Saturday, July 28, 2018

रोदँचं एक शिल्प

कुतूहल कलाविश्वातलं

रोदँचं एक शिल्प

सर्वसाधारण चौदाव्या शतकातला काळ. या काळात इंग्लंड आणि फ्रांस यांच्यामध्ये एक दीर्घकाळ चाललेले युध्द झाले होते. हे युध्द 'शंभर वर्षांचे युद्ध' म्हणून ओळखले जाते. या युद्धादरम्यानची एक गोष्ट.
फ्रांसवर विजय मिळवण्याचा इंग्लंडच्या राजाचा (एडवर्ड) निश्चय पक्का होता. फ्रांसमधल्या समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या कलाय्स या शहराला त्यानं वेढा घातला. या शहराला भक्कम दगडी तटबंदी होतीच, शिवाय उंच तटबंदीला लागूनच बाहेर खोल असा खंदक होता. या खंदकामध्ये सतत पाणी वाहायचं. त्यामुळं हल्ला करून शहर जिंकणं जवळपास अशक्यच होतं. अातमध्ये जाणारे अन्नपाणी बंद झाले. शहरातल्या नागरिकांचे हाल सुरु झाले. उपासमार होऊ लागली.

जवळपास अकरा महिन्यांच्या वेढ्यानंतर शहरातले नागरीक हताश झाले. आपल्या राजानं येऊन आपली सुटका करावी असं त्यांना वाटायचं पण तसं काही घडलं नाही. ते शरण जायला तयार झाले. यावेळी एडवर्डने एक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार शहरातील सहा स्थानिक नेते कैद्यांसारखे एक एक वस्त्रच परिधान करुन, गळ्यामध्ये एक प्रकारची पट्टी बांधून, शहरातल्या महत्वाच्या ठिकाणच्या किल्ल्या घेऊन जर एडवर्डकडे गेले तर एडवर्ड शहरातल्या इतर नागरिकांना अभय देणार होता. पण या सहा नागरिकांना मात्र मृत्यूला सामोरं जावं लागणार होतं.

शहरातला सेंट पिअर नावाचा एक धनाढ्य नेता या बलिदानासाठी सर्वप्रथम तयार झाला. त्याच्यासोबत अजून पाच लोकही तयार झाले. हे सहा लोक एडवर्डच्या मागणीनुसार किल्ल्या घेऊन निघाले. या सर्वांचे नेतृत्व सेंट पीटरने केले. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी ते वीरांना साजेल असे बलिदान करत होते. मृत्युला मिठीत घेण्याची त्यांची तयारी होती. पण शत्रूला शरण जाण्याचं दुःखही होतं. यानंतर कथेला थोडीशी कलाटणी मिळाली - ती आपण नंतर पाहूच.

साडेपाचशे वर्षांनंतर या शहराच्या नगरपालिकेनं या सहा नागरिकांपैकी सेंट पिअरचा पुतळा उभा करायचा ठरवला. नंतर विश्वविख्यात झालेल्या शिल्पकार रोदँ याला हे काम मिळालं. रूढ परंपरेपेक्षा वेगळ्या प्रकारे कलाकृती बनवून एका प्रकारचा धोका पत्करण्याची रोदँची सवय होती. त्यानं सहाही नागरिकांचं एका वर्तुळामध्ये शिल्प बनवलं. हे शिल्प रस्त्याच्याच उंचीवर असणार होतं. (म्हणजे पुतळ्यांसारखं जास्त उंचीवर नसणार होतं) रोदँनं या सहा नागरिकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जिवंत दाखवले आहेत - ते रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांना स्पष्टपणे दिसणार होते. या शिल्पात ते सहा नागरिक एडवर्डकडं जाताना दाखवलेले आहेत. सारे अनवाणी आहेत. शिल्पामध्ये सहाही नागरिकांना समान महत्व दिल्यासारखे वाटते. हे शिल्प नंतर अर्थातच जगप्रसिद्ध झाले.

कथेचा पुढचा भाग - हे सहा नागरिक एडवर्डकडं गेल्यानंतर त्यानं सहाही जणांच्या शिरच्छेदाचा आदेश दिला. पण त्याच्या गरोदर असणाऱ्या राणीनं त्या सहा जणांना प्राणदान देण्याचा आग्रह केला. (अापल्याला होणाऱ्या मुलाला शाप लागू नये म्हणून. शिवाय ही राणी मुळची उत्तर फ्रांसमधलीच होती. म्हणजे तिचं माहेर तिकडचंच होतं.) राजाला पटवून देण्यात ती यशस्वी झाली. ह्या सहा जणांना राणीनं चांगले कपडे देऊन, जेवण देऊन प्राणदान दिलं. अर्थात ह्यातला बराचसा इतिहास (विशेषतः राणीचं उदात्तीकरण) फ्रेंच माणसानं लिहिला असल्यानं त्यावर शंका घेतली जाऊ शकते.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स



 

No comments:

Post a Comment