Sunday, August 30, 2020

गजासुरसंहार

मुशाफिरी कलाविश्वातली

गजासुरसंहार

महिषासुराच्या मुलाची एक कथा पुराणात येते. या मुलाचं नाव होतं गजासुर. त्याचं डोकं हत्तीचं होतं. आपल्या पित्याच्या हत्येचा (दुर्गादेवीनं केलेल्या महिषासुराच्या हत्येचा) बदला त्याला घ्यावयाचा होता.

अपार शक्ती मिळवण्यासाठी हिमालयात जाऊन गजासुरानं कठोर तपस्या सुरु केली. हात उंचावत, पायाच्या तळव्याच्या पुढच्या भागावर उभं राहून आकाशाकडं पाहत त्याची तपस्या दीर्घ काळापर्यंत चालू राहिली. त्याची तपस्या ब्रह्मदेवासाठी चालू होती. त्याची तपस्या इतकी प्रखर होती की त्याच्या केसांमधून अग्निज्वाळा बाहेर पडू लागल्या. हा अग्नी पृथ्वीवर आणि पृथ्वीबाहेर सर्वत्र पसरू लागला. पृथ्वीवरच्या लोकांना या अग्नीच्या झळा बसू लागल्या. या ज्वाला स्वर्गातही जाऊन पोहोचल्या !! स्वर्गातले देव मग ब्रह्माकडं गेले. गजासुराची तपस्या थांबवली नाही तर एक दिवस पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ जळून खाक होतील अशी भीती या देवांना वाटत होती.

शेवटी गजासुराची तपस्या थांबवण्यासाठी ब्रह्मदेव त्याच्याकडं गेले. गजासुराची तपस्या थांबवत त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितलं. कामविकारांनी ग्रस्त असणाऱ्या स्त्री-पुरुषांकडून आपल्याला काहीच त्रास व्हायला नको असं गजासुरानं सांगितलं. तसंच देवांकडून आपण पराभूत व्हायला नको अशीही मागणी त्यानं केली. खऱ्याखुऱ्या जितेंद्रिय (इंद्रियांवर विजय मिळवणारा) असणाऱ्या एखाद्याकडून मात्र त्याला मृत्यू येणं शक्य होतं. ब्रह्मदेवानं त्याला वरदान देऊन टाकलं.  

गजासुर आता चांगलाच शक्तिशाली झाला. त्रैलोक्यावर त्यानं विजय मिळवला. मनुष्यलोक, देवलोक, आसुर, यक्ष, नागलोक, गंधर्व सर्वांवरच आता गजासुराचं राज्य सुरु झालं. गजासुराला प्रचंड वैभव, ऐश्वर्य मिळालं. पण त्याची हावदेखील वाढतच राहिली.

शास्त्रग्रंथांमध्ये काय लिहिलंय त्याकडं गजासुरानं दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्रैलोक्यावर असणाऱ्या आपल्या सत्तेची त्याला नशा चढली. आता तो दुष्ट बनु लागला. माणसांचा, ऋषीमुनींचा, देवांचा विनाकारण छळ करण्यास त्यानं सुरुवात केली.

एके दिवशी गजासुर काशीला गेला. काशीत त्यानं हाहाकार माजवला. त्याच्या पावलांनी काशीची जमीन हादरत होती. तिथल्या लोकांना त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली. काशीतले शिवभक्त भयभीत होऊन गेले. ही गोष्ट समजल्यावर शिव काशीला गेले.

शंकराला त्रिशूल घेऊन येताना पाहून गजासुराला पुढची सारी कल्पना आली. पुढचे काही दिवस गजासुर आणि शंकर यांच्या घनघोर युद्ध झालं. शंकरानं आपलं त्रिशूल गजासुराच्या शरीरात घुसवलं.

शरीरात त्रिशूल घुसल्यानंतर गजासुराला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. शंकराच्या दिव्यत्वाची त्याला जाणीव झाली. त्यानं मनापासून शंकराची स्तुती केली. त्याचं बोलणं ऐकून शंकर प्रसन्न झाला. त्यानं गजासुराला काही वरदान हवं असल्यास मागायला सांगितलं.

आपल्या अंगावर असणारी हत्तीची चामडी शंकराच्या त्रिशुळामुळं पवित्र झाल्याचं त्यानं सांगितलं. ही चामडी खास असल्याचं त्यानं सांगितलं, कारण कठोर तपस्येच्या काळात इतक्या अग्निज्वाळा बाहेर पडत असतानाही या चामडीला काही झालं नव्हतं. त्यानं ही चामडी शंकराला परिधान करायला सांगितली. शंकरानं ही चामडी परिधान केल्यावर गजासुरानं प्राण सोडले.

एका कथेप्रमाणं शंकरानं गणपतीसाठी वापरलेलं मस्तक हे गजासुराचंच होतं. गजासुराच्या अजूनही वेगवेगळ्या कथा पुराणांत येतात. एका पुराणकथेप्रमाणं शंकराला प्रसन्न करून गजासुर आपल्या पोटात (शंकरानं) राहण्याचा वर मागतो. शंकर पोटात गेल्यानंतर विष्णू एक युक्ती करत शंकराची गजासुराच्या पोटातून मुक्ती करतो. दुसऱ्या एका कथेप्रमाणं देवदार वृक्षांच्या वनात शंकराला मारण्यासाठी काही लोक काळी जादू वापरत गजासुराची निर्मिती करतात.


सोबतच्या चित्रात आपल्याला कर्नाटकातल्या हळेबिडू इथल्या मंदिरातल्या भिंतीवरचं एक कोरीव काम दिसतंय. शंकराचं हे मंदिर बाराव्या शतकातलं आहे. होयसळा साम्राज्याच्या विष्णूवर्धन नावाच्या राजानं हे मंदिर बांधलं.

भिंतीवर अतिशय बारीक कलाकुसर असणारं कोरीव काम दिसतंय. त्यात डावीकडं आपल्याला शंकरानं गजासुराची हत्या केलेली दिसत आहे. मधल्या कोरीव कामामध्ये श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलत सर्वांचं रक्षण करत असल्याचं दृश्य दिसतंय. शिल्पांमध्ये शंकराचे बहुतेकवेळा हातच दाखवले जातात. पण युद्ध करत असल्याचं दाखवताना मात्र शंकराला किंवा हात दाखवण्यात येतात. कोरीव कामात शंकराच्या बाजूला नंदीही दिसतो. शंकरानं नृत्य करत एक पाय गजासुराच्या डोक्यावर ठेवल्याचं दिसतं. शंकराच्या हातांमधले त्रिशूल आणि डमरू ठळकपणे दिसतात. शंकराच्या प्रतिमेत एक प्रकारची गतिमानता दिसून येते .

ह्या कोरीवकामात कलाकार जिवंतपणा आणण्यात नक्कीच यशस्वी झालाय !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#माझीशाळामाझीभाषा

#कारागिरी

 संदर्भ:

https://glorioushinduism.com/2018/11/02/gajasura/

https://en.wikipedia.org/wiki/Gajasurasamhara

https://www.speakingtree.in/blog/shiva-and-gajasura

http://www.harekrsna.com/philosophy/associates/demons/siva/gajasura.htm

http://blog.onlineprasad.com/stories-of-shiva-purana-lord-shiva-kills-gajasura/

Image Credit:

https://commons.wikimedia.org/wiki/File:The_temple_walls_Halebid.jpg

Gopal Venkatesan / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/2.0)

No comments:

Post a Comment