Saturday, August 1, 2020

नोटांची चित्रं काढणारा कलाकार


मुशाफिरी कलाविश्वातली

नोटांची चित्रं काढणारा कलाकार

Trompe I'oeil ही चित्रकलेतली विशिष्ट शैली आहे. "Trompe I'oeil" या शब्दाचा अर्थ होतो "fool the eye" म्हणजे डोळ्यांची फसवणूक करणारी चित्रं. या शैलीतली चित्रं इतकी हुबेहूब असतात की चित्रातल्या गोष्टी वास्तवात असल्याचा भास होतो. या शैलीत चित्रं काढणारे बरेच कलाकार होऊन गेले. या कलाकारांमध्ये जॉन हॅबर्ले या अमेरिकन कलाकाराचं एक खास स्थान आहे.

जॉननं १४ व्या वर्षीच शाळेला रामराम ठोकला. त्यानं एका छापखान्यात engraver (एका प्रकारच्या कठीण अशा ठशांवर आकृती कोरण्याचं काम) म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानं सर्वसाधारण अशाच प्रकारची कामं पुढची बरीच वर्षे केली. १८८४ मध्ये त्यानं न्यूयॉर्कमधल्या 'नॅशनल अकॅडेमी ऑफ डिझाईन' कलेतलं शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

हुबेहूब चित्रं काढण्याचा ध्यास जॉनला सुरुवातीपासूनच होता. १८८२ मध्ये (म्हणजे न्यूयॉर्कमधलं शिक्षण सुरु होण्या आधी वर्षे) त्यानं एक स्वतःच्या रेखाटनाचं  चित्र काढलं. ह्या चित्राचं नाव होतं That's me. हे चित्र इतकं हुबेहूब होतं की समोर रेखाटन ठेवल्याचा भास व्हावा. चित्रात रेखाटनाच्या कोपऱ्यांमध्ये प्रत्येकी एक पिन दिसते तर एका कोपऱ्यात कसलातरी कागद दिसतो

जॉन चित्रकलेच्या इतिहासात कायमचा लक्षात राहिला तो त्याच्या द्विमितीय गोष्टींच्या चित्रांमुळे. द्विमितीय गोष्टी म्हणजे कागद, फोटो, चलनाच्या नोटा, वृत्तपत्रांची कात्रणे, पोस्टाचे स्टॅम्प वगैरे. अशा गोष्टींची चित्रं जॉनला इतकी हुबेहूब जमायची की पाहणाऱ्याला ती खरीच असल्याचा भास व्हायचा. That's me हे चित्र म्हणजे अशा शैलीतल्या चित्रांची सुरुवात होती. द्विमितीय गोष्टींच्या चित्रांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण ती कुठल्याही कोनातून पाहिलीत तरी ती खरीच वाटतात.

१८८६ मध्ये विल्यम हार्नेट नावाच्या एका चित्रकाराला आपल्या कलेचा उपयोग बनावट नोटा तयार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या घटनेनं जॉनला एक प्रकारची प्रेरणा मिळाली. पुढच्या ४ वर्षांमध्ये त्यानं नोटा दाखवणारी असंख्य चित्रं काढली. सोबत दिसणारं चित्र हे याच मालिकेतलं.


या चित्राचं नाव आहे 'यु. एस. .' चित्रात जीर्ण झालेल्या नोटा एका लाकडी पृष्ठभागावर ठेवलेल्या दिसतात. नोटांवरचे सूक्ष्म तपशील जॉननं हुबेहूब दाखवले आहेत. नोटेवर पोस्टाचे स्टॅम्प चिकटवलेले आहे आणि तेही जीर्ण होऊन फाटलेले आहे. नोटेवर डाव्या बाजूला खाली चिकटपट्टी लावल्याचं दाखवलंय. जीर्ण झालेल्या नोटा, चिकटपट्टी, लाकडी पृष्ठभाग वास्तवात असल्याचा भास होतो. चित्रात एक वृत्तपत्राचे कात्रणही दिसते. या कात्रणात जॉनच्याच एका चित्राचा उल्लेख येतो.

गंमत म्हणजे हे चित्र जेंव्हा आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो इथं पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आलं तेंव्हा लोकांचा ते चित्र असल्याचा विश्वासच बसत नव्हता. एका पत्रकार असणाऱ्या समीक्षकानं तर त्या चित्रात खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आल्याचं जाहीर केलं. हे समजल्यावर जॉन एक मोठं भिंग, रंग काढून टाकणारं रसायन (paint remover) आणि काही तज्ञ मंडळींसोबत शिकागोला पोहोचला. त्यानं ते चित्र असल्याचं सिद्ध केलं !! जॉनचं हे सध्या तैलचित्र अमेरिकेमधल्या इंडियानातल्या एका कलासंग्रहालयात आहे.

सरकारी गुप्तचर संस्थांकडून जॉनला नोटांची हुबेहूब चित्रं  काढण्याची ताकीद देण्यात यायची !! पण यामुळं नेमका उलटा परिणाम झाला - जॉननं नोटांची जास्तच चित्रं काढली !!

a bachelor's drawer हे त्याचं १८९० ते १८९४ च्या दरम्यानचं अजून एक प्रसिद्ध असणारं चित्र. या चित्रात आपल्याला एका लाकडी पृष्ठभागावर चिकटवलेल्या/अडकवलेल्या  काही गोष्टी हूबेहूबी स्वरूपात पाहायला मिळतात. हा लाकडी पृष्ठभाग एका ड्रॉवरचा आहे. ड्रॉवरचं हॅण्डल तुटलेलं आहे. यात पत्त्यांची पानं, चलनाच्या नोटा, फोटो, पोस्टाचे स्टॅम्प्स, तिकिटं आणि वृत्तपत्राची कात्रणं दिसतात. याशिवाय धूम्रपानाची पाईप, कंगवा यासारख्या फारशी खोली नसणाऱ्या गोष्टी दिसतात. जॉनचं हे प्रसिद्ध चित्र सध्या न्यूयॉर्कमधल्या मेट्रोपॉलिटन कलासंग्रहालयात आहे.

१८९३ च्या दरम्यान मात्र जॉनची दृष्टी अधू झाली. त्याला चित्रातले सूक्ष्म तपशील दाखवणं कठीण जाऊ लागलं. यानंतर जॉननं आपाल्या नेहमीच्या शैलीतली चित्रं बंद केलं.
जॉनची द्विमितीय गोष्टींची हुबेहूब दिसणारी चित्रं आजही लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या प्रती आजही विकल्या जातात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:
Indianapolis Museum of Art / Public domain

No comments:

Post a Comment