Saturday, June 6, 2020

विजापूरचे आदिलशहा


मुशाफिरी कलाविश्वातली

विजापूरचे आदिलशहा

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली. त्यापूर्वीच्या आठशे वर्षांत इराणवर राज्य करणारे लोक अरब, मंगोलियन किंवा इतर कुणीतरी परकीय होते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इस्माईल (पहिला) यानं एका साम्राज्याची स्थापना करायला सुरुवात केली. इराणच्या इतिहासातली ही एक महत्वाची घटना मानली जाते. पुढं त्याच्या घराण्यानं जवळपास दोनशे वर्षे राज्य केलं. त्याचं साम्राज्य इराणच्या बाहेरही पसरलं होतं. आपल्या कारकिर्दीत त्यानं इस्लाममधल्या शिया पंथाचा पुरस्कार केला.

सोबतच्या चित्रात मध्यभागी सोन्याची किल्ली हातात देणारा व्यक्ती म्हणजे हाच इस्माईल (पहिला). तो ज्या व्यक्तीला किल्ली देतोय ती व्यक्ती म्हणजे युसूफ आदिल शहा. विजापूरच्या आदिल शहांपैकी हा युसूफ आदिल शहा पहिला.

या युसूफच्या पूर्वजांविषयी नक्की माहिती मिळत नाही. पण त्याचा इराणशी संबंध होता असं मानलं जातं. तो बहमनी राज्यात काम करायचा. त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचं शौर्य पाहून बहमनी सुलतान प्रभावी झाला होता. त्यानं या युसुफला विजापूर प्रांताचा एक प्रकारचा प्रशासक बनवलं. बहमनी सत्ता खिळखिळी झाल्यावर युसुफनं स्वत:ला विजापूरचा सुलतान बनवलं. इथून विजापूरच्या आदिलशहा घराण्याला सुरुवात झाली.  त्याच्या राज्यात अधिकृत भाषा फार्सी (म्हणजेच इराणी) होती.  

नंतरच्या काळात आदिलशहाच्या राज्याच्या सीमा बदलत गेल्या. युसूफ आदिल शहाचे वंशज गादीवर येत राहिले. त्यातले बहुतेक सारे लोक सहिष्णू होते. या सर्व घराण्यामध्ये राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो तो इब्राहिम आदिल शहा (दुसरा) याच्या काळात. तो एक उत्कृष्ठ प्रशासक तर होताच पण शिवाय तो एक कवी आणि कलाकारही होता. त्याच्या काळात चित्रकलेची भरभराट झाली. इतर धर्मांविषयी तो खूप सहिष्णू होता. त्यानं 'किताब--नवरस' नावाचं भारतीय सौंदर्यशास्त्रावरचं पुस्तकही लिहिलं होतं. (या पुस्तकाची सुरुवात त्यानं सरस्वती देवीच्या प्रार्थनेनं केली होती.) इब्राहिम आदिल शहा (दुसरा) याच्या कारकीर्दीनंतर आदिलशहा राज्याला उतरती कळा लागली.

एकूणच साऱ्या आदिलशहांच्या काळात कलेची भरभराट झाली. या काळात दूरदूरच्या राज्यांमधून विद्वान मंडळी, कवी, चित्रकार, नर्तक, संगीतकार आणि सुलेखन (calligraphy) करणारे लोक विजापूरला येऊन स्थायिक झाले. त्यामुळं या काळात विजापूर एक प्रकारे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जायचं.

या घराण्यातला शेवटचा बादशहा म्हणजे सिकंदर आदिल शहा. १६७२ मध्ये वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी तो गादीवर आला. १६८५ साली औरंगजेबानं विजापूर ताब्यात घेतलं. प्रचंड मुघल सेनेसमोर सिकंदर काही करू शकला नाही.

सोबतचं चित्र १६८० साली काढलं गेलं. म्हणजे अदिलशहाच्या राज्याचा शेवट होण्यापूर्वी काढलं गेलेलं चित्र. हे चित्र त्याकाळचे चित्रकार कमाल मुहम्मद आणि चांद मुहम्मद यांनी काढलं. या चित्रात युसूफ आदिल शहा पासून ते सिकंदर आदिल शहा पर्यंत घराण्यातले सारे सुलतान दाखवण्यात आलेले आहेत. वर पाहिल्याप्रमाणं युसुफच्या हातात किल्ली देतोय तो इराणचा इस्माईल (पहिला). यातून युसुफची इराणशी आणि शिया पंथाशी असणारी निष्ठा दाखवण्यात आली आहे.  या चित्रात बसलेल्या लोकांपैकी सर्वात उजवीकडं दिसणारा मुलगा म्हणजेच सिकंदर आदिल शहा.  



विजापूरच्या चित्रांमध्ये दिसून येणाऱ्या काही गोष्टी या चित्रातही दिसतात. उदा. चित्रामध्ये गुलाबी रंगाचा वापर भरपूर प्रमाणात दिसतो. चित्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कोनांमधून दिसतात (varying perspective). याशिवाय विजापूरच्या चित्रशैलीत आढळणारी एक प्रकारची कल्पनारम्यता (या जगात सापडणारी गोष्ट दाखवणं. हा परिणाम साधण्यासाठी काहीतरी अतार्किक गोष्टी दाखवल्या जातात) इथंही दिसते. उदा. गालिच्याकडं नेणाऱ्या अधांतरी पायऱ्या पहा. पाठीमागं दाखवण्यात आलेले उंच पर्वत इराणशी संबंध दाखवतात. चित्रातल्या साऱ्या मंडळींची आसनं ज्या गालीचावर आहेत त्यावर सुंदर नक्षीकाम दिसते. प्रत्येकाच्या आसनाला जोडूनच असणारे छत्रही आपल्या चित्रात दिसते. चित्रात दूर मागं पाणी दिसतं. विजापूर राज्य अरबी समुद्रापर्यंत असल्याचं यातून सूचित केलंय. चित्रात दाखवण्यात आलेल्या लोकांजवळ असणाऱ्या कट्यारांची रचनाही त्या त्या लोकांच्या काळानुसार आहे !!

जलरंगात काढल्या गेलेल्या या चित्रात सोन्याचा आणि चांदीचाही वापर केला गेला आहे. विजापूरच्या घराण्यातील साऱ्या सुलतान मंडळींना एकत्रित दाखवणारं हे चित्र सध्या न्यूयॉर्कमधल्या कलासंग्रहालयात आहे.


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :


Image Credit
Metropolitan Museum of Art / Public domain

No comments:

Post a Comment