Tuesday, April 30, 2019

मराटचा मृत्यु

मुशाफिरी कलाविश्वातली

मराटचा मृत्यू

१७८९ च्या दरम्यान फ्रान्समध्ये क्रांती झाली. जुलुमी राजाची सत्ता क्रान्तिकारक लोकांनी उलथावून टाकली. यानंतर फ्रान्स एक प्रजासत्ताक बनले.

यानंतरची १७९३-९४ ही वर्षे फ्रान्सच्या इतिहासात 'दहशतीची कारकीर्द' (The reign of Terror) म्हणून ओळखली जातात. हा काळ अंधारमय आणि रक्तरंजित आहे.  टोकाचे विचार असणाऱ्या क्रान्तिकारकांच्या हातात या काळात सत्ता गेली. फ्रान्समध्ये झालेल्या क्रांतीशी एकनिष्ठ नसल्याचा नुसता संशय आला तरी हे क्रांतिकारक संशयित व्यक्तीला मृत्युदंड देत ! क्रांतिकारकांच्या मते क्रांती सुरक्षित राहणं गरजेचं होतं. क्रांती सुरक्षित ठेवण्यासाठी जर काही जीव घ्यावे लागणार असतील तर ते अर्थातच चालणार होतं !

जो क्रान्तिकारकांचा गट फ्रान्सवर राज्य करायचा तो स्वत:ला 'The committee of public safety' असं म्हणवून घ्यायचा. ह्या कमिटीनं बरेचसे नवीन कायदे केले. खरंतर त्यांना 'दहशत' हेच अधिकृत सरकारी धोरण बनवायचं होतं.

या काळात फ्रान्समध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक व्यक्ती आपण कुणाशी बोलतोय आणि काय बोलतोय याचा क्षणोक्षणी विचार करू लागला. क्रान्तिकारकांच्या विरुद्ध केलेल्या एखाद्या छोट्याशा वक्तव्याचा अर्थ होता मृत्युदंड !! काही वेळेला या कायद्याचा गैरवापरही व्हायला लागला. आपल्याला नको असणाऱ्या लोकांना क्रान्तिकारक ह्या कायद्याच्या आधारे संपवू लागले. या दहशतीच्या काळात तब्बल १७००० लोकांना अधिकृतरीत्या मृत्युदंड देण्यात आला !! आणि अधिकृत नोंद नसणाऱ्या बळींची तर गणनाच नाही. अटक केलेल्या २ लाख लोकांपैकी कित्येक जण तुरुंगातच मरण पावले. कित्येक लोकांना रस्त्यांवर बडवून बडवून ठार करण्यात आलं !

या क्रान्तिकारक मंडळींमधला एक महत्वाचा नेता म्हणजे मराट. ज्वलंत भाषेत लिखाण करण्यासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी लढण्यासाठी तो प्रसिद्ध होता. क्रान्तिकारकांचाच 'जिरोंडीन' नावाचा दुसरा एक (काहीसा मवाळ) गट होता. या गटाच्या तत्वज्ञानाशी मराटचे वाकडे होते. 'जिरोंडीन लोक' मराटला फ्रेंच प्रजासत्ताकाचे शत्रूच वाटायचे !

जानेवारी १७९३ मध्ये फ्रान्सचा राजा १६ वा लुई याला मृत्युदंड दिल्यानंतर जिरोंडीन लोकांवरची त्याची टीका अजूनच विखारी होत गेली. त्याचा जिरोंडीन लोकांविषयी वाटणारा द्वेष वाढतच गेला. जिरोंडीन लोकांना मारण्याचाही प्रयत्न त्यानं सुरु केला. जिरोंडीन लोकही त्याच्याशी लढले. मराटवर खटलाही चालला पण तो त्यातून निर्दोषपणे सुटला.

पण नंतर जिरोंडीन लोकांचा पाडाव करण्यात मराट यशस्वी ठरला. यानंतर मराटला त्वचेचा विकार झाला. त्याला बाथटबमध्ये औषधी पाण्यात सतत पडावं लागत असे. त्याचं घराबाहेर जाणं खूपच कमी होत गेलं.
शार्लोट कॉर्डे नावाची एक पंचवीस वर्षांची फ्रेंच तरुणी मात्र मराटच्या कृत्यांनी अस्वस्थ झाली होती. जिरोंडीन लोकांचं तत्वज्ञान तिला मनापासून पटायचं. किंबहुना जिरोंडीन लोकांचं तत्वज्ञानच फ्रान्सला वाचवू शकेल असा तिचा विश्वास होता. मराटला ठार केलं तरच फ्रान्स वाचू शकेल असं तिला वाटायला लागलं. तिच्या मते मराट हा फ्रान्स प्रजासत्ताकासाठी धोका बनला होता आणि देशभरात चालू असणारी हिंसा त्याच्या मृत्यूनंच संपू शकणार होती.

९ जुलै १७९३ ला कॉर्डे थोर लोकांची चरित्रं असणारं एक पुस्तक हातात घेऊन पॅरिसला आली. हॉटेलमध्ये एक खोली घेऊन ती तिथं राहायला लागली. तिनं स्वयंपाकघरात वापरण्याचा ६ इंची चाकू खरेदी केला. तिनं "कायदा आणि शांती यांचे मित्र असणाऱ्या फ्रेंच लोकांना" उद्देशून लिहायला सुरुवात केली. यात तिनं आपण करणार असणाऱ्या खुनाचा हेतू स्पष्ट केला. खरंतर सर्व जनतेसमोर त्याला ठार मारण्याची तिची इच्छा होती. पण आजारामुळं तो आता घरीच असायचा, त्यामुळं तिला आपली योजना बदलावी लागली.

१३ जुलै १७९३ ला ती सकाळी उशिरा मराटच्या घरी गेली. काही जिरोंडीन लोकांच्या बंड करण्याच्या योजनेविषयी माहिती असल्याचा तिनं दावा केला. पण तिला घरी प्रवेशच देण्यात आला नाही. त्याच दिवशी संध्याकाळी तिनं पुन्हा एकदा त्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला घरी प्रवेश मिळाला. मराट नेहमीप्रमाणं बाथटबमध्येच होता. तिनं सांगितलेल्या जिरोंडीन बंडखोरांची नावं त्यानं लिहून घ्यायला सुरुवात केली.  इतक्यात तिनं चाकू काढला आणि त्याच्या छातीत खुपसला !!

१७ जुलै १७९३ ला (म्हणजे चारच दिवसांनी) कॉर्डेलाही मृत्यदंड देण्यात आला.

जॅकस डेव्हिड नावाच्या चित्रकारानं सोबतच्या चित्रात मराटच्या मृत्यूचं चित्र दाखवलंय. त्यानं मराटला हुतात्मा बनवलंय. चित्रात सजावटीसाठीच्या काहीच वस्तू दिसत नाहीत. चित्रात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रयोजन आहे. प्रसंगाचे सारे तपशील आपल्याला चित्राच्या खालच्या निम्म्या भागात दिसतात. वरच्या निम्म्या भागात काहीच नाहीये. एक प्रकारे या दोन्ही भागांनी समतोल साधला गेलाय. चित्रात सारे मवाळ प्रकारचे रंग वापरले गेलेत.



चित्राच्या विषयामुळं पाश्चात्य कलेच्या इतिहासात हे चित्र पुढं अजरामर झालं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍀https://www.history.com/this-day-in-history/charlotte-corday-assassinates-marat
🍀https://www.ducksters.com/history/french_revolution/reign_of_terror.php
🍀https://en.wikipedia.org/wiki/Jean-Paul_Marat
🍀https://en.wikipedia.org/wiki/Charlotte_Corday
🍀https://en.wikipedia.org/wiki/The_Death_of_Marat
🍀https://blogs.warwick.ac.uk/giulialasen/entry/visual_analysis/

Tuesday, April 23, 2019

बामियानच्या बुद्धमूर्ती

मुशाफिरी कलाविश्वातली

बामियानच्या बुद्धमूर्ती 

अफगाणिस्तानमध्ये मध्य भागात एक शहर आहे - बामियान. बामियान शब्दाचा अर्थ होतो लखलखणाऱ्या प्रकाशाचं ठिकाण. या बामियानच्या स्थानाचं एक खास भौगोलिक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळात रोमन साम्राज्य, भारत, मध्य आशिया आणि चीन या सर्व भागातून येणारे रस्ते या बामियानमध्ये मिळत होते. त्यामुळं त्या काळात खूप साऱ्या प्रवाशांसाठी बामियान हे एक प्रवासात विश्रांती घ्यायचं ठिकाण होतं. याच ठिकाणी ग्रीक आणि बौद्ध कलेचा मिलाफ झाला असं मानण्यात येतं. पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या सिल्क रूटवर  बामियान वसलेलं होतं. आजूबाजूच्या ओसाड प्रदेशापेक्षा बामियानचा प्रदेश बऱ्यापैकी सुपीक होता. यामुळं व्यापारी आणि धर्मप्रचारक यांना प्रवासात थांबण्यासाठी बामियानला पसंती असायची. पहिल्या सहस्रकाच्या मध्यामध्ये बामियानमध्ये राहणारे बहुतेक सारे व्यापारी आणि धर्मप्रसारक हे बौद्ध धर्माचेच होते. कुशाणांच्या काळात पसरलेला बुद्ध धर्म या काळात बामियानमध्ये चांगला रुजलेला होता.

बौद्ध भिक्शू कुठंही आणि केव्हाही आराधना करू शकायचे. यातूनच बौद्ध वास्तुकलेतल्या गुहांची सुरुवात झाली. आजही बामियानमध्ये डोंगरामध्ये १३०० मीटर अंतरामध्ये जवळपास १००० गुहा आहेत. या गुहा ज्या डोंगरामध्ये आहेत तिथंच अतिभव्य अशा बुद्धाच्या मूर्ती बनवल्या गेल्या होत्या. अलीकडं (२००१ मध्ये) या अतिभव्य शिल्पं नष्ट करण्यात आली. पण नष्ट होईपर्यंत ही शिल्पं जगातल्या सर्वात मोठ्या असणाऱ्या मूर्ती मानल्या जायच्या. बौद्ध आणि इतर धर्मातल्या प्रवाशांसाठी ही महाकाय शिल्पं एक महत्वाचं आकर्षण ठरत होती. या मुर्त्या बनवण्याचं काम नेमकं कुणी सांगितलं, कोणत्या शिल्पकार लोकांनी ह्या मूर्त्या बनवल्या हे मात्र आज कुणालाच माहीत नाही. पण त्याकाळात असणाऱ्या बौद्ध धर्माच्या अस्तित्त्वाची या शिल्पांमुळे कल्पना येते.

 बामियानमधल्या बुद्धमूर्तींचं १८३२ मधलं एक रेखाटन 
Image credit:
Alexander Burnes [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Bamiyan_Buddhas_Burnes.jpg


या दोन बुद्धांच्या मुर्त्यांपैकी मोठी असणारी मूर्ती तब्बल १७५ फुटांची होती तर लहान मूर्ती १२० फुटांची होती. मोठी असणारी मूर्ती 'वैरोचन' बुद्धाची (वैश्विक बुद्ध) तर छोटी मूर्ती 'शाक्यमुनी'बुद्धांची (म्हणजे गौतम बुद्ध) मानण्यात येते. ह्या मुर्त्या डोंगरात खोदल्या असल्या तरी मोठ्या मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याची सोय होती. ह्या मुर्त्यांच्या कलेवर भारतीय, ग्रीक आणि मध्य आशियातल्या कलांचा प्रभाव होता.  डोक्यावरचे कुरळे केस आणि शरीरावरचं वळ्या असणारं वस्त्र यावर ग्रीक कलेचा अतिशय स्पष्ट असणारा प्रभाव दिसत होता. ग्रीक कलेची शैली आणि कलेचा भारतीय विषय यांचा मिलाफ हे या मूर्तींचं वैशिष्ट्य होतं.

चिनी प्रवासी युवान त्सांग सातव्या शतकाच्या मध्यात प्रवास करताना बामियानमध्ये थांबला होता. त्याच्या लिखाणावरून आपल्याला ह्या मुर्त्या त्या काळात कशा दिसायच्या याची कल्पना येते. युवान त्सांग म्हणतो: “इथं (बौद्ध भिक्षूंचे) कित्येक मठ आहेत, हजारो भिक्षु आहेत. हे भिक्षु हीनयानातल्या लोकोत्तर पंथाच्या पद्धतीनं आराधना करतात. शहराच्या उत्तरपूर्व दिशेला पर्वतात बनवलेली उभ्या  बुद्धाची दगडाची मूर्ती आहे. ही मूर्ती १४० ते १५० फूट उंचीची आहे. मूर्तीचा रंग चमकदार सोनेरी आहे आणि त्यावर कित्येक सुंदर रत्नेही आहेत. देशाच्या या आधीच्या राजानं बांधलेला (भिक्षुकांसाठीचा) मठ पूर्व दिशेला आहे. मठाच्या पूर्व दिशेला बुद्धांची शंभर फुटांहून उंच तांब्याची उभी मूर्ती आहे. तांब्याचे वेगवेगळे तुकडे बनवून (casting करून), त्यांना जोडून (welding करून) ही मूर्ती बनवण्यात आली आहे.”

युवान त्सांगच्या बुद्धांच्या मूर्तींच्या वर्णनावरून हे स्पष्ट होतं की एके काळी या बुद्धमूर्ती रंग, धातू आणि रत्ने यांनी सजवलेल्या होत्या. कालांतरानं ही सारीच सजावट काढून टाकण्यात आली. दोन मूर्तींपैकी लहान असणारी मूर्ती त्या काळात तांब्याची दिसत असली तरी आजच्या विद्वानांच्या मते ती पूर्णपणे तांब्याची नव्हती. त्या मूर्तीला रंगच अशा प्रकारे दिला होता की ती तांब्याची असल्यासारखं वाटत होतं. काहींच्या मते या अतिभव्य मूर्तींच्या चेहऱ्यावर लाकडी मुखवटे बसवण्यात आले होते. या सुंदर, महाकाय आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या मूर्तींकडे पाहताना रस्त्यांवरून जाणाऱ्या बौद्ध भक्तांना कसे वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो.

२००१ मध्ये मात्र इतिहासाचा महान वारसा असणाऱ्या या मुर्त्या नष्ट करण्याचे आदेश तालिबानी नेता मुल्ला ओमर यानं तालिबानच्या अनुयायांना दिले. दोन्ही मुर्त्या या काळात पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या. या बुद्धमूर्ती प्रचंड मजबूत असल्यानं त्यांना नष्ट करणं तालिबानच्या लोकांना खूप अवघड गेलं. त्यांना ह्या मुर्त्या नष्ट करायला कित्येक आठवडे लागले. सुरुवातीला त्यांनी विमानविरोधी (anti aircraft guns ) वापरून पाहिल्या, पण त्यांनी फारसा फरकच पडला नाही. मग या लोकांनी स्फोटकांचा वापर करत मुर्त्या नष्ट करायला सुरुवात केली. मुर्त्यांची डोक्यांमध्ये भोके पाडून त्यात स्फोटकं उडवण्यात आली.

या मुर्त्या नष्ट होणं हे साऱ्या जगासाठी खूप मोठं नुकसान होतं यात मात्र कुणालाच शंका नाही.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:


🍀 https://www.khanacademy.org/humanities/ap-art-history/west-and-central-asia/a/bamiyan-buddhas

🍀 https://en.wikipedia.org/wiki/Buddhas_of_Bamyan

🍀 https://www.learnreligions.com/vairocana-buddha-450134

Tuesday, April 16, 2019

गांधार कला - ४

मुशाफिरी कलाविश्वातली

गांधार कला – ४

या आधीच्या भागात आपण प्राचीन गांधार प्रदेशाचा इतिहास आणि गांधार कलेविषयी काही माहिती पाहिली.

गांधार कलेत आपल्याला मुख्यत्वेकरून बौद्ध धर्माशी निगडित कला पाहायला मिळते. ज्या त्या ठिकाणी, त्या काळात बनवल्या गेलेल्या मूर्त्यांमध्ये एक प्रकारचे साम्य दिसून येते. सहसा बुद्धांनी घेतलेल्या वस्त्रानं दोन्ही खांद्यांना झाकलेलं पाहायला मिळतं. बऱ्याचदा त्यांचा डावा हात खाली तर उजवा हात 'अभय मुद्रा' किंवा 'वरद मुद्रा' यामध्ये पाहायला मिळतो. 'अभयमुद्रा' हे अर्थातच अभय देण्याचं चिन्ह आहे. अभयमुद्रा सुरक्षा, शांती दर्शवते. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मातल्या बऱ्याच प्रतिमांमध्ये ही मुद्रा पाहायला मिळते. 'वरदमुद्रा' काहीतरी वरदान देण्याचा इशारा दर्शवते.

वरदमुद्रा


अभयमुद्रा

काहीवेळा आपल्याला बुद्धांच्या हाताची 'भूमिस्पर्श मुद्रा' किंवा 'धम्मचक्र मुद्रा' आपल्याला दिसते. 'भूमिस्पर्श' मुद्रेत बुद्धांचा हातात बसलेल्या अवस्थेत जमिनीला टेकलेला दिसतो. भूमिस्पर्श म्हणजे जमिनीला स्पर्श. भूमिस्पर्श मुद्रेला 'पृथ्वीसाक्ष मुद्रा' असंही म्हटलं जातं. (कारण बुद्धांना जेंव्हा ज्ञानप्राप्ती झाली होती तेंव्हा त्यांनी पृथ्वी देवतेला साक्ष म्हणून बोलावलं होतं असं मानतात.) धम्मचक्र मुद्रेत एका विशिष्ट प्रकारे दोन्ही हातांचा वापर केला जातो. धर्माचं चक्र गतिमान झाल्याचं ही मुद्रा दर्शवते.

बुद्धांच्या डोक्यावर उष्णीष (डोक्याच्या वर बांधलेला केसांचं गोल) दिसून येतो. तर कपाळावर टिळ्यासारखा गोल दिसतो. अंगावर दागिने दिसत नाहीत पण लांबलेल्या कानांवरून ते एके काळी (राजपुत्र असताना ) जाड कर्ण आभूषणं वापरात असावेत याची कल्पना येते. त्यांच्या डोक्याच्या मागं एक प्रकाशमान गोल दिसतो. कधी कधी या गोलांसोबत कमळाचं फुलंही दिसतं.  काही वेळेला बुद्ध ध्यान मुद्रेत बसलेले दिसून येतात. ध्यान मुद्रेत एका हाताच्या तळव्यामध्ये दुसरा हात दिसतो. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे असतात. ही मुद्रा संपूर्ण समतोल दर्शवते. बुद्धांना ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी बुद्ध ह्याच मुद्रेत ध्यान करत होते असं मानलं जातं.

ध्यानमुद्रा


कुशाणांच्या काळात बौद्ध लोकांची चौथी धर्मपरिषद भरली. या काळात 'महायान पंथ' पुढे येऊ लागला. महायान पंथाला मान्यता मिळण्यापूर्वी बुद्धांची प्रतिमा बनवली जायची नाही. 'बुद्ध' हे शिल्पाकृतींमध्ये प्रतीक रूपानं दाखवले जायचे. आता 'बोधिसत्व' या संकल्पनेचा स्वीकार होऊ लागला. 'बोधिसत्व' म्हणजे अशी व्यक्ती जी बुद्धत्व मिळवण्याच्या मार्गावर आहे पण जिला अजून बुद्धत्व प्राप्त झालेलं नाही. 'बुद्ध' आणि 'बोधिसत्व'यांच्या प्रतिमा आता शिल्पांमध्ये दिसू लागल्या.

'पुरुष बोधिसत्व' सहसा उभारल्या अवस्थेत दिसतात. त्यांनी धोतर परिधान केलेलं दिसतं. तर खांद्यावर उपरणं घेतलेलं दिसतं. बहुतेक वेळा बोधिसत्वांची केशभूषा अगदी तपशीलवार दाखवलेली दिसते. बोधिसत्वांचे कुरळे केस खांद्यापर्यंत आलेले दिसतात. बुध्दांप्रमाणेच बोधिसत्वांच्याही डोक्यावर  उष्णीष (केसाचा गोल) आणि कपाळावर एका प्रकारचा टिळा दिसतो. बोधिसत्वांच्या पायात बऱ्याचदा वहाणा दिसतात. बुद्धांप्रमाणेच बोधिसत्वांनाही मिशा दाखवलेल्या दिसतात.

गांधार कलेत बुद्ध आणि बोधिसत्व यांच्याशिवाय बऱ्याचदा एक प्रकारचं कथानक सांगणारी शिल्पंही पाहायला मिळतात. ही कथानकं जातककथांमधून घेतलेली असतात.  बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेला क्षण आणि नंतरचं दृश्य दाखवणारी शिल्पंही ह्यामध्ये दिसतात.  अश्वघोष यानं लिहिलेल्या 'बुद्धचरितम्' मधले बुद्धांच्या चरित्रातले प्रसंगही दिसतात.

बुद्ध आणि बोधिसत्व यांच्याशिवाय इतर बौद्ध देवतांची शिल्पंही आपल्याला गांधार कलेत दिसतात. अंगानं जाड असणारा कुबेर, आपण मागच्या लेखात पाहिलेली हरिती आणि पंचिक यांची शिल्पंही दिसतात. हरितीसोबत सहसा बरीचशी लहान मुलंही दिसतात. 'यक्षी' आणि 'यक्ष' यांची शिल्पंही गांधार कलेत आढळतात. याशिवाय रोमन शैलीतली मद्य पिणाऱ्या मंडळींची शिल्पंही गांधार कलेत आढळतात. त्या काळच्या समाजात मद्यप्राशनाला बऱ्यापैकी मान्यता होती असं जाणवतं.

गांधार कला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकसारखी होती असं मुळीच नाही. काळाच्या ओघात गांधार कलेत बरेचसं बदल होत गेले. सुरुवातीच्या काळातली गांधार कला काहीशी ओबडधोबड दिसते. यात ग्रीक कलेचा प्रभाव अगदी कमी प्रमाणात दिसतो. या काळातल्या शिल्परचनांच्या मांडण्या  काळजीपूर्वक केलेल्या दिसत नाहीत.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:  

🍀  http://www.religionfacts.com/
🍀  https://www.burmese-art.com/about-buddha-statues/hand-positions/dharmachakra-mudra
🍀  https://www.yogapedia.com/definition/6871/dhyana-mudra
🍀  https://youtu.be/anBKOzsuPaw

Monday, April 8, 2019

गांधार कला - ३

मुशाफिरी कलाविश्वातली

गांधार कला – ३ 

या आधीचे भागात आपण प्राचीन गांधार प्रदेशाचा इतिहास पाहिला:

गांधार कला - १ :
गांधार कला - २ :

गांधारमध्ये वेगवेगळे व्यापारी मार्ग येऊन मिळत होते. युरोपमधून येणारा मार्ग मेसोपोटेमिया, इराण, अफगाणिस्तानमधून गांधारला मिळत होता. तर दुसरीकडं चीनमधून येणारा सिल्क रूट गांधारमध्ये येत होता. पूर्वेला गांधार भारताला जोडला गेला होता. वेगवेगळ्या देशांमधून येणारे हे सारे व्यापारी मार्ग एका अर्थानं वेगवेगळ्या देशांमधल्या संस्कृतींनाही जोडत होते. या व्यापारी मार्गांवर (किंवा व्यापारी मार्गांपासून जवळ) वसलेल्या शहरांमध्ये 'गांधार कला' विपुल प्रमाणात पाहायला मिळते. इतर संस्कृतींशी संबंध आल्यानं गांधार कलेत आपल्याला ग्रीक, रोमन, पर्शियन, भारतीय कलेचा मिलाफ झालेला दिसतो. भारतातल्या मथुरा आणि सारनाथ इथल्या कलांचाही प्रभाव गांधार कलेत दिसतो.

कबरीच्या बांधकामावर केलेल्या कलेला 'मोर्च्युअरी आर्ट' असं म्हणतात. रोमन लोकांच्या कबरीवर एक कोरीव कलेची एक विशिष्ट प्रकारची सजावट दिसून येते. नेमकी अशीच कोरीव कला गांधारमधल्या एखादी कथा सांगणाऱ्या शिल्पात (narrative art) दिसून येते. एखादी दैवी गोष्ट दाखवायची असेल तर, किंवा सजावट दाखवायची असेल तर गांधार कलेत ग्रीक आणि इराणी कलेतून काही गोष्टी घेतलेल्या दिसतात.

हे लोक शिल्पं नेमकं कशाची बनवायचे? ही शिल्पं बनवताना वालुकाश्म, शिस्ट (सुभाजा), स्लेट नावाचा पाषाण आणि स्टको (चुनेगच्ची) वापरायचे. सोनं आणि तांब्याच्या धातूंमधलं कोरीव कामदेखील याठिकाणी मिळालेलं आहे.  हे शिल्प बनवताना नेमकं कोणत्या प्रकारचं शिल्प बनवायचं आहे, यावर ते कोणतं माध्यम वापरून बनवायचं ते ठरायचं. काही काही ठिकाणी फर्निचरमध्ये हस्तिदंतावरचं कोरीव कामही पाहायला मिळतं. ह्या प्रकारचं फर्निचर मुख्यत्वेकरून राजवाड्यांमध्ये पाहायला मिळतं. (जिथं गांधार आणि मथुरा अशा दोन्ही ठिकाणांच्या कला दिसतात)

गांधार कलेच्या शैलीची आपण काही वैशिष्टयं पाहू. गांधार शिल्पांमध्ये आपल्याला एक प्रकारची नैसर्गिकता दिसते. म्हणजे शिल्पामधले आकार, प्रमाण, वस्त्रांवरच्या वळ्या अगदी नैसर्गिक वाटतात. शिल्पांमधली शरीरं अगदी आदर्श प्रकारे प्रमाणबद्ध दाखवली आहेत. शरीराचं आदर्श सौन्दर्य दाखवण्याची पद्धत अभिजात ग्रीक कलेतून घेतलेली दिसते.  (आपण जर यांची तुलना मथुरा किंवा सांची, भारहूत इथल्या शिल्पाशी केली तर मथुरा/सांची/भारहूत इथली शिल्पं कमी नैसर्गिक वाटतात आणि इथं शरीराच्या प्रमाणापेक्षा कलाकृतीच्या विषयाला जास्त महत्व दिलेलं दिसतं.) गांधारमधल्या शिल्पांमधली शरीरं तारुण्यातली आणि मजबूत दाखवली आहेत. (कारण आदर्श/प्रमाणबद्ध शरीर हे तारुण्यात असतं.) पुरुषांच्या शिल्पांमध्ये शरीरसौष्ठव उठून दिसतं. यात स्नायू, रक्तवाहिन्या यासारखे तपशील स्पष्टपणे दाखवले आहेत. पुरुषांमध्ये छाती आणि पोट V आकारात ना दाखवता काहीसं चौरसाकृती दाखवलेलं दिसतं. बहुतेकवेळा  केस कुरळेच दाखवलेले दिसतात. चेहऱ्यावर नाक, ओठ वगैरे अवयव अतिशय रेखीव पद्धतीनं दाखवलेले दिसतात.

हरिती आणि पंचिक

सोबत दिलेल्या चित्रात आपल्याला बौद्ध पुराणातली 'हरिती'नावाची यक्षिणी आणि तिचा पंचिक नावाचा यक्ष पती दिसतोय. पुराणकथेप्रमाणं ही हरिती आजच्या बिहारमधल्या नालंदेजवळच्या राजगीर नावाच्या ठिकाणी राहायची. ती सुरुवातीला राक्षसीण होती. तिला ५०० मुलं होती. ती (आणि तिची मुलं) नरमांसभक्षण करायचे. ती इतरांच्या मुलांना ठार मारायची आणि स्वतः खायची, तसंच आपल्या मुलांना खायला द्यायची. हे भयानक काम करताना ती इतर १० राक्षसिणींची मदतही घ्यायची.

स्वतःची मुलं गमावण्याची यातना भोगणाऱ्या माता गौतम बुद्धांकडे गेल्या. त्यांनी आपली कहाणी बुद्धांना सांगितली. बुद्धांनी हरितीच्या५०० मुलांपैकी सर्वात लहान असणारा मुलगी (काही कथांप्रमाणे सर्वात लहान मुलगी) पळवून लपविला. पुत्रवियोगाच्या वेदनेनं हरितीनं आपल्या पुत्राचा साऱ्या ब्रह्माण्डात शोध घेतला. दुर्दैवानं तिला तिचा मुलगा सापडला नाही. शेवटी ती बुद्धांकडं आली. बुद्धांनी तिला विचारलं की जर ५०० मुलांपैकी एकाला गमावल्यानं तिला इतकं दु:ख होत असेल तर ज्यांची एकुलती एक मुलं हरितीनं संपवली होती त्यांची अवस्था कशी असेल ?

हरितीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिनं भविष्यात कुठल्याही मुलाला ना मारण्याची शपथ घेतली. मुलांचं मांस खाण्याऐवजी डाळिंबं खाण्याचा तिनं निश्चय केला. यानंतर हरिती लहान मुलांची आणि बाळांना जन्म देणाऱ्या मातांची रक्षणकर्ती बनली. बुद्धांनी तिला आजाऱ्याला बरं करण्याची शक्ती, दुष्टशक्तींपासून वाचण्याची शक्ती दिली.

गांधार कलेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामधली शिल्पं ही कुठल्या ना कुठल्या वास्तूचा भाग असल्याचं दिसून येतं. म्हणजे ही शिल्पं भारतात सापडतात त्याप्रमाणं स्वतंत्र बनवलेली शिल्पं नसतात. बरीचशी शिल्पं एखाद्या बौद्ध वास्तूशी संबंधित कलेचं भाग असल्याचं दिसून येतं. उदा. बौद्ध स्तूप किंवा बौद्ध विहार यांचा भाग असणारी शिल्पं.

बुद्ध किंवा बोधीसत्व यांच्या शिल्पांमध्ये प्रत्येक भौगोलिक भागात एक प्रकारची समानता दिसून येते. उदाहरणार्थ स्वात खोऱ्यातल्या बुद्धांच्या मूर्त्यांमध्ये प्रमाण, मुद्रा, कुरळे केस, बसण्याची पद्धत वैगेरे गोष्टी (काही काळाकरता) एकसारख्याच दिसतात. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर शिल्पाची रचना त्या त्या भागात त्या त्या कालखंडात कॉपी केलेली दिसते.

या गांधार शिल्पांमधले विषय बहुतेकवेळा बौद्ध धर्माशी संबंधित दिसतात. यात बुद्ध, बोधिसत्व यांच्या प्रतिमा, बुद्धांच्या आयुष्यातले प्रसंग दाखवणारी शिल्पं यांचा समावेश होतो. गांधार कलेत आपल्याला ग्रीक-रोमन लोकांच्या झ्यूअस, अपोलो, एथिना यासारख्या प्रमुख देवतांची शिल्पंही आढळतात. याशिवाय आपल्याला राजघराण्यातल्या लोकांची शिल्पंही दिसतात. बुद्धांच्या बहुतेक साऱ्या प्रतिमा उभारलेल्या अवस्थेतल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचदा एक पाय थोडासा वाकलेला दिसतो. बुद्धांच्या प्रतिमेत अजूनही काही गोष्टी आढळून येतात. त्या आपण पुढच्या भागात पाहू. 

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ: 

🍀 https://en.wikipedia.org/wiki/Greco-Buddhist_art

🍀 Gandhara sculptures from Pakistan museums – Benjamin Rowland

🍀 https://youtu.be/anBKOzsuPaw

Tuesday, April 2, 2019

गांधार कला - २

मुशाफिरी कलाविश्वातली

गांधार कला - २

मागचा भाग: गांधार कला - १ 

यातल्या डिमीट्रीयसनं आपलं राज्य पंजाब आणि सिंधपर्यंत वाढवलं. त्याच्या कारकिर्दीत बनवल्या गेलेल्या नाण्यांवर ग्रीक आणि प्राकृत अशा दोन्ही भाषा वापरलेल्या दिसतात. या नाण्यांवरची लिपी ग्रीक आणि खरोष्ठी आहे. आजच्या काळातलं पाकिस्तानातल्या पंजाबमधलं 'सियालकोट' हे त्याच्या राज्याच्या राजधानीचं शहर होतं. या ग्रीक घराण्यातल्या राजांची नावं त्या काळच्या सापडलेल्या नाण्यांवरूनच समजतात. 

या घराण्यातला सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे मिनँडर (मिलिंद). यांच्या काळातही राजधानी सियालकोटलाच होती. त्याच्या कारकिर्दीतल्या सापडलेल्या नाण्यांवर वेगवेगळ्या वयांमधला मिलिंद पाहायला मिळतो. यावरून त्यानं बरीच वर्षे राज्य केल्याचं स्पष्ट होतं. या राजाचं राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला मथुरेपर्यंत होतं. मिलिन्दनं नागसेन नावाच्या बौद्ध भिक्षूला बरेचसे प्रश्न विचारले. नागसेननं या प्रश्नांना दिलेली उत्तरं 'मिलिंद पन्हा' या नावाच्या ग्रंथामध्ये आहेत. बौद्ध धार्मिक साहित्यात हा एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. मिलिन्दनं नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मिलिन्दनं बौद्ध धर्माच्या प्रसाराला बरीच चालना दिली. मिलिन्दनंतर ग्रीक घराण्यात कुणी फारसा प्रभावी राजा झाला नाही. मिलिंदच्या मृत्यूनंतर सर्वसाधारण शंभरेक वर्षे ग्रीकांची सत्ता चालली.

Jnzl's Public Domain Photos [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Gandharan_sculpture_-_head_of_a_bodhisattva_front_view.jpg

यानंतर गांधारवर पल्लव (इराणी लोक) आणि शक (मध्य आशियातून आलेले लोक) यांचं काही काळ राज्य होतं. यांचं राज्य फार काळ चाललं नाही. पण यानंतर आलेल्या कुशाण लोकांचं राज्य मात्र बराच काळ टिकलं.

कुशाण मध्यआशियामधून आले होते. गांधारचं राज्य त्यांनी जिंकलं. कडफैसेस (पहिला) नावाच्या राजानं गांधारचा ताबा मिळवला. अर्थातच त्याच्या राज्यात इतरही प्रांत येत होते. या नंतर आलेल्या कडफैसेस (दुसरा) यानं कुशाण साम्राज्य मथुरेपर्यंत वाढवलं. हिंदू धर्मातल्या शैव पंथाचा त्यानं स्वीकार केला. (तो नाण्यांवर स्वतःचा उल्लेख 'महेश्वर'असा करत असे.) त्यानं चीन आणि रोम यांच्याशी चांगले संबंध राखले.

कुशाण साम्राज्यातला सर्वात महत्वाचा राजा म्हणजे कनिष्क. तो यशस्वी योद्धा असल्याचे, आणि त्यानं बरीचशी युध्दं केल्याचे उल्लेख प्राचीन चिनी, तिबेटीय आणि भारतीय ग्रंथांमध्ये आढळतात. 

  कनिष्कचं भारताच्या सांस्कृतिक इतिहासात बरंचंसं योगदान आहे. त्यानं काश्मीर जिंकून तिथं बऱ्याचशा वास्तू उभारल्या. तिथं कनिष्कपूर नावाचं एक नगरही बसवलं. कनिष्कनं पाटलीपुत्र जिंकल्यावर त्याला तिथं अश्वघोष नावाचा एक महान बौद्ध तत्वज्ञ भेटला. कनिष्कच्या दरबारात याला खूप महत्त्वाचं स्थान मिळालं. कनिष्कनं नंतर चीनमध्येही आपलं साम्राज्य वाढवलं. कनिष्क हा बौद्ध धर्माचा खूप मोठा अाश्रयदाता होता. आपल्या कारकिर्दीत त्यानं  वेगवेगळ्या ठिकाणी बरेचशे बौद्ध स्तूप, चैत्य आणि विहार बांधले. नागार्जुन, अश्वघोष आणि वसुमित्र यासारख्या बौद्ध विद्वानांना त्यानं आश्रय दिला. चीन, तिबेट, जपान आणि मध्य आशिया या ठिकाणी त्यानं बौद्ध धर्मप्रसारक पाठवले. याच्याच कारकीर्दीत काश्मीरमधल्या कुंदनवन इथं बौध्दांची चौथी धर्मपरिषद भरली. यात वसुमित्र अध्यक्ष तर अश्वघोष उपाध्यक्ष होते.

याच काळात बौद्ध धर्मातल्या महायान पंथाच्या तत्वज्ञानाला अंतिम आकार देण्यात आला. कनिष्कनं संस्कृत साहित्यालाही चालना दिली, त्यामुळं या काळात उत्कृष्ट संस्कृत साहित्यही निर्माण झाले.

कनिष्कची राजधानी पुरुषपूर (आजचं पाकिस्तानमधलं पेशावर) ही होती. त्याच्या राज्यात पुरुषपूर शिवाय दुसरं महत्वाचं असणारं शहर म्हणजे मथुरा!

इ. स .पू पहिल्या शतकात बॅक्टरीया (गांधारच्या वायव्येस असणारा प्रदेश) इथं राहणाऱ्या सिकंदरच्या ग्रीक वंशजांना शकांनी हाकलून लावलं. हे ग्रीक लोक मग गांधारमध्ये येऊन स्थिरावले. गांधारमध्ये आढळणाऱ्या ग्रीक कलेचा प्रभाव असणाऱ्या गांधार शैलीतल्या कलाकृती दिसायला सुरुवात होते ती याच काळापासून !! आणि आपण बघितल्याप्रमाणं इथं ह्या काळात बौद्ध धर्माचा चांगला प्रसार झाला होता. यामुळं गांधार शैलीत आपल्याला बौद्ध धर्मातल्या कलाकृती बघायला मिळतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍀 History and culture of ancient Gandhara and western Himalayas – B K Kaul deambi (Ajantha publishing house 1985)

🍀 Gandhara sculptures from Pakistan museums – Benjamin Rowland

🍀 Hellenism in Ancient India – Gauranga Nath Banerjee (BUTTERWORTH & Co. (INDIA), LTD 1920)