मुशाफिरी कलाविश्वातली
सप्तमातृका
पुराणांमध्ये
येणारी आणि साऱ्या भारतात
वेगवेगळ्या ठिकाणी शिल्पांमध्ये दिसणारी एक संकल्पना म्हणजे
'सप्तमातृका'. सप्त म्हणजे सात
आणि मातृका म्हणजे मातांचा समूह. असं म्हणतात की
अतिप्राचीन काळात माणसाला (प्रत्यक्षात न दिसणाऱ्या) परमेश्वराची
कल्पना करणं अवघड जायचं.
या काळात माणसाला आपलं रक्षण करणारी,
आपली काळजी करणारी आणि आपल्यावर प्रेम
करणारी आईच देवाचं रूप वाटायची. यातूनच मातृदेवतेच्या पूजेला सुरुवात झाली.
खरंतर
सप्तमातृका ही संकल्पना पुराणकाळापेक्षाही
जुनी असावी असं मानण्यात येतं.
या सप्त मातृकांशी साम्य
दाखवणारी मुद्रा सिंधू खोऱ्यातल्या उत्खननात मिळते. मोहेंजोदडो इथं सापडलेल्या सिंधू
संस्कृतीमधल्या एका मुद्रेवर झाडाच्या
बाजूला उभ्या असणाऱ्या सात आकृती दिसतात.
(त्या नृत्य करत असल्याचा भास
होतो.) ही सप्तमातृकांच्या संकल्पनेची
सुरुवात असल्याचं मानण्यात येतं. सप्तमातृकांची संकल्पना इतकी जुनी असली
तरी प्रत्यक्षात सप्तमातृका शिल्पांमध्ये स्पष्टपणे दिसायला सुरुवात कुशाणकाळात होते. या काळात दगडांपासून
बनवलेल्या, टेराकोटापासून बनवलेल्या सप्तमातृका पाहायला मिळतात. गुप्तकाळात (आणि पुढं) आपल्याला
दगडाच्या आयताकृती पृष्ठभागावर सप्तमातृका कोरलेल्या दिसू लागतात. यात
सप्तमातृकांच्या डाव्या बाजूला वीरभद्र (म्हणजे शंकर) तर उजव्या बाजूला गणेशही दिसू लागतो. बहुतेकवेळा या मातृकांमध्ये ७ माता दिसत
असल्या तरी कधीकधी (विशेषतः
नेपाळमध्ये) आठ माताही दिसतात.
नंतरच्या काळात हा आकडा अजूनही
वाढतो.
दक्षिण भारतातल्या चालुक्य
आणि कदंब घराण्यातले राजे
या मातृकांना प्रमुख देवता मानायचे. चालुक्य घराण्यातल्या सुरुवातीच्या राजांच्या काळात ताम्रपत्रांवर सप्त मातृकांचा उल्लेख
आढळतो. कांचीपुरममधल्या कैलासनाथ मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अगदी सुरुवातीच्या काळात
कोरल्या गेलेल्या सप्तमातृका पाहायला मिळतात. यात सप्तमातृकांसोबत वीरभद्र
आणि गणेशाची दिसतात.
या सप्तमातृकांच्या उत्पत्तीच्या बऱ्याच कथा पुराणांमध्ये दिसतात.
यात सर्वात जास्त प्रसिद्ध असणारी कथा अशी आहे:
भगवान शंकर अंधकासुराशी युद्ध
करत होते. यावेळी अंधकासुराला झालेल्या जखमांमधून रक्ताचे थेम्ब जमिनीवर पडत होते. यातल्या
प्रत्येक थेंबापासून एक नवीन अंधकासूर
तयार व्हायला लागला. इतक्या साऱ्या अंधकासुरांशी लढायला शंकराला अवघड जायला लागलं.
मग शंकरानं आपल्या मुखाग्नीतून योगेश्वरी नावाची देवी तयार केली.
ही देवी अंधकासुराचे रक्ताचे
थेम्ब जमिनीवर पडू देणार नव्हती.
बाकीच्या देवांनीही आपापल्या शक्ती देवींच्या रूपामध्ये पाठवल्या. (ब्रह्मानं ब्रह्माणी पाठवली तर विष्णूनं वैष्णवी,
इंद्रानं इंद्राणी वगैरे), या साऱ्या देवींनी
(म्हणजेच सप्तमातृकांनी) अंधकासुराचं रक्त खाली सांडू
दिलं नाही आणि मग
शंकरानं अंधकासुराचा वध केला !!
या कथेला एक दुसराही अर्थ
आहे. शंकर हे ज्ञानाचं
प्रतीक तर अंधकासूर हे
अज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. ज्ञानानं अज्ञानावर केलेल्या हल्ल्यानं अज्ञान (स्वत:चं संरक्षण
करण्यासाठी) अजूनच वाढत जातं. अंधकासुराच्या
रक्ताच्या थेंबापासून नवीन अंधकासूर निर्माण
होणं हीच गोष्ट दर्शवते.
आठ दुर्गुण (काम, क्रोध, लोभ,
मद, मोह, द्वेष, पैशुन्य
(एखाद्याचं गुपित दुसऱ्याला सांगणं), असूया) जोपर्यंत ज्ञानाच्या नियंत्रणात येत नाहीत, तोपर्यंत
अंधकासुराचा पराभव होत नाही. वराहपुराणानुसार
या मातृका म्हणजे अंधःकाराविरुद्ध लढतानाच्या आत्मविद्या आहेत.
शिल्पांकानात
या मातृकांना प्रत्येकी ४ हात दाखवण्यात
येतात. पुढच्या दोन हातांपैकी उजवा
हात अभय मुद्रेत तर
दावा हातात वरद मुद्रेत दिसतो.
या मातृका बहुतेकवेळा या क्रमानं दिसतात:
१) ब्रह्माणी: हिला
चार मुखं असतात. मागच्या
दोन हातांपैकी एका हातात कमंडलू
असतो. ही मातृका कमळावर
बसलेली असते. हिचं वाहन हंस
असतं.
२) वैष्णवी: हिच्या
मागच्या दोन हातांमध्ये आणि
चक्र असतात तर वाहन गरुड
असतो.
३) इंद्राणी: हिच्या
मागच्या दोन हातांपैकी एका
हातात वज्र असते तर
वाहन हत्ती (ऐरावत) असतो.
४) माहेश्वरी: मागच्या
दोन हातांमध्ये शूल आणि माला
असते. वाहन बैल असतो.
५) कौमारी: मागच्या
दोन हातांपैकी एका हातात कोंबडा
दिसतो. वाहन मोर असते.
६) वाराही: हिचं
मुख वराहासारखं असतं. मागच्या एका हातात हल
असते. वाहन म्हैस असते.
७) चामुंडा: शिल्पांकन
करताना या मातृकेला सर्वात
भयानक दाखवतात. केस विस्कटलेले तर
गळ्यात मुंडक्यांची माला असते. वाहन
गिधाड, कावळा किंवा शव असते.
सोबत दोन चित्रं
दिली आहेत. यापैकी पहिल्या चित्रात कर्नाटकातल्या गोविंदनहल्लीमधल्या पंचलिंगेश्वर मंदिरातल्या सप्तमातृका दिसतात. (यात ९ आकृती
दिसतात - डावीकडं शिव तर उजवीकडं
गणेश दिसतो.) दुसऱ्या चित्रात आंध्रप्रदेशातल्या पुष्पगिरी मंदिरातल्या सप्तमातृका दिसतात. यामध्ये ब्रह्माणीची चार मुखं, मातृकांची
वाहनं स्पष्ट दिसतात. (पण या मातृकांचा
क्रम थोडासा वेगळा असल्याचं जाणवतं.)
सप्तमातृका - १ |
सप्तमातृका - २ |
भारतभर
मंदिरांमध्ये (विशेषतः शैव मंदिरांमध्ये) दिसणाऱ्या
वेगवेगळ्या कालखंडांमध्ये बनल्या गेलेल्या सप्त मातृकांच्या शिल्पांमध्ये
दाखवल्या गेलेल्या आयुधांमध्ये, मातृकांच्या वाहनामध्ये काहीच बदल दिसत नाही
हे विशेष !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
🌺 संदर्भ :
https://www.speakingtree.in/allslides/when-sapta-matrikas-seven-divine-mothers-came-to-the-rescue-of-lord-shiva
https://sreenivasaraos.com/tag/saptamatrika/
https://www.britannica.com/topic/Saptamatrika
https://www.templepurohit.com/sapta-matrika-7-incarnation-goddess-shakti/
https://www.youtube.com/watch?v=GL9_G4JFLbI
https://magazines.odisha.gov.in/Orissareview/2009/September/engpdf/59-61.pdf
http://www.heritageuniversityofkerala.com/JournalPDF/Volume4/24.pdf
https://pankajsamel.wordpress.com/2018/12/06/saptamatruka/
https://www.exoticindiaart.com/article/mother/
🌺 Image Credit
Dineshkannambadi at English Wikipedia / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)
https://commons.wikimedia.org/wiki/Category:Pushpagiri_Temple_Complex#/media/File:Sapta_Matrikas.JPG
Harish Aluru / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)
No comments:
Post a Comment