Wednesday, November 13, 2019

ऑफेलिया


मुशाफिरी कलाविश्वातली

ऑफेलिया

आजच्या काळात तंत्रज्ञानानं खूप मोठी भरारी घेतलीये.. आज एकमेकांशी संपर्क करणं, जगात काय चाललंय ते पाहणं, चित्रपट/नाट्य/संगीत या प्रकारचं मनोरंजनाच्या गोष्टींचा आस्वाद घेणं सर्वांना अगदी सहजरित्या उपलब्ध आहे..  हे सारं दीड-दोनशे वर्षांपूर्वी कुणाला सांगितलं असतं तर त्यावर कुणाचा विश्वासच बसला नसता !! त्यांना आजच्या काळाची कल्पना करणं खूप अवघड गेलं असतं..

त्या काळात अर्थातच टी व्ही नव्हता, मोबाइल, इंटरनेट, संगणक असलं काहीही नव्हतं.. आजच्या मानानं ते जीवन खूप साधं होतं.. या काळाची कल्पना करणं  कदाचित आज आपल्याला अवघड जाईल.. या काळातल्या इंग्लंडची आपण कल्पना करण्याचा आपण प्रयत्न करू.. या काळात मनोरंजन अर्थातच सहजासहजी उपलब्ध नव्हतं.. या काळात मनोरंजनाच्या मोजक्या साधनांपैकी एक म्हणजे त्या काळात वाचलं जाणारं साहित्य..
इंग्रजांमध्ये त्या काळातही जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या साहित्याचा एक भाग म्हणजे शेक्सपिअरचं लिखाण.. त्यातलं 'हॅम्लेट' हे नाट्य तर अर्थातच अजरामर.. त्या काळातही हॅम्लेटचं कथानक लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतं, लोकांच्या मनावर त्याचं एक प्रकारचं गारुड होतं..

या हॅम्लेटमध्ये एक पात्र होतं - ऑफेलिया.. हॅम्लेट नाट्यातली ती हॅम्लेटची प्रेयसी.. पण या नाट्यात अशा काही घटना घडत जातात की ऑफेलियाच्या वडिलांचाच हॅम्लेटच्या हातून खून होतो.. हॅम्लेट तर आधीपासूनच काहीसा वेड्यासारखा वागत असतो, पण ऑफेलियाही आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर धक्का बसल्यानं आणि तो धक्का सहन झाल्यानं थोडीशी वेड्यासारखी वागायला लागते.. ती यमक जुळवत कोड्यांमध्ये बोलू लागते.. मृत्यूविषयी काहीतरी विचित्र शब्द वापरात गीतं गाऊ लागते.. नंतर ऑफेलियाचा मृत्यू होतो.. नाट्यात प्रत्यक्ष ऑफेलियाचा मृत्यू दाखवलेला नाही.. त्यात ऑफेलियाच्या मृत्यूविषयी तिची आई बोलताना दिसते..

ऑफेलियाची आई सांगते की ऑफेलिया शोकाकुल अवस्थेत रानफुलांचे हार बनवत असते.. हार बनवण्यासाठी पानेफुले तोडण्यासाठी ती  झाडावर फांदीवर बसलेली असताना फांदी तुटल्यानं ती खाली ओढ्याच्या प्रवाहात पडते.. तिला शोक अनावर झालेला असतो.. आपण खाली वाहत्या ओढ्यामध्ये पडतोय याचंही तिला भान नसतं.. त्यामुळं पाण्यात पडतानाही ती गाणंच गात असते.. तिचे कपडे काहीशे जाड असल्यानं कपड्यात हवा अडकल्यानं काही क्षणांसाठी ती पाण्यावर तरंगते.. पण थोड्याच वेळात ती बुडून मरण पावते..

ऑफेलियाच्या आईनं ऑफेलियाच्या मृत्यूविषयी बोलताना असे काही शब्द वापरले आहेत की त्यामुळं ऑफेलियाच्या मृत्यूचं वर्णन हे इंग्रजी साहित्यातलं सर्वात काव्यमय वर्णनांपैकी एक मानलं जातं !! असं हे वर्णन संवेदनशील कलाकारांना साद घालेल तर नवलच.. या ऑफेलियावर बऱ्याच मोठमोठ्या चित्रकारांनी चित्रं काढलीत.. पण या सर्वांमध्ये विख्यात झाले ते जॉन मिलैस यानं काढलेलं तिच्या मृत्यूचं चित्र..

मिलैसनं हे चित्र काढण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले.. मूळ नाटकातला ऑफेलियाचा मृत्यू त्याला आपल्या चित्रामध्ये त्याला जिवंतपणे उतरायचा होता.. त्यानं हे चित्र दोन टप्प्यांमध्ये काढलं.. ओढा, निसर्ग या साऱ्या गोष्टी त्यानं बाहेर निसर्गात जाऊन काढल्या.. 

शेक्सपिअरनं मूळ नाट्यात वर्णन केलेली फुलं जशीच्या तशी काढण्याची त्यानं काळजी घेतली.. ऑफेलियाचं चित्र काढण्यासाठी अतिशय सुंदर अशी मॉडेल मिळवणं हे खूप महत्वाचं होतं.. त्या काळात चित्रकार मंडळी आपलं चित्र यशस्वी होण्यासाठी चित्रासाठी सुंदर (stunning) मॉडेल्स मिळवण्यासाठी खूप जागरूक असत.

एकोणीस वर्षांची एलिझाबेथ सिडाल मिलैसला मॉडेल म्हणून मिळाली.. ही एलिझाबेथ सिडाल नंतर अनेक जगप्रसिद्ध चित्रांसाठी मॉडेल झाली, एका महान चित्रकाराची पत्नी झाली - तिच्याविषयी आपण नंतर जाणून घेऊ.. तर ह्या चित्रासाठी मिलैस एलिझाबेथला बाथटबमध्ये पडायला सांगायचा.. आणि ती बाथटबमध्ये असताना तो तिचं चित्र काढायचा.. हे दिवस हिवाळ्याचे होते आणि युरोपमध्ये ह्या दिवसात पाणी थंडगार असायचं.. मॉडेलला त्रास होऊ नये म्हणून मिलैस बाथटबच्या खाली मेणबत्त्या पेटवायचा !! एके दिवशी बाथटबखालच्या मेणबत्त्या विझल्या, पण एलिझाबेथनं काहीही तक्रार केली नाही.. घरी गेल्यावर एलिझाबेथ चांगलीच आजारी पडली.. तिच्या वडिलांनी तिच्या उपचाराचा सारा खर्च मिलैसकडून वसूल केला !!



हे चित्र १८५२ मध्ये लंडनमधल्या रॉयल अकादमी मध्ये प्रदर्शित करण्यात आलं.. त्याला सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद मिळाला.. पण नंतर हे चित्र खूप गाजलं.. लॉरेन्स ओलिव्हिएरच्या हॅम्लेट चित्रपटात ऑफेलियाचा मृत्यू दाखवताना जो सेट वापरला तो याच चित्रावरून बनवला होता !!

- दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#
माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी

संदर्भ :

https://www.tate.org.uk/art/artworks/millais-ophelia-n01506/story-ophelia
https://www.widewalls.ch/john-everett-millais-ophelia/
https://www.youtube.com/watch?v=csJJWjtiRYY
https://www.youtube.com/watch?v=I2M7U8eCeHA
Image Credit:
John Everett Millais [Public domain]

No comments:

Post a Comment