मुशाफिरी कलाविश्वातली
टेकडीवरचा फेरफटका
निवांत
सुट्टीचा काळ असावा.. समुद्राकाठी
फिरायला जायला मिळावं.. समुद्राकाठी सुंदर हिरवळ असणारी टेकडी असावी.. या टेकडीवर फेरफटका
मारायला गेल्यावर छानपैकी वाहणारा वारा असावा.. समोर
अथांग समुद्र असावा. निरभ्र आकाश असावं.. असा
फेरफटका एक सुखद अनुभव
बनला तर त्यात आश्चर्य
ते काय.. जवळपास १४० वर्षांपूर्वी फ्रान्समधल्या
एका थोर चित्रकारानं हा
अनुभव त्यावेळी कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न केला..
हा चित्रकार होता क्लॉड मोने.
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा
सुरुवातीचा काळ यामध्ये त्यानं
कित्येक चित्रं काढली. त्याची चित्रं impressionist शैलीमधली होती. (impressionism या कलेतल्या विचारधारेला
मराठीत दृकप्रत्ययवाद
असं नाव आहे.) या
शैलीची खासियत आपण थोड्या वेळात
पाहूच. खरंतर दृकप्रत्ययवाद या विचारधारेला फ्रान्समध्ये
मोनेनंच सुरुवात केली असं मानलं
जातं !! हे चित्र समजून
घेण्यासाठी आपण या चित्राची
थोडीशी पार्श्वभूमी पाहूया.
१८७९
च्या दरम्यान मोनेच्या पत्नीचं निधन झालं. मोनेसाठी
हा धक्का होता. तिचं वय फक्त
३२ वर्षे इतकं होतं. तिच्या
निधनानंतरचे काही महिने मोनेसाठी
कठीण गेले. मोनेला दोन मुलं होती.
मोनेच्या मित्राची बायको एलिस हॉश्चिड या
दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी पॅरिसला घेऊन गेली. तिथं
स्वत:च्या मुलांसोबत तिनं
त्यांचाही सांभाळ केला. खरंतर एलिसची परिस्थिती इतकी चांगली नव्हती.
(तिचा नवरा म्हणजे मोनेचं
मित्र १८७८ मध्ये कंगाल
होऊन बेल्जीयमला गेला होता.) नंतर
मोने, एलिस आणि त्यांची
मुलं मोनेच्या गावात येऊन राहू लागले.
नंतर ते पॉइजी नावाच्या
ठिकाणीही राहायला गेले पण मोनेला
तिथंही चैन पडत नव्हता.
१८८२
मध्ये मोने पॉरविल्ले नावाच्या
ठिकाणी राहायला आला. हे निसर्गरम्य
खेडेगाव समुद्राच्या काठी होतं. या
गावातली माणसं प्रामुख्यानं मासेमारी करायचे. १८८२ मध्ये फेब्रुवारी
ते एप्रिलच्या दरम्यान मोने तिथं स्थायिक झाला. पण एलिस, एलिसची
मुलं आणि त्याची मुलं
अजून इथं आली नव्हती.
या काळात त्यानं एलिसला एका पत्रात लिहिलं
होतं - "इथलं ग्रामीण निसर्गसौंदर्य
किती बहरत चाललं आहे
!! इथला प्रत्येक कानाकोपरा तुला दाखवताना मला
खरंच किती आनंद होईल !!" खरंतर
अजून काही वर्षांनी (एलिसच्या
पतीच्या मृत्यूनंतर) या एलिसशी मोनेचं
लग्न होणार होतं.
जूनमध्ये
एलिस आणि मुलं तिथं
आली. जून म्हणजे तिथं
उन्हाळ्याची सुरुवात. युरोपमधला लोकांचा आवडता ऋतू. याच काळात
मोनेनं हे चित्र काढलं.
चित्रात दिसणाऱ्या व्यक्ती म्हणजे एलिस आणि तिची
मुलगी ब्लांच असं मानलं जातं.
चित्रात
आपल्याला सुंदर गवत आणि रानफुलं
असल्याचं जाणवतं. वारा वाहत असल्यासारखा
वाटतो (एलिस आणि तिच्या
मुलीचे कपडे एका बाजूला
वाऱ्यानं उडताना दिसतात.) निळ्याआकाशातल्या सूर्याचा स्पष्ट सूर्यप्रकाश जाणवतो. (टेकडीच्या एका बाजूला असणाऱ्या
गडद सावलीमुळं आपल्याला तसं जाणवतं.) समुद्र
काहीसा शांत वाटतो. आकाशात
हलकेसे ढग दिसतात. दृक्प्रत्ययवादाच्या
विशिष्ट शैलीमुळं हे चित्र जिवंत
होतं.
हे चित्र दृकप्रत्ययवादाच्या शैलीत काढलंय. या शैलीत समोरच्या
दृश्यावर एक नजर टाकल्यावर
आपल्यावर एक प्रकारची छाप
(impression) पडते ते चित्रात दाखवण्याचा
प्रयत्न केला जातो. पारंपरिक
चित्रं काढण्याच्या पद्धतीपेक्षा ही बरीच वेगळी
होती. पारंपरिक प्रकारात चित्रं बरीच तयारी करून,
कित्येक रेखाटनं काढून झाल्यावर काढली जात. ती बहुतेक
वेळा स्टुडिओमध्ये काढली जात. दृकप्रत्ययवादाची चित्रं
मात्र उत्स्फूर्तपणे निसर्गात काढली जात. ही चित्रं
रूढ अर्थानं बऱ्याचदा काहीशी ओबडधोबड असायची. दृकप्रत्ययवादी चित्रकार एखादा क्षण टिपण्याचा प्रयत्न
करायचे. ते रंग एकमेकात
खूप प्रमाणात मिसळू द्यायचे नाही. त्यामुळं चित्रांमध्ये शुद्ध रंगांचा वापर व्हायचा. रंगाचे
छोटे छोटे फटकारे वापरायचे. आपण हे चित्र
जवळून (झूम करून) पाहिलं
तर आपल्याला सुटे रंग, छोटे छोटे फटकारे या गोष्टी
स्पष्ट दिसतात. या दृक्प्रत्यवादाचा इतिहास
आणि त्या चळवळीतल्या देशोदेशींच्या
चित्रकारांनी काढलेली चित्रं आपण नंतर पाहूच.
या चित्राचा क्ष-किरणांनी अभ्यास
केल्यावर अजून एक गोष्ट
स्पष्ट होते - सुरुवातीला या चित्रात तीन
व्यक्ती होत्या पण मोनेनं नंतर
कुणातरी एकाला (किंवा एकीला) चित्रातून काढून टाकलं !!
हे तैलचित्र ६६.५ X ८२.३ सेमी आकाराचं
असून ते शिकागोमधल्या आर्ट
इन्स्टिट्यूटमध्ये आहे.
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ :
🍀http://www.visual-arts-cork.com/history-of-art/impressionism.htm
🍀https://en.wikipedia.org/wiki/The_Cliff_Walk_at_Pourville
🍁Image Credit
🍀Claude Monet
[Public domain]
No comments:
Post a Comment