Tuesday, August 6, 2019

आबालाल रहिमान

मुशाफिरी कलाविश्वातली

आबालाल रहिमान

१८७० च्या दशकातली गोष्ट. कोल्हापूरमध्ये एका मुलाला फारसी भाषा यावी यासाठी त्याचे वडील प्रयत्न करत होते. त्यांना फारसी भाषेचा अभ्यास असणाऱ्या पारसनीस यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यांनी पारसनीस यांच्याकडे जाऊन आपल्या मुलाला फारसी भाषा शिकण्याकरता आग्रह केला. पारसनीस यांच्याकडे या मुलाला भाषा शिकवण्यासाठी वेळ नव्हता. हे पारसनीस एका इंग्रजाला फारसी भाषा शिकवण्यासाठी बैलगाडीतून जायचे. त्यांनी या मुलाला बैलगाडीतून जाताना आपल्यासोबत यायला सांगितले. जात येता बैलगाडीमध्ये त्या मुलाला फारसी भाषा शिकवण्याचं त्यांनी मान्य केलं. मुलाचं बैलगाडीतून जात येता फारसी भाषेचं शिक्षण सुरु झालं.

त्या इंग्रजाच्या घरी पारसनीस भाषा शिकवायला गेल्यानंतर हा मुलगा बैलगाडीतच बसून वेळ घालवायचा. बसल्या बसल्या तो पेन्सिलनं कागदावर रेखाटनं काढायचा. एके दिवशी त्या इंग्रजाच्या पत्नीनं मुलाची रेखाटनं पाहून त्याला स्वतःचं रेखाटन काढता येईल का असं विचारलं. मुलानं आनंदानं होकार दिला आणि तिचं एक सुरेख रेखाटन काढलं. तिला ते रेखाटन प्रचंड आवडलं !! तिनं ते आपल्या पतीला दाखवलं आणि त्या मुलाच्या कलेतील शिक्षणासाठी काहीतरी करायला सांगितलं.

ह्या इंग्रजानं छत्रपती शाहू महाराजांना या मुलाच्या कलेतील शिक्षणासाठी विनंती केली. आणि महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन मुलाला मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकण्यासाठी पाठवलं. सर जे जे स्कूल आर्टस् मध्ये शिकणारा हा कोल्हापूरचा पहिलाच विद्यार्थी. तिथं हा मुलगा कलेत प्रचंड रस घेऊन शिकला आणि पुढं एक विख्यात चित्रकार बनला. या मुलाचं मूळचं नाव होतं अब्दुल अझीझ. पुढं हा मुलगा आबालाल रहिमान नावानं प्रसिद्ध झाला !!

खरंतर त्याच्या घरात एक प्रकारची कलेची पार्श्वभूमी होती. त्याचे वडील कुराणाच्या हस्तलिखित प्रती बनवायचं काम करायचे. ही हस्तलिखितं बनवण्यात, सजावट करण्यात छोटा अब्दुल त्यांना मदत करायचा. कुराणातल्या पानाभोवतीचं नक्षीकाम छोटा अब्दुल करायचा. त्याला चित्रकलेची गोडी इथंच लागली.

त्याचं शालेय शिक्षण सहावीपर्यंत झालं होतं. त्याला मराठी, इंग्रजी, अरबी आणि संस्कृत या भाषा यायच्या. त्याचं शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये झालं होतं.  शाळेतल्या शिक्षणानंतरचं शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये होणार होतं.

सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मधल्या अभ्यासक्रमात रेखाटनाला खूप महत्व होतं.तिथं आबालाल पेन्सिल, क्रेयॉन आणि चारकोल (कोळसा) यांचा वापर करत ते रेखाटनं करू लागले. रेखाटन करण्यात आणि त्यात छटा दाखवण्यात पारंगत झाल्यानंतर त्यांना जलरंगात, तैलरंगात चित्रं रंगावण्याचं शिक्षण मिळालं. त्यांचं तिथलं शिक्षण १८८८ मध्ये पूर्ण झालं. आबालाल यांना कित्येक पारितोषिकं मिळाली. त्यांना मानाचं समजलं जाणारं 'व्हाइसरॉय सुवर्णपदक'ही मिळालं. आबालाल रहिमान यांची दोन चित्रं आजही सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहेत.

सर जे जे स्कूल आर्टस् मधला एक किस्सा - एकदा काही युरोपमधले चित्रकार जे. जे. त आले होते. आबालाल यांची चित्रे बघून ही चित्रं एका विद्यार्थ्यानं काढली असावीत ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसला नाही. ‘शिक्षकांनी काढलेली चित्रं तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाखाली दाखवता का?ʼ, असा प्रश्न त्यांनी केला; तेव्हा प्राचार्यांनी त्यांच्यासमोरच आबालाल यांना चित्रं काढण्यास सांगितली. त्यांनी काढलेली चित्रे बघून युरोपमधले चित्रकार जाम खूश झाले !!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबालाल कोल्हापूरला परत आले. महाराजांच्या दरबारी ते चित्रकार म्हणून रुजू झाले. महाराज राधानगरीच्या, दाजीपूरच्या जंगलात शिकारीसाठी जाताना त्यांना घेऊन जायचे. आबालाल यांना निसर्गचित्रं काढायला खूप आवडायचं. कोटीतीर्थ तलाव आणि रंकाळ्यावरचा संध्यामठ ही त्यांची चित्रं काढण्यासाठीही आवडती ठिकाणं !! आबालाल यांनी या ठिकाणी असंख्य चित्रं काढली. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सूर्यप्रकाशाच्या वेगवेगळ्या छटा दाखवत त्यांनी वेगवेगळी चित्रं काढली.

महाराजांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांना दरबारात जाऊन नोकरी करणं पसंत नव्हतं. निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच चित्रं काढणं त्यांना आवडायचं. महाराजांना या मनस्वी कलाकाराच्या मानसिकतेची जाण होती. त्यांनी आबालाल यांना दरबारात न येता कुठंही जाऊन चित्रं काढण्याची मुभा देत त्यांचा पगार चालू ठेवला.

त्यांना सर्वात आवडायचं निसर्गचित्रं काढायला! त्यांनी थोडीफार व्यक्तीचित्रंही काढलीत. त्यांनी काढलेलं  नात्यातील एक स्त्रीचं चोळी शिवतानाचं रंगवलेलं सोबत दिलेलं चित्र सुप्रसिद्ध आहे. यात नऊवारी साडीवरच्या सुरकुत्या त्यांनी अप्रतिमरीत्या दाखवल्या आहेत.  

 

आबालाल मनानं अत्यंत उदार होते. एखाद्यानं त्यांच्याकडं चित्र मागितलं तर पैशाची काहीही अपेक्षा न ठेवता ते मागणाऱ्याला चित्र देत असत !! यामुळं त्यांची चित्रं बऱ्याच जणांच्या वैयक्तिक संग्रहात सापडतात. कोल्हापूरमधल्या राजवाड्यातल्या संग्रहालयातही त्यांची चित्रं आहेत.

भोगविलासात आणि ऐहिक सुखांविषयी त्यांना एक प्रकारचं वैराग्य होतं. ते साधं आयुष्य जगले. ते जन्मभर अविवाहितच राहिले.

छत्रपती शाहू महाराजांविषयी त्यांना प्रचंड प्रेम वाटायचं. महाराजांच्या निधनानंतर त्यांनी आपली कित्येक चित्रं पंचगंगा नदीत फेकून दिली. यानंतर मात्र त्यांचा कलेतला रस निघून गेला.

२८ डिसेंबर १९३१ ला हा मनस्वी कलावंत हे जग सोडून गेला. योगायोग म्हणजे मृत्यूच्या आदल्याच दिवशी त्यांनी स्वतःचं जलरंगातील एक व्यक्तिचित्र आरशात पाहून काढलं होतं - जणू काही त्यांना या जगाचा दुसऱ्या दिवशी निरोप घेण्याची कल्पना होती!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍁https://www.indiaart.com/Articles-and-Features/Articles-on-Abalal-Rahiman-by-Nalini-Bhagwat/
🍁https://marathivishwakosh.org/2779/
🍁https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8

Image credit:
www.indiaart.com

No comments:

Post a Comment