मुशाफिरी कलाविश्वातली
शूमन ऐकताना
पाश्चात्त्य
संगीताच्या विश्वात होऊन गेलेला एक
महान संगीत रचनाकार म्हणून रॉबर्ट शूमन ह्याची साऱ्या जगाला ओळख आहे. खरंतर त्याचा काळ आणि देश आपल्यापेक्षा खूप
वेगळा. तो जर्मनीमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (१८१० - १८५६) होऊन गेला. आज
आपण जे चित्र पाहणार
आहोत त्या चित्राचं नाव आहे Listening to
Schumann (म्हणजे शूमन ऐकताना).
आपण
पाश्चात्त्य अभिजात संगीत ऐकत नसलो तरीही
त्याची एक रचना मात्र
आपल्याला नक्की माहीत आहे. आपल्यापैकी जवळपास
सर्वांनी टी व्ही वर
कधी ना कधी 'Raymond - The complete man' ही जाहिरात कधी
ना कधी पाहिली असेल.
वर्षानुवर्षे त्यातलं संगीत तेच ठेवण्यात आलंय.
हे संगीत आहे शूमनचं. त्यानं
'लहानपणीची दृश्ये' (Scenes of
childhood) या नावाचा एक पियानोसाठी संगीतरचनासंग्रह
रचला होता. यात त्यानं लहानपणीच्या
वेगवेगळ्या आठवणींवर वेगवेगळ्या संगीत रचना केल्या होत्या.
त्यातली एक रचना आहे
Träumerei. Träumerei या
शब्दाचा जर्मन भाषेत अर्थ होतो 'स्वप्न
पाहणे'. लहानपणीच्या स्वप्न पाहण्याच्या आठवणी त्यानं या संगीतरचनेतून व्यक्त
करण्याचा प्रयत्न केला. ही रचना अतिशय
भावमय आहे. 'Raymond - The complete
man' च्या जाहिरातीमध्ये हीच रचना वर्षानुवर्षे
वापरली जात आहे.
शूमननं
तऱ्हेतऱ्हेचं संगीत रचलं. यातलं बरंचंसं संगीत फक्त पियानो या
वाद्यासाठी आहे. या संगीत
रचनांमध्ये शब्द नसले तरीही
वेगवेगळे भाव मात्र ओतप्रेत
भरलेले आहेत. आपल्याला टी व्ही वरच्या
जाहिरातीमधल्या संगीतातून याची कल्पना येते.
आपल्या भावमय संगीतरचनांमुळेच हा संगीतकार अजरामर
झाला.
शूमनच्या
मृत्यूनंतर बेल्जीयममध्ये एक चित्रकार होऊन
गेला - Khnopff. हा चित्रकार कलेमधल्या
सिम्बॉलिझम या चळवळीशी संबंधित
होता. या चळवळीचं एक
उद्दिष्ट होतं - "to depict not
the thing but the effect it produces". म्हणजे
एखाद्या प्रसंगी बाहेर डोळ्यांनी जे काही दिसतं
ते आपल्या चित्रामधून दाखवण्यापेक्षा त्या प्रसंगातली मानसिक स्थिती, भावनिक
स्थिती दाखवण्याचा ही कलाकार मंडळी
प्रयत्न करायची. हाच प्रयत्न आपल्याला
Khnopff च्या Listening
to Schumann ह्या चित्रातून दिसतो.
चित्रकारानं
काही गोष्टी स्पष्टपणे दाखवल्या आहेत तर काही
चित्र पाहणाऱ्याच्या कल्पनाशक्तीवर सोपवल्या आहेत. चित्रात मध्यभागी आपल्याला एक स्त्री डोक्याजवळ
हात घेऊन संगीत ऐकताना
दिसते. चित्रकाराला तिची मानसिक स्थितीच
या चित्रातून दाखवायची आहे. चित्रात डाव्या
बाजूला कुणीतरी पियानो वाजवत आहे असं सुचवलंय.
आपल्याला पियानो वाजवणारी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त
त्या व्यक्तीचा उजवा हात पियानोच्या
शेवटच्या सप्तकात दिसतोय. एक गोष्ट आपल्याला
लक्षात घ्यायला हवी. हे चित्र
काढलं गेलंय १८८३ मध्ये. संगीत
रेकॉर्ड होऊन ते सहजरित्या
उपलब्ध होणं आणि सामान्य
लोकांना ते परवडणं अजून
प्रत्यक्षात यायला बरीच वर्षे बाकी
होती. त्यामुळं या काळात प्रत्यक्ष
संगीत ऐकणं चालायचं !!
शूमनची
कोणती रचना वाजवण्यात येत
आहे हे आपल्या काळात
नाही. ही रचना आनंदी
भाव, दु:खी भाव
किंवा अजून कोणते भाव व्यक्त करणारी
आहे तेही काळात नाही
!! पियानो रचनेचं वादन सुरु झालंय
की संपत आलंय तेही
आपल्याला चित्र पाहून समजत नाही. खरंतर
त्या स्त्रीचा चेहराही आपल्याला दिसत नाही, तिच्या
चेहऱ्यावरचे भावही दिसत नाहीत.
परंतु असं असलं तरी
एक गोष्ट आपल्याला दिसते. एखाद्या भावमय संगीतात बुडून गेल्यानंतर आपल्याला जो अनुभव येतो
तो अनुभव ती घेताना दिसतीये.
ती संगीत ऐकण्यात हरवून गेली आहे, तिचं
इतर कुठंही लक्ष नाही. Listening to Schumann हे चित्राचं नाव
आपल्याला नेमकं हेच सुचवतं.
बाहेरच्या
गोष्टींचं जसं दिसतं तसं
चित्रण करण्यापेक्षा मनाची अवस्था दाखवण्यात हे चित्र यशस्वी
ठरतं. म्हणूनच आजही जवळपास १४०
वर्षे झाल्यानंतरही हे चित्र लोकप्रिय
आहे !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ :
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ :
Image credit:
Fernand Khnopff [Public domain]
🍁https://commons.wikimedia.org/wiki/File:Fernand_Khnopff-Schumann.jpg
🍁 शूमनची पियानोसाठी केलेली Träumerei ही मूळ रचना ऐकण्यासाठी इथं क्लिक करा:
https://www.youtube.com/watch?v=6z82w0l6kwE
🍁 शूमनची पियानोसाठी केलेली Träumerei ही मूळ रचना ऐकण्यासाठी इथं क्लिक करा:
https://www.youtube.com/watch?v=6z82w0l6kwE
No comments:
Post a Comment