Monday, September 23, 2019

ट्रायल बाय ज्युरी


मुशाफिरी कलाविश्वातली

ट्रायल बाय ज्युरी

एडविन लँडसीअर हा एकोणिसाव्या शतकातला एक मोठा इंग्रज चित्रकार. प्राण्यांची चित्रं काढणं ही त्याची खासियत होती. प्राणी असणारी त्यानं काढलेली अनेक चित्रं जगविख्यात झाली. नैतिक, सामाजिक बाजू असणारे विषय चित्रकलेच्या माध्यमातून मांडणं हे त्याचं वेगळेपण होतं.

एडविनचे वडील कलाकार होते. एडविनमधले कलागुण त्यांनी लहानपणीच टिपले होते. लहान एडविन प्राण्यांची चित्रं सुरेख काढायचा. नंतर चित्रकलेचं शिक्षण घेताना त्यानं प्राण्यांच्या शरीराच्या रचनेचा सखोल अभ्यास केला. चित्रकलेतल्या कौशल्यामुळं त्याला लगेचच लोकप्रियता मिळत गेली.

त्यावेळची इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीचा एक लाडका कुत्रा होता - त्याचं नाव होतं डॅश. लहानपणापासून राणीला आपल्या वयाचा कुणीच मित्र नसल्यानं डॅश हाच तिचा सगळ्यात जवळचा मित्र होता !! ह्या डॅशचं एडविननं  चित्र काढलं. व्हिक्टोरिया राणीनं हे चित्र पाहिल्यावर तिला ते इतकं आवडलं की एडविन राणीचा एक आवडता चित्रकार बनला !

एडविनची बरीचशी कारकीर्द एकोणिसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली. एडविन लँडसीअरचं आपण आज जे चित्र पाहणार आहोत त्याला या काळाची आणि या काळातल्या कायदाव्यवस्थेची पार्श्वभूमी आहे. या काळातलं इंग्लंड बरंचंसं वेगळं होतं. या काळातल्या न्याय व्यवस्थेत बऱ्याच अडचणी होत्या. एक तर या काळात तिथं झपाट्यानं शहरीकरण होत चाललं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या काळात तिथलं पोलीसदलही बऱ्याच प्रमाणात वाढवण्यात आलं होतं. याचा परिणाम म्हणजे कोर्टात चालणाऱ्या केसेसची संख्या खूपच वाढली होती. या साऱ्यामुळं कोर्टातलं काम पूर्ण होण्याचा वेग खूपच मंदावला होता. याचा परिणाम सामान्य माणसांना भोगावा लागत होता. कोर्टातल्या केसेस दीर्घकाळपर्यंत चालत. कोर्टात केस चालवायची म्हणजे लोकांना खूप खर्च करावा लागे. दुसरी बाजूला वकीलमंडळी मात्र श्रीमंत होत चालली होती !! चार्ल्स डिकन्सच्या ब्लीक हाऊस नावाच्या कादंबरीत त्या काळातली अशा प्रकारच्या कोर्टाच्या अनुभवाचं वर्णन वाचायला मिळतं.

इंग्लंडमध्ये असा काळ चालू असताना एके दिवशी चित्रकाराच्या घरी जेवणासाठी त्यानं आपल्या एका न्यायाधीश असणाऱ्या मित्राला बोलावलं होतं. जेवण चालू असताना चित्रकाराचं (एडवीनचं) एक कुत्रं कोचवर मोठ्या ऐटीत बसलं होतं. या कुत्र्याच्या डोक्यावर न्यायमूर्तींच्या डोक्यावर असणाऱ्या विगसारखेच केस होते. ते कुत्रा पाहून तो न्यायाधीश गंमतीनं म्हणाला की ते कुत्रं कॅपिटल लॉर्ड चॅन्सेलर (कायद्यातील अधिकारी) होऊ शकलं असतं !! न्यायाधीश मित्रानं केलेल्या एका विनोदानं चित्रकाराच्या कलाकार मनाला साद घातली. बाहेर न्यायव्यवस्थेची अवस्था तर त्याला स्पष्टच दिसत होती. या साऱ्या परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करण्याची कल्पना त्याला खुणावत होती.

ह्या विषयावर पुढं काम करत चित्रकारानं सोबत दिलेलं चित्र काढलं. चित्रात दाखवलेलं मुख्य कुत्रं एका विशिष्ट जातीचं आहे. न्यायमूर्तींच्या डोक्यावर असणाऱ्या विगसारखे या कुत्राच्या डोक्यावर केस असतात. चेहऱ्यावर अतिशय गंभीर असे हावभाव आहेत. समोरच्या टेबलावरच्या पुस्तकाच्या एका पानावर त्याचा एक पाय आहे तर पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर त्याचा चष्मा आहे. लाल रंगाची खुर्ची आणि त्यावर असणारी मऊ गादी न्यायाधीशांच्या खुर्चीची आठवण करून देते. टेबलावर शाईची डबी, लेखणी, दस्तावेज या सारख्या कोर्टातल्या वस्तू दिसतात. कोर्टातला कारकून कुत्रा मागच्या बाजूला दिसतो. कोर्टातले वकील, इतर अधिकारी सारीच मंडळी आपल्याला या चित्रात वेगवेगळ्या कुत्र्याच्या जातींमध्ये पाहायला मिळतात !! या विविध जातींच्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दाखवण्यात चित्रकाराचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. कुणाच्या चेहऱ्यावर कंटाळलेले भाव तर कुणाला झोप आल्यासारखी वाटते. कुणी लक्ष देऊन ऐकत असल्यासारखं वाटतं तर कुणाचं लक्षच नाहीये असं वाटतं. कुत्र्याच्या चेहेऱ्यांवरच्या हावभावांमुळंच ह्या चित्र कोर्टातलं वातावरण जिवंत होतं !! न्याययंत्रणेतली सारी माणसं कुत्र्यांच्या रूपात दाखवणं ही कल्पना उपहास करण्यासाठी अफलातून होती !!



ह्या चित्राला नाव देण्यात आलं 'ट्रायल बाय ज्युरी'. हे चित्र १८४० मध्ये पूर्ण झालं. ते त्याच वर्षी लंडनमधल्या रॉयल अकॅडेमीमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. ते त्याच वर्षी विकलं गेलंन्यायव्यवस्थेवर उपहासात्मक भाष्य करताना मोठी कल्पकता वापरल्यानं हे चित्र खूप गाजलं. आजही हे चित्र लोकप्रिय आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🍁https://www.chatsworth.org/art-archives/devonshire-collection/paintings/laying-down-the-law/ 
🍁https://en.wikipedia.org/wiki/Laying_Down_the_Law 
🍁http://victorian-era.org/edwin-henry-landseer-biography.html
🍁https://victoria.fandom.com/wiki/Dash
🍁https://www.parliament.uk/about/living-heritage/transformingsociety/laworder/court/overview/judicialreform/ 
🍁Sir Edwin Henry Landseer, 1802-1873- by Ormond, Richard; Rishel, Joseph J; Hamlyn, Robin; Philadelphia Museum of Art; Tate Gallery


🍁Image details:
Edwin Henry Landseer [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Edwin_Landseer_Trial_By_Jury.jpg

No comments:

Post a Comment