Tuesday, May 28, 2019

मोनालिसेचं अपहरण

मुशाफिरी कलाविश्वातली

मोनालिसेचं अपहरण

१९११ चं साल होतं. या काळात पॅरिसमध्ये एक भुरटा चोर राहायचा. त्याचं नाव होतं पेरुज्जीओ. हा पेरुज्जिओ त्यावेळी जेमतेम ३० वर्षांचा होता. पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध 'लुव्र म्युझियम'मध्ये तो काम करायचा. चित्रांसमोर संरक्षक काच बसवण्याचं त्याचं काम होतं.

एके दिवशी त्यानं या म्युझियममधलं एक चित्र चोरण्याचा बेत आखला. खरंतर तो भुरटा चोर होता पण एखादं चांगलं चित्र चोरून नेलं तर आपलं आयुष्य मालामाल बनून जाईल असं त्याला वाटत होतं. एखादं चित्र पळवून न्यायचं आणि काही दिवसांनी गुपचूपपणे ते एखाद्या रसिक कलासंग्राहकाला मोठ्या किंमतीला विकायचं असं त्याच्या डोक्यात होतं.

चोरी करण्यासाठी त्यानं चित्र निवडलं ते 'लिओनार्दो दा विंची'चं 'मोनालिसा' !! हे चित्र त्याकाळात बहुतेक सर्वांना माहित होतं पण ते आजच्यासारखं तेंव्हा जगप्रसिद्ध नव्हतं. पेरुज्जिओ भुरटा चोर होता आणि एखादं जगप्रसिद्ध चित्र चोरण्याचा विचार करण्याची त्याची झेप नव्हती.

एके रात्री पेरुज्जिओ लुव्र म्युझियममध्येच झोपला. त्यानं मोनालिसाचं चित्र भिंतीवरून काढून घेतलं. आणि तो लपून बसला. सकाळी कर्मचाऱ्यांनी म्युझियम उघडल्यानंतर हे चित्र कोटसारख्या कपड्यामध्ये गुंडाळून तो पसार झाला. तो तिथं काम करणाऱ्या लोकांपैकीच एक वाटत असल्यानं तो काहीतरी घेऊन चाललाय हे कुणाच्या लक्षातच आलं नाही.


Image URL: https://commons.wikimedia.org/wiki/File:Mona_Lisa,_by_Leonardo_da_Vinci,_from_C2RMF_retouched.jpg

या काळात मोनालिसाला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली नव्हती. खरंतर चोरी झालेल्या दिवशी मोनालिसा गायब झाल्याचं कुणाच्या लक्षातच आलं नाही !!  दुसऱ्या दिवशी स्थिर चित्रं काढणारा एक सामान्य कलाकार कलासंग्रहालयात गेलेला असताना त्याला मोनालिसाचं चित्र गायब झालेलं दिसलं. त्याचं असं झालं की त्याला कलासंग्रहालयात थांबून चित्र काढायचं होतं आणि जोपर्यंत मोनालिसाचं चित्र पाहत नाही तोपर्यंत त्याचा चित्र काढण्याचा मूड बनत नव्हता !! त्यामुळं मोनालिसाचं चित्र जागेवर नसल्यानं तो अस्वस्थ झाला. पण मोनालिसाचं चित्रं चोरीला गेलं असावं असा संशय मात्र अजूनही कुणाला येत नव्हता. याचं कारण म्हणजे तिथं कलासंग्रहालयात एक काम चाललं होतं - साऱ्या कलाकृतींची छायाचित्रं काढण्याचं.. त्या काळात छायाचित्रणाचं तंत्रज्ञान इतकं प्रगत नसल्यानं छायाचित्रं काढण्यासाठी कलाकृती सूर्यप्रकाशात न्यावी लागे. त्यामुळं मोनालिसाच्या वाट पाहणाऱ्या कलाकाराला वाटलं की मोनालिसाचं चित्र छायाचित्रणासाठी वर छतावर सूर्यप्रकाशात नेलं असावं. त्यानं मोनालिसा किती वेळात परत येईल ह्याचा अंदाज घेण्यासाठी छायाचित्रणाच्या ठिकाणी (छतावर) जाणाऱ्या कर्मचाऱ्याला माहिती घेण्यासाठी सांगितलं. थोड्या वेळानं तो कर्मचारी परत आला. त्यानं सांगितलं की मोनालिसा छायाचित्रणाच्या ठिकाणी नव्हतीच !!

मोनालिसा जगप्रसिद्ध व्हायला इथंच सुरुवात झाली !!

कलासंग्रहालयवाल्यांनी मोनालिसा चोरीला गेल्याचं जाहीर केल्यावर अक्षरश: जगभरच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर मोनालिसा झळकली !! ‘चोरी झालेल्या मोनालिसाला शोधण्यासाठी ६० डिटेक्टिव्ह लोकांचा तपास सुरु’ अशा मथळ्याची न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बातमी आली !! एखादा राष्ट्रीय पातळीवर घोटाळा झाल्यासारखं ह्या बातमीला फ्रान्समध्ये महत्व मिळू लागलं.

अमेरिकेमधले गडगंज संपत्ती असणारे लोक फ्रान्सचा पारंपारिक असणारा ठेवा (चित्रं) अवैधरित्या विकत घेत होते अशा अर्थाच्या बातम्या पसरू लागल्या. अमेरिकन उद्योगपती 'जे पी मॉर्गन' यांच्यावरही संशय घेण्यात आला. महान कलाकार 'पाब्लो पिकासो' हा देखील फ्रेंच पोलिसांच्या संशयातून सुटला नाही.

कलासंग्रहालय जवळपास एक आठवडाभर बंदच होते. ते उघडल्यावर लोक मोनालिसाच्या चित्राची रिकामी झालेली जागा पाहण्यासाठी गर्दी करू लागले !! ही रिकामी जागा साऱ्या फ्रेंच लोकांना देशासाठी लज्जास्पद बाब वाटत होती !!

आपण चोरलेल्या चित्रामुळं इतकं महाभारत घडेल असं त्या पेरूज्जिओला अजिबातच वाटलं नव्हतं.. त्यानं काही काळ ते चित्र लपवूनच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानं पेटीच्या तळाशी ते चित्र लपवून ठेवलं !! पोलीस त्याला शोधत शोधत त्याच्या घरी आले. पण चोरी झालेल्या दिवशी आपण वेगळ्याच ठिकाणी होतो हे सिद्ध करणं त्याला अगदीच सोपं गेलं !! मोनालिसाच्या चित्रासाठी वर्तमानपत्रांनी मोठमोठी बक्षिसं जाहीर केली. पण आपण पकडले जाऊ या भीतीनं पेरूज्जिओ पुढं आलाच नाही !! याकाळात आपल्या वडिलांना लिहिलेल्या एका पत्रात त्यानं आपलं नशीब उजळणार असून आपण मालामाल होणार असल्याचं लिहिलं होतं..

जवळपास सव्वादोन वर्षांनी पेरूज्जिओ पेटीमध्ये मोनालिसाचं चित्र ठेवून इटलीला परत आला. तिथल्या 'फ्लोरेन्स' नावाच्या शहरात तो एका कलाकृतींच्या व्यापाऱ्याला तो भेटला. पेरूज्जिओनं त्याला मोनालिसाच्या मूळ कलाकृती दाखविली. व्यापाऱ्यानं शहानिशा करून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला बोलावलं. पेरूज्जिओला भरमसाठ रक्कम देण्याचं त्यानं मान्य केलं होतं. पेरूज्जिओ मोठ्या समाधानानं घरी गेला. थोड्याच वेळात पेरूज्जिओच्या घराची बेल वाजली. पण दार उघडताच त्याला समोर पोलीस दिसले !!!

लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पेरुज्जिओनं एक शक्कल लढवली. मोनालिसाचं चित्रं मुळचं इटालियन असून ते फ्रान्समध्ये नव्हे तर इटलीमध्ये असायला हवं, ह्या देशप्रेमाच्या उद्देशानं ते चित्रं त्यानं इटलीमध्ये आणल्याचं तो आता सांगू लागला ! त्याला वाटत होतं की तो अशा वक्तव्यामुळं इटलीमध्ये हिरो बनेल !
पण असं काही झालं नाही, पेरूज्जिओला ८ महिन्यांचा तुरुंगवास झाला !

नंतर मोनालिसाला फ्रान्समध्ये परत देण्यात आलं !! मोनालिसा पुन्हा एकदा लुव्र कलासंग्रहालायात आली..
काही दिवसातच पहिल्या महायुद्धाचे ढग जमू लागले आणि मोनालिसाच्या बातम्या वृत्तपत्रात येणं बंद झालं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍀 https://www.npr.org/2011/07/30/138800110/the-theft-that-made-the-mona-lisa-a-masterpiece
🍀 https://www.historytoday.com/archive/months-past/mona-lisa-stolen-louvre
🍀 https://edition.cnn.com/2013/11/18/world/europe/mona-lisa-the-theft/index.html
🍀 https://en.wikipedia.org/wiki/Vincenzo_Peruggia
🍀 https://allthatsinteresting.com/vincenzo-peruggia-mona-lisa-theft

No comments:

Post a Comment