर आजचं बेटाचं असणारं नाव (मॉरिशस) हे त्यांनीच आपल्या 'मॉरिस' या राजपुत्राच्या नावावरून ठेवलं. ही दर्यावर्दी मंडळी आल्यापासून मात्र तिथल्या बेटावरच्या त्या पक्ष्याला वाईट दिवस आले. त्यांनी या पक्ष्याची शिकार सुरु केली. शिकार करण्यासाठी त्यांना काहीच कष्ट घ्यायला लागत नव्हतं पक्ष्यापर्यंत चालत जाऊन पक्ष्याला पकडणं एवढंच त्यांना ह्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी करावं लागायचं. या पक्ष्यांना आजपर्यंत कुठल्याच प्राण्यांनं इजा पोहोचवली नव्हती, त्यामुळं माणूस त्यांना पकडण्यासाठी जवळ आल्यानंतरही कसलीच भीती वाटायची नाही. आणि त्यामुळंच ते स्वत:चं  रक्षण करायचा काहीही प्रयत्न करायचे नाहीत. उलट बऱ्याचदा निरागस कुतुहलानं ते पक्षीच माणसांकडं जायचे !! या पक्ष्यांना डोडो असं नाव पडलं. (डोडो शब्दाचा अर्थ कमी बुद्धी असणारा असा होतो) या दर्यावर्दी मंडळींनी आपल्यासोबत पाळीव प्राणीही नेले होते. यापैकी मांजर डोडो पक्ष्यांच्या भविष्यासाठी घातक ठरले. कारण मांजर डोडो पक्ष्यांची अंडी खाऊन टाकायचं.

दुर्दैवानं मॉरिशस बेटाची शान असणारा डोडो हा पक्षी १६६२ च्या दशकात नामशेष झाला. आता त्याचे सांगाडे, हाडं पाहायला मिळतात. त्याकाळच्या डच लोकांनी काढलेली रेखाटनंही आजही उपलब्ध आहेत. पण या पक्ष्याचे बारकावे दाखवणारं एक उत्कृष्ठ रंगीत चित्र मिळतं ते एका भारतीय चित्रकारानं काढलेलं !! मॉरिशसमधल्या सतराव्या शतकात नामशेष होणाऱ्या पक्ष्याचं चित्र भारतीय चित्रकारानं कसं काय काढलं असावं ?

पीटर मंडी हा सतराव्या शतकातला इंग्रज व्यापारी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवायचा. त्यानं लिहून ठेवलंय की त्या काळात काही युरोपियन दर्यावर्दी लोकांनी गोव्यामध्ये डोडोंची जोडी आणली होती. ही जोडी नंतर तिथून गुजरातमधल्या सुरत इथं आणण्यात आली. नंतर ती जोडी बादशाह जहांगीर याला भेट म्हणून देण्यात आलीत. जहांगीरला वेगवेगळे प्राणी पक्षी पाळण्याचा शौक होता. त्याच्याकडं इतर प्राणीपक्ष्यांसोबत ईथुओपियामधला झेब्राही होता.

जहांगीरच्या दरबारात अनेक चित्रकार होते. यातला एक प्रतिभावंत चित्रकार होता उस्ताद मन्सूर. या मन्सूरचा निसर्गातल्या प्राण्यांची, पक्ष्याची, फुलांची चित्रं काढण्यात हातखंडा होता. खरंतर सुरुवातीच्या काळात मन्सूर पारंपरिक पद्धतीनं व्यक्तिचित्रं काढायचा. पण नंतर तो प्राणी, पक्षी वगैरे निसर्गातल्या गोष्टींकडं वळला. एकदा बादशहासोबत काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यानं काश्मीरमधल्या वेगवेगळ्या १०० फुलांची चित्रं काढल्याचा उल्लेख बादशहानं करून ठेवलाय. यापैकी बरीचशी चित्रं आज मिळत नाहीत. त्यानं काढलेलं ट्युलिपच्या फुलाचं चित्र प्रसिद्ध आहे.

चित्रांमध्ये खूप सारे बारकावे अचूकपणे आणि कलात्मक पद्धतीनं दाखवण्यातल्या त्याच्या कौशल्यामुळं त्याला 'नादीर-अल-अश्र' (म्हणजे त्याच्या काळातला अतुलनीय) असा किताब मिळाला होता.

जहांगीरच्या दरबारात डोडो आल्यानंतर त्याचं चित्र मन्सूरनं काढण्याचा योग जुळून आला. रंगांचा अतिशय सुंदर वापर करत मन्सूरनं डोडोचं चित्र काढलं. हे चित्र भविष्यकाळात खूपच मोलाचं ठरणार होतं. डोडोचं रंगीत चित्र काढण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. या आधीही डोडोची रेखाटनं काढण्यात आली होती पण मन्सूरच्या चित्रात आढळणारी परिपूर्णता त्या रेखाटनांमध्ये नव्हती. समोर डोडो पक्षी असताना त्याला पाहत एखाद्या चांगल्या चित्रकारानं चित्र काढणं असा योग नंतर जवळपास आलाच नाही. काही दशकांमध्ये डोडो नामशेष झाला.


चित्रात डावीकडं वर दिसतोय तो पक्षी पोपटाची एक जात आहे. वर उजवीकडं दिसणारा पक्षी हिमाचल प्रदेशाचं मानचिन्ह असणारा पक्षी. या पक्ष्यावर असणारे पांढरे ठिपके, त्याचे रंग बारकाईनं दाखवण्यात आले आहेत. चित्रात मध्यभागी डोडो दिसतोय. त्याचा रंग, पोत खरा भासतो.

हे चित्र सापडलं ते रशियातल्या सेंट पीटसबर्गमधल्या एका कलासंग्रहालयात. हे चित्र भारतातून रशियात कसं गेलं ते मात्र एक न उलगडलेलं कोडंच आहे !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🌹 https://www.forbes.com/sites/quora/2016/09/20/what-happened-to-the-last-dodo-bird/#1a26db6d9c2b
🌹 https://www.theatlantic.com/science/archive/2016/06/the-dodos-redemption/486086/
🌹 https://tbsnews.net/feature/travel/dodos-mughal-court
🌹 http://daak.co.in/nadir-al-asr-ustad-mansurs-miniatures-birds-tulips/
🌹 https://incois.gov.in/Tutor/science+society/lectures/illustrations/lecture19/ustadmansur.html

🌷 Image Credit
🌹 https://commons.wikimedia.org/wiki/File:DodoMansur.jpg
🌹 Ustad Mansur / Public domain

No comments:

Post a Comment