Sunday, July 21, 2019

जखमी देवदूत

मुशाफिरी कलाविश्वातली

जखमी देवदूत

फिनलंडचा चित्रकार 'ह्युगो सिम्बर्ग' याचं एक चित्र त्या देशात प्रचंड लोकप्रिय आहे. ह्या चित्राचं नाव आहे 'जखमी देवदूत' (The Wounded Angel). २००६ मध्ये तिथल्या एका कलासंग्रहालयानं आयोजित केलेल्या लोकमत चाचणीत हे चित्र सर्वात जास्त लोकप्रिय ठरलं होतं !!   

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी युरोपमध्ये कलाक्षेत्रात एक चळवळ सुरु झाली होती - 'सिम्बॉलिझम'. या चळवळीची एक खासियत म्हणजे यामध्ये कलाकार आपल्या कलाकृतींमध्ये बरीच प्रतीकं वापरायचे. फिनलंडमध्ये ह्युगो सिम्बर्गनं सिम्बॉलिझम चळवळ आणली. त्यानं या चळवळीची तत्त्वे वापरत 'सिम्बॉलिझम' प्रकारात मोडणारी चित्रं काढली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यानं युरोपमधल्या कलाक्षेत्रात ज्या चळवळी सुरु होत्या त्यांचे प्रयोग करतही चित्रं काढण्याचा प्रयत्न केला.

सोबत दिलेल्या चित्रात ह्युगोनं देवदूताच्या रूपात एका मुलीला दाखवलंय. तिच्या पंखांमधून रक्त येताना दिसतंय. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलीये. तिनं मोठ्या कष्टानं स्ट्रेचरला पकडलेलं दिसतंय. एका असहाय अवस्थेत ही देवदूताच्या रूपातील मुलगी दिसतीये. दोन निरोगी, सुदृड मुलं तिला स्ट्रेचरवरून घेऊन जाताना दिसत आहेत. ह्या चित्रात पार्श्वभूमीला आपल्याला जे काही दिसतंय ते दृश्य आहे एलेनतारा पार्कमधलं. ही पार्क आजही फिनलँडमधल्या हेलसिंकी ह्या शहरात आहे. आणि आज जवळपास सव्वाशे वर्षांनंतरही तिथलं दृश्य तसंच आहे. त्या काळात ह्या पार्कमध्ये (आणि आजूबाजूला) अनेक धर्मादायी संस्था होत्या. चित्रामध्ये मुलं त्या देवदूत मुलीला अंध मुलींच्या शाळेत किंवा अपंग मुलांच्या आश्रमात घेऊन जाताना दिसत आहेत. तिच्या हातात एक प्रकारची विशिष्ट फुलं आहेत. ही फुलं आजारातून बरं होण्याचं किंवा पुनर्जन्माचं प्रतीक म्हणून ओळखली जातात.

चित्रकाराला ह्या चित्रातून काय दाखवायचं असावं? ह्या चित्रात असं काय दाखवलंय की हे चित्र फिनलँडच्या लोकांना सर्वात जास्त आवडावं ? हे चित्र काढताना चित्रकार एका गंभीर आजारातून जात होता. त्याला झालेल्या आजाराचं नाव होतं 'मेनिन्जायटीस'. ह्या आजारात रुग्णाला मान हलवायला/वळवायला त्रास होतो. रुग्ण निरुत्साही होतो. रुग्णाला प्रकाश सहन होत नाही - तो प्रकाशाला खूप संवेदनशील बनतो. आपण ह्या चित्रातल्या देवदूत मुलीला पाहिलं तर आपल्याला तिच्यात ही तिन्ही लक्षणं दिसतात. चित्रातल्या देवदूताला पंखांना (wings) वरच्या बाजूला जखम झालेली दाखवली आहे. प्रत्यक्षात चित्रकाराला फुफुसांत (lungs) वरच्या बाजूला जखम झालेली होती. म्हणजे wings ऐवजी lungs असं आपण वाचलं तर आपल्याला जखमेचा उलगडा होतो.

चित्रकारानं ह्या चित्रासाठी बरेच कष्ट घेतले. त्यानं ह्या चित्रावर काम करायला सुरुवात केली होती १८९८ साली. त्याचं चित्र पूर्ण झालं १९०३ मध्ये. त्यानं चित्र काढण्यासाठी काढलेल्या रेखाटनांवरून आणि मॉडेल्सच्या काढलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट कळतं की ह्या चित्रासाठी त्यानं वेगवेगळ्या कल्पना वापरून पाहिल्या. उदा. सुरवातीला त्यानं देवदूत मुलीला छोटे सैतान एका ढकलगाडीतून ढकलताना दाखवलं होतं. त्यानं देवदूत मुलीच्या चित्रासाठी वेगवेगळे मॉडेल्स वापरून पाहिलं.

चित्रकाराचं हे चित्र प्रदर्शित झाल्यावर प्रचंड यशस्वी ठरलं. ह्या चित्रासाठी त्याला पारितोषिकही मिळालं. याकाळात आपली बहीण 'ब्लेंडा' हिला पाठवलेल्या एका पत्रात तो म्हणतो - "मला तुला एक चांगली बातमी सांगायची आहे - इथला परीक्षक अतिशय कडक असला तरी त्यानं ह्या वर्षी मला नाकारलं नाही आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या आणि परीक्षकांच्या नजरेतून माझ्या चित्राला प्रचंड यश मिळालाय असं दिसतंय."

कलेची दैवी देणगी असणाऱ्या कलाकाराला एखाद्या व्याधीनं असहाय्य केल्यावर कलाकाराला जो अनुभव येतो तो आपल्याला ह्या चित्रात प्रतीकरूपानं दिसतो.

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी


संदर्भ: 
◆https://www.dailyartmagazine.com/wounded-angel-by-hugo-simberg/
◆https://artsandculture.google.com/asset/the-wounded-angel/WAHm6ruBFNfnLw
◆https://celestialkitsune.wordpress.com/2009/02/28/the-wounded-angel-by-hugo-simberg/
◆https://fi.wikipedia.org/wiki/Haavoittunut_enkeli

◆◆Image Credit:
Hugo Simberg [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:The_Wound/File:The_Wounded_Angel_-_Hugo_Simberg.jpg



1 comment:

  1. खूप छान नवीन माहिती. धन्यवाद!

    ReplyDelete