Monday, June 17, 2019

विख्यात चित्रकार धुरंधर (पूर्वार्ध)


मुशाफिरी कलाविश्वातली

विख्यात चित्रकार धुरंधर (पूर्वार्ध)

आपली स्केचबुक आपल्या जवळ ठेवायची त्यांना कॉलेजच्या काळापासूनच सवय होती. जे काही समोर दिसेल त्याचं रेखाटन ते या स्केचबुकमध्ये करत असत. ते भारतात बऱ्याच ठिकाणी फिरले आणि ठिकठिकाणांची रेखाटनं त्यांच्या स्केचबुक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक रेखाटनाखाली त्यांनी तारीख आणि स्थानही लिहिलेलं आहे. हा काळ विसाव्या शतकातील सुरुवातीचा असल्यानं आपल्याला या रेखाटनांमध्ये इंग्रजांच्या राज्यातलं भारतातलं सामाजिक जीवन पाहायला मिळतं. मृत्यूसमयी त्यांची जवळपास ८० ते ८५ स्केचबुक्स भरली गेली होती. हा एक मोठा अमूल्य खजिना मानला जातो. यामध्ये ३'' X ६'' अशा छोट्या आकाराच्या स्केचबुकपासून ते १२'' X १५'' अशा मोठ्या आकाराची स्केचबुक्स आहेत. यामधली बरीचशी रेखाटनं फक्त पेन्सिलची असली तरी काही रेखाटनं जलरंगात रंगवली आहेत.

ब्रिटिशांच्या काळातले हे प्रसिद्ध चित्रकार कोल्हापूरचे होते, त्यांचं नाव होतं 'महादेव विश्वनाथ धुरंधर' !

कोल्हापूरच्या राजघराण्याशी निष्ठावंत असणाऱ्या एका प्रतिष्ठित घराण्यात महादेव धुरंधर यांचा जन्म झाला. खरंतर त्यांचा जन्म त्याच्या आजोळात म्हणजे मुंबईमधल्या 'फणसवाडी' इथं झाला. यानंतर ते कोल्हापूरमध्येच वाढले. कोल्हापूरमधल्या राजाराम हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. रेखाटन करण्यात त्यांचं शालेय काळातही प्रभुत्व होतं आणि त्यांना  शालेय जीवनात चित्रकलेतली वेगवेगळी पारितोषिकं मिळाली  होती .

त्याकाळचे कोल्हापूरमधले सुप्रसिद्ध असणारे चित्रकार म्हणजे 'आबालाल रहिमान.' आबालाल रहिमान यांची चित्रं छोट्या महादेवला लहानपणी खूप आवडायची. एक दिवस त्यांच्या भावानं आबालाल रहिमान यांना छोट्या महादेवाला चित्रकलेमध्ये मार्गदर्शन करण्याची विनंती केली. आबालाल रहिमान यांनी महादेवला रेखाटन आणि चित्र रंगवण्यासाठीच्या काही महत्वपूर्ण सूचना केल्या.


राधा आणि कृष्ण यांचं 
धुरंधर यांनी काढलेलं एक चित्र

मॅट्रिकच्या परीक्षेनंतर महादेव धुरंधर यांना चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली. याठिकाणी धुरंधर कलेचा ध्यास घेऊन शिकले. तिथल्या साऱ्या शिक्षकांचा ते आवडता विद्यार्थी बनले. या काळातला सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मधला अभ्यासक्रम लंडनमधल्या रॉयल अकॅडेमी ऑफ आर्टस् या संस्थेच्या तत्त्वांप्रमाणं बनवला होता आणि त्यामध्ये वास्तववादी चित्रकलेला महत्त्व होतं.  चित्रामधली शरीराची प्रमाणबद्धता, बारीकसारीक तपशिलांमधली अचूकता आणि प्रकाशयोजना या गोष्टींचा सखोल अभ्यास या अभ्यासक्रमात होता. वास्तववादी चित्रणावर प्रभुत्व येण्यासाठी या अभ्यासक्रमात रेखाटनं काढण्यावर खूप जास्त भर देण्यात आलेला होता. त्यांना वेगवेगळे विषय असणारी छोट्या छोट्या गोष्टींची कित्येक रेखाटनं करायला लागत असत. रेखाटनांवर एकदा प्रभुत्व आले की मगच तिथं जलचित्रं किंवा तैलचित्रं काढण्याचं शिक्षण दिलं जायचं. इथल्या साऱ्या परीक्षांमध्ये त्यांचा नेहमीच पहिला क्रमांक यायचा !!

विद्यार्थी असतानाच त्यांनी 'महाराष्ट्रीयन स्त्रियांचं स्वयंपाकघरात व्यस्त असतानाचं 'एक रेखाटन काढलं होतं. या रेखाटनाला एका ठिकाणी सर्वोत्कृष्ठ रेखाटनाचं पारितोषिक मिळालं. (सध्या हे रेखाटन औंधच्या कलासंग्रहालयात आहे.) यामुळं धुरंधर यांना प्रेरणा मिळाली. यानंतर धुरंधर यांनी आपली चित्रं 'बॉम्बे आर्ट सोसायटी'च्या प्रदर्शनांमध्ये वरचेवर प्रदर्शित करायला सुरुवात केली.

धुरंधर यांच्या आधी भारतामध्ये चित्रकलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मा यांचा दबदबा होता. राजा रविवर्मा महाभारत/हिंदू पुराणे यामधल्या घटना आपल्या चित्रांमध्ये दाखवण्याबद्दल विख्यात होते. अर्थातच धुरंधर यांच्यावरदेखील राजा रविवर्मा यांचा प्रभाव होता. धुरंधर हे देखील बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनीही हिंदू देवी-देवता यांची चित्रं काढायला सुरुवात केली. इतिहासातल्या घटना दाखवणारी चित्रंही ते काढायचे. पण या शिवाय आजूबाजूच्या समाजात जे काही दिसतंय याचीही ते चित्रं काढायचे. त्यावेळच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग त्यांच्या चित्रांमध्ये दिसून यायचे. वेगवेगळे सण, धार्मिक विधी किंवा विवाहासारखे कार्यक्रम या विषयीची त्यांची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat.asp
https://www.livemint.com/Leisure/PaYpPqk31KkultIyyaDVGP/MV-Dhurandhar-Servant-of-the-Raj-painter-of-the-soil.html
https://en.wikipedia.org/wiki/M._V._Dhurandhar

No comments:

Post a Comment