Thursday, October 3, 2019

देवी सरस्वती

मुशाफिरी कलाविश्वातली

देवी सरस्वती 


पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ एक गाव आहे - मळवली. या गावाचा आणि चित्रकार राजा रवी वर्मा यांचा खास संबंध होता. राजा रवी वर्मा यांची चित्रं सामान्य लोकांपर्यंत पोहोचली ती ओलिओग्राफ्सच्या (छापलेली रंगीत चित्रं) माध्यमातून.  यासाठीची छापखाना राजा रवी वर्मा यांनी सुरुवातीला मुंबईमधल्या घाटकोपर इथं १८९४ मध्ये सुरु केला होता. पण दोन वर्षांतच त्यांनी तो लोणावळ्याजवळच्या मळवली इथं आणला. त्यांनी रामायण, महाभारत आणि पुराणांमधले बरेचसे प्रसंग दाखवणाऱ्या काढलेल्या चित्रांच्या प्रती या छापखान्यात छापून त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यातली अनेक चित्रं आपल्याला आजही पाहायला मिळतात. त्यातलंच एक चित्र म्हणजे सोबत दिलेलं सरस्वती देवीचं चित्र.



या चित्रात सरस्वतीच्या बाजूला आपल्याला नदी दिसते. सरस्वतीचा आणि नदीचा संबंध अगदी प्राचीन काळापासून आहे. वेदकाळात सरस्वती देवी नदीशी संबंधित होती. आजच्या काळात असणारी अफगाणिस्तानातली हेलमंड ही नदी ऋग्वेदाच्या काळातली सरस्वती नदी असावी असं मानलं जातं. (काहींच्या मते ही नदी आजच्या काळातली घग्गर नदी असावी.) सरस्वती देवीच्या नदीशी असणाऱ्या या संबंधामुळं सरस्वतीच्या चित्रात बऱ्याचदा नदी दाखवली जाते.

आपल्याला चित्रातली सरस्वती शुभ्र वस्त्रांमध्ये दिसते. सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवता. आणि ज्ञान हे प्रकाशासारखे असते - ते अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करते. याच कारणामुळं सरस्वती देवी कलेमध्ये नेहमी शुभ्र वस्त्रांमध्ये दाखवली जाते. शुभ्र सफेद रंग शुद्धता, पावित्र्य हे गुणही दर्शवतो.

तिला असणारे चार हात तिची चारही दिशांमध्ये असणारी सत्ता दर्शवतात असं मानलं जातं.

ज्ञान आणि शिक्षण यांची देवी असल्यानं सरस्वतीच्या चित्रांमध्ये तिच्या एका हातात बऱ्याचदा भूर्जपत्रांवर लिहिलेला एखादा छोटासा ग्रंथ दाखवलं जातो. सोबतच्या चित्रामध्येही तिच्या एका डाव्या हातात आपल्या छोट्याशा पुस्तकासारखं काहीतरी दिसतंय. हा भूर्जपत्रांवर लिहिलेला छोटासा ग्रंथ आहे असं दिसतं. तिच्या हातात वीणा आणि पुस्तक असल्याचा उल्लेख एका प्रसिद्ध श्लोकातही येतो:

नमस्ते शारदा देवी वीणा पुस्तक धारिणीं |
विद्यारंभं करिष्यामी, प्रसन्ना भव सर्वदा ||

सरस्वतीच्या एका उजव्या हातात आपल्याला मोत्यांची माळ दिसते. ही माळ जप करण्यासाठीची आहे. बऱ्याचदा सरस्वतीच्या चित्रांमध्ये एका हातात ही माळ दाखवली जाते. या माळेचा संबंध आध्यात्मिक शास्त्र, तप करणे, जप या गोष्टींशी आहे.

सरस्वतीच्या हातांमध्ये आपल्याला वीणा दिसते. सरस्वती ही ज्ञानाप्रमाणेच कलेचीही देवता मानली जाते. यामुळं सरस्वतीच्या हातात नेहमीच वीणा दाखले जाते. हिंदू तत्त्वज्ञानातल्या नादब्रह्माचा संबंध बऱ्याचदा वीणेशी जोडला जातो.

या चित्रात  पाण्यामध्ये आपल्याला कमळाची फुले दिसतात. काही वेळेला सरस्वती कमळामध्ये बसलेलीही दाखवली जाते. कमळ हे पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. कमळाची दोन वैशिष्ट्यं असतात - चिखलात उगवूनही कमळाची फुलं सुंदर असतात. दुसरं म्हणजे कमळाच्या पानावर पाण्याचे थेंब स्थिरावू शकत नाहीत.  (हा गुण अनासक्ती दर्शवतो.)

सरस्वतीच्या चित्रात बऱ्याचदा असणारा राजहंस मात्र आपल्याला ह्या चित्रात दिसत नाही. राजहंस दूध आणि पाणी ह्या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करू शकतो अशी एक कल्पना आहे. संसारात योग्य काय आणि आणि अयोग्य काय यांच्यात फरक करण्याच्या गुणाला विवेक म्हणता येईल. या गुणांचा संबंध ज्ञानाशी असल्यानं सरस्वतीच्या चित्रात सहसा राजहंस दाखवला जातो.

सरस्वतीचं वाहन मानलं गेलेला मोर आपल्याला ह्या चित्रात दिसतो. मोराचा पिसारा आपलं लक्ष वेधून घेतो. तो चमकदार आहे. संसारामध्ये अशा अनेक चमकदार गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात, आपल्या आकर्षणाचा विषय ठरतात. हा चमकदारपणा (आणि प्रतिकानं मोर) आध्यात्मिक प्रवासातला अडथळा मानला जातो. सरस्वतीचं मोर हे वाहन असल्यानं तिचा मोरावरचा (पर्यायानं आध्यात्मिक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या  संसारातल्या आकर्षणांवरचा) विजय आपल्याला वाहन असणाऱ्या मोराच्या प्रतीकातून दिसतो.

राजा रविवर्मा यांनी काढलेल्या सरस्वती देवीच्या या चित्राला जवळपास सव्वाशे वर्षे झाली असली तरी आजही हे चित्र तितकंच लोकप्रिय आहे !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :


🌸 https://www.thehouseofthings.com/saraswati-by-raja-ravi-varma-1.html
🌸 https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-village-forgets-legendary-painter/articleshow/16105195.cms
🌸 Iconography in Hinduism, Decoding the Pictorial Script by Sherline Pimenta, IDC, IIT Bombay    

🌸 Image Credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:Saraswati.jpg
Raja Ravi Varma [Public domain]

No comments:

Post a Comment