Tuesday, October 22, 2019

लक्ष्मी देवी


मुशाफिरी कलाविश्वातली

लक्ष्मी देवी

राजा रवीवर्मा यांच्या बालकृष्णन नायर यांनी मल्याळी भाषेत लिहिलेल्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. राजा रविवर्मा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये बसले होते. याच वेळी त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये एक विद्वान व्यक्तीही होती. बोलणं चालू असताना काही कारणानं त्यांनी बाजूला उभ्या असणाऱ्या एका सामान्य असणाऱ्या माणसाला एका चित्राविषयी अभिप्राय विचारला. विद्वान व्यक्तीला याचं मोठं आश्चर्य वाटलं. त्या काळात एखाद्या मोठ्या चित्रकारानं सामान्य व्यक्तीला अभिप्राय विचारावा ही गोष्ट थोडी आश्चर्याचीच होती. विद्वान व्यक्तीनं आश्चर्य व्यक्त करत ह्या विषयी विचारलं. राजा रवीवर्मा म्हणाले, "खरंय.. (आज ह्या सामान्य व्यक्तीला कलेतलं फारसं काही काळात नसेल.) कदाचित आज सामान्य लोकांपर्यंत कला पोहोचली नसेल. पण कुणी सांगावे, आज राजेमहाराजांसाठी रंगवलेली चित्रं उद्याच्या काळात कला संग्रहालयात जातील आणि पुढच्या पिढीतली  सर्वसामान्य माणसं ती पाहू शकतील. मी असं ऐकलंय की पाश्चात्य देशांमध्ये सर्वांसाठी खुली असणारी कलेची सार्वजनिक दालनं असतात." आपली चित्रं, कला सामान्य लोकांपर्यंत पोहोचावीत अशी राजा रवी वर्मा यांची प्रामाणिक तळमळ होती. या प्रसंगानंतर काही वर्षांनी ओलिओग्राफ्सचं तंत्रज्ञान आल्यानंतर राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या प्रती सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवातही झाली.

आज, सव्वाशे वर्षांनंतर राजा रवी वर्मा यांची चित्रं साऱ्या भारताला ओळखीची झालेली आहेत. दिवाळीमध्ये जवळपास सारे भारतीय लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या ज्या प्रतिमेचं पूजन करतात ती प्रतिमा म्हणजे राजा रवी वर्मा यांनी १८९६ च्या दरम्यान काढलेलं लक्ष्मी देवीचं काढलेलं चित्र !! अक्षरश: करोडो भारतीयांना हे चित्र परिचित आहे. खरंतर, यामुळं, एका प्रकारे राजा रवी वर्मा यांना जगातला सर्वात लोकप्रिय कलाकार असं म्हणता येईल !!

लक्ष्मी देवीचा जन्म समुद्रमंथनात झाला होता असं मानण्यात येतं. पारंपारिक पद्धतीनं लक्ष्मी देवीची प्रतिमा बनवताना ज्या गोष्टी दाखवण्यात येतात त्या साऱ्या गोष्टी राजा रवी वर्मा यांनी दाखवल्या आहेत.

सर्वसाधारणपणे लक्ष्मी देवीचा रंग सावळा, पिवळसर सोनेरी, शुभ्र किंवा गुलाबी असा दाखवण्यात येतो. ती विष्णूसोबत असते तेंव्हा तिचा रंग सावळा दाखवण्यात येतो. संपत्तीचा स्रोत म्हणून तिला दाखवायचं असेल तर तिचा रंग पिवळसर सोनेरी दाखवला जातो. निसर्गाचं, प्रकृतीचं शुद्ध असं रूप म्हणून दाखवताना तिला शुभ्र रंगात दाखवतात. तर (माता असल्यानं) सर्व जीवांवर दया असणारी अशी दाखवताना तिला गुलाबी रंग दाखवण्यात येतो. या चित्रात आपल्याला लक्ष्मीची गुलाबी रंगाची छटा पाहायला मिळते.



धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ पूर्ण होण्यासाठीचं वरदान लक्ष्मी देऊ शकते. तिच्यात असणारी ही शक्ती दाखवण्यासाठी लक्ष्मीच्या प्रतिमेत चार हात दाखवले जातात. राजा रवी वर्मा यांनीही या चित्रात चार हात दाखवले आहेत. (जेंव्हा ती विष्णूसोबत असते तेंव्हा तिला हात दाखवले जातात तर जेंव्हा तिचं स्वतंत्र मंदिर असतं तेंव्हा तिला चार हात दाखवले जातात.)

लक्ष्मी देवीच्या दोन हातांमध्ये कमळाची फुलं दाखवली जातात. ह्या चित्रातही आपल्याला देवीच्या हातात दोन कमळाची फुलं दिसतात. देवीचा पाण्याशी असणाऱ्या संबंधामुळं कमळाची फुलं दाखवण्यात येतात असं मानलं जातं. कमळाची मुळं पाण्यात असतात. खरंतर देवीच्या गळ्यात कमळांच्या फुलांचा हारही दाखवला जातो. पण ह्या चित्रात तो दाखवलेला नाही. दक्षिण भारतात १६व्या शतकात लिहिल्या गेलेल्या शिल्पशास्त्र या ग्रंथात लिहिल्याप्रमाणं लक्ष्मी देवीच्या गळ्यात मोत्यांचा हार असतो. ह्या चित्रातही आपल्याला लक्ष्मी देवीच्या गळ्यात मोत्यांचा हार दिसतो.

आपण मागं बघितल्याप्रमाणं कमळ फुलांचं (चिखलात उगवूनही येणाऱ्या सुंदर फुलामुळं) आपल्या इकडं खूप महत्व आहे. लक्ष्मी देवी नेहमी कमळाच्या फुलात दाखवली जाते. ह्या चित्रातही आपल्याला लक्ष्मी देवी कमळाच्या फुलात उभी दिसते.

बहुतेकवेळा लक्ष्मीच्या चित्रात हत्ती सोंडेनं पाण्याचे फवारे मारताना दाखवला जातो. कारण हत्तीचा राजसत्तेशी संबंध असतो. आणि सोंडेनं पाणी सोडणं हे एक प्रकारे राजसत्तेनं केलेला अभिषेक दर्शवतो. या चित्रात मात्र राजसत्तेचं प्रतीक असणाऱ्या हत्तीनं देवीसाठी सोंडेत हार धरलेला दिसतोय.

राजा रविवर्मा यांचं हे चित्र दशकानुदशकं दिवाळी आणि लक्ष्मीपूजन यांचा अविभाज्य भाग बनलं आहे हे मात्र निश्चित !!

दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ :

Iconography in Hinduism, Decoding the Pictorial Script, by Sherline Pimenta IDC, IIT Bombay
Hindu Iconography Vol. 1, by Rao, T. A. Gopinatha

Image Credit:
Raja Ravi Varma [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Ravi_Varma-Lakshmi.jpg

Thursday, October 17, 2019

शेवटचा थेंब


मुशाफिरी कलाविश्वातली

शेवटचा थेंब

डच इतिहासात सतरावं शतक म्हणजे सुवर्णकाळ मानला जातो. या काळात डच मंडळींनी बऱ्याच क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती केली. यामध्ये कलाक्षेत्राचाही समावेश होतो. या काळात एकाहून एक अशी कलाकार मंडळी उदयास आली. यापैकी एक कलाकार म्हणजे ज्युडिथ लिस्टर. दैनंदिन जीवनातली चित्रं, व्यक्तीचित्रं, स्थिर चित्रं रंगवण्यासाठी ती खास ओळखली जायची.

ज्युडिथ तिच्या आईवडिलांचं आठवं अपत्य होती. तिचे वडील मद्य बनवायचं काम करायचे. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. काही लोकांच्या मते घरची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळंच ती कुटुंबाला मदत करण्यासाठी चित्रकलेकडं वळली. वडिलांचा मद्य बनवण्याचा व्यवसाय असल्यानं मद्य पिणाऱ्या लोकांना तिनं लहानपणापासूनच जवळून पाहिलं होतं.

खरंतर ज्युडिथ तिच्या हयातीमध्ये एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखली जायची. पण तिच्या मृत्यूनंतर ती विस्मरणात गेली. यानंतर तिची चित्रं आणि ती १८९३ मध्येच प्रसिद्धीस आले.

वडील मद्य बनवत असल्यानं मद्यपी लोकांना तिनं जवळून पाहिलं होतं. लोकांच्या आयुष्यात दारुनं काय फरक पडतो ते तिनं प्रत्यक्ष अनुभवलं होतं. दारूचा परिणाम सुरु झाला की वर्तणुकीत होणारे बदल ती लहानपणापासूनच बघत आली होती. याच विषयावर तिनं काढलेलं एक प्रसिद्ध चित्र म्हणजे 'शेवटचा थेम्ब' !!

चित्रात आपल्याला दोन व्यक्ती दिसतात. दोघंही दारूच्या नशेत आहेत. एक गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करणारा व्यक्ती उभा आहे तर काहीशी गडद जाम्भळी छटा असणारा कोट घालणारा व्यक्ती बसलेला आहे. उभ्या व्यक्तीनं आपला दारूचा प्याला पिऊन रिकामा केलेला आहे. बसलेल्या व्यक्तीच्या हातातलं दारूचं पात्र जवळपास संपलेलंच आहे, तो शेवटचा घोट घेताना दिसतोय. उभ्या व्यक्तीच्या हातात धूम्रपानाची कांडीही दिसते.



चित्रात आपलं लक्ष वेधून घेतो तो मध्यभागी असणारा मानवी सांगाडा. सांगाड्याच्या हातामध्ये अजून एक कवटी आहे. त्याच हातात एक जळत असणारी मेणबत्तीही आहे. मेणबत्ती संपत आलेली आहे. चित्रात पडणारा सारा प्रकाश त्या मेणबत्तीचाच प्रकाश आहे. सांगाडा बसून मद्य पिणाऱ्या व्यक्तीला निरखून पाहतोय. गम्मत म्हणजे आपल्या जवळच असणाऱ्या सांगाड्याचं दोघांनाही भान नाही आहे !! सांगाड्याच्या दुसऱ्या हातात वाळूचं घड्याळ आहे. त्यातला वेळ संपत आला आहे.

ज्युडिथनं हे चित्र १६३९ मध्ये काढलं होतं. खरंतर ह्या चित्रात दिसणाऱ्या दोन व्यक्ती आपल्याला ज्युडिथच्या अजून एका चित्रात दिसतात. त्या चित्राचं नाव आहे - 'merry trio' (आनंदी तिघं). Merry Trio ह्या चित्रात आपल्याला एकूण तिघं दिसतात. संध्याकाळची वेळ दिसते आणि त्यांची पार्टी नुकतीच सुरु झालेली दिसते. ह्या चित्रात ते आपला पहिलाच प्याला घेत आहेत असं वाटतं. हे चित्र (Merry Trio) म्हणजे The Last Drop ह्या चित्राचा पूर्वार्ध मानला जातो. Merry Trio मध्ये सुरु झालेल्या पार्टीचा शेवट The Last drop मध्ये पाहायला मिळतो. यातला महत्वाचा भाग म्हणजे त्यात आलेला सांगाडा.

काहींच्या मते हे चित्र जीवनातली क्षणभंगुरता दाखवते. संपलेली धूम्रपानाची कांडी आणि संपलेलं दारूचं पात्र जीवनातल्या ऐहिक सुखांचा शेवट दाखवतात. सतराव्या शतकात अटळ मृत्यू दाखवण्यासाठी सांगाडा हे प्रतीक वापरलं जायचं. त्यामुळं ह्या चित्रात मद्याच्या शेवटच्या थेंबात दंग असणाऱ्या लोकांच्या अवतीभवती असणारा अटळ मृत्यू दाखवला गेलाय.

८९ से मी X ७३. से मी आकाराचं तैलरंगात रंगवलं गेलेलं हे चित्र सध्या अमेरिकेमधल्या फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट या कलासंग्रहालयात आहे.  वरवर दैनंदिन जीवनातलं चित्र वाटणाऱ्या ह्या चित्रात खोल अर्थ आहे हे नक्की !!

दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ :

https://www.sartle.com/artwork/the-last-drop-judith-leyster
https://www.philamuseum.org/collections/permanent/102220.html
https://kweiseye.wordpress.com/tag/the-last-drop-analysis/
Image Credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:Judith_Leyster,_Dutch_(active_Haarlem_and_Amsterdam)_-_The_Last_Drop_(The_Gay_Cavalier)_-_Google_Art_Project.jpg
Philadelphia Museum of Art [Public domain]

Tuesday, October 8, 2019

शूमन ऐकताना


मुशाफिरी कलाविश्वातली

शूमन ऐकताना

पाश्चात्त्य संगीताच्या विश्वात होऊन गेलेला एक महान संगीत रचनाकार म्हणून रॉबर्ट शूमन ह्याची साऱ्या जगाला ओळख आहे. खरंतर त्याचा काळ आणि देश आपल्यापेक्षा खूप वेगळा. तो जर्मनीमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (१८१० - १८५६) होऊन गेला. आज आपण जे चित्र पाहणार आहोत त्या चित्राचं नाव आहे Listening to Schumann (म्हणजे शूमन ऐकताना).

आपण पाश्चात्त्य अभिजात संगीत ऐकत नसलो तरीही त्याची एक रचना मात्र आपल्याला नक्की माहीत आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनी टी व्ही वर कधी ना कधी 'Raymond - The complete man' ही जाहिरात कधी ना कधी पाहिली असेल. वर्षानुवर्षे त्यातलं संगीत तेच ठेवण्यात आलंय. हे संगीत आहे शूमनचं. त्यानं 'लहानपणीची दृश्ये' (Scenes of childhood) या नावाचा एक पियानोसाठी संगीतरचनासंग्रह रचला होता. यात त्यानं लहानपणीच्या वेगवेगळ्या आठवणींवर वेगवेगळ्या संगीत रचना केल्या होत्या. त्यातली एक रचना आहे Träumerei. Träumerei या शब्दाचा जर्मन भाषेत अर्थ होतो 'स्वप्न पाहणे'. लहानपणीच्या स्वप्न पाहण्याच्या आठवणी त्यानं या संगीतरचनेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. ही रचना अतिशय भावमय आहे. 'Raymond - The complete man' च्या जाहिरातीमध्ये हीच रचना वर्षानुवर्षे वापरली जात आहे.

शूमननं तऱ्हेतऱ्हेचं संगीत रचलं. यातलं बरंचंसं संगीत फक्त पियानो या वाद्यासाठी आहे. या संगीत रचनांमध्ये शब्द नसले तरीही वेगवेगळे भाव मात्र ओतप्रेत भरलेले आहेत. आपल्याला टी व्ही वरच्या जाहिरातीमधल्या संगीतातून याची कल्पना येते. आपल्या भावमय संगीतरचनांमुळेच हा संगीतकार अजरामर झाला.

शूमनच्या मृत्यूनंतर बेल्जीयममध्ये एक चित्रकार होऊन गेला - Khnopff. हा चित्रकार कलेमधल्या सिम्बॉलिझम या चळवळीशी संबंधित होता. या चळवळीचं एक उद्दिष्ट होतं - "to depict not the thing but the effect it produces". म्हणजे एखाद्या प्रसंगी बाहेर डोळ्यांनी जे काही दिसतं ते आपल्या चित्रामधून दाखवण्यापेक्षा त्या प्रसंगातली मानसिक स्थिती, भावनिक स्थिती दाखवण्याचा ही कलाकार मंडळी प्रयत्न करायची. हाच प्रयत्न आपल्याला Khnopff च्या Listening to Schumann ह्या चित्रातून दिसतो.



चित्रकारानं काही गोष्टी स्पष्टपणे दाखवल्या आहेत तर काही चित्र पाहणाऱ्याच्या कल्पनाशक्तीवर सोपवल्या आहेत. चित्रात मध्यभागी आपल्याला एक स्त्री डोक्याजवळ हात घेऊन संगीत ऐकताना दिसते. चित्रकाराला तिची मानसिक स्थितीच या चित्रातून दाखवायची आहे. चित्रात डाव्या बाजूला कुणीतरी पियानो वाजवत आहे असं सुचवलंय. आपल्याला पियानो वाजवणारी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त त्या व्यक्तीचा उजवा हात पियानोच्या शेवटच्या सप्तकात दिसतोय. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी. हे चित्र काढलं गेलंय १८८३ मध्ये. संगीत रेकॉर्ड होऊन ते सहजरित्या उपलब्ध होणं आणि सामान्य लोकांना ते परवडणं अजून प्रत्यक्षात यायला बरीच वर्षे बाकी होती. त्यामुळं या काळात प्रत्यक्ष संगीत ऐकणं चालायचं !!

शूमनची कोणती रचना वाजवण्यात येत आहे हे आपल्या काळात नाही. ही रचना आनंदी भाव, दु:खी भाव किंवा अजून कोणते भाव व्यक्त करणारी आहे तेही काळात नाही !! पियानो रचनेचं वादन सुरु झालंय की संपत आलंय तेही आपल्याला चित्र पाहून समजत नाही. खरंतर त्या स्त्रीचा चेहराही आपल्याला दिसत नाही, तिच्या चेहऱ्यावरचे भावही दिसत नाहीत.

परंतु असं असलं तरी एक गोष्ट आपल्याला दिसते. एखाद्या भावमय संगीतात बुडून गेल्यानंतर आपल्याला जो अनुभव येतो तो अनुभव ती घेताना दिसतीये. ती संगीत ऐकण्यात हरवून गेली आहे, तिचं इतर कुठंही लक्ष नाही. Listening to Schumann हे चित्राचं नाव आपल्याला नेमकं हेच सुचवतं.

बाहेरच्या गोष्टींचं जसं दिसतं तसं चित्रण करण्यापेक्षा मनाची अवस्था दाखवण्यात हे चित्र यशस्वी ठरतं. म्हणूनच आजही जवळपास १४० वर्षे झाल्यानंतरही हे चित्र लोकप्रिय आहे !!

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ :

Image credit:
Fernand Khnopff [Public domain]
🍁https://commons.wikimedia.org/wiki/File:Fernand_Khnopff-Schumann.jpg

🍁 शूमनची पियानोसाठी केलेली Träumerei ही मूळ रचना ऐकण्यासाठी इथं क्लिक करा:
https://www.youtube.com/watch?v=6z82w0l6kwE