मुशाफिरी कलाविश्वातली
मातृदेवता देवीश्री
'जावा' हे इंडोनेशिया देशातलं एक बेट. इंडोनेशियामधले जवळपास ६५% लोक हे जावामधले आहेत. या जावामध्ये चौथ्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत हिंदू/बौद्ध धर्माचं प्राबल्य होतं. इथं हिंदू धर्माचं आगमन झाल्यानंतर स्थानिक संस्कृतीमधल्या देवता आणि त्यांच्याशी मिळत्याजुळत्या असणाऱ्या हिंदु धर्मातल्या देवता यांचा संगम झालेल्या देवता दिसू लागल्या. यातलीच एक देवी म्हणजे देवीश्री. (ही देवी हिंदू धर्मातल्या लक्ष्मीसारखी अाहे.
जावामधल्या एका पुराणकथेप्रमाणं स्वर्गामध्ये एकदा 'महादेव बटारा गुरु' यांनी एकदा नवीन महाल बांधायचं ठरवलं. स्वर्गातल्या साऱ्या देवीदेवतांना त्यांनी आपापल्या शक्ती वापरत महाल बांधण्यात योगदान करायला सांगितलं. जो कुणी (किंवा जी कुणी) ही आज्ञा पाळणार नाही त्याचं/ तिचं डोकं उडवलं जाणार होतं!
सर्व देवी,देवता कामाला लागले. पण या देवतांपैकी एकाला मात्र प्रश्न पडला होता. या देवाचं नाव होतं 'अंता'. या अंताला हात आणि पाय नव्हते. तो नागदेवता होता.. महादेवाच्या महालात आपण कसं योगदान द्यायचं हे त्याला कळत नव्हतं. त्यानं महादेव बटारा गुरु यांचे धाकटे बंधू बटारा नारद यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण बटारा नारद अंताच्या दुर्दैवानं गोंधळात पडले.
अंता हताश होऊन रडायला लागला. त्याचे अश्रू जमिनीवर पडले. आणि या तीन अश्रूंची ३ अंडी बनली !! ही तीन अंडी मोत्यांसारखी चमकत होती. बटारा नारद यांनी त्याला ती अंडी घेऊन बटारा गुरुकडं जाण्याचा सल्ला दिला. यामुळं अंतावर अन्याय होणं टळलं असतं.
तिन्ही अंडी तोंडामध्येच धरून अंता बटारा गुरुंकडं चालू लागला. तो चालत असताना वाटेत त्याला एक गरुड भेटला. गरुडानं अंताला एक प्रश्न विचारला. पण अंता उत्तरच देऊ शकणार नव्हता कारण त्याच्या तोंडात ३ अंडी होती. पण अंता काहीच बोलत नसल्यानं गरुडाला राग आला. गरुडाला अंता उद्धट वाटला. त्यानं अंतावर हल्ला केला. अंताच्या तोंडातून एक अंडं पडलं !! अंता पटकन झुडुपांमध्ये लपण्यासाठी गेला. पण दुर्दैवानं तिथं तो गरुड तिथं टपूनच बसला होता. अंताच्या तोंडातून दुसरं अंडं पडलं. आता अंताकडं एकाच अंडं शिल्लक राहिलं. ते अंडं नीट सांभाळत अंता बटारा गुरुंकडं निघाला.
शेवटी अंता बटारा गुरुंकडं पोहोचला. बटारा गुरूंना त्यानं अंड्याच्या रुपातला आपला अश्रू दिला. बटारा गुरूंनी तो स्वीकारला. त्यांनी अंताला ते अंडं एखाद्या घरट्यात ठेवायला सांगितलं. अंता ते अंडं घेऊन परत निघून गेला. काही दिवसांनी चमत्कार होऊन त्या अंड्यातून एक गोंडस कन्यारत्न बाहेर आलं !! अंतानं ती कन्या बटारा गुरूंना आणि त्यांच्या पत्नीला दिली.
या कन्येचं नाव 'न्याई पोहाची' असं ठेवण्यात आलं. ही कन्या वाढत्या वयासोबत अधिकाधिक रूपवान होत गेली. तिच्या अलौकिक सौंदर्यानं तिला पाहणारा प्रत्येक पुरुष तिच्याकडं आकर्षित व्हायचा. यामुळं स्वर्गातल्या देवतांची आपापसात वैर होण्याची शक्यता झाली.!! नंतर तर बटारा गुरु स्वत:च तिच्याकडं नकळत आकर्षित व्हायला लागले.
User:Davenbelle aka User:Moby Dick aka Jack Merridew [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:DewiSri.jpg
आता मात्र सारे देव चिंतेत पडले. जे काय चाललंय ते त्यांना चांगलं कळत होता. त्यांना स्वर्गामध्ये शांतीही राखायची होती आणि कन्येचं असणारं चांगलं नावही सुरक्षित ठेवायचं होतं. शेवटी त्यांनी एक कट रचला- त्यांनी तिला विष देऊन ठार केलं आणि पृथ्वीवर आणून कुठंतरी पुरलं !!
Gunawan Kartapranata [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Dewi_Sri_Java_Bronze.jpg
तिच्या निरागसपणात एक प्रकारची दैवी शक्ती होती. तिला पृथ्वीवर जिथं पुरलं होतं त्या ठिकाणी एक चमत्कार दिसून यायला लागला. मानवजातीला सदैव उपयोगी पडणाऱ्या वनस्पती तिला पुरलं होतं त्या ठिकाणी उगवायला लागल्या. तिच्या डोक्यातून नारळाचं झाड उगवलं. तिचे नाक, ओठ आणि कान यातून वेगवेगळ्या पालेभाज्या आणि मसाले यांच्या वनस्पती उगवल्या. केसांमधून वेगवेगळी फुलांची झाडं, गवत तर छातीतून फळं देणारी झाडं उगवली. तिच्या हातांमधून सागवान आणि इतर वृक्ष उगवले. पायांमधून बांबू आणि अन्नसाठा करणाऱ्या (बटाटे, रताळे यासारख्या) वनस्पती उगवल्या. तिच्या बेंबीमधून भाताचं रोपटं उगवलं. (काही इतर कथांप्रमाणं तिच्या एका डोळ्यांमधून पांढऱ्या भाताचं तर दुसऱ्या डोळ्यांधून तांबड्या भाताचं रोपटं उगवलं.
Tropenmuseum, part of the National Museum of World Cultures [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:COLLECTIE_TROPENMUSEUM_Beeld_van_Dewi_Sri_de_rijstgodin_TMnr_60016918.jpg
Tropenmuseum, part of the National Museum of World Cultures [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:COLLECTIE_TROPENMUSEUM_Pop_van_gevlochten_lontarblad_voorstellende_de_rijstgodin_Dewi_Sri_TMnr_1100-20.jpg
The original uploader was Sumbuddi at English Wikipedia. [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Indonesia_1952_10r_o.jpg
मानवजातीला उपयोगी पडणाऱ्या साऱ्या वनस्पती तिच्या मृतदेहापासून आल्याचं मानलं जातं !! पुराणकाळापासून तिला भाताची देवता आणि जननदेवता (Goddess of fertility) मानलं जातं. प्राचीन काळी तिला सर्वश्रेष्ठ देवी मानलं जायचं. जन्म, जीवन आणि धान्य यांची ती देवता आहे. हीच देवी 'देवीश्री' या नावानंही ओळखली जाते.
शिल्पकलेत तिला दाखवताना तरुण, नाजूक आणि सुंदर दाखवलं जातं. तिला दागदागिण्यांसहित शुभ्र, पीत किंवा हरित रंगाची वस्त्रं परिधान केल्याचं दाखवलं जातं. तिच्या हातात भाताची फांदी दाखवली जाते. गौर वर्ण, अर्धोन्मीलित नयन आणि चेहऱ्यावर एक प्रकारची शांती ही तिच्या मूर्तींमध्ये नेहमीच दिसून येते. बाली देशातले लोक काही विधींमध्ये नारळाच्या (किंवा इतर पाम वृक्षाच्या) कोवळ्या पानांपासून, तांदळाच्या पिठापासून तिची प्रतिमा करतात. तिथल्या बऱ्याचशा विधींमध्ये देवीची पूजा केली जाते.
भाताची देवता असल्यानं भाताच्या शेतात आढळणाऱ्या सापाशीही हीच संबंध जोडला जातो. जावामधल्या ग्रामीण भागात आजही तिथल्या परंपरेप्रमाणं घरी साप आला तर त्याला हुसकावून न लावता त्याला एक प्रकारचा नैवेद्य दाखवतात. घरी साप येणं हा तिथं चांगलं पीक येण्यासाठी शुभशकुन मानला जातो.
आजही तिथल्या भाषेत भाततोडणीच्या कार्यक्रमाला 'मपागश्री' म्हणतात. या शब्दाचा अर्थ , 'देवीश्रीला बोलावणं किंवा आवाहन करणं' असा होतो !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
🔘 https://en.m.wikipedia.org/wiki/Dewi_Sri?wprov=sfla1
🔘 https://broomcloset.wordpress.com/2013/04/03/dewi-sri-the-indonesian-rice-goddess/
🔘 https://mirrorofisis.freeyellow.com/id573.html
No comments:
Post a Comment