Wednesday, August 14, 2019

अशोकस्तंभ

मुशाफिरी कलाविश्वातली

अशोकस्तंभ

भारतातल्या सम्राट अशोक यानं विशिष्ट प्रकारचे स्तंभ आपल्या साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बांधले. अशोकानं या स्तंभांवर एका खास प्रकारचे संदेश लिहिले. सहानुभूती आणि उदारता दाखवत राज्य करण्याचं वचन प्रजेला देत असल्याचं त्यानं या स्तंभांवर लिहिलं. प्रजेतील लोकांना अन्न पुरवण्याचं, प्रजेला आनंदी ठेवण्याचं आणि हिंसेचा त्याग करण्याचं वचन त्यानं या स्तंभांवर लिहिलं. यातल्याच एका स्तंभाचा वरचा भाग जवळपास सव्वादोन हजार वर्षांनंतर इ.स. १९४७ मध्ये विशाल भारत देशाचं राष्ट्रीय प्रतिक बनणार होतं !!

खरंतर पर्शियाचा सम्राट 'डेरियस' यानंही आपल्या कारकिर्दीत काही डोळे दिपवून टाकणारे, भव्य अशाच प्रकारचे स्तंभ बांधले होते. पण या स्तंभांवर त्यानं आपण जिंकलेल्या लढायांची माहिती लिहून घेतली होती, आपण संपवलेल्या शत्रूंची माहिती लिहिली होती. प्रजेविषयी तळमळ यात दिसत नव्हती.

स्तंभांवरचा हा सारा मजकूर संस्कृतऐवजी तिथल्या स्थानिक भाषांमधून लिहला होता. संपूर्ण साम्राज्यामध्ये साऱ्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचावा असं त्याला प्रामाणिकपणे वाटत होतं. वास्तवात प्रजेतल्या खूप साऱ्या लोकांना वाचताही येत नव्हतं. हे लक्षात घेऊनच अशोकानं प्रत्येक स्तंभाजवळ एक माणूसही नेमला होता. या नेमलेल्या माणसांची कामं होती लोकांना स्तंभावरचा संदेश समजावून सांगण्याची आणि लोकांची (प्रजेची) माहिती घेण्याची, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची. अशोकाची प्रजेसाठी असणारी तळमळ यातून दिसून यायची.

साम्राज्याच्या पश्चिमेकडच्या भागात (आजच्या अफगाणिस्तानात) बांधलेल्या स्तंभांवर तिथल्या लोकांना समजावं म्हणून आर्मेनिक आणि ग्रीक भाषेत लेख लिहिले होते. हा भाग साम्राज्याच्या सीमारेषेवरच येत होता. त्यावर लिहिलेल्या मजकुराचा अर्थ असा काहीतरी होता: "जो कुणी तिथं प्रवास करत होता तो आता एका उदार मनाच्या राजाच्या राज्यात प्रवेश करत होता.”

अशोकानं इतके सारे स्तंभ कोणत्या उद्देशानं बनवले ? अशोकाला बौद्ध धर्मविषयीचा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. काहींच्या मते काम शोधण्याच्या उद्देशानं काही पर्शियन कलाकार अशोकाच्या दरबारात आले असावेत. त्यांनी त्यांच्या सोबत पर्शिअन कलेत नेहमी आढळून येणार स्तंभ हा प्रकार अशोकाला दाखवायला आणला असावा. काहींच्या मते स्तंभ हा कलाप्रकार मूळचा भारतीयच आहे...

हे सारे स्तंभ त्यावेळच्या मौर्य साम्राज्यात विखुरलेले आहेत. अशोकानं बनवलेल्या स्तंभांपैकी फक्त १९ स्तंभच आज शिल्लक आहेत. त्यापैकीही कित्येकांचे फक्त तुकडेच पाहायला मिळतात. स्तंभ बनवण्यामागं अशोकाची कलात्मक दृष्टी आहे. सारे स्तंभ सर्वसाधारण ४० ते ५० फूट उंचीचे आहेत. प्रत्येक स्तंभ बनवताना २ प्रकारच्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. स्तंभाच्या वरच्या भागासाठी एक प्रकारचा पाषाण तर स्तंभाच्या उरलेल्या भागासाठी दुसऱ्या प्रकारचा पाषाण. हे जवळपास ५० टन वजनाचे पाषाण दुरून आणले जात.

या साऱ्या स्तंभामध्ये बौद्ध तत्वज्ञान पाहायला मिळतं. बहुतेक साऱ्या स्तंभांच्या वरच्या बाजूला एखाद्या प्राण्यांचं शिल्प पाहायला मिळतं. प्रत्येक स्तंभावर वरच्या बाजूला उलटं ठेवलेलं कमळाचं फुलंही पाहायला मिळतं. कमळ हे शारीरिक, वाचिक आणि मानसिक शुद्धता दर्शवते. महत्त्वाचं म्हणजे चिखलात उगवूनही कमळ आपली शुद्धता सोडत नाही. याशिवाय कमळाच्या पाकळ्यांवर थेम्ब राहू शकत नाहीत. यामुळं कमळ अनासक्तीचंही प्रतीक बनतं. या उलट्या कमळाच्या फुलावर एक प्रकारचा लंबगोलाकार भाग दिसतो आणि त्यावर एखादा प्राणी असतो. बऱ्याचदा या लंबगोलावर बसलेला (किंवा उभा) सिंह किंवा बैल पाहावयास मिळतो.

अशोकाच्या या साऱ्या स्तंभांपैकी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो सारनाथ इथला अशोकस्तंभ. सारनाथलाच भगवान बुद्धांनी लोकांना पहिल्यांदा उपदेश केला. या स्तंभाचा वरचा भाग सध्या सारनाथ इथल्या वस्तूसंग्रहालयात आहे. हेच आपल्या देशाचं राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या नाण्यांवर एका बाजूला चित्र असतं ते ह्याच स्तंभाच्या वरच्या भागाचं. (नोटांवरही एका बाजूला ह्याचं चित्र असतं)


या स्तंभावरच्या लंबगोलाकार भागावर चार प्राणी पाहायला मिळतात, ते चार दिशा दर्शवतात असं मानलं जातं - घोडा (पश्चिम), बैल (पूर्व), हत्ती (दक्षिण) आणि सिंह (उत्तर). हे चार प्राणी चालताना दिसतात. ते मानवी संसारातल्या जन्म, व्याधी, मृत्यू आणि ऱ्हास ह्या गोष्टी दर्शवतात असंही मानलं जातं. (त्यामुळं हे प्राणी एकमेकांच्या मागं मागं चालत राहतात.) या चार प्राण्यांमध्ये चार धम्मचक्रेही दिसतात.

लंबगोलाकार भागावर आपल्याला चार सिंह बसलेले दिसतात. सिंह हे भगवान बुद्धांचं प्रतीक मानलं जातं. (त्यांचा जन्म शाक्य (सिंह) कुळात झाला होता). आणि ते चार सिंह बौद्ध धर्मातल्या चार तत्वांची गर्जना करत धर्माचा प्रसार करत आहेत. उलटे कमळ, लंबगोलाकार भाग आणि वर बसलेले ४ सिंह हे प्रत्यक्षात ७ फूट उंच आहेत. हा अशोकस्तंभ प्राचीन काळात अखंड स्थितीत असताना  प्रत्यक्ष दिमाखदार दिसत असणार यात शंकाच नाही !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

★http://ringmar.net/irhistorynew/index.php/2018/10/11/pillars-of-ashoka/
★https://www.khanacademy.org/humanities/art-asia/south-asia/buddhist-art2/a/the-pillars-of-ashoka
★https://www.khanacademy.org/humanities/art-asia/south-asia/buddhist-art2/a/lion-capital-ashokan-pillar-at-sarnath
★https://en.wikipedia.org/wiki/Pillars_of_Ashoka

Image credit :

★Chrisi1964 [CC BY-SA 4.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Sarnath_capital.jpg


No comments:

Post a Comment