मुशाफिरी कलाविश्वातली
दि ग्लिनर्स
बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये एक प्रकारचा विरोधाभास बघायला मिळतो. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे, कशाचीच कमतरता नसणारे विलासी जीवन जगणारे श्रीमंत लोक तर दुसऱ्या बाजूला अगदी नगण्य पैशांसाठी प्रचंड राबणारे, जगण्यासाठी संघर्ष करणारे गरीब लोक. हा टोकाचा विरोधाभास, आर्थिक विषमता ही आजची गोष्ट नाही आणि एखाद्या देशापुरती मर्यादित असणारी ही गोष्ट नाही !!
या आर्थिक विषमतेवर, सामाजिक विषमतेवर आजपर्यंत कित्येक लोकांनी लिखाण केलंय.. पण आज आपण एका थोर चित्रकाराचं एक अजरामर झालेलं याच विषयावरचं चित्र बघणार आहोत. या चित्रकाराचं नाव होतं 'मिलेट'. हा चित्रकार फ्रेंच होता. तो एकोणिसाव्या शतकात होऊन गेला. त्यानं हे चित्र जवळपास एकशे त्रेसष्ट वर्षांपूर्वी काढलंय. या चित्राचं नाव आहे 'दि ग्लिनर्स'.
ग्लिनर्स कुणाला म्हणतात? चित्र बघितल्यावर आपल्याला (ह्या शब्दाचा खरा अर्थ माहित नसेल तर) वाटतं की 'ग्लिनर्स'चा अर्थ शेतामध्ये काम करणारे लोक. ग्लिनर्सचा अर्थ ह्यापेक्षा बराच वेगळा आहे. एखादा हंगाम संपल्यानंतर शेतातलं सारं धान्य मालकानं नेल्यानंतर शेतात उरलेले, मातीत पडलेले धान्याचे दाणे पोटापाण्यासाठी वेचून नेण्याचं काम करणारे लोक म्हणजे 'ग्लिनर्स'.
समाजातल्या विषमतेवर वाच्यता करणारं मास्टरपीस म्हणजे हे 'दि ग्लिनर्स' चित्र. या चित्रात चित्रकारानं चित्रात ठळकप्रकारे तीन ग्लिनर्स स्त्रिया दाखवल्या आहेत. त्यांच्या वाकून धान्यांचे दाणे शोधून वेचण्याच्या कामामुळं त्यांना होणाऱ्या शारीरिक कष्टाची जाणीव होते. याविरूद्ध चित्रात पार्श्वभूमीला शेतावर देखरेखीचं काम करणारा माणूस घोड्यावर जाताना दिसतो. एक एक धान्याचे दाणे शोधण्याचं ग्लिनर्स स्त्रियांचं काम चालू असताना मागं आपल्याला धान्याचे ढिगारे दिसतात. एका घोडागाडीतून खूप सारं धान्य नेलं जातानाही दिसतंय. ग्लिनर्स स्त्रियांची काळी सावली त्यांच्या बाजूलाच दिसते. याउलट पार्श्वभूमीला धान्यांच्या ढिगाऱ्यांवर प्रकाश पडलेला दिसतो. या ग्लिनर्सचे चेहरे दाखवणं चित्रकारानं टाळलंय. सामाजिक विषमतेवर भाष्य करण्याचं काम हे चित्र अतिशय परिणामकारकरित्या करतं. चित्रात अगदी मागच्या बाजूला एक अस्पष्ट खेडेगावही दिसतं.
चित्रकारानं हे चित्र पहिल्यांदा लोकांसमोर आणलं १८५७ मध्ये. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांना हे चित्र मुळीच आवडलं नाही. नुकतीच १८४८ मध्ये क्रांती घडून गेली होती. युरोपमध्ये क्रांतीचं वारं वाहत होतं. उच्चवर्गीय लोकांना ह्या चित्रात कष्टकरी गरीब लोकांचं चित्रण केल्याचं नजरेत भरत होतं. हे चित्र पाहताना त्यांना एक प्रकारची अस्वस्थता यायची. त्यामुळं या चित्राला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
या चित्राचा आकार मोठा होता '८४ सेमी X ११२ सेमी.' इतक्या मोठ्या आकाराचं गरिब लोकांच्या आयुष्याचं चित्रण करणारं चित्र आधी काढलं गेलं नव्हतं. खरंतर एवढ्या मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर बायबलमधली किंवा ग्रीक पुराणांतील चित्रं काढली जायची. खरंतर ग्लिनर्स हा विषय चित्रकलेसाठी नविन नव्हता. ग्लिनर्सची बायबलमध्ये सांगितलेल्याप्रमाणे चित्रं पूर्वी काढली गेली होती. पण ह्या चित्राचा आणि बायबलचा काहीच संबंध नव्हता.
प्रदर्शित केल्यानंतर चित्रकारानं काही दिवसांतच हे चित्र विकून टाकलं. आपल्या चित्राची किंमत त्यानं ४००० फ्रँक्स ठेवली होती. पण ह्या चित्राची किंमत त्याला ३००० फ्रँक्स इतकीच मिळाली. पैशांची खूप गरज असल्यानं तो कमी किंमतीत चित्र विकण्यास तयार झाला. चित्राला कमी किंमत मिळाल्याचं चित्रकारानं गुपितच ठेवलं. त्याच्या हयातीत ते चित्र फारसं प्रसिद्ध झालंच नाही.
१८७५ मध्ये चित्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर मात्र या चित्राची लोकप्रियता वाढत गेली. १८८८ मध्ये एका लिलावात हे चित्र तब्बल ३००००० फ्रँक्सना विकलं गेलं !! हे चित्र विकत घेणारी व्यक्ती मात्र निनावीच राहिली होती. चित्र खरेदी करणारा व्यक्ती कुणीतरी अमेरिकन असावा असा लोकांचा अंदाज होता. चित्र खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर (मृत्यूपत्राप्रमाणं) ते चित्र पॅरिसमधल्या विश्वविख्यात 'लुव्र' कलासंग्रहालयात देण्यात आलं. सध्या हे चित्र फ्रान्समधल्याच एक कलासंग्रहालयात आहे.
या चित्रानं मिलेटची सामाजिक विषमतेविषयीची संवेदनशीलता अधोरेखित झाली. त्याचं निरीक्षणही अफलातून होतं. या चित्राची प्रेरणा घेऊन नंतरच्या काळात 'The Gleaners and I' नावाचा एक चित्रपटही निघाला !
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
https://en.m.wikipedia.org/wiki/The_Gleaners
http://www.visual-arts-cork.com/paintings-analysis/gleaners-millet.htm
https://www.theartstory.org/artist-millet-jean-francois-artworks.htm
No comments:
Post a Comment