Friday, February 28, 2020

खगोलशास्त्री कोपर्निकस


मुशाफिरी कलाविश्वातली

खगोलशास्त्री कोपर्निकस

आजच्या काळात विज्ञान खूप पुढं गेलंय. सगळेजण लहानपणापासून विज्ञान शिकत असल्यानं विज्ञानाची मुळं सर्वत्र खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळं आपल्याला युरोपमध्ये ५०० वर्षांपूर्वीची स्थिती कशी असेल याची कल्पना करणं थोडंसं अवघड जाईल. विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी आहे आणि सूर्य, चंद्र, तारे सारे पृथ्वीभोवती फिरतात असं या काळात मानण्यात यायचं !! प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या काळापासून शतकानुशतके विश्वाच्या रचनेचं हेच मॉडेल शिकवण्यात यायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्य, चंद्र, ग्रह तारे पृथ्वीभोवती फिरताना सगळ्याच माणसांना स्पष्टपणे दिसायचे. आणि आपण ज्या जमिनीवर राहतो ती जमीन, पृथ्वी स्थिर असल्याचं प्रत्येकजण क्षणोक्षणी अनुभवत होता. त्यामुळं स्थिर असणाऱ्या पृथ्वीभोवती सूर्य,चंद्र, ग्रह, तारे फिरतात ह्या गोष्टीवर शतकानुशतकं सर्व लोकांचा १००% विश्वास होता !!

या काळात (सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला) पोलंडमधला खगोल शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यानं इतरांपेक्षा वेगळा विचार केला. पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असं त्याला वाटायचं. खरंतर १५१४ मध्ये त्यानं आपल्या मित्रांना आपले विचार बोलूनही दाखवलेले होते. पण त्यानं हे विचार त्यावेळी प्रकाशित केले नाहीत. त्यानं मृत्यूच्या थोडंसं अगोदर म्हणजे १५४३ साली हे विचार एका पुस्तकातून (On the Revolutions of the Heavenly Spheres) प्रकाशित केले. १५४३ मध्ये ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासोबतच विज्ञानातल्या क्रांतीला सुरुवात झाली असं मानण्यात येतं. अर्थातच यानंतर विज्ञानाची घोडदौड कधीच थांबली नाही. त्यामुळं  विज्ञानाच्या इतिहासातला १५४३ हा एक प्रचंडच महत्वाचा टप्पा मानण्यात येतो.

एकोणिसाव्या शतकात पोलंडमध्ये एक महान चित्रकार होऊन गेला जॅन मॅतेको. या चित्रकाराला आपल्या मातृभूमीविषयी प्रचंड प्रेम होतं आणि आपल्या देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या प्रसंगांवर त्यानं एकाहून एक उत्कृष्ठ चित्रं काढली. १८७३ साली कोपर्निकसच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण होणार होती. १५४३ साली कोपर्निकसनं प्रकाशित केलेलं पुस्तक हा जसा विज्ञानाच्या इतिहासातला सुवर्णक्षण होता तसा तो पोलंडवासीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. कोपर्निकसच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं त्यानं कोपर्निकसचं एक चित्र काढायचं ठरवलं.

हे चित्र एक महान कलाकृती बनण्यासाठी त्यानं खूप कष्ट घेतले. कोपर्निकसच्या आयुष्याचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला. सोबत दिलेलं चित्र काढण्यापूर्वी त्यानं कित्येक रेखाटनं काढून पाहिली, दोन कच्ची तैलचित्रंही काढली. आपल्याला चित्रातून जे काही पोहोचवायचं आहे ते रसिकांपर्यंत नीट पोहोचावं आणि त्या अर्थानं आपलं चित्र एक उत्तम कलाकृती बनावी याचा त्याला नेहमीच विलक्षण ध्यास असायचा. क्रॅको या शहरातल्या आपल्या जुन्या छोट्याशा फ्लॅटमध्ये त्यानं १८७२ मध्ये हे चित्र काढायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं चित्र पूर्ण झालं.


या चित्रात आपल्याला पहाट होण्याआधीचं रात्रीचं दृश्य पाहायला मिळतं. कोपर्निकस आपल्या कामात गढून गेलाय, त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळं त्याला काहीतरी सत्य गावसलंय असं भासतं. त्याच्या हातात मापन करण्याचं एक साधन आहे. आजूबाजूला काही ग्रंथ दिसतात.  मागच्या बाजूला चर्चचं शिखर दिसतं. आकाशात चमचमणारे तारे दिसतात. आजूबाजूला दोरी आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी लागणारी काही उपकरणं दिसतात. सूर्याभोवती फिरणारे ग्रह दाखवणारी, त्याचा सिद्धांत मांडणारी एक आकृती त्याच्या बाजूला दिसते. जुन्या काळातला एक दिवाही दिसतो. चित्र अतिशय जिवंत वाटतं आणि आजूबाजूला अंधार असताना कोपर्निकसवर पडणारा प्रकाश खूप काही सुचवतो !!!  

दुर्दैवाचा भाग असा होता की कोपर्निकसच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं जो उत्सव आयोजित केला जाणार होता त्याच्या आयोजकांना या चित्रात फारसा रस नव्हता !! त्यांनी हे चित्र त्या उत्सवात प्रदर्शित करायला स्पष्ट नकार दिला. जर्मनीमधल्या एका शहरातील नगरपालिकेनं हे चित्र विकत घेण्याची तयारी दाखवली. पण या चित्रकारानं हे चित्र विक्री करून पैसे कमावण्याच्या उद्देशानं काढलं नव्हतं. त्यामागं पोलंडविषयी वाटणारं प्रेम आणि अभिमान होता. त्यामुळं जर्मनीतल्या नगरपालिकेला त्यानं हे चित्र द्यायला नकार दिला. शेवटी क्रॅकोमध्ये त्यानं स्वत:च्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं. या प्रदर्शनात झालेल्या विक्रीतून मिळालेला पैसे त्यानं सामाजिक संस्थांना दान केला. क्रॅकोमधल्या लोकांनी पैसे जमा करून हे चित्र नंतर विकत घेतलं आणि क्रॅकोच्या विद्यापीठात दिलं !! हे चित्र तिथं आजही पाहायला मिळतं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ :

🌺https://www.nationalgallery.org.uk/exhibitions/conversations-with-god-copernicus-by-jan-matejko
🌺https://en.wikipedia.org/wiki/Astronomer_Copernicus,_or_Conversations_with_God
🌺https://www.dailyartmagazine.com/jan-matejko-the-painter-of-polish-history/
🌺http://origins.osu.edu/milestones/february-2016-400-years-ago-catholic-church-prohibited-copernicanism
🌺https://en.wikipedia.org/wiki/Jan_Matejko

🍁Image Credit:
🌺https://commons.wikimedia.org/wiki/File:Jan_Matejko-Astronomer_Copernicus-Conversation_with_God.jpg
🌺Jan Matejko / Public domain


No comments:

Post a Comment