Sunday, August 16, 2020

भारताची कांस्य महिला

मुशाफिरी कलाविश्वातली

भारताची कांस्य महिला

१९७० च्या दशकातील गोष्ट. अहमदाबादमधल्या एका विशीतल्या शिल्पकार तरूणीला एक काम मिळालं. हे काम होतं पुतळा बनवायचं. काम राजकोट महानगरपालिकेचं होतं. अहमदाबाद ते राजकोट हा अडीचशे किलोमीटरचा प्रवास तिनं स्कूटरनं केला.

ही शिल्पकार तरुणी नंतरच्या काळात 'भारताची कांस्य महिला' (Bronze woman of india) म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांचं नाव होतं जसुबेन शिल्पी. ज्या काळात शिल्पं बनवण्याचं काम पुरूषांचं म्हणून ओळखलं जायचं त्या काळात त्यांनी शिल्पकामाच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि आपला कायमचा ठसा उमटवला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोठ्या आकाराचे  तब्बल २२५ पूर्णाकृती पुतळे तर ५२५ अर्धाकृती पुतळे बनवले.

जसुबेन यांचा जन्म १९४८ सालचा. त्यांची लहानपणापासूनच कलेची ओढ होती. अहमदाबादमधल्या सी एन काॅलेज आॅफ फाईन आर्ट्समध्ये त्यांनी कलेचं शिक्षण घेतलं. वर्गातल्या पाच मुलींपैकी त्या एक होत्या. कलेच्या साऱ्याच माध्यमांमध्ये त्यांचं नैपुण्य दिसून येत होतं. पण, त्यांना आवडायचं ते शिल्पकाम. विशेषतः कांस्यशिल्पं, धातुची शिल्पं किंवा दगडाच्या मूर्ती बनवताना त्या जीव ओतून काम करायच्या.

खरंतर जसुबेन यांच्या कारकिर्दीतला सुरूवातीचा काळ संघर्षाचा होता. घरातल्या लोकांच्या इच्छेविरूद्ध त्यांनी मनहर शिल्पी नावाच्या शिल्पकाराशी लग्न केलं होतं. मनहर शिल्पी अनाथ होते, त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. लग्न झाल्यावर कुटुंब चालवण्याकरिता त्यांना शाळेत कलाशिक्षिका म्हणून काम करावं लागलं.

पहिलं अपत्य जन्माला आल्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत एक प्लाॅट खरेदी केला. अर्थातच पैसे नसल्यानं त्यांनी कर्ज काढून हा व्यवहार केला होता. पण आता कर्जाचे हप्ते भरावे लागणार होते. वेगवेगळ्या शहरांमधलं पुतळे बनवण्याचं काम जसुबेन यांना मिळू लागलं. मनहर शिल्पी आपल्या स्टुडिओमध्येच काम करायचे. पण, जसुबेन जिथं काम असेल तिकडं प्रवास करायच्या. आणि हा प्रवास त्या आपल्या स्कूटरनं करायच्या. स्कूटरनं प्रवास करुन दुसऱ्या शहरात जाणं, दिवसभर जीव ओतून शिल्पकाम करणं, संध्याकाळी परत प्रवास करणं हे तर त्या करायच्याच, पण शिवाय आपल्या पतीचा शिल्पकामाचा स्टुडिओ सांभाळणं, स्वतःचे आणि पतीचे सारे आर्थिक व्यवहार पहाणं ही जबाबदारीदेखील त्यांच्याकडंच होती.

हा सारा खडतर काळ ८० च्या दशकात संपू लागला. त्यांच्या शिल्पकामाची लोकप्रियता वाढत चालली होती. त्यांना कामंही मिळू लागली होती. आता बऱ्यापैकी पैसेही मिळू लागले होते. पण, सारं काही सुरळीत होतंय असं दिसताना त्यांच्यावर एक आघात झाला. १९८४ मध्ये त्यांचे पती मनहर शिल्पी यांचं कर्करोगाचं निदान झालं. आता त्यांच्यावरची जबाबदारी अजुनच वाढली.

१९८९ मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. साथीदार गमावल्यानं त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पण, कुटुंब सांभाळत त्यांनी पुढच्या आयुष्यात शिल्पकामामध्ये स्वतःला वाहून घेतलं.


त्यांच्या शिल्पकामातला परिपूर्णतेचा ध्यास सर्वांनाच जाणवायचा. या ध्यासामुळंच त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिल्पकार बनल्या. जसुबेन यांनी भारतातल्या कित्येक शहरांमध्ये पुतळे बनवले. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तराखंडमध्ये त्यांनी बनवलेले पुतळे दिसतात. त्यांनी बनवलेले महात्मा गांधीजी, राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुतळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी बनवलेले महात्मा गांधी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांचे पुतळे अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये दिसतात. राजस्थानातल्या सुमेरपुरमधली २८ फुट उंचीची पंचमुखी मारुतीची त्यांनी बनवलेली मुर्ती ही जगातली कुठल्याही महिला शिल्पकारानं बनवलेलं सर्वात जास्त उंचीचं शिल्प म्हणून रेकाॅर्ड आहे.

जसुबेन शिल्पी यांना कित्येक मानसन्मान मिळाले. अमेरिकेतल्या लिंकन केंद्रातर्फे त्यांना अब्राहम लिंकन कलाकार पारितोषिक मिळालं.  इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊसतर्फे त्यांना बेस्ट सिटीझन आॅफ इंडिया अॅवाॅर्ड मिळालं.

हुबेहुब दिसणाऱ्या मेणाच्या पुतळ्यांसाठी विश्वविख्यात असणाऱ्या लंडनमधल्या मॅडम तुसाड संग्रहालयाच्या धर्तीवर भारतातही कांस्य पुतळ्यांचं संग्रहालय बनवण्याचं  त्यांचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. या प्रकल्पावर काम चालू असतानाच २०१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अजून थोडं आयुष्य लाभलं असतं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर भारतात एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शिल्पसंग्रहालय पहायला मिळालं असतं ...!!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍁 https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/cover-story/bronze-woman-of-india-no-more/articleshow/36021475.cms
🍁 https://www.thebetterindia.com/206431/jasuben-shilpi-bronze-woman-india-sculptor-son-remembers-inspiring-india/
🍁 https://www.thehindu.com/news/national/other-states/renowned-sculptor-jasuben-shilpi-passes-away-in-gujarat/article4309569.ece

🍁 https://yodhas.com/indian-stories/jasuben-shilpi-story-of-indian-bronze-sculpture-artist/

Image credit:

Indiatimes.com

No comments:

Post a Comment