Friday, January 3, 2020

१७९० मधला पुण्यातला करार


मुशाफिरी कलाविश्वातली

१७९० मधला पुण्यातला करार 

१७८० च्या दशकातली गोष्ट. इंग्रजांना पुण्यामध्ये पेशव्यांच्या दरबारात आपला दूत कायमस्वरूपी ठेवण्याची गरज भासू लागली. आजपर्यंत इंग्रजांच्या दूतांनी इथं भेटी दिल्या असल्या तरी त्यातलं कुणी कायमस्वरूपी पुण्यात राहिलं नव्हतं. इंग्रजांनी या कामगिरीसाठी चार्ल्स मॅले नावाचा मुत्सद्दी निवडला. दरबारात कायमस्वरूपी दूत ठेवण्यासंबंधी बरेच विवाद झाल्यानंतर मार्च १७८६ रोजी मॅले पुण्यात आला.

मॅलेसोबत त्याच्या माणसांचा बराच लवाजमा होता. सहा इंग्रज अधिकारी, ३५ घोडे, २०० रक्षक, बाकीची बरीच माणसे, हत्ती, मेणे ह्या साऱ्यांचा त्यात समावेश होतापेशव्यांच्या प्रतिनिधींनी त्यांचं गणेशखिंड इथं स्वागत केलं. मॅलेची राहण्याची व्यवस्था गायकवाड महालात करण्यात आली तर बाकीचा लवाजमा पर्वतीपाशी तंबू ठोकून राहिला. मॅलेनं पेशव्यांना देण्यासाठी खूप साऱ्या भेटवस्तू आणल्या होत्या. यात ऍबीसीनिया इथून आणलेला चार फूट उंच असणारा पक्षी (एक प्रकारचा शहामृग) होता. पण दुर्दैवानं तो पक्षी मरण पावला होता. काही कारणानं सुरुवातीला मॅलेला पेशव्यांना भेटता आलं नाही.

मॅलेनं लवकरच पुण्यात आपला जम बसवला. पुण्यात त्याला (आणि त्याच्या नोकरचाकरांना) राहण्यासाठी बंगला बांधण्यासाठी त्यानं पेशव्यांकडं जमीन मागितली. पेशव्यांकडून त्याला मुळा आणि मुठा नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणची जमीन मिळाली. त्यानं या ठिकाणी सुंदर घर बांधलं. घराभोवती छानसा बगिचाही केला. घराचं नाव 'संगम' असंच ठेवण्यात आलं. यात तऱ्हेतऱ्हेची फळांची झाडं आणि भाज्या लावण्यात आल्या. बाजूच्या नद्यांचंच पाणी या बगिच्यात वापरण्यात यायचं.  

मॅलेनं अगदी साध्या कारकूनांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. टेलिस्कोप, पृथ्वीच्या घनगोल प्रतिकृती, वैज्ञानिक उपकरणे तो पेशव्यांना भेट द्यायचा. पेशव्यांना ह्या भेटी आवडायच्या. स्थानिक लोकांच्या रितीरिवाजांची त्याला चांगली जाण होती. गणपतीच्या उत्सवात तो आवर्जून पेशव्यांकडं हजर असायचा. अधिकाऱ्यांच्या घराची लग्ने असोत वा मुंजी - तो कधी चुकवायचा नाही. पुण्यात खूप साऱ्या लोकांना तो परिचित होता.

अर्थातच हे सारं करताना इंग्रज लोकांची राजकीय आणि व्यापारी उद्दिष्टां साध्य करण्याचा त्यानं सर्वात आधी विचार केला. युरोपियन लोकांची कला, विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र त्यानं पुण्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध इंग्रज चित्रकार जेम्स वेल्स याला त्यानं पुण्यात १७९० मध्ये आणलं (आणि हा चित्रकार मरेपर्यंत म्हणजे १७९५ पर्यंत पुण्यातच राहिला.) या चित्रकारानं पेशव्यांच्या दरबारातील बऱ्याच जणांची व्यक्तिचित्रं काढलीत. वेल्सच्या हाताखाली पुण्यात बरेचशे चित्रकारही तयार झाले !!

मॅलेनं ईस्ट इंडियाचा दूत म्हणून काम करताना उत्कृष्टपणे मुत्सद्देगिरी दाखवली. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जून १७९० रोजी त्यानं घडवून आणलेला करार. त्या काळात इंग्रजांना टिपू सुलतानचा मोठाच धोका होता. टिपूच्या वाढत्या सामर्थ्याला आळा घालणं खूपच आवश्यक होतं. मॅलेनं मराठे, निजाम आणि इंग्रज यांच्यात एक करार घडवून आणला. या कराराप्रमाणं तिघांचं सैन्य (मराठे, निजाम आणि इंग्रज) टिपूविरुद्ध एकत्रित लढणार होते. ह्या करारावर पेशव्यांनी गणपती रंगमहालात (म्हणजे शनिवारवाड्यात) जून १७९० रोजी स्वाक्षरी केली. एका दृष्टीनं इंग्रजांच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश होतं. पुढं या तिघांच्या एकत्रित सैन्यानं टिपूचा पराभव केला.

नंतर १७९७ मध्ये मॅले इंग्लंडमध्ये परतला. त्यानं घडवून आणलेल्या कराराचं त्याला एक चित्र बनवून घ्यायचं होतं. खरंतर त्याला हे चित्र त्यानं पुण्यात नेलेल्या जेम्स वेल्सकडून काढून घ्यायचं होतं पण वेल्स तर आता मरण पावला होता. याच काळात (१७८६ पासून ते १७९३ पर्यंत ) थॉमस डॅनियल नावाच्या दुसऱ्या एका इंग्रज चित्रकाराचे भारतात वास्तव्य होते. भारतामधली दृश्ये दाखवणारी चित्रं काढणं हा त्याचा हातखंडा होता. मॅलेनं हे चित्र काढण्याचं काम डॅनियलला दिलं. डॅनिएलनं आपलं सारं कौशल्य पणाला लावत या चित्राला न्याय दिला. त्यानं हे चित्र १८०५ मध्ये काढलं.


या चित्रात आपल्याला पेशव्यांच्या हातात कराराची कागदपत्रं दिसतात. ही कागदपत्रं स्वतमॅले पेशव्यांना देतोय. हे दृश्य गणपती रंगमहाल म्हणजे शनिवारवाड्यातलं आहे. मॅलेच्या मागं अजून काही इंग्रज दिसतात. दरबारात अनेक लोक दिसतात. मागच्या भिंतीवर गणपतीची मूर्तीही दिसते. तिथंच बाजूला एक विष्णूची मूर्ती दिसते. तैलरंगात काढलेलं हे चित्र सध्या इंग्लंडमधल्या टेट गॅलरीमध्ये आहे.
   
- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🍁‘Poona – the bygone days’ by Rao Bahadur D. B. Parasnis (published by The Times Press 1921)
🍁https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell

🌸Image credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:Thomas_Daniell,_Sir_Charles_Warre_Malet,_Concluding_a_Treaty_in_1790_in_Durbar_with_the_Peshwa_of_the_Maratha_Empire.jpg
Thomas Daniell [Public domain]

No comments:

Post a Comment