Saturday, January 25, 2020

विनय, बादल आणि दिनेश


मुशाफिरी कलाविश्वातली

विनय, बादल आणि दिनेश

१९३० च्या ऑगस्ट मधली गोष्ट. बंगालमधल्या (ढाका) एका मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात एक ज्येष्ठ इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला आणले होते. त्याच्यावर उपचार चालू होते. त्याला पाहण्यासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असणारा लोमन येणार होता.

ठरल्याप्रमाणं लोमन इस्पितळात आला. ज्या वैद्यकीय महाविद्यालयाचं हे इस्पितळ होतं त्या महाविद्यालयात शिक्षण घेणारा एक विद्यार्थी त्याच वेळी इस्पितळात आला. त्यानं पारंपरिक बंगाली वेष परिधान केला होता. त्यानं सारी सुरक्षा व्यवस्था भेदली आणि लोमनवर जवळून गोळ्या झाडल्या !! लोमन तात्काळ मृत्यू पावला. त्याच्यासोबत असणारा हॉडसन नावाचा पोलीस अधिकारीही गंभीररीत्या जखमी झाला.

तो कोण होता हे गुपित नव्हतं. महाविद्यालयाच्याच एका मॅगझीनमधून त्याचं छायाचित्र घेऊन ते सर्वत्र चिकटवण्यात आलं. त्याला पकडण्यासाठी १०००० रुपयांचं बक्षीसही ठेवण्यात आलं.

या मुलाचं नाव होतं विनय बसु. त्यानं बंगाल व्हॉलन्टीअर्स नावाच्या एक क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ही संघटना १९२८ मध्ये स्थापन केली होती. विनयनं या संघटनेची ढाका इथं एक प्रकारे शाखा सुरु केली होती. त्या काळात काही इंग्रज पोलीस अधिकारी अटक केलेल्या भारतीय राजकीय बंदीवानांचा तुरुंगात छळ करत. अशा पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध काम करण्याची या संघटनेची योजना होती. या योजनेचा एक भाग म्हणूनच विनयनं लोमनची हत्या केली होती. 

पोलिसांचा पाठलाग चुकवत विनय कलकत्याला आला. तिथं क्रांतिकारी लोकांनी त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती.

या काळात कर्नल एन एस सिम्प्सन हा इंग्रज अधिकारी इंस्पेक्टर जनरल आॅफ प्रिझन्स' या पदावर होता. भारतीय राजकीय कैद्यांचा अमानुष छळ करून त्यांचा आवाज बंद करता येईल असं त्याला वाटायचं. असा अमानुष छळ करण्यासाठी तो त्या काळात कुप्रसिध्द होता. स्वाभाविकच  क्रांतिकारक मंडळींमध्ये या सिम्प्सनविषयी कमालीची चीड होती. बंगाल व्हाॅलिंटियर्सचं पुढचं लक्ष्य होतं हा सिम्प्सन.

खरंतर फक्त सिम्प्सनला संपवून प्रश्न संपणार नव्हता, कारण मग इंग्रज अधिकारी लोकांत अजून एखादा सिम्प्सन तयार झाला असता. इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये एक भितीचा संदेश पाठवणं गरजेचं होतं. या क्रांतिकारक मंडळींनी असाच एक बेत आखला. इंग्रज लोकांच्या एका प्रमुख कार्यालयात जाऊन या सिम्प्सनला मारून हे साध्य होणार होते. क्रांतिकारक मंडळींनी नेमकं असंच ठरवलं. कलकत्त्यातला डलहौसी चौकातल्या रायटर्स बिल्डिंग (त्या वेळचं त्यांचं सचिवालय) इथं जाऊन सिम्प्सनला मारायचं ठरलं.

८ डिसेंबर १९३० रोजी विनय बसु, बादल गुप्ता आणि दिनेश गुप्ता या तीन क्रांतिकारकांनी युरोपियन वेष परिधान करत रायटर्स बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. या वेळी तिघांपैकी दोघांचं वय होतं २२, तर एकाचं वय होतं अवघं १८. या तिघांनी सरळ या सिम्प्सनवर गोळ्या झाडल्या आणि भारतीय कैद्यांचा अमानुष छळ करणारा सिंप्सन तिथंच संपला. अर्थातच इंग्रजांचं एक प्रमुख कार्यालय असल्यानं तिथं बरेचशे सुरक्षारक्षक होते. तीन क्रांतिकारक आणि हे सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू झाली. काही इंग्रज अधिकारी जखमी झाले.

तीन क्रांतिकारकांना इंग्रजांच्या हाती लागायचं नव्हतं. यापैकी दोघांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या तर एकानं पोटॅशिअम सायनाईड हे विष खाऊन स्वतःला संपवलं.  तिघंही हुतात्मा झाले. सिम्प्सनची हत्या हे बंगाल व्हाॅलिंटियर्सनं पार पाडलेली एक प्रमुख कामगिरी मानण्यात येते.


डलहौसी चौकाचं नाव 'बीबीडी बाग' असं बदलण्यात आलं. बिनाॅय (विनय), बादल आणि दिनेश यांच्या नावांवरून चौकाचं नविन नाव ठेवलं गेलं. रायटर्स बिल्डिंगसमोर या तिघांचे पुतळे उभे करण्यात आले. सोबतच्या चित्रात आपल्याला हेच बोलके पुतळे दिसताहेत. तिघांनीही पाश्चात्त्य वेश परिधान केलेला दिसतोय. पुतळ्यांमध्ये एक प्रकारची गतिमानता, जिवंतपणा जाणवतो. तिघांच्याही हातात पिस्तूल दिसतात.

या तिघांचे हे जिवंत भासणारे पुतळे पाहताना देशभक्तीची भावना  जाणवल्यावाचून राहत नाही.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

◆◆संदर्भ :

◆https://www.thebetterindia.com/154654/benoy-badal-dinesh-writers-building-kolkata-news/
★https://www.patrika.com/miscellenous-india/history-of-binoy-badal-dinesh-1-2219359/
★https://en.wikipedia.org/wiki/Bengal_Volunteers
★https://en.wikipedia.org/wiki/Benoy_Basu

◆◆Image Credit:

★https://commons.wikimedia.org/wiki/File:Statue_of_Benoy,_Badal_%26_Dinesh_in_front_of_Writers%27_Building,_Kolkata.jpg
Sujay25 [CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]

No comments:

Post a Comment