Saturday, May 23, 2020

व्हर्चुओसो


मुशाफिरी कलाविश्वातली

व्हर्चुओसो

१८३२ मधली गोष्ट. पॅरिसमधल्या ऑपेरा हाऊस मध्ये एक मैफल चालू होती. इटलीमधुन आलेला व्हायोलिनवादक पॅगॅनिनी याचं वादन या कार्यक्रमात चालू होतं. त्या काळात पॅरिसमध्ये कॉलराची साथ चालू होती. कॉलराग्रस्तांसाठी निधी उभारण्यासाठी ही मैफल आयोजित करण्यात आली होती. या मैफलीत एक तरुण पियानोवादक श्रोता होता. त्याचं नाव होतं फ्रान्झ लीझस्ट. पॅगॅनिनीचं व्हायोलिनवर असणारं प्रभुत्व पाहून लीझस्ट थक्क झाला होता. पॅगॅनिनी आणि त्याचं व्हायोलिन एकरूप झालेलं त्यानं अनुभवलं. पॅगॅनिनी त्या काळाच्या इतर व्हायोलिनवादकांपेक्षा तर चांगलं वाजवायचाच पण महत्वाचं म्हणजे तो व्हायोलिन जितक्या चांगल्या प्रकारे वाजवता येऊ शकतं तितकं तो वाजवायचा. पॅगॅनिनीसारखंच आपल्या वाद्यावर प्रचंड प्रभुत्व असणारं, असामान्य कौशल्य असणारं म्हणजेच 'व्हर्चुओसो' बनण्याचे विचार त्याच्या डोक्यात घोळायला लागले. त्यानं एक प्रकारची तपस्या सुरु केली.

यानंतर liszt नं जे काही केलं त्यानं इतिहास बनला. असं म्हणतात की मानवी मर्यादा आणि पियानोच्या मर्यादा जिथं संपतात तिथंपर्यंत liszt पोहोचला. त्यानं रचलेलं संगीत याची साक्ष देते. आपण त्याची एक रचना ऐकूया - https://www.youtube.com/watch?v=M0U73NRSIkw. गंमत म्हणजे Liszt ची ही रचना पॅगॅनिनीच्या एका रचनेवर आधारित आहे. व्हर्च्युऑसिटीचा संगीतामधला अर्थ आपलं वाद्य वाजवण्यातलं अत्युच्च कौशल्य असा करता येईल. (अर्थातच कौशल्य म्हणजे कला नव्हे, पण संगीताच्या कलेत  उत्कृष्ट कलाकृती बनवण्यासाठी कौशल्य नेहमीच उपयोगी ठरते.)

संगीतासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या मंडळींमध्ये व्हर्च्युऑसिटी मिळवण्याचं एक प्रकारे वेड दिसायचं. त्यासाठी कितीही तपस्या करायला हे लोक तयार असायचे. अर्थातच आजही व्हर्च्युऑसिटीचा ध्यास असणारी, संगीतसाधना करणारे लोक दिसतात.

१९८० च्या दशकात अमेरिकेमधल्या ह्यूस्टन इथं एका व्यापारी कार्यालयांच्या संकुलासमोर (लिरिक सेंटर) काहीतरी शिल्प बसवायचं होतं. ह्या संकुलाच्या शेजारीच थिएटर डिस्ट्रिक्ट नावाचा भाग होता (म्हणजे अजूनही आहे). हा भाग संगीत, नृत्य आणि नाट्य कलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं इथं या कलांशी संबंधित काहीतरी शिल्प बसवायचं ठरलं. डेव्हिड ऍडिक नावाच्या एका कलाकारावर हे शिल्प बनवण्याची कामगिरी सोपवण्यात आली.


या कलाकारानं 'व्हर्च्युओसो' नावाचं शिल्प बनवलं. या शिल्पात आपल्याला एक चेलो नावाचं वाद्य वाजवणारा कलाकार दिसतो. चेलो म्हणजे व्हायोलिनच्या परिवारातलंच एक आकारानं थोडंसं मोठं असणारं वाद्य. या व्हर्च्यूओसो वादकाला देहच नाही आहे. जणू काही हा वादक देहभान हरपून आपल्या वादनात मग्न झालाय. आपल्याला यात फक्त वाद्य, वाद्य वाजवणाऱ्या हाताचा मनगटापुढचा हात आणि संगीतात हरवलेल्या या वादकाचा चेहरा दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांऐवजी दोन गोल दिसतात. नाकाच्या ठिकाणी सरळ रेषा दिसते. या भव्य आकाराच्या शिल्पाची उंची ३६ फूट आहे.  मागं दिसणारी इमारत २६ माजली आहे !! यावरून या शिल्पाच्या भव्यतेची कल्पना येते.  हे शिल्प बनवताना २१ टन काँक्रीट वापरलं गेलं. खरंतर या वादकाच्या मागच्या बाजूला अजून तीन वादकांची शिल्पं आहेत पण भव्य शिल्पाच्या मागं असल्यानं ती आपल्याला दिसत नाहीत. या काँक्रीटच्या शिल्पात एक संगीताची ध्वनियंत्रणा आहे. रस्त्यावरून चालताना आपण या शिल्पाजवळ गेलो तर आपल्याला पाश्चात्य अभिजात संगीत ऐकू येते !! रस्त्यावर जास्त वर्दळ असेल तर मात्र हे संगीत ऐकू येत नाही.

इतकं सुंदर शिल्प असलं तरी या शिपवर सुरुवातीच्या काळात कडाडून टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये तिथले नागरिक आणि कलासमीक्षक होते. नंतर मात्र हे शिल्प अतिशय लोकप्रिय ठरत गेलं. आता हे शिल्प ह्युस्टनमधलं पर्यटनाचं एक आकर्षण ठरलं आहे !!

ह्युस्टनला जाण्याची संधी मिळाली तर मात्र हे शिल्प आवर्जून पाहायलाच हवं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit
Carol M. Highsmith / Public domain

No comments:

Post a Comment