मुशाफिरी कलाविश्वातली
पाऊस, वाफ आणि वेग
आपल्या समाजात सतत काहीतरी घटना घडत असतात.. काही चांगल्या तर काही वाईट, काही माणसांचं जीवन बदलून टाकणाऱ्या तर काही इतिहास रचणाऱ्या.. एका संवेदनशील कलाकाराला ह्या साऱ्या घटना दिसत असतात.. त्याच्या कलाकार मनाला त्या साद घालत असतात.. मग अशा घटनांचे प्रतिबिंब आपल्याला त्याच्या कलाकृतीमध्ये पाहायला मिळते.. सामाजिक गोष्टींविषयी संवेदनशीलता असणारा असाच एक जुन्या काळातला चित्रकार म्हणजे टर्नर. टर्नरचा काळ सर्वसाधारण दीड-दोनशे वर्षांपूर्वीचा.
या चित्रात टर्नरनं एक रेल्वे येताना दाखवलीय. चित्रांमधल्या दृश्यात पाऊस दाखवला असून चित्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला धूसर, अस्पष्ट दिसतात. चित्राचा मुख्य विषय असणारी रेल्वे चित्रात जवळपास मध्यभागी आहे. ती वेगानं आपल्या दिशेनं येत असल्याचा भास होतो. रेल्वेचं इंजिन आपल्याला स्पष्ट दिसतं. त्या मागचे सारे डबे आपल्या काहीसे अस्पष्ट दिसतात. हे सारे डब्बे उघडेच (छप्पर नसणारे) आहेत. पाऊस चालू असताना या उघड्या डब्यांवर बसून लोक भिजत प्रवास करत आहेत. खरंतर ही त्या काळातली गरीब लोकांसाठीची रेल्वे आहे. त्या काळात इंग्रज सरकारनं गरीब लोकांना स्वस्तामध्ये (एक पेनी) लंडन सारख्या शहराकडं येत यावं म्हणून ही रेल्वे सुरु केली होती. तंत्रज्ञानानं शक्य झालेला समाजातला मोठा बदल टर्नरनं आपल्या चित्रात नेमका टिपला होता.
काहींच्या मते वेगानं येणारी ही रेल्वे काळही दाखवते.. रेल्वेच्या मागं धूसर, अस्पष्ट झालेला भूतकाळ आहे.. चित्रात स्पष्टपणे दिसणारी एकमेव गोष्ट म्हणजे रेल्वेचं इंजिन - हे म्हणजे वर्तमानकाळ.. रेल्वेचा पुढचा मार्ग म्हणजे भविष्यकाळ.. गम्मत म्हणजे या साऱ्यांमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो तो फक्त वर्तमानकाळ !!
अगदी बारकाईनं पाहिलं तर आपल्याला रेल्वेच्या पुढं एक ससा धावताना दिसतो.. यात टर्नरला नेमकं काय दाखवायचं आहे याविषयी मात्र लोकांची निरनिराळी मतं आहेत.. मांजर आडवं गेलं तर आपलं काम होणार नाही ही जशी आपल्याकडं अंधश्रद्धा आहे तशी तिकडंही एक अंधश्रद्धा होती - 'ससा समोरून पळत गेला तर काहीतरी शोकांतिका घडते' !! त्यामुळं तंत्रज्ञानाच्या या झेपेमुळं काहीतरी दुःखद गोष्ट घडणार आहे असं टर्नरला दाखवायचं आहे असं काहींना वाटतं. तर काहींना सशाच्या जीवाला असणारा धोका पाहून तंत्रज्ञानामुळं/औद्योगिकीकरणामुळं निसर्गाला असणारा धोका दिसतो.
काही लोक या सशाचं संबंध थेट तिकडच्या पुराणाशी जोडतात !! ग्रीक पुराणात ओरायन (म्हणजे आकाशातलं मृग नक्षत्र) नावाचं एक पात्र आहे. याला तीन वडील असतात - झ्युअस, पोसायडान आणि हरमीझ. गम्मत म्हणजे हे तिघं पाणी, अग्नी आणि हवा यांच्याशी संबंधित आहेत. आपल्या चित्रातल्या इंजिनांचाही हवा, पाणी (वाफ) आणि अग्नी यांच्याशी जवळचा संबंध आहे. महत्वाचा भाग म्हणजे हा ओरायन सशाचा शिकारीसाठी पाठलाग करत असतो पण त्याच्या हाती ससा कधी लागत नाही. त्यामुळं तंत्रज्ञान (रेल्वे) आणि निसर्ग (ससा) यांच्या शर्यतीमध्ये तंत्रज्ञान निसर्गाला कधीच मागे टाकू शकणार नाही असं टर्नरला सुचवायचं आहे असं काहींना वाटतं !
चित्रातल्या नदीत नावेतून प्रवास करणाऱ्या २ व्यक्ती दिसतात. पारंपरिक पद्धतीनं मंद गतीनं, कष्टांनं नावेतून येणारे प्रवासी आणि आधुनिक पद्धतीनं आरामात बसून वेगानं येणारे रेल्वेतून येणारे प्रवासी यांच्यातली विसंगती पटकन लक्षात येण्यासारखी. उजव्या बाजूला इंग्लंडमधली शेती दिसते. यामुळं ग्रामीण इंग्लंड आणि औद्योगिकीकरणामुळं एका वेगळ्या दिशेला चाललेला इंग्लंड अशीही विसंगती आपल्याला ह्या चित्रात दिसते.
चित्रातल्या रेल्वेचा वेग इतका खरोखर वाटतो की १८४४ मध्ये चित्र प्रदर्शित झाल्यावर 'फ्रेझर्स मॅगझीन' या मासिकात या चित्राविषयी लिहिण्यात आलं होतं - 'हे चित्र पाहण्यासाठी वाचकांनी लवकरात लवकर जावं नाहीतर चित्रातली रेल्वे चित्रातून बाहेर निघून जाईल !!'
माणसाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा परिणामकारक दाखवल्यानं हे चित्र खूप गाजलं !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ :
🍁The Life and Masterworks of J M W Turner – Eric Shanes
🍁http://www.galleryintell.com/artex/rain-steam-and-speed-jmw-turner/
🍁http://rainsteamandspeedturner.blogspot.com/
🍁http://www.middlewaysociety.org/rain-steam-and-speed-1844-j-m-w-turner-1775-1851/
🍁https://thebeautyoftransport.com/2013/05/08/so-fast-its-just-a-blur-rain-steam-and-speed-by-j-m-w-turner/
🍁http://www.netnicholls.com/neh2000/paper/pages/txt01.htm
🍁http://www.uh.edu/engines/CD-RainSteamSpeed/track1.html
🍁https://youtu.be/N8mf9y6ziXA
🍁Image Credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:Turner_-_Rain,_Steam_and_Speed_-_National_Gallery_file.jpg
J. M. W. Turner [Public domain]
No comments:
Post a Comment