Friday, March 6, 2020

ज्युडिथ


मुशाफिरी कलाविश्वातली

ज्युडिथ

बायबलच्या जुन्या करारात एक विलक्षण कथा येते. ही कथा आहे बॅबिलोनिया आणि इस्रायल ह्या प्रदेशातली. बॅबिलोनियाच्या प्रदेशात (आजच्या काळातला इराक) नेब्युकड्नेझर नावाचा एक राजा होऊन गेला. बायबलमधल्या उल्लेखाप्रमाणं हा चांगला राजा नव्हता. आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी या राजानं बऱ्याचशा राज्यांना शरण यायला सांगितलं. जी राज्यं शरण यायला तयार नव्हती त्यांना आपल्या साम्राज्याला जोडण्यासाठी त्यानं आपला सेनापती होलोफर्नेस याला प्रचंड सेनेसहित पाठवलं. होलोफर्नेस शरण न येणाऱ्या राज्यातल्या लोकांना अक्षरश: जाळत, त्यांचा विनाश करत निघाला. शरण येणाऱ्या लोकांना तो मारायचा नाही पण त्यांची मंदिरं, मूर्त्या तो नष्ट करायचा. कारण त्याच्या मते सर्वांनी नेब्युकड्नेझर राजाची पूजा करायला हवी होती !!

होलोफर्नेसची इस्रायलच्या दिशेने वाटचाल चालूच होती. त्याची नजर इस्रायली लोकांच्या जेरुसलेम शहरावर होती. पण जेरुसलेमला जाण्याआधी त्याला वाटेत बेथूलिया नावाचे नगर लागलं. हे नगर टेकडीवर होतं. पुढच्या प्रवासासाठी त्याला बेथूलिया पार करूनच जावं लागणार होतं. या बेथूलियाला भक्कम तटबंदी होती. प्रचंड सैन्य सोबत असलं तरी त्याला ही तटबंदी भेदून जाणं शक्य नव्हतं.

होलोफर्नेसच्या सैन्यानं बेेेथुलिया नगराला वेढा घातला. बेथुलियाच्या नगरवासियांनी शरण यावं अशी होलोफर्नेसची मागणी होती.  नगरवासियांना मुख्य समस्या होती ती पाण्याची. काही दिवसात नगरातला पाण्याचा साठा संपू लागला. लोक भोवळ येऊन रस्त्यावर पडू लागले. लोकांचा धीर सुटू लागला. सर्वांनी नगरप्रमुखाला दोषी ठरवायला सुरुवात केली. शरण गेल्यानं नागरवासियांना त्यांच्या देवाऐवजी होलोफर्नेसच्या राजाची पूजा करावी लागणार होती, गुलामीचं जीवन जगावं लागणार होतं. पण जगायला मिळणार होतं !! पाण्याशिवाय ते जगणारच नव्हते. नगरप्रमुखानं तिथल्या रहिवाश्यांना पाच दिवसात परमेश्वरानं काही मदत केली नाही तर शत्रूला शरण जाण्याचं वचन दिलं.

याच नगरात आर्थिक परिस्थिती चांगली असणारी एक ज्युडिथ नावाची विधवा राहायची. दिसायला देखणी असणाऱ्या या विधवेचं चरित्र अतिशय शुद्ध होतं. आर्थिक सुस्थिती असूनही ती विरागी जीवन जगणं पसंत करायची. तिच्या नवऱ्याचा मृत्यू तीन वर्षांपूर्वी उष्माघातानं झाला होता.

नगरप्रमुखाचा शरण जाण्याचा निर्णय तिला मुळातच पटलेला नव्हता. तिनं नगरप्रमुखासहीत इतर ज्येष्ठ मंडळींना स्वत:च्या घरी बोलावलं. तिनं आपले विचार सांगितल्यावर नगरप्रमुखानं  तिच्या मताकडं दुर्लक्ष केलं. ती एक स्त्री असल्यानं तिनं फक्त प्रार्थना करावी आणि निर्णय घेण्याचं काम पुरुषांकडं सोपवावं असं नगरप्रमुखानं सुचवलं. आता त्याच्या मताकडं तिनं दुर्लक्ष केलं.

तिनं स्वत:च काहीतरी करायचा निर्णय घेतला. तिनं मनात काहीतरी बेत आखला. परमेश्वराची प्रार्थना करत तिनं स्वत:ला व्यवस्थित खोटं बोलता यावं अशी इच्छा व्यक्त केली. तिनं परमेश्वराची प्रार्थना केली. प्रार्थना संपल्यावर तिनं आपल्या विश्वासू मोलकरणीला बोलावलं. मोलकरणीसोबत तिनं आपल्या बेतावर चर्चा केली. आणि लगेच बेताप्रमाणं काम करायला सुरुवातही केली.

तिनं स्नान केलं. (नगरातला पाण्याचा प्रचंड तुटवडा लक्षात घेता स्नान करणं ही मोठी गोष्ट होती.) सुगंधी अत्तराचा वापर करत सुंदर वस्त्रं परिधान करत, काही दागिन्यांसहित ती सजली आणि आपल्या मोलकरणीसहित ती घराबाहेर पडली. नगराच्या प्रमुख दरवाजाजवळ नगरप्रमुख आणि काही ज्येष्ठ मंडळी उभी होती. दरवाजा उघडण्यात आला. ज्युडिथ आणि तिची मोलकरीण बाहेर पडल्या आणि खाली शत्रूसैन्याच्या तळाकडे चालत गेल्या.

खाली शत्रूसैन्याच्या तळाकडं आल्यानंतर त्यांना गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांनी अडवलं. त्यांची ओळख विचारली. ज्युडिथनं सांगितलं की त्या बेथुलियामधुन पळून आल्या आहेत, त्यांच्या मागं बेथूलियाचे लोक लागलेले आहेत. एक सैनिकही न गमावता बेथूलिया नगर कसं जिंकायचं ते गुपित तिला होलोफर्नेसला सांगायचं होतं असं तिनं सुरक्षारक्षकांना सांगितलं. तिच्या सौंदर्यानं प्रभावित झालेल्या सुरक्षारक्षकांनी त्या दोघींना होलोफर्नेसच्या तंबूकडं नेलं.

तंबूमध्ये आराम करत असणारा होलोफर्नेस त्यांच्या स्वागतासाठी बाहेर आला. त्यानं सुरुवातीलाच सांगितलं की त्याचा मालक म्हणजे राजा नेब्युकड्नेझर याच्याशी निष्ठा ठेवणाऱ्या कुणालाही त्यानं आजपर्यंत कसलीही इजा केलेली नव्हती. खरंतर, तो  हे खोटं बोलला होता. ज्युडिथनं सांगितलं की नेब्युकड्नेझर आणि होलोफर्नेस यांच्या प्रतिभेविषयी आणि त्यांच्या विचारपूर्वक योजना करून केलेल्या लष्करी कारवायांविषयी तिनं बरंच ऐकलेलं होतं आणि तिला या दोघांचं खूप कौतुक वाटायचं. अर्थातच तीही धडधडीत खोटं बोलली होती. तिच्याइतकी सुंदर असणारी आणि विचारपूर्वक बोलणारी स्त्री होलोफर्नेसनं पूर्वी कधीच पाहिलेली नव्हती असं होलोफर्नेसनं बोलून दाखवलं.

ज्युडिथ आणि तिची मोलकरीण यांची एका वेगळ्या तंबूत राहण्याची सोय झाली. त्या दोघीजणी ३ दिवस त्या तंबूत राहिल्या. स्वत:चं अन्न त्या स्वत:च बनवून खायच्या.
चवथ्या दिवशी होलोफर्नेसनं त्या दोघींना जेवणासाठी बोलावलं. खरंतर होलोफर्नेस ज्युडिथच्या सौंदर्यानं वेडावून गेला होता आणि त्याला काहीही करून ज्युडिथ मिळवायची होती !!

याच दिवशी नंतर त्याच्या तंबूमध्ये ज्युडिथनं होलोफर्नेसला इतकं मोहित केलं की तो भान हरपून गेला. त्यानं तिला प्यायला मद्य देऊ केलं. पण तिनं ते नाकारत तिच्या मोलकरणीनं दिलेलं मद्य (wine) पिलं. होलोफर्नेस इतकं मद्य पीत गेला की त्याला नशेत काहीच भान उरलं नाही. एकेक करत होलोफर्नेसचे सारे सेवक बाहेर गेले. तंबूत फक्त होलोफर्नेस आणि ज्युडिथ उरले.

हाच तो क्षण होता !! ज्युडीथनं परमेश्वराकडं शक्ती मागितली. तिनं होलोफर्नेसची तलवार घेतली आणि साऱ्या शक्तीनिशी होलोफर्नेसचं शीर धडापासून अलग केलं !! त्याचं कापलेलं मस्तक तिनं एका कापडात गुंडाळलं आणि आपल्या मोलकरणीला दिलं. मोलकरणीनं ते जेवणाच्या टोपलीत ठेवलं !! यानंतर ज्युडिथ आणि तिची मोलकरीण गुपचूपपणे शत्रूसैन्याच्या तळातून आपल्या नगराकडं परत आल्या.

नगराच्या दरवाजाजवळ आल्यावर त्यांनी तिथल्या रक्षकांना हाक मारून दरवाजा उघडायला सांगितला. नगरात प्रवेश केल्यावर तिनं लोकांना कापून आणलेलं होलोफर्नेसचं डोकं दाखवलं. त्याचं मस्तक पाहून सारे लोक अर्थातच अचंबित झाले.

ज्युडिथ एवढ्यावरच थांबली नाही. तिनं पुढच्या दिवशी काय करायचं याच्या सूचना लोकांना दिल्या. होलोफर्नेसचं डोकं सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं लटकावयाला सांगितलं. आणि पहाटे सर्वांना शस्त्रं घेऊन मोठमोठ्यानं आरोळ्या ठोकायला सांगितल्या. या आरोळ्या ऐकून शत्रूसैन्यातले लोक होलोफर्नेसला सांगायला जातील असा तिचा अंदाज होता. आणि त्याच्या तंबूत गेल्यावर त्याचं मस्तकरहित शरीर पाहून त्यांना चांगलाच धक्का बसणार होता! त्यामुळं ते भयभीत होऊन पळून जाणार होते.

दुसऱ्या दिवशी नेमकं असंच घडलं. बेथुलियाच्या लोकांच्या आरोळ्या ऐकल्यावर शत्रुचे सैनिक होलोफर्नेसला सांगायला गेले. होलोफर्नेस जिवंत नाही हे लक्षात आल्यावर शत्रूसैन्य भयभीत होऊन पळून जाऊ लागलं. गनिमी काव्यात तरबेज असणाऱ्या इस्रायली लोकांनी मग नेता नसणाऱ्या शत्रूसैन्याचा सहजच पराभव केला !!

ज्युडीथची ही कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. ह्या कथेनं कुठल्याही संवेदनशील कलाकाराच्या मनाला साद न घातली तरच नवल !! ह्या कथेवर पाश्चात्त्य कलाकारांनी अक्षरश: हजारो चित्रं काढली. ज्युडीथचं चित्र काढण्याचा मोह भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनाही आवरला नाही !

१५९९ मध्ये कॅरॅवॅज्जिओ या चित्रकारानं काढलेल्या चित्रात तिघांच्याही चेहऱ्यावरचे ( विशेषतः मोलकरीणीच्या चेहऱ्यावरचे) हावभाव पाहण्यासारखे आहेत. यात आपल्याला ज्युडिथ शिरच्छेद करताना दिसते.


१६२० च्या दरम्यान सायमन वाउटनं काढलेल्या चित्रात कापलेलं शीर हातात घेतलेली ज्युडिथ पाहायला मिळते.


१८४० मध्ये एका हातात तलवार आणि एका हातात होलोफर्नेसचं कापलेलं मस्तक असणारं चित्र रिडेलनं काढलंय. 

१४७० साली बोत्तिसेली या चित्रकारानं परतीच्या वाटेवरची ज्युडिथ दाखवलीये.


आतापर्यंत हजारो चित्रं काढण्यात आलेल्या या ज्युडीथवर भविष्यकाळातही उत्तमोत्तम कलाकृती होतील यात शंका नाही !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

🌹http://www.womeninthebible.net/women-bible-old-new-testaments/judith/
🌹http://www.womeninthebible.net/bible-paintings/judith-and-holofernes/
🌹https://www.biblicalarchaeology.org/daily/people-cultures-in-the-bible/people-in-the-bible/judith-a-remarkable-heroine/
🌸 Image Credit:
🌹Attributed to Simon Vouet / Public domain
🌹Sandro Botticelli / Public domain  
🌹August Riedel / Public domain

No comments:

Post a Comment