Tuesday, May 7, 2019

आशेची कांती

मुशाफिरी कलाविश्वातली
आशेची कांती

म्हैसूरचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे जगमोहन पॅलेस. एके काळी 'वाडियार' राजघराण्यातल्या लोकांचा हा राजवाडा होता. आता त्याचं रूपांतर कलादालनात (art gallery) झालंय. या कलादालनाला भेट देण्यासाठी कित्येक पर्यटक/कलारसिक नेहमी इथं येत असतात.

या कलादालनाच्या दुसऱ्या मजल्यावर एक खास कलाकृती आहे. दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी प्रकाशयोजना मुद्दामच मंद ठेवण्यात आली आहे. या काहीशा अंधारमय ठिकाणी आपल्याला एक महान चित्रकृती पहायला मिळते. चित्रावर एक पातळसा पारदर्शक पडदा आहे. या पडद्यातून आपल्याला चित्रामधली स्त्री पितळेची समई घेऊन उभी दिसते. अंधारमय वातावरणात ही समई, त्यातून बाहेर पडणारा प्रकाश हे सगळं खरंखुरं भासायला लागतं. पडदा बाजूला केला तर चित्रातल्या स्त्रीनं नेसलेल्या साडीवरच्या गुलाबी, जांभळ्या छटा अजूनच स्पष्ट दिसायला लागतात.

या चित्रात आपल्याला एक भारतीय स्त्री दिसते. तिनं एका हातात पितळेची समई धरली आहे तर तिनं दुसरा हात (वाऱ्यानं दिव्याची ज्योत विझू नये म्हणून) दिव्याभोवती धरलाय. या स्त्रीनं साधीच अशी पारंपारिक भारतीय साडी नेसलीये. या दिव्याचा तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडलाय तर मागच्या भिंतीवर तिची सावली पडली आहे. 
  


या चित्राचं नाव आहे 'आशेची कांती' (glow of hope). भारतीय चित्रांपैकी जगभर ख्याती असणाऱ्या चित्रांपैकी हे एक. साधेपणा, मृदू रंग, संवेदनशीलता, बोटांमधून पडणारा प्रकाश या साऱ्यामुळं ही चित्र एक महान कलाकृती बनली आहे.

हे चित्र आहे 'सावळाराम हळदणकर' यांचं. हळदणकर मूळचे सावंतवाडीचे. लहानपणीच त्यांची चित्रकलेतली प्रतिभा शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ध्यानी आली. त्याकाळच्या तिथल्या राजाकडं त्यांनी हळदणकरांच्या प्रतिभेविषयी सांगितलं. राजाच्या पाठिंब्यानं सावळारामचं पुढं मुंबईच्या 'सर जे जे स्कूल आॅफ अार्ट्समध्ये' शिक्षण झालं. पुढं हळदणकर भारतातले एक प्रसिध्द चित्रकार बनले.

हे चित्र १९४०च्या दशकातलं. १९४५/४६ च्या दरम्यान दिपावलीच्या सणाचे दिवस चालू होते. हळदणकरांची तृतीय कन्या 'गीता' एका हातात समई घेऊन दुसरा हात ज्योतीभोवती धरून बाहेर येत होती. बाहेर येताना तिला वडिलांनी पाहिलं आणि त्यांच्या चित्रकार मनात एक कल्पना चमकून गेली. समईचा प्रकाश, आजूबाजूचा अंधार, प्रकाशानं उजळलेला चेहरा आणि तळव्यांना झाकली जाणारी ज्योत यामुळं एक सुंदर चित्र बनू शकणार होतं आणि हळदणकरांच्या कलाकार मनानं ते पटकन टिपलं !!

हळदणकरांनी हे चित्र काढण्यासाठी तैलरंगाऐवजी जलरंगाचं माध्यम वापरायचं ठरवलं. तैलरंग वापरून काढलेल्या चित्रात बदल करणं सहज शक्य असतं. जलरंगात मात्र असं नसतं. यामुळं जलरंगात चित्र काढणं आव्हानात्मक होतं. एकही चूक केल्याशिवाय हे चित्र पूर्ण करून हळदणकरांना जगाला दाखवून द्यायचं होतं. हळदणकर हे चित्र काढत असताना गीता तीन तास हातात समई घेऊन उभी होती !! आणि मग या कलाकृतीची निर्मिती झाली.

म्हैसूरला त्याकाळात 'दसऱ्याचे खास कार्यक्रम' असायचे. चित्र काढल्यानंतर दोन वर्षांनी म्हैसूरच्या राजानं दसऱ्यानिमित्त भरवलेल्या (स्पर्धा असणाऱ्या) प्रदर्शनामध्ये हे चित्र पाठवण्यात आलं. ह्या चित्रानं स्पर्धेत पहिलं पारितोषिक पटकावलं !! कालांतरानं म्हैसूरच्या राजानं हे चित्र खरेदी केलं आणि हे चित्र म्हैसूरच्या राजवाड्यात आणण्यात आलं. नंतर हे चित्र कलादालनात हलवण्यात आलं.

म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधल्या 'जयचमराजेंद्र' कलादालनामधलं हे चित्र गेली ६५ वर्षं तिथल्या कलादालनातलं प्रमुख आकर्षण आहे !!
    
- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा 
#कारागिरी

संदर्भ: 

🍀 https://www.kokuyocamlin.com/blog/the-real-story-behind-the-glow-of-hope-a-painting-by-s-l-haldankar.html

🍀 https://en.m.wikipedia.org/wiki/Glow_of_Hope?wprov=sfla1

🍀 https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/how-a-woman-with-a-lamp-turned-a-plain-canvas-into-a-masterpiece/articleshow/50033938.cms

No comments:

Post a Comment