Saturday, August 24, 2019

पिठोरा चित्रं


मुशाफिरी कलाविश्वातली

पिठोरा चित्रं

गुजरातच्या मध्य भागात एक 'राठवा' नावाची भिल्ल/आदिवासी जमात राहते. भारतातल्या इतर भिल्ल जमातींसारखीच या जमातीची स्वतःची अशी एक संस्कृती आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही परंपरा आहेत. ह्या लोकांचं स्वतःचं असं रंजक गोष्टींनी भरलेलं असं पुराणही आहे, सण आहेत, संगीत आहे. त्यांची स्वतःची वेगळी चित्रकलाही आहे. अर्थातच, त्यांचं जीवन आपल्यापेक्षा बरंचंसं वेगळं आहे.

त्या लोकांमध्ये एक खास पद्धत रूढ आहे. जसं आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या येत असतात, तसं ह्या लोकांच्याही आयुष्यात समस्या येत असतात. ह्या समाजातल्या कुणाही व्यक्तीला घरात/जीवनात काही समस्या जाणवू लागल्यास तो जमातीतल्या धर्मप्रमुख अशा तांत्रिकाची भेट घेतो. समस्या असणाऱ्या व्यक्तीला घरधनी (घराचा मालक) असं म्हणतात. (जनावरे मरणे किंवा घरी कुणीतरी आजारी असणे अशा प्रकारच्या या समस्या असतात.)  हा तांत्रिक त्या व्यक्तीला काही तोडगे सांगतो, काही विधी करायला सांगतो. या ठिकाणी घरधनी आपल्या समस्या कमी झाल्यावर घराच्या भिंतींवर 'पिठोरा चित्रे' काढण्याचे नवस बोलतो. कालांतरानं जेंव्हा त्या व्यक्तीच्या समस्या थोड्या कमी झाल्यासारख्या वाटतात, तेंव्हा त्याला आपण बोललेलं नवस फेडायचं असतं.
नवस फेडण्यासाठी घरधनी तांत्रिकाला भेटतो. तांत्रिक त्याला कोणत्या प्रकारची चित्रं भिंतींवर काढायची याविषयी मार्गदर्शन करतो. मग घरधनी लखाराला (पिठोरा चित्रं काढणारा चित्रकार) बोलावतो आणि मग 'लखारा' सांगितलेली चित्रं काढतो. घरावर ही चित्रं पूर्ण होताच नवस फेडणं पूर्ण होतं. यानंतर संगीत, नृत्य यांच्यासहित साऱ्या गावाला जेवण दिलं जातं !


★Anilbhardwajnoida [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)] 
★https://commons.wikimedia.org/wiki/File:Pithora_wall_painting.JPG

या चित्रांना 'पिठोरा' चित्रं का म्हणतात? या जमातीत एक पारंपरिक कथा सांगितली जाते. या कथेप्रमाणं देवांचा राजा असणाऱ्या इंद्राला बहिणी होत्या. यातली एक बहीण होती राणी कडी कोयल. ती एके दिवशी अरण्यात गेली. तिथं ती राजा कंजूराणा याला भेटली. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यातून तिला दिवस गेले आणि मुलगा झाला. पण अजून तिचं लग्न झालं नव्हतं. तिनं (भावाच्या भीतीनं) आपल्या मुलाला वाहत्या  पाण्यात सोडलं.
हे बाळ इंद्राच्या इतर दोन बहिणींना पुढं मिळालं. त्यांनी बाळाला वाचवलं. त्यांनी बाळाचं नाव 'पिठोरा' असं ठेवलं. या बाळाला त्यांनी राजवाड्यात नेलं.

कालांतरानं पिठोरा मोठा झाला. मामा असणाऱ्या इंद्राला पिठोराचं लग्न करायचं होतं. पण पिठोराला आधी आपले आईवडील कोण आहेत ते जाणून घ्यायचं होतं. त्यानं  इंद्राला आपले आई वडील कोण आहेत हा प्रश्न विचारला. यानंतर  इंद्रानं एकदा मोठी सभा बोलावली. यात त्यानं साऱ्या देवीदेवतांना, राजा राणी आणि मोठ्या लोकांना बोलावलं. यात कंजूराणाही होता. पिठोरानं कंजूराणाला पाहताक्षणीच ओळखलं. त्यानं कंजूराणाकडं बोट दाखवत ते आपले वडील असल्याचं सांगितलं. यानंतर पिठोराचं पिठोरीशी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. या लग्नाला सारे देवदेवता घोड्यांवरून किंवा हत्तीवरून आले.

राठवा जमातीचे लोक पिठोराला आपला देव मानतात कारण त्यानं पाहताक्षणीच आपल्या वडिलांना ओळखलं !! ह्या लोकांच्या चित्रात देवमंडळी घोड्यांवरून येताना दिसतात कारण कथेमध्ये पिठोराच्या लग्नात देवदेवता घोड्यांवरून येतात.

पिठोरा चित्रं घराच्या पुढच्या (व्हरांड्याला लागून असणाऱ्या) भिंतीवर आणि घराच्या दोन बाजूला असणाऱ्या भिंतींवर काढली जातात. पुढच्या भिंतींवर असणारं चित्र ११ फूट X फूट इतकं मोठं असतं !! यामध्ये भरभरून देवदेवता, माणसं, प्राणी, निसर्गातल्या गोष्टी असतात. चित्रात वापरण्यात आलेले रंग काहीसे भडक आणि लक्षवेधक असतात. गम्मत म्हणजे या पिठोरा चित्रांमध्ये आधुनिक जीवनातल्या गोष्टीही येतात. या जमातीत चित्रात येणाऱ्या वेगवेगळ्या देवीदेवतांच्या स्वतंत्र अशा गोष्टी आहेत.

पिठोरा चित्रं काढण्यासाठी बरेच दिवस लागतात. हे चित्र काढण्यासाठी मंगळवारी सुरुवात होते. एक प्रकारची प्रार्थना केल्यानंतर कामाला सुरुवात होते. सुरुवातीला गाईच्या शेणानं किंवा चिखलानं भिंती सारवल्या जातात. चित्रं काढण्यासाठीचं सारं सामान कुमारिकाच आणतात. यानंतर भिंतींवर चित्रं काढली जातात. चित्रांचा शेवट बुधवारी केला जातो.

धार्मिक विधीचा भाग म्हणून काढली जाणारी ही चित्रं भिल्ल जमातीला कलेच्या बाबतीत समृद्ध मात्र करतात !!

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ:

🍁https://www.sahapedia.org/motifs-pithora-painting
🍁http://gaatha.com/pithora-paintings/
🍁https://www.openart.in/history/pithora-paintings-central-gujarat/

Wednesday, August 14, 2019

अशोकस्तंभ

मुशाफिरी कलाविश्वातली

अशोकस्तंभ

भारतातल्या सम्राट अशोक यानं विशिष्ट प्रकारचे स्तंभ आपल्या साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बांधले. अशोकानं या स्तंभांवर एका खास प्रकारचे संदेश लिहिले. सहानुभूती आणि उदारता दाखवत राज्य करण्याचं वचन प्रजेला देत असल्याचं त्यानं या स्तंभांवर लिहिलं. प्रजेतील लोकांना अन्न पुरवण्याचं, प्रजेला आनंदी ठेवण्याचं आणि हिंसेचा त्याग करण्याचं वचन त्यानं या स्तंभांवर लिहिलं. यातल्याच एका स्तंभाचा वरचा भाग जवळपास सव्वादोन हजार वर्षांनंतर इ.स. १९४७ मध्ये विशाल भारत देशाचं राष्ट्रीय प्रतिक बनणार होतं !!

खरंतर पर्शियाचा सम्राट 'डेरियस' यानंही आपल्या कारकिर्दीत काही डोळे दिपवून टाकणारे, भव्य अशाच प्रकारचे स्तंभ बांधले होते. पण या स्तंभांवर त्यानं आपण जिंकलेल्या लढायांची माहिती लिहून घेतली होती, आपण संपवलेल्या शत्रूंची माहिती लिहिली होती. प्रजेविषयी तळमळ यात दिसत नव्हती.

स्तंभांवरचा हा सारा मजकूर संस्कृतऐवजी तिथल्या स्थानिक भाषांमधून लिहला होता. संपूर्ण साम्राज्यामध्ये साऱ्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचावा असं त्याला प्रामाणिकपणे वाटत होतं. वास्तवात प्रजेतल्या खूप साऱ्या लोकांना वाचताही येत नव्हतं. हे लक्षात घेऊनच अशोकानं प्रत्येक स्तंभाजवळ एक माणूसही नेमला होता. या नेमलेल्या माणसांची कामं होती लोकांना स्तंभावरचा संदेश समजावून सांगण्याची आणि लोकांची (प्रजेची) माहिती घेण्याची, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची. अशोकाची प्रजेसाठी असणारी तळमळ यातून दिसून यायची.

साम्राज्याच्या पश्चिमेकडच्या भागात (आजच्या अफगाणिस्तानात) बांधलेल्या स्तंभांवर तिथल्या लोकांना समजावं म्हणून आर्मेनिक आणि ग्रीक भाषेत लेख लिहिले होते. हा भाग साम्राज्याच्या सीमारेषेवरच येत होता. त्यावर लिहिलेल्या मजकुराचा अर्थ असा काहीतरी होता: "जो कुणी तिथं प्रवास करत होता तो आता एका उदार मनाच्या राजाच्या राज्यात प्रवेश करत होता.”

अशोकानं इतके सारे स्तंभ कोणत्या उद्देशानं बनवले ? अशोकाला बौद्ध धर्मविषयीचा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. काहींच्या मते काम शोधण्याच्या उद्देशानं काही पर्शियन कलाकार अशोकाच्या दरबारात आले असावेत. त्यांनी त्यांच्या सोबत पर्शिअन कलेत नेहमी आढळून येणार स्तंभ हा प्रकार अशोकाला दाखवायला आणला असावा. काहींच्या मते स्तंभ हा कलाप्रकार मूळचा भारतीयच आहे...

हे सारे स्तंभ त्यावेळच्या मौर्य साम्राज्यात विखुरलेले आहेत. अशोकानं बनवलेल्या स्तंभांपैकी फक्त १९ स्तंभच आज शिल्लक आहेत. त्यापैकीही कित्येकांचे फक्त तुकडेच पाहायला मिळतात. स्तंभ बनवण्यामागं अशोकाची कलात्मक दृष्टी आहे. सारे स्तंभ सर्वसाधारण ४० ते ५० फूट उंचीचे आहेत. प्रत्येक स्तंभ बनवताना २ प्रकारच्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. स्तंभाच्या वरच्या भागासाठी एक प्रकारचा पाषाण तर स्तंभाच्या उरलेल्या भागासाठी दुसऱ्या प्रकारचा पाषाण. हे जवळपास ५० टन वजनाचे पाषाण दुरून आणले जात.

या साऱ्या स्तंभामध्ये बौद्ध तत्वज्ञान पाहायला मिळतं. बहुतेक साऱ्या स्तंभांच्या वरच्या बाजूला एखाद्या प्राण्यांचं शिल्प पाहायला मिळतं. प्रत्येक स्तंभावर वरच्या बाजूला उलटं ठेवलेलं कमळाचं फुलंही पाहायला मिळतं. कमळ हे शारीरिक, वाचिक आणि मानसिक शुद्धता दर्शवते. महत्त्वाचं म्हणजे चिखलात उगवूनही कमळ आपली शुद्धता सोडत नाही. याशिवाय कमळाच्या पाकळ्यांवर थेम्ब राहू शकत नाहीत. यामुळं कमळ अनासक्तीचंही प्रतीक बनतं. या उलट्या कमळाच्या फुलावर एक प्रकारचा लंबगोलाकार भाग दिसतो आणि त्यावर एखादा प्राणी असतो. बऱ्याचदा या लंबगोलावर बसलेला (किंवा उभा) सिंह किंवा बैल पाहावयास मिळतो.

अशोकाच्या या साऱ्या स्तंभांपैकी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो सारनाथ इथला अशोकस्तंभ. सारनाथलाच भगवान बुद्धांनी लोकांना पहिल्यांदा उपदेश केला. या स्तंभाचा वरचा भाग सध्या सारनाथ इथल्या वस्तूसंग्रहालयात आहे. हेच आपल्या देशाचं राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या नाण्यांवर एका बाजूला चित्र असतं ते ह्याच स्तंभाच्या वरच्या भागाचं. (नोटांवरही एका बाजूला ह्याचं चित्र असतं)


या स्तंभावरच्या लंबगोलाकार भागावर चार प्राणी पाहायला मिळतात, ते चार दिशा दर्शवतात असं मानलं जातं - घोडा (पश्चिम), बैल (पूर्व), हत्ती (दक्षिण) आणि सिंह (उत्तर). हे चार प्राणी चालताना दिसतात. ते मानवी संसारातल्या जन्म, व्याधी, मृत्यू आणि ऱ्हास ह्या गोष्टी दर्शवतात असंही मानलं जातं. (त्यामुळं हे प्राणी एकमेकांच्या मागं मागं चालत राहतात.) या चार प्राण्यांमध्ये चार धम्मचक्रेही दिसतात.

लंबगोलाकार भागावर आपल्याला चार सिंह बसलेले दिसतात. सिंह हे भगवान बुद्धांचं प्रतीक मानलं जातं. (त्यांचा जन्म शाक्य (सिंह) कुळात झाला होता). आणि ते चार सिंह बौद्ध धर्मातल्या चार तत्वांची गर्जना करत धर्माचा प्रसार करत आहेत. उलटे कमळ, लंबगोलाकार भाग आणि वर बसलेले ४ सिंह हे प्रत्यक्षात ७ फूट उंच आहेत. हा अशोकस्तंभ प्राचीन काळात अखंड स्थितीत असताना  प्रत्यक्ष दिमाखदार दिसत असणार यात शंकाच नाही !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

★http://ringmar.net/irhistorynew/index.php/2018/10/11/pillars-of-ashoka/
★https://www.khanacademy.org/humanities/art-asia/south-asia/buddhist-art2/a/the-pillars-of-ashoka
★https://www.khanacademy.org/humanities/art-asia/south-asia/buddhist-art2/a/lion-capital-ashokan-pillar-at-sarnath
★https://en.wikipedia.org/wiki/Pillars_of_Ashoka

Image credit :

★Chrisi1964 [CC BY-SA 4.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Sarnath_capital.jpg


Tuesday, August 6, 2019

आबालाल रहिमान

मुशाफिरी कलाविश्वातली

आबालाल रहिमान

१८७० च्या दशकातली गोष्ट. कोल्हापूरमध्ये एका मुलाला फारसी भाषा यावी यासाठी त्याचे वडील प्रयत्न करत होते. त्यांना फारसी भाषेचा अभ्यास असणाऱ्या पारसनीस यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यांनी पारसनीस यांच्याकडे जाऊन आपल्या मुलाला फारसी भाषा शिकण्याकरता आग्रह केला. पारसनीस यांच्याकडे या मुलाला भाषा शिकवण्यासाठी वेळ नव्हता. हे पारसनीस एका इंग्रजाला फारसी भाषा शिकवण्यासाठी बैलगाडीतून जायचे. त्यांनी या मुलाला बैलगाडीतून जाताना आपल्यासोबत यायला सांगितले. जात येता बैलगाडीमध्ये त्या मुलाला फारसी भाषा शिकवण्याचं त्यांनी मान्य केलं. मुलाचं बैलगाडीतून जात येता फारसी भाषेचं शिक्षण सुरु झालं.

त्या इंग्रजाच्या घरी पारसनीस भाषा शिकवायला गेल्यानंतर हा मुलगा बैलगाडीतच बसून वेळ घालवायचा. बसल्या बसल्या तो पेन्सिलनं कागदावर रेखाटनं काढायचा. एके दिवशी त्या इंग्रजाच्या पत्नीनं मुलाची रेखाटनं पाहून त्याला स्वतःचं रेखाटन काढता येईल का असं विचारलं. मुलानं आनंदानं होकार दिला आणि तिचं एक सुरेख रेखाटन काढलं. तिला ते रेखाटन प्रचंड आवडलं !! तिनं ते आपल्या पतीला दाखवलं आणि त्या मुलाच्या कलेतील शिक्षणासाठी काहीतरी करायला सांगितलं.

ह्या इंग्रजानं छत्रपती शाहू महाराजांना या मुलाच्या कलेतील शिक्षणासाठी विनंती केली. आणि महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन मुलाला मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकण्यासाठी पाठवलं. सर जे जे स्कूल आर्टस् मध्ये शिकणारा हा कोल्हापूरचा पहिलाच विद्यार्थी. तिथं हा मुलगा कलेत प्रचंड रस घेऊन शिकला आणि पुढं एक विख्यात चित्रकार बनला. या मुलाचं मूळचं नाव होतं अब्दुल अझीझ. पुढं हा मुलगा आबालाल रहिमान नावानं प्रसिद्ध झाला !!

खरंतर त्याच्या घरात एक प्रकारची कलेची पार्श्वभूमी होती. त्याचे वडील कुराणाच्या हस्तलिखित प्रती बनवायचं काम करायचे. ही हस्तलिखितं बनवण्यात, सजावट करण्यात छोटा अब्दुल त्यांना मदत करायचा. कुराणातल्या पानाभोवतीचं नक्षीकाम छोटा अब्दुल करायचा. त्याला चित्रकलेची गोडी इथंच लागली.

त्याचं शालेय शिक्षण सहावीपर्यंत झालं होतं. त्याला मराठी, इंग्रजी, अरबी आणि संस्कृत या भाषा यायच्या. त्याचं शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये झालं होतं.  शाळेतल्या शिक्षणानंतरचं शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये होणार होतं.

सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मधल्या अभ्यासक्रमात रेखाटनाला खूप महत्व होतं.तिथं आबालाल पेन्सिल, क्रेयॉन आणि चारकोल (कोळसा) यांचा वापर करत ते रेखाटनं करू लागले. रेखाटन करण्यात आणि त्यात छटा दाखवण्यात पारंगत झाल्यानंतर त्यांना जलरंगात, तैलरंगात चित्रं रंगावण्याचं शिक्षण मिळालं. त्यांचं तिथलं शिक्षण १८८८ मध्ये पूर्ण झालं. आबालाल यांना कित्येक पारितोषिकं मिळाली. त्यांना मानाचं समजलं जाणारं 'व्हाइसरॉय सुवर्णपदक'ही मिळालं. आबालाल रहिमान यांची दोन चित्रं आजही सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहेत.

सर जे जे स्कूल आर्टस् मधला एक किस्सा - एकदा काही युरोपमधले चित्रकार जे. जे. त आले होते. आबालाल यांची चित्रे बघून ही चित्रं एका विद्यार्थ्यानं काढली असावीत ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसला नाही. ‘शिक्षकांनी काढलेली चित्रं तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाखाली दाखवता का?ʼ, असा प्रश्न त्यांनी केला; तेव्हा प्राचार्यांनी त्यांच्यासमोरच आबालाल यांना चित्रं काढण्यास सांगितली. त्यांनी काढलेली चित्रे बघून युरोपमधले चित्रकार जाम खूश झाले !!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबालाल कोल्हापूरला परत आले. महाराजांच्या दरबारी ते चित्रकार म्हणून रुजू झाले. महाराज राधानगरीच्या, दाजीपूरच्या जंगलात शिकारीसाठी जाताना त्यांना घेऊन जायचे. आबालाल यांना निसर्गचित्रं काढायला खूप आवडायचं. कोटीतीर्थ तलाव आणि रंकाळ्यावरचा संध्यामठ ही त्यांची चित्रं काढण्यासाठीही आवडती ठिकाणं !! आबालाल यांनी या ठिकाणी असंख्य चित्रं काढली. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सूर्यप्रकाशाच्या वेगवेगळ्या छटा दाखवत त्यांनी वेगवेगळी चित्रं काढली.

महाराजांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांना दरबारात जाऊन नोकरी करणं पसंत नव्हतं. निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच चित्रं काढणं त्यांना आवडायचं. महाराजांना या मनस्वी कलाकाराच्या मानसिकतेची जाण होती. त्यांनी आबालाल यांना दरबारात न येता कुठंही जाऊन चित्रं काढण्याची मुभा देत त्यांचा पगार चालू ठेवला.

त्यांना सर्वात आवडायचं निसर्गचित्रं काढायला! त्यांनी थोडीफार व्यक्तीचित्रंही काढलीत. त्यांनी काढलेलं  नात्यातील एक स्त्रीचं चोळी शिवतानाचं रंगवलेलं सोबत दिलेलं चित्र सुप्रसिद्ध आहे. यात नऊवारी साडीवरच्या सुरकुत्या त्यांनी अप्रतिमरीत्या दाखवल्या आहेत.  

 

आबालाल मनानं अत्यंत उदार होते. एखाद्यानं त्यांच्याकडं चित्र मागितलं तर पैशाची काहीही अपेक्षा न ठेवता ते मागणाऱ्याला चित्र देत असत !! यामुळं त्यांची चित्रं बऱ्याच जणांच्या वैयक्तिक संग्रहात सापडतात. कोल्हापूरमधल्या राजवाड्यातल्या संग्रहालयातही त्यांची चित्रं आहेत.

भोगविलासात आणि ऐहिक सुखांविषयी त्यांना एक प्रकारचं वैराग्य होतं. ते साधं आयुष्य जगले. ते जन्मभर अविवाहितच राहिले.

छत्रपती शाहू महाराजांविषयी त्यांना प्रचंड प्रेम वाटायचं. महाराजांच्या निधनानंतर त्यांनी आपली कित्येक चित्रं पंचगंगा नदीत फेकून दिली. यानंतर मात्र त्यांचा कलेतला रस निघून गेला.

२८ डिसेंबर १९३१ ला हा मनस्वी कलावंत हे जग सोडून गेला. योगायोग म्हणजे मृत्यूच्या आदल्याच दिवशी त्यांनी स्वतःचं जलरंगातील एक व्यक्तिचित्र आरशात पाहून काढलं होतं - जणू काही त्यांना या जगाचा दुसऱ्या दिवशी निरोप घेण्याची कल्पना होती!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍁https://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-Abalal-Rahiman-by-Nalini-Bhagwat/
🍁https://marathivishwakosh.org/2779/
🍁https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8

Image credit:
www.indiaart.com