Thursday, September 27, 2018

बेकरीवाल्याची गाडी

ओळख कलाकृतींची

बेकरीवाल्याची गाडी

सॅम्युएल वॅन हुगस्ट्रॅटेन नावाचा एक चित्रकार, कवी आणि लेखक असणारा प्रतिभावंत सतराव्या शतकात होऊन गेला. त्याचं एक चित्रकलेवरचं पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यानं चित्रांचं वर्गीकरण तीन भागांत केलं. यामध्ये स्थिरचित्र प्रकारात मोडणाऱ्या चित्रांना (still life paintings) त्यानं सर्वात खालचं स्थान दिलं. कारण या प्रकारात फक्त थेट निरीक्षण आणि कौशल्य यांची गरज असे. समोर जे काही दिसतं ते कॅनव्हासवर उतरवणं एवढाच भाग या प्रकारच्या चित्रात असे. त्यानं ऐतहासिक चित्रांना सर्वात उच्च दर्जाचं मानलं. या प्रकारच्या चित्रांमध्ये चित्रकारानां कल्पनाशक्तीचा वापर करत चित्रातले प्रसंग, व्यक्ती यांची चित्रं काढावी लागत. या चित्रांचे विषय बायबल, पुराणं किंवा इतिहास यातले प्रसंग असत.

या दोन प्रकारांच्या मध्ये असणाऱ्या चित्रांच्या प्रकारात दैंनदिन जीवनातले प्रसंग येत. सामान्य जनतेच्या आयुष्यातले सुखदुःखाचे प्रसंग, चाकोरीबध्द आयुष्यातले प्रसंग यात चित्रित केलेले असत. या चित्रांना अगदी उच्च दर्जाचं मानण्यात येत नसलं तरी ही चित्रं भरपूर प्रमाणात काढली जायची आणि या चित्रांना किंमतही चांगली मिळायची. या प्रकारच्या चित्रांच्या विषयांमध्ये प्रचंड विविधता असायची. नंतरच्या काळात चित्रांचा हा प्रकार 'जाॅनर् पेंटिंग्ज' या नावानं ओळखला जाऊ लागला.         

इथं दिलेलं 'बेकरीवाल्याची गाडी' हे याच प्रकारातलं चित्र. १६५६ मध्ये फ्रेंच चित्रकार मिकेलीन नावाच्या चित्रकारानं हे चित्र काढलं. या प्रकारातल्या चित्रांमध्ये बहुतेकवेळा कलाकारमंडळी ग्रामीण भागातल्या जीवनाचं चित्रण करायची. पण मिकेलीन बऱ्याचदा शहरी जीवनातली चित्रं काढायचा. या चित्रात त्यानं पॅरिसच्या रस्त्यावरचं एक दृश्य दाखवलंय. यात पाव विकणारा एक माणूस मध्यभागी दिसतोय. पण बाकीचे लोकही काहीतरी विकताना दिसतात. पाववाल्या समोर एक वयस्कर स्त्री औषधी ब्रँडी विकताना दिसतीये. तिच्या बाजूला एक मुलगा पाठीला काहीतरी अडकवून विकताना दिसतोय. एकूणच सगळ्यांच्या कपड्यांवरून कुणाची आर्थिक परिस्थिती फारशी  चांगली दिसत नाही.                         

गंमत म्हणजे १६५६ मध्ये काढलेल्या या चित्राचा चित्रकार कोण हे लोकांना समजत नव्हतं. १९२० च्या दशकात जेंव्हा हे चित्र स्वच्छ केलं गेलं तेंव्हा ह्या चित्रकाराचं नाव आणि स्वाक्षरी चित्रामध्ये दिसू लागली.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://googleweblight.com/i?u=https://www.metmuseum.org/toah/works-of-art/27.59/&hl=en-IN&grqid=BDXgRqPx

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Baker%27s_Cart?wprov=sfla1

Saturday, September 22, 2018

गाॅर्डिअन गाठ

कुतूहल कलाविश्वातलं

गाॅर्डिअन गाठ

एका कथेप्रमाणं इ. पू. ३३३ मध्ये सिकंदर आपल्या सैन्यासहित (आजच्या तुर्कस्तानमधल्या) एका छोट्याशा देशातल्या शहरात पोहोचला. शहराचं नाव होतं गाॅर्डिअम. हे शहर त्या देशाची राजधानी होती. सिकंदरचं वय होतं अवघं २३ वर्षं. पण जगावर राज्य करण्याची त्याची महत्वाकांक्षा जागी झाली होती.

गाॅर्डिअममध्ये पोहोचल्यावर त्याला एक रथ दिसला. रथ खूप जुना होता.  या रथाशी संबंधित एक पारंपारिक समजूत तिथं प्रचलित होती. या रथाला दोरखंडाच्या एकावर एक अशा अनेक गाठी घट्टपणे बांधलेल्या होत्या. या गाठी इतक्या क्लिष्ट पध्दतीनं बांधल्या होत्या की त्या नीट दिसतही नव्हत्या. सोडवणं तर निव्वळ अशक्य होतं. तिथल्या लोकांच्या समजूतीप्रमाणं या गाठीशी संबंधित पूर्वी एक भविष्यवाणी झाली होती. या भविष्यवाणीप्रमाणं जो कुणी या गाठी सोडवेल तो साऱ्या आशियावर राज्य करणार होता.
       
सिकंदरला हे समजल्यावर त्याला ही गाठ सोडवण्याची तीव्र इच्छा झाली. तो ती गाठ सोडवण्यासाठी लगेच रथापाशी आला. त्यानं थोडावेळ प्रयत्न केला पण गाठ काही सुटेना. सिकंदर दोन पावलं मागं गेला आणि त्यानं आपली तलवार बाहेर काढली. तो गरजला, "ही गाठ मी कशी सोडवेन यानं काही फरक पडणार नाही!". त्यानं तलवार चालवून गाठ कापून सोडवली. (दुसऱ्या एका दंतकथेप्रमाणं त्यानं रथातला एक छोटासा भाग सुटा करून गाठ सोडवली.)

त्याच दिवशी त्या शहरामध्ये रात्री वादळासहित पाऊस पडला. सिकंदर आणि त्याच्या लोकांनी एकप्रकारचा दैवी शुभशकुन मानला !!

या कथेतून दोन शब्दप्रयोग इंग्रजी भाषेत आले. एखाद्या क्लिष्ट समस्येला इंग्रजीमध्ये गाॅर्डिअन नाॅट (Gordian knot) असं म्हणतात. तर क्लिष्ट समस्येवरच्या धाडसी आणि सर्जनशील उपायाला  'गाॅर्डिअन नाॅट कापून काढणं' (cutting Gordian knot) असं म्हणतात !!  

बर्थेलेमी नावाच्या एका फ्रेंच चित्रकारानं हा प्रसंग दाखवणारं चित्र १७६७ मध्ये काढलं. या चित्रात त्यानं सिकंदर आपली तलवार काढत गाठ कापण्याचा निर्णय घेतानाचा क्षण दाखवलाय. चित्राच्या मध्यभागी सिकंदर आहे. चित्रामध्ये सिकंदरवर प्रकाश थोडासा जास्त दाखवलाय. सिकंदराच्या निर्णयांना लोक आश्चर्यचकित झालेले दिसतात. चित्रातल्या लोकांचे हावभाव, त्यांची देहबोली यामुळं हे चित्र जिवंत वाटतं. 


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

https://www.history.com/news/what-was-the-gordian-knot

https://en.m.wikipedia.org/wiki/Gordian_Knot?wprov=sfla1

Tuesday, September 18, 2018

पूर्वकालीन शेक्सपिअर वाचन


ओळख कलाकृतींची

पूर्वकालीन शेक्सपिअर वाचन

शेक्सपिअर त्याच्या हयातीत (म्हणजे सोळाव्या शतकाचा शेवट आणि सतराव्या शतकाची सुरुवात) एक प्रतिभावंत नाटककार म्हणून ओळखला जायचा. पण त्याला इंग्रजी साहित्यामधलं उत्तुंग स्थान मिळालं ते सतराव्या शतकात त्याच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी. यानंतर मात्र त्याची लोकप्रियता वाढतच गेली - ती कधीच कमी झाली नाही.

१८३० च्या दरम्यान इंग्रज मंडळींचा इंग्लंडच्या इतिहासातला आणि शेक्सपिअरमधला रस वाढत चालला होता. १८३८ मध्ये चित्रकार साॅलोमन अलेक्झांडर हार्ट यानं 'An Early Reading of Shakespeare' हे चित्र काढलं. जुन्या काळात (म्हणजे आधीच्या शतकात) इंग्लंडमध्ये घराघरांमध्ये शेक्सपिअरचं साहित्य वाचलं जाताना वातावरण कसं असायचं याची कल्पना करत त्यानं हे चित्र काढलं. जुन्या काळात अर्थातच मनोरंजनाची फारशी साधनं नसल्यानं याप्रकारे एकत्रित वाचन व्हायचं.



चित्रामध्ये शेक्सपिअरचं साहित्य वाचणारा माणूस त्यातल्या कथेमध्ये पुरता समरस झालाय. बाकीचे श्रोतेही कथेमध्ये रंगून गेलेले दिसतात. (फक्त तरुण स्त्रीच्या मागं असणाऱ्या माणसाचं लक्ष वाचनाकडं नाही, त्याचं लक्ष त्या स्त्रीकडं आहे!!) प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हावभाव उत्कृष्टपणे दाखवण्यात आलेले आहेत. या हावभावांमुळं चित्रामध्ये एकप्रकारचा जिवंतपणा आलाय. खोलीमधलं फर्निचर खूप जुन्या प्रकारचं दाखवलंय. खोलीत उबदारपणा येण्यासाठी अग्नी प्रज्वलित केलेला आहे. या फर्निचरच्या, अग्नी प्रज्वलित केलेल्या फायरप्लेसच्या प्रकारावरून तसंच लोकांच्या वेशभूषेवरुन हा जुना काळ असल्याचं स्पष्ट होतं. वृध्द श्रोत्याच्या पायाशी कुत्रंही झोपलेलं दिसतं.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:

http://www.victorianweb.org/painting/hart/paintings/4.html

https://www.royalacademy.org.uk/art-artists/work-of-art/an-early-reading-of-shakespeare

Friday, September 14, 2018

द काॅर्सेर

ओळख कलाकृतींची

द काॅर्सेर

लाॅर्ड बायरन या विख्यात इंग्रज कवीचं 'द काॅर्सेर' नावाचं एक काव्य 1814 मध्ये प्रकाशित झालं. हे काव्य किती लोकप्रिय व्हावं? पहिल्याच दिवशी या काव्याच्या तब्बल 10000 प्रती विकल्या गेल्या !! या काव्यामध्ये एक कथा होती. नंतर ह्या काव्यातल्या कथेवर आॅपेरा, बॅले आणि संगीतही रचले गेले.

ह्या काव्यात काॅर्सेर नावाच्या लुटारूची कथा आहे. कथानक थोडक्यात असं:
      
काॅर्सेर हा लुटारू दुसऱ्या बेटावर राहणाऱ्या पाशाच्या राजवाड्यावर हल्ला करुन लुटण्याचा बेत आखतो. त्याची पत्नी मेदोरा त्याचं मन वळवण्याचा बराच प्रयत्न करते. त्यानं ही जोखीम पत्करू नये असं तिला मनोमन वाटत असतं. पण काॅर्सेरचा निश्चय पक्का असतो. हल्ला करण्यासाठी तो समुद्रातून प्रवास करायला निघतो. 

बुरखाधारी काॅर्सेर आणि त्याचे साथीदार राजवाड्यापर्यंत पोहोचतात. ते राजवाड्यात घुसतात. आखलेल्या बेताप्रमाणं ते हल्ला चढवतात. अपेक्षेप्रमाणं त्यांचा हल्ला यशस्वी होत जातो. पण इतक्यात ते काही स्त्रीयांच्या किंकाळ्या कक्षा. त्या पाशाच्या जनानखान्यातल्या (हरेम) बंदी बनवलेल्या स्त्रीया असतात. काॅर्सेर त्यांना मुक्त बनवण्याचा प्रयत्न करतो. पण ठरलेल्या योजनेत नसलेल्या ह्या कामामुळं त्यांची योजना फसते. पाशाचे सैन्य प्रतिहल्ला चढवतात. काॅर्सेकच्या बहुतेक साऱ्या साथीदारांना ते संपवतात आणि काँर्सेरला ते कैद करतात. 

बंदी बनलेल्या काॅर्सेरला गुल्नेर नावाची पाशाची गुलाम असणारी स्त्री चोरून भेटायला येते. काॅर्सेरनं त्यांच्या मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचे भाव असतात. काॅर्सेरला कैदेमधुन सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा मानस ती व्यक्त करते.

1831 च्या दरम्यान डेलॅक्राॅक्स नावाच्या चित्रकारानं कथेतल्या ह्याच प्रसंगावर एक जलरंगात एक चित्र काढलं. ह्या चित्रात गुल्नेर हातामध्ये दिवा घेऊन काॅर्सेरला बंदी बनवलेल्या कोठडीमध्ये आलेली दिसते. तिच्या दुसऱ्या हातात खंजीर दिसतो. त्याला सोडवण्याचा मानस सांगताना तिच्या चेहऱ्यावर जोखीम पत्करण्याचे धाडसी भाव दिसतात. त्याला एकप्रकारे आश्चर्याचा धक्का बसलेला दिसतो. चित्रकारानं ह्या कलाकृतीत कुंचल्याचे हलके फटकारे (loose strokes) वापरलेले दिसतात.



कथानकात पुढं बऱ्याचशा घटना घडतात. गुल्नेरच पाशाची हत्या करते. दोघंही मुक्त होतात.

- दुष्यंत पाटील

# ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
# माझीशाळामाझीभाषा
# कारागिरी

संदर्भ:


Sunday, September 9, 2018

यूक्लिड

कुतूहल कलाविश्वातलं

यूक्लिड

रिबेरा हा सतराव्या शतकातला एक चित्रकार. याचा जन्म स्पेनमध्ये झाला पण हा नंतर इटलीमध्ये आला, त्यानं इटलीमध्ये असताना रंगवलेली बरीचशी चित्रं गाजली. 

तो इटलीमध्ये आला तेंव्हाचा काळ वेगळा होता. राजघराण्यातल्या किंवा श्रीमंत लोकांपेक्षा विद्वान माणसांची चित्रं याकाळात लोकप्रिय होत चालली होती. प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्वज्ञानामध्ये लोकांचा रस वाढत चालला होता. याकाळात त्यानं काढलेलं एक चित्र म्हणजे 'यूक्लिड'. यूक्लिड हा ..पुर्व ३०० च्या दरम्यान ग्रीसमध्ये होऊन गेलेला थोर गणिती होताखरंतर 'भूमितीचा जनकया नावानंही तो ओळखला जातो. स्वतःच्या प्रमेयांसोबतच त्यानं त्याकाळात ज्ञात असणाऱ्या साऱ्या गणिताच्या सिध्दांतांचं संकलन केलं. युक्लिडनंतर जवळपास पुढची २००० वर्षे गणिताच्या दुनियेत इतकं मोठं काम कुणीच केलं नाही. त्यानं लिहिलेलं एलिमेंट्स हे पुस्तक विसाव्या शतकातही बेस्ट सेलर होतं !!

या चित्रकारानं यूक्लिडच्या काढलेल्या चित्राचं वैशिष्ट म्हणजे त्यानं यूक्लिडच्या बाह्यरूपापेक्षा यूक्लिडच्या व्यक्तिमत्वाचं, त्याच्या अंतरंगांचं केलेलं चित्रण. हे चित्र प्रचलित व्यक्तिचित्रांच्या (portrait) खुपच वेगळं होतं. या चित्रात गडद काळ्या पार्श्वभूमीवर यूक्लिड दाखवला गेलाय. त्याची दाढी, नखं वाढलेली आहेत. कपडे जीर्ण झालेले आहेत. असं वाटतंय की त्याचं दैनंदिन आयुष्यात लक्षच नाहीये. सारं आयुष्य त्यानं गणिताला समर्पित केल्यासारखं दिसतंय. त्याचे डोळे एकप्रकारे त्याची गणिताच्या विश्वातली असणारी सत्ता दाखवतात. तो गणिताचा एक ग्रंथ दाखवतोय. त्यामध्ये आपल्याला भूमितीच्या आकृत्या दिसतात. हा ग्रंथही जीर्ण झालेला दिसतो.



या चित्रकाराचा आयुष्यातला शेवटचा काळ वाईट गेला. आर्थिक समस्यांना तोंड देता देता याचा मृत्यू झाला.

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ
:

https://sizeofart.com/dose-of-art-47-jusepe-de-ribera-euclid-c-1630-1635/

http://www.getty.edu/art/collection/objects/130406/jusepe-de-ribera-euclid-spanish-about-1630-1635/

Tuesday, September 4, 2018

पहिला मेघ


ओळख कलाकृतींची


पहिला मेघ

सर विलियम क्विलर ऑर्चर्डसन यानं 'श्रीमंत पती आणि सुंदर पत्नी' या समीकरणावर जुळलेल्या लग्नांवर भाष्य करताना ३ चित्रं काढलीत. प्रेमाचा पाया नसणारी अशी लग्नं अयशस्वी होतात असं या चित्रकारानं आपल्या चित्रांमधून दाखवलं. या चित्रमालिकेतलं हे तिसरं चित्र - "पहिला मेघ". 

हे चित्र पहिल्यांदा प्रदर्शित करताना त्यानं टेनिसन या कवीच्या खालील ओळी चित्रासोबत लिहिल्या होत्या:

'It is the little rift within the lute
That by-and-by will make the music mute.'

'ल्युट वाद्यातली एक छोटीशी भेग,
हळूहळू करत जाईल संगीताला मूक'



चित्रामध्ये त्यानं संध्याकाळी बाहेरून घरी परतलेलं जोडपं दाखवलंय. चित्र जवळून बघितलं तर यातल्या पती-पत्नीमध्ये बर्‍याच वर्षांचं अंतर असल्याचं जाणवतं. घरातल्या प्रशस्त असणार्‍या हॉलवरुन तो श्रीमंत आहे ते स्पष्ट होतं. वयाने कमी असणारी त्याची पत्नी पाठमोरी असली तरी सुंदर असल्याचं जाणवतं. तिचं अस्पष्ट प्रतिबिंब आपल्याला दिसतं. त्यांच्यात काहीतरी वाद होऊन पत्नी तिथून निघून जाताना दिसते. त्याच्या देहबोलीवरुन तो त्रस्त होऊन भांडलाय असं दिसतं तर ती वैतागून तिथून निघून जाताना दिसत आहे. त्यांच्या नात्यात पडलेली ही पहिलीच भेग आहे. चित्रामध्ये दोघांमध्ये दिसणारं अंतर हे मानसिक पातळीवरही आहे. "पहिला मेघ" असं नाव देताना पुढं येणारं वादळ चित्रकाराला सूचीत करायचं आहे.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ 
https://www.ngv.vic.gov.au/explore/collection/work/4224/
https://www.tate.org.uk/art/artworks/orchardson-the-first-cloud-n01520

Sunday, September 2, 2018

जत्रा

कुतूहल कलाविश्वातलं

जत्रा

हार्लेक्विनेड हा सोळाव्या शतकानंतर युरोपमध्ये पसरलेला एका विशिष्ट प्रकारच्या विनोदी नाटकांचा प्रकार. याची सुरुवात इटलीत झाली पण नंतर हा सर्वत्र पसरला. याची लोकप्रियता एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कमी होत गेली. १९३० च्या आसपास हा प्रकार नामशेष झाला.

या नाट्यप्रकारात काही ठराविक पात्रं येतात. सर्वसाधारण कथानक असं काहीतरी असतं: मुख्य नायक असतो हार्लेक्विन. त्याचं कोलंबाईन या नायिकेचे प्रेम असतं. तिचंही त्याच्यावर प्रेम असतं. तिच्या स्वार्थी/हावरट असणाऱ्या वडिलांचा या प्रेमाला विरोध असतो. त्यांच्या नोकरांच्या सहाय्यानं ते दोघांची ताटातूट करण्याचा प्रयत्न करतात. यापैकी एक नोकर असतो - पिअराॅट. काहीशा बावळट असणाऱ्या या नोकराचंही कोलंबाईनवर प्रेम असतं. (त्यामुळं या पात्राला कधीकधी एक भावुकपणाची छटा येते.) पण एकूणच बावळट असण्यामुळं हे पात्र विदुषकासारखं बनतं.

हार्लेक्वीन हा मात्र चतुर असतो. कठीण प्रसंगी काहीतरी शक्कल लढवून तो दरवेळी मार्ग काढतो. हार्लेक्वीनचं पात्र रोमँटिक असतं. त्याच्याकडं एक जादूची छडी असते. त्या छडीचा वापर करत तो जादूही करत असतो. हार्लेक्वीन हे पात्र पिअराॅटच्या पात्राच्या नेमकं उलटं आहे. या दोन पात्रांमध्ये विरोधाभास आहे. पिढ्यान्पिढ्या रंगभूमीवरची ही पात्रं ठरलेली असायची. 

पाॅल सिझेन ह्या चित्रकारानं 'जत्रा' ह्या चित्रात ह्याच व्यक्तिरेखा थोड्याशा वेगळ्या प्रकारे दाखवल्या. (त्याकाळात बऱ्याचदा जत्रेमध्ये हे नाटक सादर व्हायचं.) त्यानं ह्या पात्रांना दाखवलं ते रंगभूमीवर प्रवेश करताना. म्हणजे ही पात्रं अजून लोकांसमोर आलेली नसताना. त्यामुळं चित्रकारानं ह्या पात्रांच्या वेगळ्याच छटा दाखवण्याची मुभा घेतली आहे. एकप्रकारे त्यानं अभिनेत्यांचे भूमिकेचे मुखवटे चढवण्यापूर्वीचे चेहरे या चित्रात दाखवले आहेत. यातला हार्लेक्वीन हसता खेळता चेहरा असणारा, नेहमीची प्रतिमा असणारा नायक वाटत नाही. तो थोडासा अहंकारी असा वाटतो. पण पडद्यांच्या रचनेमुळं त्याच्या व्यक्तिमत्वाला एक गती येते. त्याच्या तांबड्या-काळ्या कपड्यांमुळं तो उठून दिसतो. याउलट पिअराॅट एकरंगी कपड्यांत दिसतो. ही वेशभूषा नाट्यतल्या पात्रांना अनुसरून आहे. दोघांच्या उंचीमध्येही फरक जाणवतो. पिअराॅट हार्लेक्वीनला ढकलताना दिसतो. आपल्या बावळट भुमिकेनं लोकांना हसवण्याच्या तयारीत पिअराॅट दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर बावळटपणा किंवा भावूकपणा दिसत नाही.



कुणालातरी स्वतःच्या बंगल्यामध्ये लावण्यासाठी नविन चित्र हवं होतं म्हणून त्यानं पाॅलला चित्र काढायला सांगितलं होतं. पाॅलनं मग हे चित्र काढलं होतं. हे चित्र काढताना स्वतःच्या मुलाला त्यानं हार्लेक्वीनसाठी माॅडेल म्हणून उभं केलं होतं. पाॅलच्या मृत्यूनंतर हे चित्र चांगलंच गाजलं. जगप्रसिद्ध चित्रांमध्ये या चित्राचा समावेश होतो.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

https://arthive.com/artists/1020~Paul_Cezanne/works/1279~Pierrot_and_harlequin

https://vsemart.com/pierrot-and-harlequin-by-paul-cezanne/


http://www.paulcezanne.org/pierrot-and-harlequin.jsp