Saturday, January 11, 2020

वेरूळ लेण्यातलं एक रेखाटन


मुशाफिरी कलाविश्वातली


वेरूळ लेण्यातलं एक रेखाटन

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची स्थापना इंग्रजांच्या काळात १८६१ मध्ये झाली होती. ब्राह्मी लिपीचं ज्ञान असणाऱ्या अलेक्झांडर कनिंगहॅम यानं या संस्थेची स्थापना केली होती. भारतातल्या बौद्ध धर्माशी निगडित असणाऱ्या वास्तूंचं त्यानं जवळपास ५० वर्षे सर्वेक्षण केलं. पुरातत्व संशोधनाचं वेड असणाऱ्या अलेक्झांडरनं सुरुवातीच्या काळातलं सारं काम स्वखर्चानंच केलं. कालांतरानं त्याच्या प्रयत्नातून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग या संस्थेची स्थापना झाली.

संस्थेच्या सर्वोच्चपदी अलेक्झांडरनंतर जेम्स बुर्गेस आला. जेम्सलाही पुरातत्व संशोधनाचं असंच वेड होतं. भारतामध्ये त्यानं पुरातत्व संशोधनाचं काम करून कित्येक पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं बरीच लोकप्रिय झाली आणि त्यांच्या आवृत्यांवर आवृत्या निघाल्या. यातली बहुसंख्य पुस्तकं आजही संदर्भासाठी वापरली जातात.

पुरातन काळातली मंदिरं, लेणी यांचा अभ्यास करताना जेम्स बऱ्याचदा रेखाटनं करायचा. वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास करताना त्यानं सोबत दिलेलं रेखाटन केलं. वेरूळच्या पंधरा क्रमांकाच्या गुंफेमधलं (दशावतार लेणे) कोरीव कामाचं हे रेखाटन आहे. मार्कंडेय पुराणाशी संबंधित असणाऱ्या मार्कंडेय ऋषींच्या जीवनातला एक प्रसंग यात दाखवलाय.



शैव पंथीय लोकांच्या श्रद्धेप्रमाणं या मार्कंडेय ऋषींच्या जन्माची एक कथा आहे. एका ऋषीला मूल होत नव्हते. त्यानं शंकराची आराधना केली. शंकरानं प्रसन्न होऊन त्या ऋषीला पर्याय दिले. एकतर त्याला दिर्घायुष्यी पण मतिमंद अपत्य मिळू शकणार होते किंवा त्याला बुद्धिमान पण अल्पायुष्यी अपत्य मिळू शकणार होते. त्या ऋषीनं दुसरा पर्याय निवडला. त्याला बुद्धिमान असणारं मूल झालं. हे मूल मार्कंडेय नावानं ओळखलं जाऊ लागलं.

मार्कंडेय १६ वर्षांचा झाला तेंव्हा त्याचा मृत्यू जवळ आल्याचं त्याच्या आई वडिलांना समजलं. पण बुद्धिमान असल्यानं हा मुलगा मृत्यूला घाबरला नाही. मृत्यू प्रत्येकालाच अटळ आहे हे त्याला चांगलं माहीत होतं. मृत्यूला सामोरं जाण्यापूर्वी मार्कंडेयचा शिवाची आराधना करण्याचा मानस होता. नदीकाठची वाळू घेऊन त्यानं एक शिवलिंग बनवलं. आणि त्यानं शिवाची आराधना सुरु केली. त्याची आराधना सुरु असताना त्याच्या समोर यम येऊन उभा राहिला. मार्कंडेयानं त्याला प्रार्थना संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली. यमानं त्याची टिंगल करत त्याला सांगितलं की मृत्यू कुणासाठी थांबत नसतो. मार्कंडेयाचा प्राण घेण्यासाठी यमानं मार्कंडेयाच्या नाकाला पकडलं. मार्कंडेयानं शिवाकडं मदतीची याचना केली. शिवानं यमाला परतावून लावलं आणि त्याच्या भक्ताची सुटका केली. यानंतर मार्कंडेय अमर झाला. शंकराचं नाव यानंतर यमान्तक असं पडलं.

जितकं सुंदर या लेण्यामधलं कोरीव काम आहे तितकंच सुंदर हे रेखाटन केल्याचं आपल्याला जाणवल्यावाचून राहत नाही !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

The Indian biographical dictionary by Rao, C. Hayavando
Image Credit:
Burgess, James (1832-1916) [Public domain]

No comments:

Post a Comment