मुशाफिरी कलाविश्वातली
लोण्यातलं शिल्प - स्वप्न पाहणारी आयोलॅंथ
एका
सच्च्या कलाकाराला काहीतरी सुंदर कलाकृती बनवण्याचं आतून वेड असतं.
माध्यम कुठलंही असो, कलाकाराचा परीसस्पर्श
होताच त्यातून एक सुंदर कलाकृती
बाहेर पडते !! अमेरिकेत अशीच एक मनस्वी
कलाकार एकोणिसाव्या शतकात होऊन गेली - तिचं
नाव होतं कॅरोलिन ब्रूक्स.
कॅरोलिनमध्ये
कलागुण लहानपणापासूनच दिसत होते. चित्रकलेची
आणि रेखाटण्याची आवड तिला लहानपणापासूनच
होतो. शाळेत शिकताना शिल्पकाम करताना तिनं एका पूर्वी
होऊन गेलेल्या कवीचं मस्तक बनवलं होतं. १८५२ मध्ये वयाच्या
बाराव्या वर्षी मेणाची फुलं बनवल्याबद्दल तिला
एका स्पर्धेत सुवर्णपदकही मिळालं होतं. पुढं एका शेतकऱ्यासोबत
लग्न झाल्यावर कॅरोलिन वेगवेगळ्या ठिकाणी राहत शेवटी अर्कान्सास
या ठिकाणी स्थायिक झाली.
१८६७
साली कॅरोलिनच्या कुटुंबाचं कापसाच्या शेतीत चांगलाच नुकसान झालं. कॅरोलिन आता उत्पन्न मिळवण्यासाठी
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती. त्या
काळातल्या शेतकरी स्त्रिया नक्षीदार साचे वापरात लोण्याचे
(butter) नक्षीदार तुकडे करून विकायच्या. पण
कॅरोलिनच्या आतल्या कलाकाराला साचे वापरून नक्षीदार
लोण्याचे तुकडे बनवणं फारसं पटत नव्हतं. कॅरोलिन
आपली खास हत्यारं (झाडूच्या
काड्या, उंटाच्या केसांचा ब्रश वगैरे) वापरात
लोण्याच्या तुकड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम करायची. लोण्यावर
चेहरे कोरणं किंवा प्राणी कोरणं तिला सहज जमायचं.
तिचं कोरीव काम असणाऱ्या या
लोण्याच्या तुकड्यांना अर्थातच चांगली मागणी होती. तिनं हे काम
जवळपास दीड वर्षे केलं.
पण नंतर काही कारणानं
तिनं हे काम सोडून
दिलं.
पुढं
१८७३ मध्ये तिनं पुन्हा लोण्यामध्ये
कोरीव काम करायला सुरुवात
केली. त्याचं असं झालं की
तिच्या घरापासून जवळपास १०-१२ किलोमीटर
अंतरावर एक चर्च होतं.
या चर्चचं छप्पर तुटलं होतं. आणि हे छप्पर
दुरुस्त करण्यासाठी काही निधी गोळा
करायचा होता. एक प्रकारची जत्रा
भरणार होती. त्या जत्रेत कॅरोलिन
आपलं लोण्यावरचं कोरीव काम पाठवणार होती
आणि ते विकून जमा
झालेला पैसे चर्चच्या छप्पर
दुरुस्ती निधीमध्ये वापरला जाणार होता. कॅरोलिनचं लोण्यातलं कोरीव काम घेऊन तिचा
नवरा घोड्यावरून १०-१२ किलोमीटरचा
प्रवास करत जत्रेच्या ठिकाणी
पोहोचला. या कोरीव कामाला
इतकी किंमत मिळाली की त्यातून चर्चचं
छप्पर दुरुस्त झालं. या जत्रेत आलेल्या
एका माणसाला हे काम इतकं
आवडलं की त्यानं तिला
आपल्या कचेरीसाठी
एका लोण्यातल्या कोरीव कामाची ऑर्डर दिली.
याच
वर्षी शेवटी शेवटी कॅरोलिनच्या वाचनात एक पुस्तक आलं.
खरंतर त्यात एक नाटक होतं,
नाटकाचं नाव होतं 'राजा
रिनीची कन्या'. ह्या नाटकाचं कथानक
हृदयस्पर्शी होतं. त्यातली राजकन्या आयोलॅंथ ही अंध असते.
पण आपल्या कन्येला कसलंही दु:ख होऊ
नये म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला तिच्या अंधत्वाची
जाणीवच होऊ दिलेली नसते.
तिला 'दृष्टी' नावाची काही चीज असते
याची जाणीवच नसते. जसं आपल्याला काही
दिसत नाही तसं कुणालाच
दिसत नाही असं तिला
वाटत असतं. तिच्या सोळाव्या वाढदिवसाला तिला पहिल्यांदाच कळतं
की ती अंध आहे.
हे कथानक (विशेषतः राजकन्येचा व्यक्तिरेखा) कॅरोलिनला खूप भावलं. तिनं
राजकन्येचं एक लोण्यावरचं कोरीव
करायचं ठरवलं. यात तिला सत्य
समजण्याआधीची निरागस राजकन्या दाखवायची होती. आपल्या स्वप्नात हरवलेली राजकन्या तिनं यात दाखवली.
१८७४
मध्ये एका कलाप्रदर्शनात तिची
ही कलाकृती ठेवण्यात आली. ही लोण्याची
कलाकृती एका भांड्यात ठेवण्यात
आलेली होती आणि हे
लोणी वितळू नये म्हणून दुसऱ्या
बर्फ असणाऱ्या भांड्यात ठेवण्यात आलेलं होतं. ही कलाकृती प्रचंड
गाजली !! ही लोण्याची कलाकृती
आपल्याला पाहायला मिळावी म्हणून दोन आठवड्याच्या काळात
दोन हजार लोकांनी प्रदर्शनाला
भेट दिली. कॅरोलिनला ह्या कलाकृतीची खूपच
चांगली किंमत मिळाली. समीक्षक मंडळींनीही तिच्या कामाचं कौतुक केलं. न्यूयॉर्क टाइम्सनं लिहिलं की 'आजपर्यंत कुठल्याही
[स्त्री] शिल्पकारानं इतका दैवी नाजूकता
असणारा चेहरा दाखवलेला नाही जितका कॅरोलिननं
ह्या कलाकृतीत दाखवलाय..' !!
लोण्यामध्ये
शिल्पं होण्याची ही अमेरिकेमधली सुरुवात
होती !! ह्यानंतर कॅरोलिनला प्रसिद्धी मिळाली आणि तिनं लोण्यामधल्या
बऱ्याच कलाकृती बनवल्या.
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ :
🌷https://publicdomainreview.org/collection/the-butter-sculptures-of-caroline-s-brooks
🌷https://en.wikipedia.org/wiki/Caroline_Shawk_Brooks
🌷https://www.thevintagenews.com/2016/03/09/identified-butter-woman-caroline-shawk-brooks-first-known-american-sculptor-working-medium-butter/
🌷https://www.atlasobscura.com/articles/caroline-shawk-brooks-butter-sculptor-history
🍁Image Credit
🌷https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/a/a4/The_Dreaming_Iolanthe_from_Henrik_Hertz%27s_play_King_Ren%C3%A9%27s_Daughter_1876.jpg
🌷 Caroline Shawk Brooks [Public domain]
No comments:
Post a Comment