Saturday, May 30, 2020

पाटणा कलम


मुशाफिरी कलाविश्वातली

पाटणा कलम

मुघल सम्राटांपैकी हुमायून, अकबर आणि जहांगीर यांच्या काळात चित्रकलेला खूप चांगले दिवस आले. हे लोक कलाप्रेमी असल्यानं त्यांच्या कारकिर्दीत कलेला आणि आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळालं. या काळात आपल्याला मुघल चित्रशैलीतले उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. पण यानंतर गादीवर आलेला औरंगजेब हा मात्र थोडासा वेगळा होता. त्याला कलेमध्ये कसलाही रस नव्हता. त्याच्या कारकिर्दीत चित्रकार मंडळींना आपल्या उपजीविकेसाठी दिल्ली सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले. यात काही लोक उत्तरेला पहाडांवर गेले आणि त्यातून पहाडी शैली निर्माण झाली. काही लोक राजस्थानात आले आणि त्यातून राजस्थानी शैली विकसित झाली. याच काळात काही लोक पूर्वेला बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं गेले

मुर्शिदाबाद इथला नवाब मीर जाफर हा कलाप्रेमी होता. याच कारणामुळं मुघल दरबारातले कलाकार मुर्शिदाबाद्ला आले. मीर जाफरच्या प्रोत्साहनामुळं त्यांना चांगले दिवस आले. दरबारामध्ये चित्रकलेचं काम करता करता या चित्रकार मंडळींचा इंग्रज व्यापाऱ्यांशी संबंध येऊ लागला. इंग्रजांशी संवाद साधता साधता इंग्रजांच्या चित्रकलेचाही त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. या काळात मुर्शिदाबाद हे कलेचं एक प्रमुख केंद्र बनलं.
मीर जाफरनंतर त्याचा मुलगा मिराण गादीवर आला. त्याला कलेत काहीएक रस नव्हता. चित्रकार मंडळींवर पुन्हा एकदा वाईट दिवस आले. या काळात पाटणा हे एक प्रमुख शहर होते. तिथं कपडे, साखर, मसाले,अफू वगैरेचा चांगला व्यापार चालायचा. व्यापारी केंद्र असल्यानं तिथं इंग्रज, डच आणि पोर्तुगीज व्यापारी मोठ्या कालावधीसाठी राहताना दिसत. सर्वसाधारण १७६० च्या दरम्यान मुर्शिदाबाद मधली चित्रकार मंडळी पाटण्याला आली. पाटणमधल्या काही ठराविक भागात हे लोक राहायचे. तिथले राजेलोक, नवाब, जमीनदार, इंग्रज व्यापारी, इंग्रज सैनिक यांच्या मागणीप्रमाणं चित्रं काढू लागले. बरेच चित्रकार पटण्यामधून बिहारमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दरबारी कलाकार म्हणून काम करू लागले.

या चित्रकार मंडळींनी एक नवीनच चित्रशैली निर्माण केली. या शैलीवर मुघल चित्रशैली आणि पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव होता. चित्रातल्या रेषा, रंग मुघल शैलीतून आल्या होत्या तर छटा (shades) वापरण्याची पद्धत पाश्चात्य चित्रशैलीमधून घेतली गेली होती. ही चित्रशैली 'पाटणा कलम' या नावानं विश्वविख्यात झाली. मुघल चित्रशैलीत आपल्याला बहुतेक वेळा चित्रांच्या विषयांत राजेशाही थाट, शाही जीवन पाहायला मिळतं. पण पाटणा कलममध्ये मात्र चित्रांचे विषय अगदीच साधे असायचे. सामान्य माणसांचं दैनंदिन जीवन हे या चित्रांचा प्रमुख विषय असायचा. त्यामुळं या चित्रांमध्ये आपल्याला कासार, गारुडी, चांभार, लोहार, कोळी अशा प्रकारचे लोक पाहायला मिळतात. तसंच या चित्रांमध्ये त्या काळचे सण, उत्सव, जत्रा आणि बाजारही दिसतात. एकूणच या चित्रांमध्ये आपल्याला तत्कालीन सामाजिक जीवन पाहायला मिळते. मुघल शैलीत चित्राच्या चारी बाजूंना सुंदर नक्षीकाम दिसायचं. पण पाटणा कलममध्ये मात्र असं काही नक्षीकाम नसायचं. इतकंच काय, या शैलीतल्या चित्रांमध्ये पार्श्वभूमीलाही काहीच नसायचं. पाश्चात्य व्यापारी अशी चित्रं आपल्या भारतातल्या आठवणी म्हणून घेऊन जायचे.

ही चित्रं प्रामुख्यानं कागदांवर, हस्तिदंतावर किंवा कपड्यांवर काढली जायची. हा कागद त्या काळात नेपाळहून यायचा. हस्तिदंतावर केलेली चित्रकला प्रामुख्यानं इंग्रजांसाठी असायची. हस्तिदंताच्या छोट्याश्या पट्टीवर अंडाकृती आकाराचं चित्र काढलं जायचं आणि बऱ्याचदा इंग्रज लोक ते आपल्या कोटवर लावायचे. चित्रं काढण्यासाठी वापरले जाणारे कुंचलेही हे चित्रकार स्वत: तयार करायचे. खारीच्या शेपटीचे (किंवा घोड्याच्या मानेवरचे केस) मऊ होण्यासाठी गरम पाण्यात उकळले जायचे. मग पक्ष्यांच्या पिसांमध्ये असणाऱ्या पोकळ नळीसारख्या भागात ते बसवून कुंचले तयार केले जायचे. चित्रासाठीचे रंगही हे लोक स्वत: तयार करायचे. हे रंग पूर्णपणे नैसर्गिक असायचे. फळं, फुलं, खनिजं आणि झाडांच्या सालींपासून हे रंग बनवले जायचे. (हळदीपासून पिवळा, काजळीपासून काळ वगैरे)  हे रंग पावसाळ्यात बनवले जायचे. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात कमी असणारं धुळीचं प्रमाण.

दुर्गा पूजा

टांगा
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र या शैलीला उतरती कला लागली. याचं एक कारण म्हणजे त्यात तेच तेच विषय येऊ लागले. याच सोबत आता लिथोप्रेस आणि कॅमेरा यांचंही आगमन झालं होतं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालेली ही चित्रशैली विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अस्तंगत झाली.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :

https://www.jagranjosh.com/general-knowledge/patna-kalam-painting-origin-and-characteristics-1548754612-1
https://selfstudyhistory.com/2016/04/25/bpsc-general-studies-patna-kalam-paintings/
https://www.deccanherald.com/content/56522/return-patna-kalam.html
https://www.patnabeats.com/patna-kalam-the-heritage-that-we-lost/

Image Credit

https://commons.wikimedia.org/wiki/File:Durga_Puja,_1809_watercolour_painting_in_Patna_Style.jpg
Sevak Ram (c.1770-c.1830) / Public domain

https://commons.wikimedia.org/wiki/File:Shiv_Lal.jpg
Shiv Lal / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)

3 comments: