Monday, June 24, 2019

विख्यात चित्रकार धुरंधर (उत्तरार्ध)

मुशाफिरी कलाविश्वातली 

विख्यात चित्रकार धुरंधर (उत्तरार्ध)


धुरंधर भारतात बऱ्याच ठिकाणी फिरले. हा काळ सर्वसाधारण शंभर वर्षांपूर्वीचा होता. या काळातल्या भारतीय स्त्रियांची स्थानिक परंपरेनुसार पोशाख परिधान केलेली चित्रं त्यांनी काढली. ही सारी चित्रं नंतर प्रकाशितही झाली. समीक्षकांनी आणि रसिक मंडळींनी या चित्रांना दाद दिली. या चित्रात समाजाताल्या सर्व स्तरातल्या स्त्रिया पाहायला मिळतात. यातली काही चित्रं सोबत दिली आहेत. या चित्रांमध्ये त्याकाळच्या सिंध प्रांतातली कोळी समाजातली स्त्री, कच्छ प्रांतातली राजपूत स्त्री, म्हैसूर मधली स्त्री, पठाणी स्त्री, झाडूवाली स्त्री, अहमदाबादमधली पाणी घेऊन जाणारी स्त्री, उत्तर भारतातील मुसलमान स्त्री, बंगाली स्त्री, जैन साध्वी, विणकर स्त्री, गवळी स्त्री, मुंबईमधली कोळी समाजातली स्त्री, भिल्ल मुलगी , मिर्झापूरची नर्तिका, तंजावरची नर्तिका, कर्नाटकातील नायकीण, गुरख्याची पत्नी, काश्मिरी स्त्री, दख्खनमधली विधवा स्त्री, भटक्या समाजातली स्त्री आणि त्या काळातल्या इतर बऱ्याच स्त्रियांचा समावेश होतो.

मेवाडमधली स्त्री


पठाण स्त्री

सिंध प्रांतातली कोळी समाजाची स्त्री

अहमदाबादमधली पाणी घेऊन जाणारी स्त्री


धुरंधरांचं लग्न बापूबाई यांच्याशी झालं होतं. पण लग्नानंतर दीड वर्षातच त्या प्लेगनं वारल्या. यानंतर धुरंधरांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं गंगुबाई. धुरंदराच्या कलेच्या क्षेत्रातल्या कार्याचं बरंचंसं श्रेय या गंगुबाईंना जातं. घर आणि संसार यांच्या जबाबदाऱ्या गंगुबाईंनी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळंच  धुरंधर कलेसाठी व्यवस्थित वेळ देऊ शकले.

धुरंधरांनी आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीचीही बरीचशी चित्रं आणि रेखाटनं केली होती. यातली काही रेखाटनं समोर बसून अगदी कमी वेळेत झटपट केली होती तर काही रेखाटनं फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर केली होती. अर्थात ही रेखाटनं/चित्रं त्यांनी नंतर पूर्ण केली होती. नोकरीचं पर्व संपल्यानंतर निवृत्तीकाळात त्यांनी आपल्या रेखाटनांच्या वहीतून आपल्या पत्नींची चित्रं वेगळी केली. या साऱ्या चित्रांचं त्यांनी उत्कृष्ठ दर्जाचं कव्हर वापरून एक नवीन पुस्तक बनवलं. या पुस्तकाला त्यांनी नाव दिलं - 'कलेमध्ये माझी पत्नी' (My wife in art). स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी या पुस्तकाला अत्यंत हृदयस्पर्शी अशी प्रस्तावना लिहिली. आपल्या पत्नीच्या स्मृतींस त्यांनी हे पुस्तक समर्पित केलं.

नंतरच्या काळात धुरंधरांच्या कन्येनं हे पुस्तक प्रकाशित करण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते काही प्रकाशित होऊ शकलं नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक आज कुठं आहे ते कुणालाच माहीत नाही. आपल्या पत्नीच्या चित्रांचा, रेखाटनांचा एखाद्या चित्रकारानं इतक्या प्रेमानं केलेला कदाचित हा एकमेव अल्बम असावा !!
ब्रिटिश काळात 'राव बहादूर' असा एक किताब मोठ्या कार्यासाठी दिला जायचा. ब्रिटिशांकडून धुरंधरांना 'राव बहादूर' हा किताब मिळाला.

निवृत्तीनंतर धुरंधरांना बराच निवांत वेळ मिळू लागला. या काळात त्यांनी आपल्या आयुष्यातल्या आठवणी लिहिल्या. धुरंधरांचा १८९० पासूनच सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् या महाविद्यालयाशी संबंध आला होता. नंतर ते याच महाविद्यालयात शिकवूही लागले. त्यांचा १९३१ पर्यंत या महाविद्यालयाशी संबंध राहिला. धुरंधरांनी जानेवारी १८९० पासून ते जानेवारी १९३१ पर्यंतच्या काळातल्या विविध आठवणी लिहिल्या. हे सारं लिखाण नंतर 'कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे' या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित झालं. हे पुस्तक आजही बाजारात मिळतं. या पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आणि महाविद्यालयातल्या साऱ्या महत्वाच्या घटना वाचायला मिळतात. कलेच्या विद्यार्थ्याना आणि कलाकारांना उपयोगी असणारं, अशा प्रकारचं हे मराठी भाषेतलं पहिलंच पुस्तक असावं असं मानण्यात येतं. या शिवाय धुरंधरांनी अजून एक महत्वाचं लिखाण केलं. त्यांनी १९३३ च्या दरम्यान 'माझे समकालीन चित्रकार' या शीर्षकाखाली एक लेखमाला लिहिली. या लेखमालेत त्यांनी १५ चित्रकार, त्यांची वैयक्तिक माहिती आणि त्यांच्या कलेची माहिती यांचा समावेश केला. लेखक म्हणूनही त्यांचं कलेच्या क्षेत्रातलं योगदान महत्वाचं मानलं जातं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat/Articles-on-M-V-Dhurandhar-by-Nalini-Bhagwat.asp
https://www.livemint.com/Leisure/PaYpPqk31KkultIyyaDVGP/MV-Dhurandhar-Servant-of-the-Raj-painter-of-the-soil.html
https://en.wikipedia.org/wiki/M._V._Dhurandhar


No comments:

Post a Comment